गुगल इंडियाच्या सहकार्याने नुकतीच ‘विमेन विल टुडे’ परिषद आयोजित करण्यात आली होती. स्त्रियांच्या सक्षमीकरणाला इंटरनेटची जोड दिल्यास काय बदल घडू शकतात, या संदर्भात लखलखती उदाहरणं सादर करणाऱ्या या परिषदेत स्रियांची वेगळीच, समर्थ रूपं पाहायला मिळाली.
‘जब मैं गाव में गोल्ड मेडल जितके आयी तो देखा की गाव का माहौल ही बदल गया था.’ ८० वर्षांची रायफल दादी जेव्हा तिचे अनुभव सांगत असते तेव्हा आपल्याला भारावून जाण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याच्या अशा टप्प्यावर फक्त नातवंडांबरोबर खेळणं आणि घरची पारंपरिक कामं करणं हेच उरलंय, असं समजण्यापेक्षा रायफल दादीने आपला वेळ रायफल शूटिंगमध्ये घालवणं पसंत केलं. आज या प्रकाशी दादींकडे २५ ते ३० मेडल्स आहेत आणि इथवर थांबण्याचा त्यांचा अजिबात निर्धार नाहीये, या दादींना आणि अशा अनेक स्त्रियांना ऐकण्याचा योग आला ते गुगल इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘विमेन विल टुडे’ या परिषदेत. स्त्रियांच्या सक्षमीकरणास इंटरनेटची जोड दिल्यास काय बदल घडू शकतात या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
‘‘अगं, जरा ना ते लोकर विणायचे व्हिडीओज दाखव ना मला कॉम्प्युटरवर. त्यावर म्हणे सुंदर सुंदर डिझाइन्स असतात. कालच मला मनीषा म्हणत होती. तिने तर घरी बनविलेसुद्धा.’’ ‘‘हं बघू..’’ आई मुलांचा हा थोडय़ाफार फरकाने सारखाच असलेला संवाद शहरातील बऱ्याच घरात एकायला मिळतो. पालकांना आणि त्यातही आईला इंटरनेट शिकविणं हे मुलांना कटकटीचं आणि वेळखाऊ वाटतं. ‘‘तुला काय गरज आहे आता हे सगळं शिकायची? मी दाखवेन तुला, मला वेळ मिळाला की.. उगाच काहीतरी बटण दाबशील आणि खराब होईल. मी घरी असेन तेव्हा सांगेन.’’ साधारण या वाक्यावर आपले संवाद संपतात.
स्त्री सक्षमीकरण हा विषय किंवा हा मुद्दा आपण भ्रष्टाचार, जागतिकीकरण इत्यादी मुद्यांसारखा गेली कित्येक वर्षे फक्त चघळतोय आत्मसात नाही करीत आहोत. हा मुद्दा मुळात केवळ एक स्वतंत्र मुद्दा नाहीये तर अनेक प्रश्न त्याच्या भोवती रिंगण घालतात, काही प्रश्न तर असे असतात की ज्यांच्या अस्तित्वाची आपल्याला चाहूलसुद्धा लागलेली नसते.
शहरात राहणारी, उच्चशिक्षित, एका मोठय़ा कंपनीत चांगल्या हुद्दय़ावर काम करणारी शालिनी, महत्त्वाकांक्षी आणि स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा मनात बाळगणारी. शालिनीचं लग्न झालं आणि त्यानंतर काहीच वर्षांत तिला आईपणाची चाहूल लागली. मॅटर्निटी लिव्ह (maternity leave) वरून ती परत कामावर रुजू होतेय तोवर करिअर की आईपण हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित केला गेला. तिच्या कल्पनेपलीकडचा असा हा प्रश्न इतक्या मोठय़ा कंपनीकडून विचारला जावा..? तिने अशा प्रश्नाची कधी अपेक्षाच केली नव्हती.. प्रसूतीच्या रजेवरून परत आलेली बाई जगाच्या अशी किती दशके पाठीमागे पडलेली असते..? प्रसूतीनंतर स्त्रीच्या शारीरिक झिजेबरोबरच तिची बौद्धिक झीजही होते अशी मानसिकता ठेवणारे लोक आजही अस्तित्वात आहेत? अचानक तिच्यातल्या कर्तबगार कर्मचाऱ्याच्या जागी घरात राहून मूल सांभाळणारी बाई का दिसायला लागते? हे आणि असले अनेक प्रश्न मनात घेऊन तिने स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि आज ती अनेक स्त्रियांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यात मोलाचे सहकार्य करते. आपण पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या मोठय़ा शहरात राहतो. स्त्री मागे पडणे किंवा तिला सापत्न वागणूक मिळणे या स्पर्धात्मक दुनियेत शक्य नाही असं आपल्यातील बहुतेकांना वाटतं. मात्र शहरी स्त्रियांनाही या भेदभावाची झळ पोहोचतेच.
आजकाल झालंय काय की शिक्षण तर आपण सर्वच घेतो, पण त्याने आपण फक्त शिक्षित होतो सुशिक्षित नाही. स्त्रीशिक्षणाचे प्रयत्न शतकानुशतके सुरू आहेत आणि ते ध्येय अजूनही साध्य होत नाही याचं खापर कोणावर फोडायचं याबाबत समाज आणि समाजानं निवडून दिलेले सरकार यात कायम रस्सीखेच चालू असते. गावांमध्ये अजूनही स्त्रीशिक्षण हे गरजेपेक्षा चैनीची बाब मानली जाते ही खरंतर आत्यंतिक खेदाची गोष्ट आहे. पण हीच चैन जोपासणारी माणसंही हळू हळू वाढायला लागली आहेत. हेच काय त्या खेदावरचं मलम. अशीच एक गोष्ट सांगितली ती तिथे आलेल्या लक्ष्मी राणीने. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीला शिकण्याची खूप हौस आणि मग त्यासाठी एक-दोन तास चालत शाळेत पोहोचण्याची खमकी तयारी. तिच्या आईवडिलांनी तिला तेवढं शिकवलंही, पण मग कॉलेजला जायची वेळ आली तेव्हा मात्र आमच्यानं हे झेपणार नाही असं म्हणून तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मात्र लक्ष्मीच्या नवऱ्यानं तिला पुढे शिकवलं आणि लक्ष्मीसुद्धा अगदी मन लावून शिकली. याच्याच साथीने तिच्या नवऱ्यानं तिची इंटरनेटशी तोंडओळख करून दिली. अचानक एके दिवशी शिक्षक असलेल्या तिच्या नवऱ्याचा मोठा अपघात झाला, त्या अपघातासोबतच काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या बढतीच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा या प्रश्नाने तिच्या नवऱ्याला ग्रासलं. कारण परीक्षेची पुस्तकं सहजासहजी मिळेनात आणि ती आणण्यासाठी जिल्ह्य़ाच्या बाजारापर्यंत जावं लागणार होतं, आणि हा तर अंथरुणालाच खिळलेला, परीक्षेला बसण्याची आशा आणि हिंमत दोन्ही गमावलेला. त्याच्या पत्नीने म्हणजेच लक्ष्मीने या सरस्वतीला इंटरनेटद्वारे आपल्या घरी आणले. तिने ही सारी संदर्भ पुस्तकं इंटरनेटवर कुठे मिळतील याचा शोध घेतला. योग्य ती सगळी पुस्तकं डाउनलोड केली आणि प्रयत्नपूर्वक नवऱ्याची हिंमत त्या पुस्तकांसह त्याला परत मिळवून दिली. तिचा नवरा पुढे त्या परीक्षेला बसला आणि त्याबद्दल त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त आणि फक्त कृतज्ञता होती. त्याच्या मते तिने त्याला नवीन जन्मच मिळवून दिला होता.
ही लक्ष्मी ही काही फार उच्चविद्याविभूषित स्त्री नव्हती. मूलभूत शिक्षण घेतलेली आणि तंत्रज्ञानाची अगदीच तोंडओळख असणारी खेडेगावातील एक अतिसामान्य स्त्री होती. पण जेव्हा या ज्ञानाची कवाडं तिच्यापुढं खुली झाली तेव्हा मात्र तिने त्याचे मुक्त हस्ताने स्वागतच केले आणि त्याचा योग्य तो उपयोग करण्याची संधी सोडली नाही. तुम्ही किती शिकता यापेक्षा कसं आणि काय शिकता यानेच तुमची विद्वत्ता पारखली जाते.
या परिषदेदरम्यान अजून एक मुद्दा प्रकर्षांने जाणवला तो म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्त्रियांना करून देण्यात आलेली आत्मभानाची जाणीव. गुगल इंडियानं सुरू केलेला ‘इंटरनेट साथी’ हा त्यातलाच एक उपक्रम. या कार्यक्रमांतर्गत गुगल इंडियानं भारतातील काही निवडक गावांमधल्या स्त्रियांना इंटरनेट कसं वापरायचं ते शिकविलं आणि पुढे त्यांचीच नेमणूक इंटरनेट साथी म्हणून केली. त्यांना जबाबदारी दिली गेली की त्यांनी जास्तीतजास्त बायकांना इंटरनेट कसं वापरायचं ते शिकवायचं आणि रोजच्या आयुष्यात त्याला सामील करून घ्यायचं. याच कार्यक्रमातून पुढे आलेली एक स्त्री म्हणजे पार्वती. पाचवीपर्यंत शिकलेल्या पार्वतीचं घरातल्यांनी १८व्या वर्षीच लग्न लावून दिलं. मात्र लग्नाला तिनं तिच्या पुढच्या शिक्षणाची आडकाठी कधीच बनू दिलं नाही. आणि फक्त बारावीपर्यंत शिकलेली ही पार्वती तिच्या गावातील सगळ्यात जास्त शिकलेली स्त्री बनली. (याला प्रगती म्हणायचं की साचलेलं मागासलेपण हा मुद्दा आहेच.) आणि याच जोरावर तिला तिच्या गावातून इंटरनेट साथी म्हणून निवडण्यात आलं. आजपर्यंत तिने जवळपास ९५० महिलांना इंटरनेट कसं वापरायचं ते शिकवलं आहे. एवढंच नाही तर जेव्हा गावात दारूबंदी करण्यासाठी अधिकारी तयार नव्हते तेव्हा या साऱ्या बायकांनी त्यांना दारूगुत्याचे फोटो आम्ही इंटरनेटवर अपलोड करू अशी धमकीवजा सूचना दिली तेव्हा नंतरच्या परिणामांना घाबरून अधिकाऱ्यांनी गावात दारूबंदी जाहीर केली, ज्या कारणाने गाव सुधारलं.
इंटरनेटच्या कमालीचं आणखी एक उदाहरण समोर आलं, या इंटरनेट साथी कार्यक्रमाने अनेक बायकांना या महाजालाची ओळख करून दिली त्यातलीच ‘ती’ एक होती. तीन-चार पोरं पदरात असताना नवऱ्याने सोडून दिलेली, समाजाने नाकारलेली आणि त्यामुळेच आत्मविश्वासाचा तळ गाठलेली. पोट भरायचं म्हणून ब्लाऊज शिवून विकू लागली. तिची गाठ जेव्हा इंटरनेटशी घालून दिली गेली तेव्हा तिच्यासाठी याच माध्यमातून एक नवी खिडकी खुली झाली. ब्लाऊजचे वेगवेगळी डिझाइन्स ती इंटरनेटवर पाहून शिवू लागली, तेव्हा अवघ्या ३० रुपयांना एक ब्लाऊज विकणाऱ्या ‘ती’ची मजल आज ३०० रुपयांवर गेली आहे. या महाजालामुळे तिने स्वत:चा अडकलेला आत्मविश्वास परत मिळविला आणि आता तिनं ठरवलंय की ‘मी एकटीच माझ्या घराचा आणि मुलाबाळांचा सांभाळा करायला समर्थ आहे.’
तंत्रज्ञान आणि त्यातही इंटरनेट ही एक जादू आहे आणि त्या जादूचे अनेक चांगले-वाईट प्रयोगसुद्धा आहेतच. आजकाल शहरी भाग असो वा ग्रामीण, आपला आत्मविश्वास गमावलेल्या अनेक स्त्रियांचे चेहरे आपल्याला सहज पाहायला मिळतात. आपल्या सभोवतीचं जग हे खूप पुढं निघून गेलं आहे आणि आपण मात्र पाठी अडकलोय. त्या जगासोबत मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही, ही भावना त्यांच्या मनात न्यूनगंड तयार करते. पण जेव्हा ६० वर्षांच्या काकूंना कळतं की आपली रेसिपी फक्त किचनमध्ये नाही तर ब्लॉगमध्येसुद्धा मांडता येऊ शकते तेव्हा खऱ्या अर्थाने या आंतरजालाने जग आणि स्त्रियांमधली पोकळी विणलेली असते.
स्त्री-सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, आणि स्त्रीवाद (ऋी्रेल्ल्र२े) या गोष्टींना चुकीच्या अर्थाने वापरल जातं. स्त्रियांना त्यांचे अधिकार देणं म्हणजे पुरुषांच्या हक्काची पायमल्ली करणं असा सूर बरेच जण आळवताना दिसतात. काहीजण तर स्त्रीवाद (ऋी्रेल्ल्र२३) या संकल्पनेलाच अत्यंत नकारात्मक अर्थाने घेताना दिसतात. स्त्रियांचा उदो उदो करण्यात कसली आलीय समानता..? असा प्रश्न बरेचदा विचारला जातो, मुळात स्त्रीवादाचा साधा सरळ अर्थ स्ट्राँगर सेक्स नव्हे तर इक्वल सेक्स असा आहे हे समजून घ्यायला पुरुषच काय पण स्त्रियासुद्धा विसरून जातात.
स्त्री-सक्षमीकरणाचे मुद्दे आजही तेच आहेत. याला समाजाची उदासीनता म्हणावं की परिस्थितीचं साचलेपण हे ज्याचं त्याचं ज्यानं त्यानं ठरवावं. मात्र या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा शिरकाव झालाय हे मान्य करायला हवं. मुळात स्त्रीला आत्मभान येण्यासाठी गरज असते ती आत्मविश्वासाची. जेव्हा स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होऊन आर्थिक निर्णय स्वत: घ्यायला लागते तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाची सुरुवात होते. आणि सध्या इंटरनेटचा आपल्या आयुष्यात झालेला शिरकाव स्त्रीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा दुवा बनू शकतो. आपण वरील उदाहरणांवरून पाहिलंच की बदल अजिबात होत नाहीये असं बोलणं अयोग्य आहे.
वाटचाल सुरूच झाली नाही हेही तितकंच चुकीचं आहे, मात्र आत्ताशी दोन पावलं पुढे जातोय आपण, मंजिल तो अभी कोसो दूर है.. ही जाणीव मनात सतत तेवती ठेवायला हवी.
स्त्रियांच्या समस्या त्यांच्या अडचणी जटील आहेत खऱ्या, पण त्यांची उत्तरंही तितकीच साधी सोपी आणि सरळ हवीत, त्याशिवाय बदल मुश्कील आहे. नेमका याच गोष्टीवर परिषदेत उपस्थित असलेल्या माणदेशी महिला सहकारी बँक या पहिल्या महिला ग्रामीण बँकेच्या संस्थापिका आणि अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की जेव्हा आम्ही बँकेची एटीएम कार्ड्स घेऊन गावातल्या बायकांना ती कशी वापरायची हे शिकवायला गेलो तेव्हा त्यांनी लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या सहा अंकी पिन नंबरसाठी ते एटीएम कार्ड वापरण्यास नकार दर्शविला. महिलांना असुविधा होऊ द्यायची नाही आणि त्यांना बँकिंगची सवयही लावायची यासाठी मग त्यांनी जरा वेगळी शक्कल लढविली आणि एटीएमसाठी बायोमेट्रिक पद्धत वापरायला सुरुवात केली आणि यामुळे त्यांच्या एटीएम वापराच्या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
स्त्री-सक्षमीकरण हा एका सरळ धाग्यात अडकलेला मुद्दा नाही तर अनेक धाग्यांचा गुंता होऊन तयार झालेला असा गुंतवळा आहे जो केवळ एक धागा सोडवून सुटणार नाही. भारतात आजही पुरुषांबरोबरच स्त्रियांची स्त्रियांबद्दलची मानसिकता ही त्यांच्या सक्षमीकरणाला अडथळा निर्माण करते. तसे नसते तर शहरात डॉक्टर असणाऱ्या सुनेला हुंडय़ासाठी सासूने जिवंत जाळले नसते. आजही स्त्रिया आपल्या सक्षमीकरणासाठी पुरुषांची वैधता ग्राह्य़ धरतात. भारतात तर सक्षमीकरणासाठी भौगोलिक आणि सामाजिक वैविध्य असलेल्या समस्यांची भरच पडते. युनायटेड नेशन्सचे भारतातील प्रतिनिधी युरी अफनासिएव म्हणतात की भारत हा केवळ एक देश नाही तर अनेक देशांनी मिळून बनलेला एक खंड आहे. आणि म्हणूनच इथे स्त्रियांच्या समस्यांचे स्वरूप आणि परिणाम खूप जटिल आहेत. असं म्हणतात की जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा एक संपूर्ण समाज शिकत असतो, पण जर हाच समाज स्त्रीशिक्षणाच्या आड येत असेल तर त्याचा सामना करणं हे स्त्रियांसाठी अपरिहार्य आहे. स्त्रियांच्या प्रगतीआड येणारी काचेची भिंत तोडायची तर आहेच, पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान आहे ते, ती भिंत तोडण्यासाठी इंटरनेटरूपी शस्त्राचा तिच्यावर योग्य ठिकाणी आघात करण्याचे…
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com