श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे सणांचे दिवस सुरू होतात. आठवडय़ातल्या प्रत्येक दिवशी काही ना काही तरी परंपरा, रूढी पाळण्याचा तो महिना असतो. तिथून मग सगळे उत्सव सुरू होतात. गणपती, नवरात्र, दसरा करता करता दिवाळी कधी येते ते समजतही नाही. सण हे घरोघरी साजरे होणारे, तर उत्सवांना एक सामूहिक रूप असते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांचे वातावरण महिना पंधरा दिवस आधीच सुरू होते आणि गल्लीतले, आळीतले, मंडळातले सगळे जण उत्साहाने सजावट, आरास, कार्यक्रम यांच्या तयारीला लागतात. घरच्या सणांच्या तयारीमध्येही लहान-मोठे सगळेच सामील होतात. ‘दरवर्षीप्रमाणे’ असे म्हणत अनेक पद्धती मनोभावे पाळल्या जातात. घराची साफसफाई, सजावट, रंगरंगोटी, पूजेची तयारी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई या सगळ्याची नुसती धांदल होते. शाळा-कॉलेजेस, ऑफिसेस सर्वत्र वातावरणात एक उत्साह निर्माण होतो. नवरात्रोतल्या ठरवलेल्या विविध रंगांच्या पेहरावांमधूनही तो व्यक्त होतो. सुट्टीचेही वेध लागतात.
गजबजलेली बाजारपेठ, मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल, सामाजिक चहलपहल अशा सगळ्या गोष्टी सण-उत्सवांमध्ये होतात. त्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येतो.
हल्ली उत्सव म्हटले की गर्दी, खेचाखेच असतेच. खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विकले जातात. फटाके, मोठे माइक या सगळ्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांची चर्चा तर सर्वत्र होतेच. यातून पचन, श्वसन संस्थेचे विकार बळावतात. दरवर्षी उत्सवांच्या काळात आरोग्यविषयक सूचनांना उधाण येते. यात मानसिक आरोग्याविषयी आपण कधीच चर्चा करत नाही, परंतु सण-उत्सव यांचा आपल्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम होतो. थोडा चांगला, तर थोडा वाईट!
सण आणि उत्सव मनात आनंद निर्माण करतात. घरातल्या घरातसुद्धा सणांची तयारी सगळे एकत्र मिळून करतात. सामूहिकतेचा उत्तम अनुभव यातून मिळतो. मनावरचा ताण आपोआप कमी होतो. आपापसात गप्पा होतात, विचारांची, भावनांची देवाणघेवाण होते आणि मन मोकळे होते. सगळे नातेवाईक एकत्र जमतात. नातेसंबंध दृढ बनतात आणि आपल्या मागे असलेल्या भक्कम मानसिक आधाराची जाणीव होऊन मन निर्धास्त बनते.
सण म्हणजे देवदेवतांची पूजाअर्चा! मनोभावे केलेली पूजा, मन:पूर्वक केलेली प्रार्थना यातून मनाला समाधान प्राप्त होते. सश्रद्ध व्यक्तीला प्रार्थनेतून मनोबल प्राप्त होते आणि संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते. जो श्रद्धाळू नाही त्यालासुद्धा स्वत:शी संवाद करण्याची संधी मिळते, मन:शांती लाभते. सगळ्यांनी मिळून केलेल्या आरतीमधूनही आनंद मिळतो. आपण समूहाचा भाग आहोत ही भावना मनाला आधार देते, तसेच स्वत:ला ओळखही (्रीिल्ल३्र३८) प्राप्त करून देते. त्यामुळेच उत्सव संपताना वाईट वाटते, पण पुढच्या वर्षीची आशाही मनात निर्माण होते. म्हणूनच ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणेने आपण बाप्पाला निरोप देतो.
मानसिक आरोग्य जतन करताना सण-उत्सवांचा असा उपयोग होतो, हे जाणून त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. रुग्णालयात रक्षाबंधन, दसरा, दिवाळी असे सण रुग्णांसाठी आवर्जून साजरे केले जातात. मनोरुग्णांना यामुळे समाजात मिसळण्याची संधी मिळते. एकत्रितपणे सण साजरे केले की, सामूहिकतेचा अनुभव मिळतो. यातून नवीन नाती, मैत्री जुळते आणि मनोविकारातून बरे होण्याच्या मार्गावर पुढचे पाऊल टाकण्यास मदत होते. पुनर्वसनाच्या अनेक प्रयत्नांमध्ये समाजात सरमिसळ होणे हा महत्त्वाचा टप्पा असतो.
सण-उत्सवांचे असलेले धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान आपत्तीनंतरच्या काळात लोकांमध्ये मनोबल वाढवते. एकत्रितपणे साजऱ्या केलेल्या उत्सवांमधूनही आपण सारे मिळून आपल्या संकटांना सामोरे जाऊया असा धीर एकमेकांना देण्याचे बळ येते. तसेच आपले आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे असेही यातून वाटते. भूकंप, त्सुनामी, पूर अशा अनेक प्रकारच्या आपत्तीनंतर मनोसामाजिक उपचारांचा भाग म्हणूनही उत्सव साजरे करण्यावर भर दिला गेला आहे. १९९३च्या किल्लारीच्या भूकंपानंतर, २००४मध्ये झालेल्या त्सुनामीनंतर असे अनेक प्रयत्न यशस्वीपणे राबवले गेले.
कोणताही सण म्हटला की, त्याचा मानसिक ताण असतो. होणारा खर्च, करावे लागणारे कष्ट, सततची धावपळ याचा मनावर चांगलाच ताण जाणवतो. ऑफिसचे काम, मुलांच्या परीक्षा, कधी कधी घरातली आजारपणे हे सगळे बाजूला ठेवून सणांची तयारी करावी लागते, त्याचा आर्थिक भार सोसावा लागतो. आपली स्थिती चांगली नाही म्हणून एखाद्या वेळेस कमी खर्च करायचे ठरवले तर ‘लोक काय म्हणतील?’ असे दडपण येते. अशा अनेक गोष्टींमुळे कधी कधी सण-उत्सवासारख्या आनंददायी घटनेनेसुद्धा अतिचिंता निर्माण होते. झोप लागत नाही, भूक मंदावते. मनात आनंदच निर्माण होत नाही. माणसांची गर्दी, अवेळी झोपणे, अतिश्रम या सगळ्याचा परिणाम होऊन आधीपासून असलेले मानसिक विकार बळावण्याची शक्यता असते. उदा. स्किझोफ्रेनियासारखा आजार असलेल्या रुग्णाला उत्सवात सामील व्हावेसे वाटले तर होऊ द्यावे. अन्यथा त्याला त्याचा त्रास होऊ शकतो. भीती वाटू शकते, मनातला संशय वाढू शकतो. सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अनेक दिवस जागरण केले तर मेनियासारखा विकार डोके वर काढू शकतो. ध्वनिप्रदूषणाचा आणि गर्दीचाही परिणाम होतो, चिडचिड वाढते, वृत्तीतली आक्रमकता वाढते. काही जण तर परिसरातले आवाज टाळण्यासाठी बाहेरगावी निघून जातात!
भारतीय समाजात सण-उत्सवांचे फार महत्त्व आहे. वैयक्तिक आणि सामूहिक पद्धतीने ते साजरे करण्यातून आपण सारे नेहमीच आनंद मिळवत आलो आहोत. आपली नाती दृढ करून, मन:शक्ती वाढवून वर्षभरातल्या विविध प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळही प्राप्त करत आलो आहोत. मानसिक स्वास्थ्य म्हणजे मनोविकारांचे परिणामकारक उपाय, मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि त्याबरोबरच मनस्वास्थ्य वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न! सण-उत्सवांचासुद्धा यासाठी पुरेपूर उपयोग करून तेच करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader