स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
जगातल्या सगळ्या फुटबॉलपटूंचं लक्ष १४ जूनकडे लागलं आहे. या दिवशी सुरू होणाऱ्या फुटबॉलच्या जागतिक जल्लोषात सहभागी व्हायला तरूणाई उत्सुक आहे. त्यानिमित्त या स्पर्धेतल्या सांघिक पातळीवरील आव्हानांवर एक नजर

पूर्वाचलची अनुष्का बोरो, काश्मीरची नाझरीन, कोलकात्याचा सुब्रतो, गोव्याचा संदेश, चेन्नई- केरळ येथील ध्रुव, कुट्टी, नायर अशा अनेकांची काहीतरी धडपड सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम.. आदी सोशल नेटर्किंग साईटवर त्यांचा वावर नेहमीपेक्षा अधिक जाणवत आहे. मेस्सी, रोनाल्डो, ग्रिझमन, म्युलर, सलाह, केन, अग्युरो, लुकाकू अशी क्वचितच ऐकलेली नावं वारंवार सोशलसाईटवर निदर्शनास पडत आहेत. कोण आहेत हे आणि सतत त्यांची नावे का समोर येत आहेत?

रशियात १४ जूनपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत यांचा बोलबाला राहील, अशा पैजा हा युवा वर्ग लावत आहेत. भारतात अर्थात अन्य खेळाची चर्चा होत नाही आणि झालीच तर ती केवळ महत्त्वाच्या स्पर्धापुरतीच. त्यामुळे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने युवा वर्ग अधिक सक्रिय झाला आहे. पूर्वाचलमध्ये अर्जेन्टिना समर्थक अचानक वाढले आहेत. गोव्यात पोर्तुगीज, कोलकात्यात जर्मन, केरळमध्ये ब्राझील अशा पद्धतीने भारताची अनेक राज्ये कोणत्या ना कोणत्या देशातील खेळाडूंची चाहती झाली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊनच एका वृत्तवाहिनीने सुरू केलेल्या ‘मेरी दुसरी कंट्री’ या मोहिमेची आठवण होते. क्रिकेटवेडय़ा भारतात फुटबॉलच्या रोपटय़ाचा वटवृक्ष झाला नसला तरी त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजलेली आहेत. दर चार वर्षांनी येणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत त्याची प्रचीती येते.

रशियात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भारतीयांनी  यापूर्वी कधी घेतला नसेल तितका  रस आत्ता तेथे घडणाऱ्या फुटबॉलशी निगडित प्रत्येक घडामोडीत घेतला जातो आहे. यंदाची स्पर्धा रशियात  होत असल्याने सर्वच अधिक उत्सुक आहेत. युरोप आणि फुटबॉल हे फार जुने नाते आहेच. त्यात रशिया हा आशिया खंडाच्या सीमेला लागूनच असल्याने त्याची आणि आशियाई देशांची जवळीक ही आलीच. त्यामुळेही रशियातील विश्वचषक आशियाई क्रीडारसिकांच्या  उत्सुकतेचे कारण बनला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत काय नवीन आहे आणि कोण निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत, यापेक्षाही यजमानपदाचा मान प्रथमच रशियाला मिळाला हे महत्त्वाचे आहे.

फुटबॉल तसा सगळ्यांच्याच पसंतीचा. जगातील एकूण लोकसंख्येतील जवळपास निम्मे लोक या खेळाचे चाहते आहेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. पण आशियाई देशांमध्ये याची क्रेझ दर चार वर्षांनी येते आणि महिन्याभरात कमी होते. साहजिकच रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने ती पुन्हा दिसू लागली आहे. मुंबईच्या अनेक बार आणि पब्समध्ये विश्वचषक स्पध्रेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येणार आहे आणि फुटबॉल चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. इंडियन सुपर लीग आणि फिफाच्या युवा विश्वचषक स्पर्धानी भारतीयांना फुटबॉलच्या आणखी जवळ आणले. त्यामुळेच चार वर्षांपूर्वीच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये यंदा अधिक वाढ झाली आहे. केवळ तरुण-तरुणीच नव्हे, तर लहान मुले-मुली, वयस्करही या खेळाची चर्चा करताना दिसत आहेत. जुने जाणकार त्यांच्या काळातील फुटबॉलच्या गप्पा गोष्टींना उजाळा देत तरुण वर्गाची उत्सुकता आणखी वाढवत आहेत.

मुख्य स्पध्रेपूर्वी अनेक रंजक घडामोडींनी हा विश्वचषक सतत चर्चेत राहिला. स्पध्रेच्या यजमानपदापासून ते हुलिगन्सना (सामन्यादरम्यान स्टेडियमवर हाणामारीचे प्रकार करणाऱ्या टोळ्या)  आवरण्यापयत अनेक विषयांवर सखोल चर्चा झाल्या. मात्र, फिफा आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि रशियाने यजमानपदासाठी कंबर कसली. आर्थिक मंदीचा या स्पध्रेवर परिणाम होईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती, परंतु त्यावरही उपाययोजना करण्यात आल्या. २००६ नंतर युरोपात होणारा हा पहिला विश्वचषक आहे, तर पूर्व युरोपला प्रथमच हा मान मिळाला आहे. २०१८ आणि २०२२च्या विश्वचषक स्पध्रेच्या यजमानपदाचा मान अनुक्रमे रशिया आणि कतार यांना मिळाला, परंतु या यजमानपदासाठी प्रचंड प्रमाणात घोडेबाजार आणि मतांची खरेदी करण्याचे प्रकार झाल्याचे आरोप झाले. इंग्लंड आणि रशिया यांच्यातील तणावसदृश परिस्थिती पाहता ब्रिटिश संघाने स्पध्रेवर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली होती. पण, सुदैवाने असे काही घडले नाही. उत्तम फुटबॉल सामन्यांचा निखळ आस्वाद घेण्यासाठी आतुर असलेल्या क्रीडा चाहत्यांना या मैदानाबाहेरील घडामोडी अस्वस्थ करत होत्या. पण, आता या स्पध्रेत फुल्ल धम्माल करण्यासाठी हा दर्दी चाहता तयार झाला आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच सर्व संलग्न २०९ देशांनी पात्रता फेरीत सहभाग घेतला. मात्र, झिम्बाब्वे आणि इंडोनेशिया यांना पहिली लढत खेळण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले.  २०१४ मध्ये सहभागी झालेले २० संघ रशियातही खेळणार आहेत, तर पनामा आणि आईसलॅण्ड यांनी प्रथमच या स्पध्रेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर लक्ष लागलेले आहेच. इजिप्त (१९९० नंतर प्रथमच), मोरोक्को (१९९८ नंतर प्रथमच), पेरू (१९८२ नंतर प्रथमच) आणि सेनेगल (२००२ नंतर प्रथमच) यांनी प्रदीर्घ काळानंतर विश्वचषक स्पध्रेत प्रवेश मिळवला आहे. त्याशिवाय प्रथमच या स्पध्रेत तीन नॉर्डिक (डेन्मार्क, आईसलॅण्ड आणि स्वीडन) आणि चार अरब देश (इजिप्त, मोरोक्को, सौदी अरेबिया आणि टय़ुनिशिया) खेळणार आहेत.

यावेळी अनेक संघांनी अनपेक्षित प्रवेश मिळवला असला तरी ज्यांच्याकडून जेतेपदाच्या अपेक्षा केल्या जात होत्या, अशा देशांना पात्रता फेरी पार करण्यात अपयश आले आहे. यामध्ये प्रामुख्याने चार वेळा जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या इटलीचा उल्लेख करावा लागेल. १९५८ नंतर सातत्याने विश्वचषक स्पध्रेत खेळणाऱ्या इटलीला पात्रता फेरी पार करण्यातच अपयश आल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. तीन वेळा उपविजेतेपद पटकावणारा नेदरलॅण्ड्स, कॅमरून, चिली, न्यूझीलंड आणि अमेरिका या प्रमुख संघांच्या दर्जेदार खेळाला यंदा मुकावे लागणार आहे. त्याशिवाय घाना आणि आयव्हरी कोस्टा यांचे अपयश वेदनादायक आहे. फुटबॉल हा खेळच असा आहे की अखेरच्या सेकंदात काहीही घडू शकते. त्यामुळे जुने जाणते २० संघ आणि नव्याने प्रवेश मिळवणारे १२ देश यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळू शकते. त्यात कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे असेलच, परंतु नव्या दमाच्या संघांची मजल कुठपर्यंत जाते आणि ते प्रतिष्ठितांचा कसा सामना करतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. १४ जून ते १५ जुलै या फुटबॉलच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी फुटबॉलप्रेमी आसुसले आहेत.

रशिया : यजमानांवर प्रचंड दडपण

स्टॅनिस्लाव्ह चेर्सेसोव्हच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रशियाच्या संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर सकारात्मक कामगिरी करण्याचे प्रचंड दडपण असणार आहे. प्रमुख स्पर्धामध्ये रशियाला दडपणाखाली खेळ करण्यात अपयश आल्याचा इतिहास आहे, परंतु दक्षिण कोरियात २००२ मध्ये झालेल्या यशस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे आहे.

प्रमुख खेळाडू : फ्योडर स्मोलोव्ह याने २०१२मध्ये फॅबीनो कॅपेलोच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. सहा वर्षांनंतर तो संघाचा प्रमुख आक्रमणपटू झाला आहे आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर रशिया मोठी झेप घेण्याचे स्वप्न पाहत आहे.

आईसलॅण्ड : निद्रावस्थेत असलेला ज्वालामुखी

युरो २०१६ स्पध्रेतील अविश्वसनीय कामगिरीमुळे आईसलॅण्डकडेही सर्वाचे लक्ष असणार आहे. युरो स्पध्रेत त्यांनी पोर्तुगालसारख्या बलाढय़ संघाला बरोबरीत रोखले, तर इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, यजमान फ्रान्सविरुद्ध विजय मिळवण्यात त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सातत्यपूर्ण कामगिरी करताना त्यांनी प्रथमच विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचा मान पटकावला. निद्रावस्थेत असलेला ज्वालामुखी अशी ओळख असलेल्या आईसलॅण्डच्या स्वागतासाठी रशियातील स्टेडियमही सज्ज आहेत.

प्रमुख खेळाडू : गिल्फी सिगर्डसन हा संघाचा आत्मा आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वाधिक पसंतीचा हा खेळाडू आईसलॅण्डकडे आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आईसलॅण्डला बाद फेरीत प्रवेश मिळवण्याची आस आहे.

ब्राझील : वचका काढण्यासाठी सज्ज

चार वर्षांपूर्वी ब्राझील संघाला जर्मनीकडून १-७ असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्याचा वचपा काढण्याचा निर्धार ब्राझील संघाचा असेल. मात्र, रशियात होणाऱ्या या स्पध्रेत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागेल. त्यांच्या खेळातील सौंदर्य आणि कौशल्य याची भुरळ आजही फुटबॉलप्रेमींच्या मनात आहे. त्यामुळे जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये त्यांचाही क्रमांक येतोच. त्यांनी पाच विश्वचषक, सात कोपा अमेरिका चषक आणि चार कॉन्फडरेशन चषक उंचावले आहेत.

प्रमुख खेळाडू : फुटबॉलपटूंची खाण असलेल्या या संघात अनेक खेळाडूंवर नजरा खिळल्या आहेत. मात्र, गॅब्रीएल जीजससारखे नवीन खेळाडू पहिल्याच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेला कसे सामोरे जातात याची उत्सुकता लागलेली आहे. नेयमार हा त्यांचा प्रमुख अस्त्र असला तरी त्याची दुखापत कधीही डोकं वर काढणारी आहे.

स्वीडन : पुनरागमन

इब्राहिमोव्हीकनंतर स्वीडन संघाची वाटचाल सुरळीत सुरू आहे. प्ले ऑफ लढतीत त्यांनी इटलीवर १-० अशा गोलसरासरीने विजय मिळवून विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. पात्रता फेरीत फ्रान्सलाही त्यांनी नमवले. त्यांच्याकडे एक नायक नसला तरी संघ म्हणून त्यांची कामगिरी उजवी ठरते. प्रशिक्षक जॅन अँडरसन यांना यशाचे श्रेय जाते. २००६ नंतर प्रथमच हा संघ विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे.

प्रमुख खेळाडू : बुंदेसलीगमध्ये आपल्या तंत्राने आणि गोल करण्यासाठी संधी निर्माण करण्याच्या कौशल्याने इमिल फोर्सबर्ग सर्वाच्या पसंतीत उतरला आहे.

डेन्मार्क : दमदार प्रतिस्पर्धी

एज हॅरेइडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा डेन्मार्क संघ या विश्वचषक स्पध्रेत दमदार प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहणार आहे. टोटनहॅमचा मध्यरक्षक ख्रिस्टियन इरिक्सेन हा युरोपातील सर्वोत्तम मध्यरक्षक ठरलेला खेळाडू डेन्मार्ककडे आहे. त्याच्यासोबतीला चेल्सीचा आंद्रेस ख्रिस्टसेन, सिमोन कीजर, सेल्टा व्हिगोचा पिओन सिस्टो ही उद्योन्मुख खेळाडूंची फळी डेन्मार्ककडे आहे. विश्वचषक पात्रता स्पध्रेत त्यांनी आर्यलडला नमवून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला.

प्रमुख खेळाडू : ख्रिस्टियन इरिक्सेन हा त्यांचा हुकमी एक्का आहे, त्याच्या मदतीला पिओन सिस्टो आहेच.

बेल्जियम : कागदावरील बलाढय़ संघ

इडन हजार्ड, केव्हिन डी ब्रुयने, ड्राएस मेर्टेन्स आणि अ‍ॅलेक्स वित्सल हे मात्तबर खेळाडूंच्या उपस्थितीतही बेल्जियचा संघ केवळ कागदावरच बलाढय़ दिसतो. रोमेलू लुकाकू क्लब फुटबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असला तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये छाप पाडण्यात तो अपयशी ठरलेला आहे. रोबेटरे मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ चेंडूवर ताबा मिळवण्यात तरबेज आहे आणि मजबूत मधली फळी गोल करण्याच्या संधी अगदी सहज निर्माण करून जातात. त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, परंतु त्यांच्या काही कमकुवत बाबी त्यांनाच मारक ठरत आहेत.

जर्मनी : विजयाचे दुसरे नाव

ब्राझीलपाठोपाठ विश्वचषक स्पध्रेतील दुसरा यशस्वी संघ म्हणजे जर्मनी. त्यांच्या नावावर चार विश्वविजेतपदं आहेत. युरोपियन पात्रता फेरीत अपराजित (१० विजय) राहण्याचा पराक्रम या संघाने केला आहे आणि या विजयात ३९ हून अधिक गोलही त्यांनी केले आहेत. २०१४चे विजेते असल्यामुळे त्यांच्यावर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे आणि इतिहासात असा पराक्रम केवळ ब्राझील (१९५८ आणि १९६२) संघाला करता आला आहे. जर्मनीच्या संघात कौशल्याने भरलेल्या खेळाडूंची खाण आहे आणि त्यामुळे उपांत्य फेरीपेक्षा आधी त्यांचे आव्हान संपुष्टात येणे म्हणजे धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.

प्रमुख खेळाडू : या संघात प्रत्येक खेळाडू हा नैपुण्यवान आहे, परंतु यंदा टिमो वेर्नेरकडे सर्वाचे लक्ष खिळले आहे. राष्ट्रीय संघाकडून सात सामन्यांत त्याने १० गोल केले आहेत. अव्वल ११ खेळाडूंमध्ये संधी देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवल्यास यंदाचा गोल्डन बुटाचा मानकरी तो ठरू शकतो.

अर्जेटिना : अंदाज बांधणे अवघड

अर्जेटिनाचा पात्रता फेरीतील आलेख पाहिल्यास विश्वचषक स्पध्रेत त्यांच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड आहे. दक्षिण अमेरिका गटातून त्यांनी उरुग्वे आणि ब्राझील पाठोपाठ कसेबसे तिसरे स्था प्रात्प केले. पात्रता फेरीत त्यांना चार पराभव पत्करावे लागले, तर  लढती अनिर्णीत सोडवल्या. प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पाओली हे मैदानावरील आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात आणि २०१२ ते १६ मध्ये चिली संघासोबत त्यांनी याच शैलीच्या जोरावर अनपेक्षित निकाल नोंदवले होते. तशीच अपेक्षा अर्जेटिनासोबत त्यांच्याकडून बाळगल्या जात आहेत.

प्रमुख खेळाडू : लिओनेल मेसी हे नाव चर्चेत असले तरी झेनिट सेंट पिटर्सबर्गचा इमिलियानो रिगोनी हा यंदा स्टार ठरू शकेल. युरोपा लीगमध्ये त्याने गोलचा पाऊस पाडला आहे.

इंग्लंड : बेभरवशी संघ

प्रत्येक प्रमुख स्पर्धामध्ये इंग्लंडच्या संघाकडून मोठय़ा अपेक्षा केल्या जातात. किंबहुना तशी वातावरणनिर्मिती केली जाते, परंतु प्रत्येक वेळी हाती निराशाच येते. युरो स्पध्रेतील आईलॅण्डविरुद्धच्या पराभवाच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. त्यामुळे वस्तुस्थितीचे भान राखून त्यांनी खेळात सुधारणा करायला हवी. पात्रता फेरीत त्यांना स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया आणि स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत संघांचा सामना करावा लागला होता. मात्र, मुख्य स्पध्रेत त्यांची कसोटी लागणार आहे. साखळी फेरीत त्यांना पनामा आणि टय़ुनिशिया यांचा सामना करावा लागेल. हे आव्हान तसे इंग्लंडसाठी फार त्रासदायक ठरणारे नाही, परंतु बेभरवशी इंग्लंडची शाश्वती देणे अवघडच. तरीही इंग्लंडचे चाहते त्यांच्याकडून अपेक्षा लावून बसले आहेत.

प्रमुख खेळाडू : इंग्लिश प्रीमियर लीगच्या कामगिरीच्या जोरावर संघबांधणी करून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहेत. डेल अली, एरिक डीएर, कायरेन ट्रिपर आणि अ‍ॅश्ली यंग यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

स्पेन : आहे बलाढय़ पण…

स्पेनसारख्या बलाढय़ संघाला केवळ एकच जेतेपद पटकावता आलेला आहे, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. ज्युलन लोपेटेग्युई हा अजूनही अपराजित प्रशिक्षक स्पेनला लाभला आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या १६ सामन्यांत १२ विजयाची नोंद केलेली आहे. संघाचा प्रमुख भार बचावात्मक खेळावर असल्याने ९० मिनिटे प्रतिस्पर्धीना रोखून धरणे, हीच त्यांची रणनीती. तंदुरुस्ती, कौशल्य आणि मॅचफिनिशर अशा क्षमता असलेले खेळाडू या संघात आहेत. मात्र, पोर्तुगालसारख्या संघाला रोखण्यासाठी चेंडूवर अधिक काळ नियंत्रण राखण्याची रणनीती पुरेशी ठरणार का?

प्रमुख खेळाडू : स्पेनच्या युवा संघातून राष्ट्रीय संघात आलेला मार्को असेन्सियो. १९ आणि २१ वर्षांखालील संघात २९ सामन्यात १५ गोल असेन्सियोच्या नावावर आहेत आणि वरिष्ठ संघाकडून गोलची बोहनी करण्यासाठी तो उत्सुक आहे.

क्रोएशिया : कौशल्याची खाण

यंदाच्या विश्वचषक स्पध्रेत क्रोएशिया ही सर्वाधिक उत्सुकतेचा संघ ठरला आहे. निदान कागदावर तरी. त्यांच्याकडे प्रत्येक आघाडीवर अव्वल क्षमता असलेले खेळाडू आहेत, तरीही त्यांना मोठी झेप घेण्यात अपयश का येते, हा प्रश्न सतावतो. संघटनात्मक वाद, पाठीराख्यांची कमतरता आणि प्रशिक्षकांची समस्या, असे बरेच मुद्दे क्रोएशियाच्या फुटबॉलला मारक ठरत आहेत. अशा परिस्थितीत झ्ॉट्को डॅलिस हे संघाला किती तारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इव्हान रॅकिटिक, ल्युका मॉड्रिक आणि मॅटेको कोव्हिसिस ही दमदार मधली फळी क्रोएशियाकडे आहे.

प्रमुख खेळाडू : ल्युका मॉड्रिक याची मैदानावरील सजगता आणि चेंडूवर नियंत्रण मिळवण्यातील कौशल्य याचा आस्वाद घ्यायला चाहते उत्सुक आहेत.

सर्बिया : अंतर्गत वादाचा फटका

रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केल्यानंतर प्रशिक्षक स्लाव्होलजूब मुस्लीन यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या निवड प्रक्रियेवर आणि बचावात्मक शैलीवर आक्षेप घेण्यात आला. मात्र, याच शैलीच्या जोरावर सर्बियाने आर्यलड आणि वेल्स असे संघ समोर असताना गटात अव्वल स्थान पटकावले. मॅल्डेन क्रिस्टॅजीक हे आता सर्बियाचे प्रशिक्षक असणार आहेत. डुसॅन टॅडीक, अ‍ॅडेम लॅजजीस आणि फिलिप कोस्टीक हे तंत्रशुद्ध खेळाडू सर्बियाला लाभले आहेत.

प्रमुख खेळाडू : २२ वर्षीय सेर्गेज मिलिनकोव्हिक याचा खेळ पाहण्याची संधी कुणालाही दवडणे आवडणार नाही.

पोलंड : वैविध्यपूर्ण खेळाची आवश्यकता

रॉबर्ट लेवांडोवस्की हा पोलिश संघाचा चेहरा. डेन्मार्कविरुद्धचा ६-० असा पराभव वगळला तर पात्रता फेरीतही पोलंड संघाची कामगिरी उजवी ठरली. प्रशिक्षक अ‍ॅडम नवाल्का हे युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालण्यात यशस्वी ठरले आहेत. विशेषत: पिओत्र झिएलिंस्की याची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. मात्र, आक्रमण फळीत लेवांडोवस्कीवगळता पोलंडकडे चांगले पर्याय नाहीत आणि प्रतिस्पर्धी संघांना याची चांगलीच जाण आहे. कोलंबिया, जपान आणि सेनेगल हे विविध शैली असलेल्या प्रतिस्पर्धीचा त्यांना सामना करावा लागणार आहे. प्रत्येकाविरुद्ध त्यांना वैविध्यपूर्ण खेळ करणे गरजेचे आहे.

प्रमुख खेळाडू : लेवांडोवस्की हे नाव प्रथम येणे साहजिकच आहे. त्याच्या साथीला पिओत्र झिएलिंस्की याचीही भूमिका महत्त्वाची आहे.

ऑस्ट्रेलिया : सर्वात कमकुवत संघ

सीरियाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली खरी, परंतु प्रशिक्षक अँगे पोस्टेकोग्लोयू यांनी त्वरित राजीनामा दिला. त्यामुळे विश्वचषक स्पध्रेत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक कोण असतील याबाबत संभ्रम आहे. स्पध्रेतील सर्वात कमकुवत संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचे नाव आघाडीवर आहे. याच गटातील पेरूचीही हीच गत. ऑस्ट्रेलियातील बहुतेक खेळाडूंची ही अखेरची स्पर्धा असल्याने त्यांच्यासाठी ती अधिक महत्त्वाची आहे. मिले जेडीनॅक (३३), मार्क मिलिगन (३२), जेम्स ट्रॉइसी (२९) आणि रॉबी क्रुस (२९) हे यांची ही अखेरची प्रमुख स्पर्धा असेल.

प्रमुख खेळाडू : मॅथ्यू लेकीए हा त्यांचा प्रमुख आणि भरवशाचा खेळाडू.

स्विर्त्झलंड : बलाढय़ संघासमोर बलाढय़ आव्हान

ब्राझील, कोस्टारिका आणि सर्बिया यांच्यासारख्या तुल्यबळ संघाचा सामना स्विर्त्झलंडला करावा लागणार आहे. प्रशिक्षक व्लॅदीमिर पेटकोव्हिक यांना युवा खेळाडूंना आक्रमण आणि बचाव या आघाडीवर अव्वल खेळासाठी मार्गदर्शन करावे लागणार आहे. या संघाचा खेळ पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या या संघाकडून अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. ग्रॅनीटी झाका,

ब्लेरीम डीजेमैली, स्टीफन लिचस्टरनर आणि फॅबीयन स्कर हे शारीरिकदृष्टय़ाा

तंदुरुस्त खेळाडू त्यांच्याकडे आहेत. गटात खडतर आव्हान असले तरी स्वित्र्झलडला प्रत्येक सामन्यात गुण मिळवण्याची समसमान संधी आहे.

प्रमुख खेळाडू : ब्रिल एम्बोलो या २० वर्षीय खेळाडूने अल्पावधीतच सर्वाचे मन जिंकले आहे. तंदुरुस्त आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असलेला हा खेळाडू स्वित्र्झलडसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

उरुग्वे : कट्टर प्रतिस्पर्धी

ब्राझील आणि अर्जेटिना या बलाढय़ संघांचा समावेश असूनही उरुग्वेने दक्षिण अमेरिका गटातून विश्वचषक पात्रता मिळवली. एडिसन कव्हानी आणि लुईस सुआरेझ ही आक्रमणाची तोफजोडी उरुग्वेकडे आहे आणि त्यांच्यासोबतीला रॉड्रिगो बेटांकर हा उदयोन्मुख खेळाडू आहे. त्यात बचावात जोस गिमेनेझ आणि डिएगो गॉडीन हेही आहेतच. त्यामुळे एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उरुग्वेकडे पाहिले जात आहे.

प्रमुख खेळाडू : लुईस सुआरेझ आणि एडिसन कव्हानी यांना बाजूला सारल्यास रॉड्रिगो बेटांकर याच्याकडे लक्ष असेल.

फ्रान्स : कागदावर बलाढय़ संघ

कागदावर हा संघ बलाढय़ वाटत आहे, परंतु खेळाडूंचा योग्य वापरच त्यांना यश मिळवून देऊ शकतो. गटात ते प्रमुख दावेदारापैकी एक आहेत. २०१२पासून डिडिएर डेश्चॅम्पस यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने २०१६च्या युरो स्पध्रेत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, पोर्तुगालने त्यांना त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर पराभूत केले. पण, विश्वचषक स्पध्रेपूर्वीच्या या प्रमुख स्पध्रेचे उपविजेतेपद फ्रान्स संघाचे मनोबल उंचावणारे आहे.

प्रमुख खेळाडू : अ‍ॅलेक्सांड्रे लॅसेझेट, अँटोने ग्रिझमन आणि कायलीन मॅब्प्पे ही त्रयी फ्रान्सचे प्रमुख अस्त्र आहे.

पोर्तुगाल : प्रगल्भता वाढली

युरो चषक स्पध्रेतील यशानंतर पोर्तुगाल संघाला वेध लागलेत ते विश्वचषक विजयाचे. चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये त्यांना साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. मात्र, चार वर्षांनंतरचा पोर्तुगाल संघ अधिक प्रगल्भ झाला आहे आणि मोठय़ा स्पर्धामध्ये आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने तोही जेतेपदासह शेवट करण्यासाठी आसुसलेला आहे.

प्रमुख खेळाडू : कोन्सॅलो ग्युडेस हा व्हेलेन्सिया क्लबचा खेळाडू रेयाल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ठरू पाहत आहे. त्याच्या उल्लेखनीय खेळीच्या जोरावर व्हेलेन्सियाने ला लिगा स्पध्रेत चांगली कामगिरी केली आहे.

इजिप्त : देशाच्या अपेक्षांचे ओझे

१९९० नंतर प्रथमच विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरल्याने इजिप्तच्या संघावर देशाच्या अपेक्षांचे ओझे आहे. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत मोहम्मद सलाह दुखापतग्रस्त झाल्याने इजिप्तसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इजिप्तचे चाहते मोठय़ा संख्येने रशियात दाखल झाले आहेत. त्यांनी फिफाकडे जादा तिकिटांचीही मागणी केली आहे. यजमान रशियाची कामगिरी समाधानकारक न झाल्यास इजिप्तला बाद फेरीत प्रवेश करण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

प्रमुख खेळाडू : मोहम्मद सलाह हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे. इंग्लिश प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात लिव्हरपूलकडे खेळणाऱ्या सलाहने हंगामात सर्वाधिक ४३ गोल केले आहेत.

कोलंबिया : बचाव फळीवर मदार

दक्षिण अमेरिका गटात चौथे स्थान पटकावत कोलंबियाने विश्वचषक प्रवेश निश्चित केला. त्यांची संपूर्ण मदार बचावफळीवर आहे. डेव्हिडसन सांचेझ आणि येरी मिना हे अनुक्रमे २१ व २३ वर्षांचे खेळाडू कोलंबियाचे प्रमुख अस्त्र आहेत. त्यांना अनुभवी जोस नेस्टर पेकरमनची साथ आहेच. शारीरिक तंदुरुस्ती आणि कौशल्यपूर्ण खेळ, ही त्यांची मजबूत बाजू.

प्रमुख खेळाडू : जेम्स रॉड्रिगेज याला विसरून चालणार नाही. मधल्या फळीतील प्रमुख शिलेदार आणि मोक्याच्या क्षणी गोल करण्याची धमक असणारा हा खेळाडू.

इराण : यशस्वी आशीयाई संघ

आशिया खंडातील सर्वाधिक यशस्वी संघ अशी इराणची ओळख आहे. पाचव्यांदा ते विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहेत. कार्लोस क्युइरोझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इराणला नमवणे अवघड आहे आणि याची प्रचीती त्यांनी वारंवार दिली आहे. २०११ पासून ते या संघाला मार्गदर्शन करीत आहेत आणि संघाने ६९ विजय मिळवले असून केवळ आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

प्रमुख खेळाडू : सरदार अझमौन या २२ वर्षीय खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा आहे. त्याने आत्तापर्यंत २२ गोल केले आहेत.

जपान : अनुभवच सर्व काही

सलग सहाव्यांदा जपान विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे आणि आशियातील सर्वोत्तम संघापैकी हा एक आहे. त्यांचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे आणि त्यांच्याकडे अनुभवही आहे. बचावपटू सकाई, नागाटोमो आणि योशिदा यांच्याकडे एकूण २२० आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव आहे. आक्रमणपटू ओकाझाकीच्या नावावर १०० सामने आहेत आणि कांगवा, होंडा व कोन्नो हेही शंभरच्या आसपास सामने खेळले आहेत. या स्पध्रेत सहभागी होणारा हा सर्वात अनुभवी संघांपैकी एक आहे.

प्रमुख खेळाडू : असानो आणि कुबो या युवा आक्रमणपटूची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

दक्षिण कोरिया : दडपणाशिवाय खेळण्यावर भर

जर्मनी, मेक्सिको आणि स्वीडनसारख्या बलाढय़ संघांचा सामना दक्षिण कोरियाला करावा लागणार आहे. त्यांच्याकडून जगातील फुटबॉलप्रेमींच्या फार आशा नसल्या तरी मायदेशात त्यांच्याकडून २००२च्या कामगिरीची पुनरागमनाची आस लावली जात आहे. त्या वेळचा नायक जी सुंंग पार्क निवृत्त झाला असला तरी कोरियन संघात आश्चर्यकारक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. यंदा त्यांची मदार टोटनहॅक क्लबच्या हीयूंग मिन सन याच्यावर आहे. प्रशिक्षक टाए-यंग शीन यांना वर्षभराच्या कार्यकाळात साजेशी कामगिरी करता आली नसल्याने त्यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत. त्यामुळे मुख्य स्पध्रेत मोठी मजल मारण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे कोरियाचे लक्ष्य असेल.

प्रमुख खेळाडू : रेड बुल सॅल्झबर्ग क्लबचा आक्रमणपटू ही-चॅन हवँग याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवायला हवे.

सौदी अरेबिया : जुनं ते सोनं

पाचव्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होणारा सौदी अरेबियाचा संघ हा रशियात खेळणारा सर्वाधिक वयस्कर संघ असेल. त्यांच्या खेळाडूंच्या वयाची सरासरी ही २९ वष्रे आहे. अर्जेटिनाचे माजी खेळाडू आणि संयुक्त अरब अमिरातीचे माजी प्रशिक्षक एडगाडरे बौझा यांनी गतवर्षी या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली. त्याशिवाय ओसामा हावसावी (१३० सामने) आणि तैसीर अल-जासीम (१३० च्या आसपास) हे सर्वाधिक अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यांचे बरेचसे खेळाडू हा अखेरचा विश्वचषक खेळणार असल्याने तेही आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहेत.

प्रमुख खेळाडू : संघात युवा खेळाडू नसल्याने ३३ वर्षीय ओसामा याच्यावर सर्वाचे लक्ष असेल.

मेक्सिको : विशेषज्ञांचा संघ, पण अंदाज बांधणे अवघड

पात्रता फेरीत मेक्सिकोने पाच गुणांच्या फरकाने विश्वचषक प्रवेश निश्चित केला. त्यांच्याकडे प्रत्येक आघाडीवर विशेषज्ञ आहेत. ज्युआन कार्लोस यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ रशियात आपली छाप पाडण्यासाठी येणार आहे. आत्तापर्यंत मेक्सिकोला केवळ ६ सामन्यांत पराभव पत्करावा लागला असला तरी मोठय़ा स्पध्रेतील त्यांची कामगिरी दिलासादायक नाही. कार्लोस व्हेला, आंद्रेस गाडरेडो, ओरिब पेराल्टा, जिओव्हानी डॉस ही नावे मेक्सिकोला तारू शकतील. पण, या संघाचा अंदाज बांधणे अवघडच आहे.

प्रमुख खेळाडू : हिवर्ि्हग लोझानो हा २२ वर्षीय खेळाडू आपला ठसा उमटवण्यासाठी आतुर आहे. वेग आणि चेंडूवर अचूक ताबा ठेवून गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याची त्याचे कौशल्य वाखाण्याजोगे आहे.

नायजेरिया : सर्वात युवा संघ

जर्मनीचे ६४ वर्षीय गेर्नोट रोहर गेल्या अनेक वर्षांपासून नायजेरिया संघाला मार्गदर्शन करत आहेत. मैत्रीपूर्ण लढतीत या संघाने अर्जेटिनाला ४-२ असे लोळवले होते. अ‍ॅलेक्सी आयवोबी, केलेची इहीनाचो आणि अहदम मुसा हे कौशल्याची खाण असलेले युवा खेळाडू नायजेरियाकडे आहेत. या स्पध्रेतील सर्वात युवा संघ म्हणून नायजेरियाची ओळख आहे. याच युवा जोशाच्या जोरावर हा संघ उलटफेर करण्यास उत्सुक आहे. त्यामुळेच ‘ड’ गटाला ग्रुप ऑफ डेथ असे संबोधू शकतो.

प्रमुख खेळाडू : या संघात बरेच युवा खेळाडू आहेत, परंतु आयवोबी आणि इहिनाचो यांचा खेळ पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मोरोक्को : बचाव आणि आघाडीचे योग्य मिश्रण

आफ्रिकन पात्रता स्पध्रेत मोरोक्कोने प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिलेला नाही. मेहदी बेनाटिया आणि नाबिल दिरार हे अनुकमे सेंटर बॅक आणि राइट फ्लँक पोझिशनला खेळणारे खेळाडू बचावफळीला अधिक मजबूत करतात. हाकिम झियेच आणि सोफियान बौफाल हे गोल करण्याची संधी निर्माण करण्यात तरबेज आहेत. मात्र, दुर्दैवाने मोरोक्कोला गटातच स्पेन, पोर्तुगाल आणि इराणसारख्या कट्टर प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. हेव्‍‌र्हे रेनार्ड या संघाचे प्रशिक्षक आहेत.

प्रमुख खेळाडू : २४ वर्षीय आक्रमणपटू हकिम झियेचला जन्मजात फुटबॉलचे कौशल्य भेट म्हणून दिले आहे.

टय़ुनिशिया : बारा वर्षांनंतर पुनरागमन

२००६ नंतर प्रथम टय़ुनिशिया विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. आफ्रिकन देशात सर्वोत्तम क्रमवारी असलेला हा संघ प्रदीर्घ काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. या संघात प्रचलित नाव नसले तरी पात्रता फेरीत अपराजित राहून त्यांच्या खेळाडूंनी त्यांच्यातील धमक दाखवून दिली आहे. मध्यरक्षक वाहबी खाझजी हे संघातील एकमेव प्रमुख नाव. त्यापाठोपाठ विंगर युसूफ मस्कानी हा आक्रमणाची धुरा सांभाळणारआहे. प्रशिक्षक नाबिल मालौल यांनी संघ बचावात्मक खेळ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संपूर्णपणे अपरिचित आणि अंदाज बांधण्यात कठीण असले तरी त्यांना ९० मिनिटांत पराभूत करणे तितके सोपे नाही.

प्रमुख खेळाडू : वाहबी खाजरी याच्या खांद्यावर संघाची मदार आहे

कोस्टा रिका : युवा खेळाडूंची कमतरता

ब्राझीलमध्ये चार वर्षांपूर्वी संपूर्णपणे अनोळखी असलेला हा संघ यंदा पुन्हा आपली धमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील सर्वात यशस्वी गोलरक्षकांपैकी एक कायलर नव्हास त्यांच्याकडे आहे आणि नव्हासला प्रमुख स्पर्धामध्ये खेळण्याचाही भरपूर अनुभव आहे. मात्र, युवा खेळाडूंची कमतरता असलेल्या या संघाला तुलनेने बुजुर्ग खेळाडूंवर अवलंबून राहावे लागणार आहे. सौदी अरेबियापाठोपाठ स्पध्रेतील दुसरा सरासरी वयस्कर संघ म्हणून कोस्टा रिकाची ओळख आहे. मात्र, हे खेळाडू प्रचंड मेहनती आहेत आणि प्रशिक्षक ऑस्कर रॅमिरेझ यांना त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ कसा काढून घेता येईल, याचे कौशल्य माहीत आहे.

प्रमुख खेळाडू : सेल्को बोर्गेस हा संघातील अनुभवी खेळाडूच कोस्टा रिकाला तारू शकतो. त्याच्या जोडीला नव्हास आहेच.

सेनेगल :  १५ वर्षांनंतर विश्वचषक खेळणार

दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने २००२ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर सेनेगल यंदा पुन्हा दिसणार आहे. प्रशिक्षक अ‍ॅलियू सिस्से यांनी २००२ मध्ये संघाला मार्गदर्शन केले होते आणि यंदाही त्यांच्यावर जबाबदारी आहे. सॅडीयो माने आणि इड्रीसा ग्युये यांना राष्ट्रीय संघाकडून आपला दबदबा दाखवण्याची संधी आहे. बचावात कॅलिडू कौलिबॅली, चेख कौयाटे हेही चांगली कामगिरी करत आहेत.

प्रमुख खेळाडू : कैटा बॅल्डे आणि सॅडीयो माने या आक्रमणपटूंचा जलद खेळ पाहण्यासारखा आहे.

पेरू : ३५ वर्षांनी पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेऑफ लढतीदरम्यान पेरू जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर होता. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक महागात पडू शकते. १९८२ नंतर हा संघ विश्वचषकात खेळणार आहे आणि एक एक लक्ष्य गाठत आगेकूच करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्यात संघातील बरेच खेळाडू या स्पध्रेनंतर निवृत्ती स्वीकारतील आणि त्यामुळे ही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे. प्रशिक्षक रिकाडरे गॅरेका यांच्या मार्गदर्शनाखाली पेरूने २०१५ पासून अपराजित (५ विजय ४ अनिर्णीत) राहण्याचा पराक्रम केला आहे.

प्रमुख खेळाडू : जेफर्सन फरान याच्याकडे रशियातील लोकोमोटीव्ह मॉस्को या क्लबकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तो संघाच्या फायद्याचा ठरू शकतो.

पनामा : गमावण्यासारखे काहीच नाही

व्यवहाराचा विचार केल्यास विश्वचषक स्पध्रेत खेळणारा हा सर्वात स्वस्त संघ आहे. प्रथमच ते या स्पध्रेत खेळणार असल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मात्र, काही तरी कमावून पुढील पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असेल. ३६ वर्षीय सेंटर बॅक फेलिप बलॉय आणि ३६ वर्षीय स्ट्रायकर ब्लास पेरेझ हे अनुभवी खेळाडू संघाला तारू शकतील, अशी अपेक्षा आहे.

प्रमुख खेळाडू : रिकाडरे अ‍ॅव्हीला

मजेशीर आकडेवारी

विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात इंग्लंडने सर्वाधिक ११ सामने गोलशून्य बरोबरीत सोडवले आहेत.

विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक ११ रेड कार्ड ब्राझीलच्या खेळाडूंना मिळाले असून त्यापाठोपाठ अर्जेटिना (१०) आणि उरुग्वे (९)यांचा क्रमांक येतो.

पेरू १९८२ नंतर प्रथमच विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. म्हणजे जवळपास ३६ वर्षांनंतर हा संघ मुख्य स्पध्रेसाठी पात्र ठरला असून इतका प्रदीर्घ काळ मुख्य स्पध्रेपासून बाहेर राहणारा तो एकमेव संघ आहे.

विश्वचषक स्पध्रेच्या एका सामन्यात सर्वाधिक १२ गोलचा विक्रम ऑस्ट्रिया वि. स्वित्र्झलड यांच्या लढतीत झाला. २६ जुलै १९५४ मध्ये ऑस्ट्रियाने ७-५ असा विजय मिळवला होता.

फ्रान्सच्या जस्ट फोन्टेन यांच्या नावावर असलेला एका स्पध्रेतील सर्वाधिक १३ गोलचा विक्रम आजही कायम आहे. त्यांनी १९५८ च्या विश्वचषक स्पध्रेत ही कामगिरी केली होती, तर एका सामन्यात सर्वाधिक पाच गोलचा विक्रम रशियाच्या ओलेग सॅलेंकोच्या नावावर आहे. २८ जून १९९४ च्या स्पध्रेत कॅमेरूनविरुद्ध त्यांची गोलपंचक साजरे केले.

सध्याच्या खेळाडूंमध्ये जर्मनीच्या थॉमस म्युलर याच्या नावावर सर्वाधिक १० गोल जमा आहेत आणि विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक १६ गोल करणाऱ्या मिरोस्लाव्ह क्लोसचा विक्रम म्युलरला खुणावत आहे.

मिरोस्लाव्ह क्लोस, पेले आणि उवे सीलर यांची चारही विश्वचषक स्पर्धामध्ये गोल केले आहेत आणि रशियात या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी टीम चाहील, राफेल मार्कझ, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि डेव्हिड व्हिला यांना आहे.

जेर्ड म्युलर हा एकाच विश्वचषक स्पध्रेत दहा गोल करणारा शेवटचा खेळाडू आहे. त्यानंतर रोनाल्डोने २००२च्या स्पध्रेत ८ गोल केले होते.

विश्वचषक इतिहासात सर्वच्या सर्व २१ स्पर्धा खेळणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे.

१९६६ मध्ये जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या इंग्लंडला त्यानंतर केवळ एकदाच (१९९०) उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे.

Story img Loader