भरजरी पारंपरिक कपडय़ांवर इतर दागिन्यांसोबत तुमचं सौंदर्य खुलवेल ते घडय़ाळ! केवळ पट्टय़ाच्या घडय़ाळांचा जमाना गेला. आता सध्या बाजारात उपलब्ध असलेली ट्रेण्डी घडय़ाळं आता तुमचा लुक आणखी देखणा करतील.

सणासुदीचा कालावधी जवळ आला, की सगळ्यांची लगबग सुरू होते. कोणते कपडे घालावे, बाजारात त्यांचे ट्रेण्ड्स काय आहेत, त्यावर कशा प्रकारची ज्वेलरी चांगली दिसेल या सगळ्याची गणितं लगेच डोक्यात सुरू होतात. हातातल्या दागिन्यांइतकंच महत्त्व आता घडय़ाळालाही आहे. म्हणून हातात ब्रेसलेट, कडं, बांगडी जितकं सौंदर्य खुलवते तितकंच हातातलं घडय़ाळही तुमच्या देखणेपणात भर घालतं. दिवाळीसाठी कपडय़ांची खरेदी नेहमीच केली जाते. यंदा कपडय़ांसह घडय़ाळाची खरेदी करायला हरकत नाही; पण दुकानात जाऊन आवडणारा रंग आणि पॅटर्न बघून ते विकत घेऊ नका. तर सध्याचा ट्रेण्डही जाणून घ्या. घडय़ाळांमध्येही आता खूप वैविध्य आलंय. सोबर पण ट्रेण्डी अशी सांगड घालत सध्याच्या घडय़ाळांच्या डिझाईन्स आकर्षित करताहेत. घडय़ाळांच्या या विविधतेवर टाकलेली नजर.

ब्रेसलेट घडय़ाळ

दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण पारंपरिक कपडय़ांमध्येच वावरत असतो. एका हातात बांगडय़ा घातल्या तर दुसऱ्या हातात काय घालावं, असा प्रश्न पडतो. घडय़ाळ घालायचं ठरवलं तर आपल्या पारंपरिक कपडय़ांवर नेहमीचं घडय़ाळ शोभून दिसेलच असं नाही. यासाठी टायटन ब्रॅण्डची नवीन फेस्टिव्ह रेंज बाजारात उपलब्ध झाली आहे. यामध्ये घडय़ाळांना ब्रेसलेटसारखं रूप देण्यात आलं आहे. हिरे, सिल्व्हर किंवा गोल्डन यांचा मुलामा लावलेली घडय़ाळं त्यामध्ये आहेत. त्यामुळे या घडय़ाळांना ब्रेसलेटसारखा लुक येतो. पारंपरिक कपडय़ांवर अशी घडय़ाळं खूप शोभून दिसतात. घडय़ाळ घातल्याच्या फीलसह त्याला ब्रेसलेटचाही लुक मिळतो. पुरुषांसाठी चंदेरी किंवा सोनेरी पट्टय़ाची घडय़ाळं उपलब्ध आहेत.

अशा ब्रेसलेट स्टाइल घडय़ाळांमध्ये बरीच डिझाईन्स उपलब्ध आहेत. यांची किंमत २ हजारांपासून सुरू होते. महागडी घडय़ाळं घ्यायची नसतील तर शहरातील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीटवर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सची ब्रेसलेट स्टाइल घडय़ाळं नक्कीच मिळतील. तसंच वेगवेगळे रंग, आकारसुद्धा येथे मोठय़ा प्रमाणावर मिळतील. त्यांची किंमत २५० रुपये ते ५०० रुपये या दरम्यान असतात. अशा घडय़ाळांमुळेही मस्त लुक येतो. ब्रेसलेट किंवा बांगडी न घालताही एकाच हातात घडय़ाळ घालू शकता. म्हणजे एक हात मोकळा आणि एका हातात ब्रेसलेट कम घडय़ाळ असंही चांगलं दिसतं. सैल किंवा बरोबर फिटिंग, तुम्हाला हवं तसं त्याचं स्टायलिंग तुम्ही करू शकता.

स्पोर्टी लुक घडय़ाळ

फास्टट्रॅक ब्रॅण्डचं नवीन स्पोर्टी लुक असलेल्या घडय़ाळांचं कलेक्शन बाजारात आलं आहे. हे स्पोर्टी लुक असलेल्या घडय़ाळांचं कलेक्शन पुरुष आणि स्त्रिया या दोघांसाठीही उपलब्ध आहे. स्त्रियांसाठीच्या घडय़ाळांमध्ये काहीसे बदल दिसून येतात. त्यांच्याकलेक्शनमध्ये डायलचा आकार लहान आणि थोडीशी नाजूक डिझाईन्स आहेत. मुलांचे कुर्ते, धोती, जॅकेट्स अशा पारंपरिक कपडय़ांवरही घडय़ाळ खूप छान दिसतं. मुलींनाही ओव्हरसाइज कुर्ती, धोती पॅण्ट्स किंवा वेस्टर्न आऊटफिट्सवर स्पोर्टी लुकघडय़ाळं मस्त दिसतील. पॉवर ड्रेसिंगचं उत्तम उदाहरण ठरतील. त्याची किंमत ९०० रुपयांपासून चालू होते. स्ट्रीट शॉपिंग करतानाही तुम्हाला अशी घडय़ाळं नक्कीच मिळतील. यात वेगवेगळे प्रकार आढळतात. आकडे असलेली घडय़ाळं, चिन्हांकित वेळ दाखवणारी घडय़ाळं किंवा डिजिटल घडय़ाळं यात उपलब्ध आहेत. प्रकारानुसार त्यांची किंमत बदलत जाते.

फंकी कलरफुल घडय़ाळ

टाइमेक्स ब्रॅण्डचे नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. फंकी कलरफुल घडय़ाळाची रेंज सध्या त्यांनी बाजारात आणली आहे. कोणत्याही प्रकारच्या आऊटफिट्सवर ही घडय़ाळं शोभून दिसतील. मुलांसाठी कोणत्याही शर्ट, टीशर्टवर ही घडय़ाळं उठावदार दिसतील. तसेच केवळ सणासुदीच्या काळात ही घडय़ाळं वापरली जाऊ  शकतात. फॉर्मल, इन्फॉर्मल कोणत्याही लुकसाठी ही घडय़ाळं शोभून दिसतात. फॉर्मल वेअर वा वेगळा फंकी आणि आऊट ऑफ द बॉक्स लुक देण्यासही ही घडय़ाळाची रेंज परफेक्ट आहे. मुलीसुद्धा ही घडय़ाळं नक्कीच वापरू शकतात.

ब्रॅण्डेड घडय़ाळांबरोबरीनेच स्ट्रीट शॉपिंगमध्येही घडय़ाळाचे वेगवेगळे हटके ट्रेण्ड्स उपलब्ध झाले आहेत. तरुणाईला आकर्षित करणारे हे ट्रेण्ड्स आहेत. अशा स्ट्रीट शॉपिंग घडय़ाळांवर एक नजर टाकूया.

दोऱ्यांची घडय़ाळं

वेगेवगेळे रंगीबेरंगी दोरे या घडय़ाळांत वापरले आहेत. दोरे एकमेकांत गुंफवून त्याच्या वेण्या घालून त्यामध्ये डायल गुंफली जाते. अशा प्रकारच्या घडय़ाळ्यांचा सध्या ट्रेण्ड आहे. कोणत्याही आऊटफिटला साजेशी अशी ही घडय़ाळं असल्यामुळे तरुणाईची या घडय़ाळांना खूप मागणी आहे. अगदी ट्रेडिशन कुर्ता ते वेस्टर्न वेअर कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर ही घडय़ाळं उठून दिसतील. त्यांची किंमत २५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.

लहान मुलांसाठी घडय़ाळं

पोकीमॉन प्रोची हवा जरा ओसरली असली तरी लहानग्यांच्या मनात त्यांनी आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे कपडय़ांबरोबरीनेच चपला, बुटांवर तसेच घडय़ाळांवर हे पोकीमॉन येऊन बसलेले दिसतात. घडय़ाळाचे पट्टे, डायल यावर वेगेवगेळे पोकेमॉनचे प्रिंट्स असलेली घडय़ाळं बाजारात उपलब्ध आहेत. पोकीमॉन बरोबरीनेच नोबिता आणि आवडता डोरेमॉन या कार्टून पात्रांचे प्रिंट्ससुद्धा सध्या इन आहेत. त्याचबरोबर छोटा भीम, मिनिअन, डोरा यांचे प्रिंट्ससुद्धा लहान मुलांच्या घडय़ाळांमध्ये उपलब्ध आहेत. लहान मुलींसाठी हातातल्या कडय़ांसारखी घडय़ाळं सध्या बाजारात दिसतायत. पट्टे बदलता येणाऱ्या घडय़ाळांचे विविध प्रकार लहान मुलांसाठी उपलब्ध आहेत. ब्रॅण्डेड शो रूम्समध्येसुद्धा लहान मुलांसाठी अनेक रंगीबेरंगी घडय़ाळं बघायला मिळतात.

अँटिक घडय़ाळं

दिवाळीच्या दिवसात प्रत्येक जण आपापलं घर सजवत असतो. सध्या विंटेज इंटेरिअर खूप ट्रेण्ड इन आहे. अशा इंटेरिअरला साजेशा सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. विंटेज घडय़ाळाचे विविध प्रकार त्यात पाहायला मिळतात. भिंतीवर लावण्याच्या घडय़ाळांपासून ते हातावर बांधण्याच्या घडय़ाळांपर्यंत सगळे प्रकार त्यात उपलब्ध आहेत. लोलकाचं घडय़ाळ पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आहे. जुन्या इराणी कॅफेमध्ये भिंतीवर लटकवलेली घडय़ाळंसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत. गोल विंटेज घडय़ाळांचासुद्धा या ट्रेण्डमध्ये समावेश आहे. या घडय़ाळांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. विंटेज घडय़ाळांमध्ये काळा, राखाडी, तपकिरी हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. दिवाळीच्या दिवसात घराला सजवताना ही विंटेज घडय़ाळं नक्कीच छान दिसतील. तसंच ही घडय़ाळं विविध आकारात उपलब्ध असल्यामुळे दिवाळीच्या दिवसात भेटवस्तू देण्यासाठी चांगला पर्याय ठरेल. यांच्या किमती हजारापासून सुरू होतात. अशा पद्धतीची विंटेज घडय़ाळं मिळण्याच्या अनेक ऑनलाईन शॉपिंग साइट्सही आहेत.

याबरोबरच हातातील विंटेज घडय़ाळांचाही सध्या ट्रेण्ड आहे. लेथारचे काही पट्टे, काही विणलेले दोरे आणि काही वेगवेगळे स्टोन्स, फुलपाखरू, आयफेल टॉवरची प्रतिकृती यांनी ही घडय़ाळं सजलेली असतात. यांची किंमत १०० रुपयांपासून ते अगदी ८०० रुपयांपर्यंत आहे. स्ट्रीट शॉप्स बरोबरीनेच ऑनलाइन साइट्सवर अशी घडय़ाळं मिळू शकतात. नाजूक सोनेरी किंवा चंदेरी चेनमध्ये घडय़ाळचं पेंडण्ट असतं. ही चेन बऱ्यापैकी मोठी असते. घडय़ाळाच्या पेंडण्टला हिरे, मोती यांनी सजवलेलं असतं. त्याचे वेगवेगळे डिझाइन्स उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार रंग निवडू शकता. तसंच मुलींच्या इंडो-वेस्टर्न लूकसाठी हे घडय़ाळ खूप छान दिसेल. गळ्यात कोणतेही नेकपीस घालण्यापेक्षा हातात अशी घडय़ाळयुक्त चेन घातली तर त्याचा एक क्लासी लूक मिळेल. पलाझो पॅण्ट आणि लाँग कुर्ती, क्रॉपटॉप आणि धोती अशा कपडय़ांवर ही घडय़ाळं उठावदार दिसतील. याची किंमत ५०० रुपये ते १००० रुपयांदरम्यान आहे.

बाजारात घडय़ाळांचे असंख्य ट्रेण्ड्स दिसून येत आहेत. त्याचा यंदाच्या दिवाळीत स्वत:साठी आणि भेटवस्तू म्हणून नक्कीच वापर करून बघा. दागिन्यांबरोबरच अ‍ॅक्सेसरी म्हणून घडय़ाळ खूप छान दिसेल.

ट्रेण्डी घडय़ाळं वापरायच्या काही टिप्स:

घडय़ाळ घेताना आपण काय प्रकारचे कपडे घालणार आहोत त्यानुसारच घडय़ाळ निवडावं. कधीकधी प्रत्येक घडय़ाळ अपल्या ओव्हरऑल लूकसाठी शोभून दिसेलच असं नाही.

घडय़ाळ विकत घेताना आपण ते कोणकोणत्या दिवशी किंवा प्रसंगांना वापरू शकतो याचा विचार करूनच घ्यावं.

एखाद्या ठरावीक समारंभासाठी घडय़ाळ घेताना स्ट्रीट शॉपिंग फायद्याची ठरेल.

हाताच्या मनगटाच्या आकारानुसारच घडय़ाळाची निवड करावी.

अती मोठं घडय़ाळ वापरू नये, त्यामुळे तुमच्या आऊटफिटपेक्षा संपूर्ण लक्ष त्या घडय़ाळाकडे केंद्रित होण्याची शक्यता असते.

मुलींनी घडय़ाळाची खरेदी करताना मुलांच्या घडय़ाळांवरही एकदा नजर टाकावी. कधी कधी मुलांची काही घडय़ाळे मुलींनाही शोभून दिसतात. त्याचा लूक क्लासी दिसतो.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader