शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या कार्यात मोलाचा वाटा आहे तो महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा. तोच अभिमान मनात रुजवलेले अनेक जण इतिहासाच्या ओढीने किल्ले बघायला जातात. पण तिथे गेल्यावर उपलब्ध बांधकामातून नेमकं काय पाहायचं, कसं समजून घ्यायचं हे समजतंच असं नाही. म्हणूनच किल्ला समजून घेण्याआधी हा गृहपाठ-
किल्ला पाहण्याच्या अनेक पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर जाणाऱ्यांमध्ये दोन दिवसांत तीन ते चार किल्ले धावत बघणारे दुर्गभटके असतात. हौशी ट्रेकर, पिकनिकसाठी येणारे असतात. या सर्वाचा प्रामाणिक उद्देश किल्ला पाहणे हा गृहीत धरला तरी या सर्वानी खरंच किल्ला पाहिला आहे असे म्हणता येईल का, याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. खरं तर एखादा किल्ला पाहणं ही गोष्ट किल्ल्यावर गेल्यावर नाही तर जाण्यापूर्वीच सुरू व्हायला हवी. अनुभवी ट्रेकर्स किल्ला पाहण्याआधी त्याची माहिती गोळा करतात. बऱ्याचदा यात किल्ल्यावर कसं जायचं, राहण्याची, पाण्याची सोय यापुरतीच माहिती मर्यादित असते. हौशी ट्रेकर आणि पर्यटक एवढीही तसदी घेत नाहीत. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातला वाटाडय़ा कम गाइड घेऊन ते किल्ला पाहायला निघतात. तोही त्याच्या वकुबाप्रमाणे किल्ला दाखवतो. कुलाबा तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरचे गाइड किल्ल्यापासून समुद्राखालून पार किनाऱ्यापर्यंत भुयार आहे असे बिनदिक्कत सांगतात. पर्यटकही हे ऐकून भारावून जातात. कोणीही असा विचार करत नाही की, समुद्राखालून भुयार करण्याएवढं प्रगत तंत्रज्ञान जर आपल्याकडे त्या काळी असते तर आपण गुलामगिरीत कशाला खितपत पडलो असतो? किल्ला पाहताना आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाली तरच किल्ला पाहिल्याचे समाधान खऱ्या अर्थाने मिळते.
किल्ला कसा पाहावा, या प्रश्नाचे उत्तर तीन टप्प्यांत देता येईल. तो पाहायला जाण्यापूर्वी किल्ल्याची काढलेली ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती. किल्ला पाहताना पडलेले प्रश्न, केलेल्या नोंदी आणि किल्ला पाहून आल्यावर त्यांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न.
किल्ल्याची भौगोलिक रचना समजण्यासाठी नकाशांचा आणि हल्लीच्या काळात गुगल मॅपचा चांगला उपयोग होतो. किल्ला कुठल्या डोंगररांगेवर आहे, त्याच्या आजूबाजूला कोणते किल्ले, शहरे, बंदरे, बाजारपेठा, घाटमार्ग आहेत ते पाहता येते. किल्ल्यांची निर्मिती ही युद्ध काळात शत्रू सन्यापासून राज्याचे रक्षण करण्यासाठी आणि शांततेच्या काळात व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रशासकीय सोयीसाठी झाली होती. याशिवाय राजधानीच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी त्याच्या प्रभावळीत किल्ले बांधले जात.
प्राचीन काळापासून भारतातल्या राज्यसत्तांचा समुद्रमाग्रे परदेशांशी व्यापार चालू होता. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून ते घाटमाथ्याचा पायथा ते घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी बनवलेली पाहायला मिळते. उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगडाचं देता येईल. महाबळेश्वरी उगम पावणारी सावित्री नदी बाणकोटजवळ अरबी समुद्राला मिळते. प्राचीन काळापासून महाड गावातून वाहणाऱ्या सावित्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढय़ा घाट, ढवळ्या घाट इत्यादी) घाटमार्गानी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) या मार्गावर केलेले रस्ते आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी साखळी उभारली जात असे. आपण आज गुगल मॅप वापरून संबंधित किल्ला कुठल्या प्रकारात आहे, तो राजधानीच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला की व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी बांधला आहे, त्याचे व्यापारी मार्गावरील स्थान इत्यादी गोष्टी पाहू शकतो.
किल्ल्याचे भौगोलिक स्थान जेवढे महत्त्वाचे तेवढाच त्याचा इतिहास महत्त्वाचा असतो. किल्ला कुठल्या राजवटीत बांधला, किल्ल्यावर आणि परिसरात झालेली युद्धं, महत्त्वाच्या घटना किल्ल्यावर जाण्यापूर्वीच वाचलेल्या असल्या तर किल्ला समजायला त्याचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. आज गुगल मॅप आणि किल्ल्याचा इतिहास यांची सांगड घातली तर अनेक गोष्टी नव्याने कळतात. किल्ल्याच्या परिसरात युद्ध झाले असेल तर सन्याच्या हालचाली कशा झाल्या असतील. भौगोलिक परिस्थितीचा कसा फायदा घेतला, किल्ल्याची बांधणी करताना नसíगक रचनेचा वापर कसा केला गेला या गोष्टी आपण सहजरीत्या पाहू शकतो. प्रत्यक्ष किल्ल्यावर गेल्यावर किल्ल्याच्या सर्व बाजू एकाच ठिकाणाहून दिसणं फार कठीण असतं अशा वेळी या घरच्या अभ्यासाचा चांगला उपयोग होतो.
हे सगळं करून आपण किल्ल्याखालील गावात पोहोचतो. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणजे घेरा. हे किल्ल्याच्या दृष्टीने जसे महत्त्वाचे असते तसेच ते आपल्यालाही अनेक ऐतिहासिक गोष्टी दाखवत असते. पण बऱ्याचदा पायथ्याच्या गावाकडे आपलं लक्ष जात नाही. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात वीरगळ, सतीचा हात कोरलेले दगड, समाध्या पाहायला मिळतात. युद्धात कामी आलेल्या वीरांच्या सन्मानार्थ वीरगळ, समाध्या बांधल्या जातात. तर या वीरांबरोबर सती जाणाऱ्या स्त्रियांसाठी सतीशिळा उभारलेल्या असतात. यावर स्त्रीचा चुडा (बांगडय़ा भरलेला) हात कोरलेला असतो. याशिवाय किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात मंदिर असते. त्यात शिलालेख किंवा किल्ल्यावरील मंदिर पडल्यामुळे मूर्ती आणून ठेवलेल्या पाहायला मिळतात. किल्ल्यावर अनेक लोकांच्या अंगात अचानक स्फूर्ती येते. तिचं काय करावं हे न कळल्याने किल्ल्याचे दगड, तोफा किल्ल्यावरून ढकलून दिल्या जातात. या तोफा गावात असतात. अनेक किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावात अशा तोफा पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील हनुमंत गडाच्या पायथ्याच्या गावात आडबाजूला दोन तोफा जमिनीत पुरलेल्या आहेत त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यावर १७१२ हे वर्ष कोरलेले पाहायला मिळते. इंग्रजांच्या काळात किल्ले ओस पडायला सुरुवात झाली. किल्ल्यावरील वस्ती आजूबाजूच्या गावात स्थिरावली. पुढील काळात आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी किल्ल्यावरील वाडय़ांचे कोरीव दगड, लाकडी खांब, तुळया, दरवाजे इत्यादी सामान खाली आणले. अशा प्रकारे सजवलेली घरे अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. धुळे जिल्हय़ातील भामेर किल्ल्याखालचं भामेर गाव हे याचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याखालच्या गावातून फेरफटका मारला तर किल्ल्याच्या इतिहासातले अनेक हरवलेले दुवे सापडतात. याशिवाय गावातील लोकांकडून किल्ल्यासंदर्भातील अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. त्याही रंजक असतात. त्यातील अतिरंजितपणा सोडला तर त्यातही ऐतिहासिक घटनेचा अंश असतो.
किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर किल्ल्याखालील गावातील एखादा तरतरीत वाटाडय़ा बरोबर घेऊन जावे. तो प्रशिक्षित गाईड नसला तरी किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळण्यात त्याचे आयुष्य गेल्याने त्याला वर जायच्या वाटा, तेथील सर्व ठिकाणे याची खडान्खडा माहिती असते. त्यामुळे न चुकता कमी श्रमात संपूर्ण किल्ला पाहून होतो. अशा प्रकारे वाटाडय़ांबरोबर संवाद साधत फिरताना आपल्याला आजवर नोंद न झालेल्या अनेक जागाही पाहायला मिळतात, असा माझा अनुभव आहे.
किल्ल्याचं प्रवेशद्वार म्हणजे किल्ल्याच्या अंतरंगात प्रवेश देणारं द्वार, हे बऱ्याच गोष्टी सांगत असतं. किल्ल्याचं प्रवेशद्वार शत्रूच्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम पाहिजे, तसेच ते सुंदर आणि भारदस्तही हवे, जेणेकरून किल्ल्यात येणाऱ्या सामान्य माणसाला एकाच वेळी भारावून टाकलं पाहिजे आणि त्याच्या बुलंदपणाचं, अभेद्यपणाचं त्याच्यावर दडपणही आलं पाहिजे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हा तटबंदी आणि बुरुजांमधला नाजूक भाग असतो. तो नेहमी तटबंदी आणि बुरुजांच्या मध्ये लपवलेला असतो. त्यामुळे प्रत्यक्ष दरवाजासमोर पोहोचेपर्यंत दरवाजा दिसत नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना, तो नाजूक भाग शत्रूपासून संरक्षित राहावा यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या अभ्यासण्यासारख्या असतात. किल्ला भुईकोट असेल तर त्याला संरक्षणासाठी खंदकाची जोड दिलेली असते. या सर्व संरक्षण योजनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत केलेला गोमुखी प्रवेशद्वाराचा प्रयोग ही एक अजोड रचना आहे.
हत्तीने किंवा ओंडक्याने धडका देऊन दरवाजा फोडता येऊ नये यासाठी प्रवेशद्वारावर टोकदार लोखंडी खिळे बसवलेले असतात. खिळ्यांच्या आकार, लांबी आणि रचनेनुसार डभोई, गोवळकोंडा, बीदर, विजापूर, नगर, पुणे, दिल्ली, चितोड असे खिळ्यांचे विविध प्रकार आहेत. दरवाजाच्या मागच्या आतील बाजूस अडसर सरकवण्याची सोय केलेली असते. दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही िभतीत त्यासाठी ठेवलेल्या खोबण्या (दरवाजे अस्तित्वात नसेल तरी) आजही अनेक ठिकाणी पाहता येतात. तसेच दरवाजा व्यवस्थित उघडबंद होण्यासाठी खालच्या आणि वरच्या बाजूस अशी दोन बिजागरीसाठी भोकं बनवली जात. प्रत्येक दरवाजाला साधारणपणे तीन फूट उंचीचा एक छोटा िदडी दरवाजा असतो.
किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर एका बाजूला, दोन्ही बाजूला किंवा मधोमध एखादं चिन्ह किंवा शिल्प कोरलेलं दिसतं, त्यालाच द्वारशिल्प म्हणतात. या द्वारशिल्पातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. द्वारशिल्प म्हणजे ते प्रवेशद्वार किंवा किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्ह असतं. किल्ला बांधणारा राज्यकर्ता मुख्य प्रवेशद्वारावर आपले राजचिन्ह बसवतो. किल्ला दुसऱ्या राजसत्तेच्या हातात गेल्यावर नवीन प्रवेशद्वार किंवा वास्तू बांधल्यास त्यावर नवीन आलेली राजसत्ता आपले राजचिन्ह असलेले शिल्प बसवते. अनेकदा राजसत्ता बदलल्यावर जुनी द्वारशिल्प तशीच ठेवून नवीन राजसत्तेचे राजचिन्हे प्रवेशद्वारावर बसवलेली पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांपुरता विचार केला तर शरभ, कमळ (फूल), गणपती, गंडभेरुंड, हत्ती इत्यादी द्वारशिल्पे प्रामुख्याने पाहायला मिळतात. यावरून किल्ल्याच्या शासकांबद्दल अधिक माहिती मिळू शकते. आज अनेक किल्ल्यांवर आपल्याला उद्ध्वस्त प्रवेशद्वारं दिसतात. तिथे नीट शोध घेतल्यास द्वारशिल्पं दिसू शकतात.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला कमान असलेल्या खोल्या पाहायला मिळतात. त्यांना देवडय़ा म्हणतात. किल्ल्याच्या दरवाजावर पहारा देणारे सनिक या ठिकाणी बसत असत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दुतर्फा तटबंदी आणि बुरूज किल्ल्याला कवेत घेताना दिसतात. तटबंदी बांधताना आतल्या आणि बाहेरील बाजूच्या िभती घडीव दगडाने बांधून दगड एकमेकांशी चुन्याने सांधलेले पाहायला मिळतात. बाहेरील िभतीची जाडी आणि उंची आतील िभतीपेक्षा जास्त असते. या दोन भितींमधील जागेत छोटेमोठे दगड भरून सपाटी तयार करण्यात येते. त्यास फांजी असे म्हणतात. तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी या फांजीचा उपयोग होत असे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूकडील तटबंदी उंच असल्यामुळे युद्धकाळात बाहेरून होणाऱ्या हल्ल्यापासून सनिकांचे संरक्षण होत असे. या फांजीची रुंदी प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळी पाहायला मिळते. काही किल्ल्यांवर एक माणूस फिरेल एवढीच फांजी पाहायला मिळते तर काही किल्ल्यांवर तोफेचा गाडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल इतकी रुंद फांजी पाहायला मिळते. फांजीवर पोहोचण्यासाठी तटबंदीत ठिकठिकाणी जिने बनवलेले असतात. तटबंदी आडून स्वत: सुरक्षित राहून शत्रूवर हल्ला करता यावा यासाठी वेगवेगळ्या उंचीवर आणि कोनात उभी आयताकृती छिद्र ठेवलेली असतात त्यांना जंग्या म्हणतात. या जंग्यांची रचना अशा प्रकारे केलेली असते की किल्ल्याच्या आतून शत्रू सनिकाला बंदुकीच्या किंवा बाणाच्या साहाय्याने सहज टिपता येईल पण शत्रूला बाहेरून जंग्यांच्या आत मारा करता येणार नाही. किल्ल्यातील सनिकाला एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणचा किंवा हलता शत्रू टिपता यावा यासाठी एकाच ठिकाणी तीन ते चार वेगवेगळ्या अंशाच्या कोनात जंग्या बनवलेल्या पाहायला मिळतात. तटबंदीच्या वर पाकळ्यांच्या किंवा त्रिकोणी किंवा पंचकोनी आकाराचे दगड बसवलेले पाहायला मिळतात. त्यांना चर्या म्हणतात. या चर्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडतेच, पण चर्याच्या आड दडून वेळप्रसंगी शत्रूवर माराही करता येतो. किल्ल्याच्या शत्रूच्या हल्ल्याच्या दृष्टीने नाजूक भागात तटबंदी बांधताना दुहेरी आणि तिहेरी तटबंद्या बांधल्या जातात. तटबंदीत पहारेकऱ्यांसाठी खोल्या, भांडारगृह, चोर दरवाजे, शौचकूप बांधलेले पाहायला मिळतात. तटबंदीत मोक्याच्या जागी बाहेर डोकावणारे बुरूज बनवलेले असतात. त्यांच्या गोल, चौकोनी, षटकोनी, चांदणीसारख्या इत्यादी आकारांमुळे चहू दिशांना हल्ला करता येऊ लागला. तटबंदीपासून पुढे आलेल्या बुरुजांमुळे तटबंदीला भिडणाऱ्या शत्रूला बुरुजांवरहून सहजगत्या टिपता येते. बुरुजांच्या वर मोकळी जागा असल्यामुळे त्यावर तोफा ठेवून विविध दिशांना मारा करता येतो. बुरुजांच्या रचनेवरूनही किल्ल्याची निर्मिती कोणी केली हे सांगता येते.
किल्ल्यावर लांबलचक तटबंदी आणि भव्य बुरूज पाहिल्यावर पहिला प्रश्न पडतो की हे बांधण्यासाठी एवढे दगड आणले कुठून? किल्ला बांधण्यासाठी दगड किल्ल्यातूनच काढले जातात. नंतर त्या दगडांच्या खाणीचे रूपांतर पाण्याच्या टाक्यात, तलावात केले जाते. अशा प्रकारे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होतात. पाण्याची टाकी तीन प्रकारची असतात. लेण्यासारख्या खोदलेल्या टाक्यांना सातवाहनकालीन टाकी म्हणतात. याशिवाय डोंगरउतारावर आणि सपाट पृष्ठभागावरही टाकी खोदली जातात. या टाक्यांत पाण्याबरोबर वाहात येणारा केरकचरा, गाळ जाऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केलेल्या असतात. उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केलेले पाहायला मिळतात. टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोकं केलेली दिसतात. त्यांचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. त्यावर कापड टाकून पाण्याचे केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. पाण्याची तुलना संपत्तीशी केली जाते. त्यामुळे बऱ्याच टाक्यांच्या िभतीवर कुबेराची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. टाक्यांत पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागत असल्यामुळे पाण्याच्या स्रोताचं पावित्र्य राखण्यासाठी टाक्यांच्या िभतीवर देवता कोरलेल्या असतात किंवा टाक्यांच्या परिसरात देऊळ किंवा मूर्तीची स्थापना केलेली असते. टाक्यांच्या, तलावांच्या आजूबाजूला नीट निरीक्षण केल्यास अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. किल्ल्यावरील पाण्याच्या साठय़ावरून आपण किल्ल्यावरील वस्तीचाही अंदाज करू शकतो.
किल्ल्यावर दारूकोठार, धान्यकोठार, सदर, वाडे इत्यादी विविध प्रकारच्या इमारती असतात. आज बहुतांश किल्ल्यांवर या वास्तूंचे चौथरेच उरलेले आहेत. पण त्याच्या रचनेवरून आणि स्थानावरून ती वास्तू कोणती आहे याचा आपण अंदाज लावू शकतो.
‘किल्ला पाहून झाल्यावर आपलं तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण किल्लाही आज २०० वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. सह्य़ाद्रीतील पाऊस, वेगवान वारे, पर्यटक, सरकारची अनास्था आणि अतिक्रमण यामुळे किल्ले हळूहळू नष्ट होत चालले आहेत. अनेक संस्था किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे हा गडकिल्ल्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी किल्ला पाहताना आपण आपल्याला दिसलेल्या गोष्टींच्या नोंदी त्यांची मोजमापं घेऊन, कच्चा नकाशा काढून, फोटो काढून आणि जीपीएसने त्याची स्थाननिश्चिती करू शकतो. आज आपल्याला किल्ल्यावरील एखादी गोष्ट ज्या स्वरूपात दिसत आहे तशी पुन्हा दिसेलच असं नाही हे लक्षात घेऊन या नोंदी केल्या आणि त्या लेख, ब्लॉग्ज, साइट इत्यादींच्या माध्यमातून सर्वासमोर आणल्या तर एक चांगला माहितीसंग्रह तयार होऊ शकतो. या दृष्टीने अनेक व्यक्ती, संस्था कार्य करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच हातभार लागू शकतो.
लेखक ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक असून गेली २० वर्षे सह्य़ाद्रीतील भटकंतीचा अनुभव आहे.
अमित सामंत
response.lokprabha@expressindia.com