मृणाल भगत
मत्री, तरुणाईच्या विषयावरील असंख्य मालिका जगभरात विविध भाषांमध्ये तयार होतात. तरी या मालिकेचं गारूड अद्याप प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनातून उतरलेलं नाही. त्यामुळे यात नक्की विशेष काय आहे? याची दखल घेतलीच पाहिजे.
इंग्रजी मालिका पाहण्यास सुरुवात करणाऱ्या बहुतेक नवोदित प्रेक्षकाला ‘तू फ्रेण्ड्स पाहिलीस का?’ हा प्रश्न विचारला जातोच. ६ मे २००४ रोजी शेवटच्या भागानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतलेली ही मालिका आजही तब्बल १४ वर्षांनंतरसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तसं पाहायला गेलं, तर काम, शिक्षणानिमित्त एकत्र राहणारे मित्र या विषयातील ही काही पहिली मालिका वगैरे नाही. तरी असं काय खास आहे या मालिकेत या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर, खरंतर या मालिकेत खास असं काहीच नाही. एका इमारतीत राहणारी मोनिका आणि तिचे शेजारी जोई आणि चँदलर. मोनिकाचा मोठा भाऊ आणि चँदलरचा कॉलेजचा मित्र रॉस, कधीकाळी मोनिकासोबत राहणारी पण तिच्या अति टापटीपपणाला कंटाळून वेगळी राहणारी फिबी हे पाच घनिष्ठ मित्र. एके दिवशी नेहमीच्या कॅफेमध्ये बसून गप्पा मारत असतात. रॉसला नुकतंच आपली बायको समिलगी असून तिला घटस्फोट घ्यायचा असल्याचं कळतं. त्यामुळे बाकीचे हिरमुसलेल्या रॉसचं सांत्वन आणि थट्टामस्करी करत असताना, नववधूचा शुभ्र सफेद गाऊन घातलेली, पावसात भिजलेली रेचल मोनिकाला शोधत कॅफेत येते. गर्भश्रीमंत घरातील रेचल मोनिकाची शाळेतील मत्रीण असते. शाळा सुटल्यावर दोघींचा संपर्क तुटतो. रेचलचं लग्न दातांच्या डॉक्टरसोबत ठरलेलं असतं, पण ऐन लग्नमंडपात ‘काहीतरी चुकतेय’ असा विचार तिच्या मनात येतो आणि ती तिथून पळ काढते. अशा वेळी न्यूयॉर्कमध्ये हक्काचं ठिकाण म्हणजे मोनिका या विचाराने रेचल मोनिकाला भेटते. अशा प्रकारे या सहाजणांचा गट जमतो आणि मालिकेची सुरुवात होते. मालिका कुठल्याच टप्प्यावर आदर्शवाद मांडत नाही किंवा नाती, मत्री, करिअर यामध्ये काय चूक-बरोबर या वादात पडत नाही. केवळ आयुष्याकडे पाहण्याचे सहाजणांचे सहा दृष्टिकोन मांडते.
शाळा, कॉलेजमध्ये अत्यंत हुशार असलेल्या, आई-वडिलांच्या लाडक्या रॉसचं आयुष्य एका सरळ रेषेत चाललेलं असतं. पण बायकोचं समलैंगिकत्व आणि त्यानंतर स्थिरस्थावर झालेल्या आयुष्याला अचानक बसलेला धक्का हे सगळं त्याला चक्रावून टाकतं. लहानपणीचा अतिलठ्ठपणा तसंच अतिखाण्याच्या सवयीवर शिस्तपूर्वक नियंत्रण ठेवून बारीक झालेली मोनिका खवय्येगिरी ते उत्तम शेफ बनण्यापर्यंतचा पल्ला गाठते. पण करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि प्रेमळ नवरा, चौकोनी कुटुंब हे स्वप्न पूर्ण करण्याची तिची धडपड कायम सुरू असते. लहानपणीच आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे एकाकी पडलेल्या चँदलरला बुजरेपणा आलेला असतो. सवयीचे चार मित्र सोडल्यास इतरांशी बोलताना येणारा अवघडलेपणा टाळण्यासाठी तिरकस कोटय़ा करण्याची सवय त्याला असते. लहानपणापासून श्रीमंती पाहिलेल्या रेचलला अचानक एका टप्प्यावर स्वतला सिद्ध करण्याची गरज भासते. त्यामुळे वडिलांच्या पशांवर पाणी फिरवून नक्की काय करायचं याचा काहीही अंदाज नसताना ती सगळं सोडून आयुष्याला नवी सुरुवात करते. अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन शहरात आलेला जोई म्हणजे मस्तमौला माणूस असतो. हाताशी पैसे जमतील इतपत काम, भरपूर खाणं आणि शरीरसुख यामध्ये त्याचं आयुष्य सुखात सुरू असतं. लहानपणी आईची आत्महत्या, त्यानंतर हलाखीचं जीवन यातून स्वतच्या परीने रस्ता काढणाऱ्या फिबीने जगण्याची विशिष्ट सवय लावून घेतलेली असते. तिचं गाणं, गिटार वाजवणं तितकंसं चांगलं नसलं तरी तिच्या दृष्टीने ते उत्तम असतं. लहानपणापासून पोट भरण्यासाठी हाती लागेल ते काम करण्याची सवय लागल्यामुळे कोणतंही काम करण्यात तिला कमीपणा वाटत नाही. पण स्वतच्या तत्त्वांबद्दल ती तितकीच कडक असते. या सगळ्यांचा अड्डा म्हणजे सेन्ट्रल पार्क कॅफे आणि मोनिका-चँदलरचं घर हेसुद्धा मालिकेतील महत्त्वाची पात्रं आहेत. यातील प्रत्येकजण आयुष्य आपापल्यापरीने जगत असतो. प्रेम, नोकरी, पुढचं आयुष्य, कुटुंब याबद्दल पडणारे प्रश्न स्वत सोडवत असतो. कधी फसतात, यशस्वी होतात, गोंधळतात, बालिशपणासुद्धा करतात. पण हे सगळं करताना ते एकमेकांचा आधार असतात.
मुळात ‘फ्रेण्ड्स’ मालिकेला इतक्या वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळण्याचं कारण तिचं कथानक, दिग्दर्शनशैली किंवा उत्तम अभिनय वगैरे नाही. मालिकेची मांडणी नेटकी आहे. प्रत्येक भागात एक विषय मांडला जातो. त्यामुळे मालिकेचं कथानक माहिती असेल, तर क्रमवार भाग पाहण्याची गरजही जाणवत नाही. प्रेक्षकांना बांधून ठेवतं ते मालिकेतील मत्रीचं सूत्र. दिवसभराचं काम संपवून इमारतीखाली, चहाच्या टपरीवर किंवा कट्टय़ावर मित्रांचे गट जमा होतात. दिवसभराच्या घटना, एखादा नवा अनुभव, थट्टामस्करी, शंका हे त्यांच्या गप्पांचे विषय असतात. हे सहाजणसुद्धा अशाच स्वरूपात प्रेक्षकांना भेटतात. तरुणाईला रोजच्या आयुष्यात पडणारे प्रश्न मालिकेतसुद्धा उपस्थित होतात. त्यावर उत्तरं, परीक्षण करण्यापेक्षा ते आपल्यापरीने मार्ग काढतात. मालिकेमध्ये मांडलेले लिव्ह-इन संबंध, समलैंगिकता, सरोगसी, दत्तक मूल, अविवाहित आई, विभक्त कुटुंब, उत्तम पगाराची नोकरी असताना मानसिक समाधान मिळत नसल्याने ती सोडून शून्यापासून पुन्हा सुरुवात करणं, प्रेमातील वयाचं अंतर, घटस्फोटानंतर फुलणारं प्रेम, ब्रेकअप आणि मत्री, प्रेमातील सहजता असे बरेसचे विषय नव्वदीच्या दशकात अमेरिकन समाजासाठी नवे होते. अगदी आजही या विषयांची तीव्रता कमी झालेली नाही. या मालिकेत हे विषय तितक्याच सहजतेने मांडले गेले. उलट शाब्दिक कोटय़ा, प्रासंगिक विनोद यामुळे त्यांच्यात टोकदारपणा जाणवणार नाही याचीही काळजी घेतली गेली. त्यामुळे तरुणाईला ही मालिका आपलीशी वाटू लागली. मुळात तरुणाईला रोजच्या आयुष्यातील बरेच प्रश्न आई-वडील, नातेवाईकांसमोर मांडण्यापेक्षा मित्रांना सांगणं जास्त योग्य वाटतं. कारण मित्रांमध्ये या विषयांची चर्चा होत असली, तरी त्यावर टीका होत नाही. एकमेकांना सल्ले देण्यापेक्षा प्रयोग करायला प्रोत्साहन दिलं जातं. एकमेकांच्या चुका खुल्या मनाने स्वीकारल्या जातात. गुपितं टिकून राहतात. चुकल्यास कान उपटले जातात, पण तितक्याच प्रेमाने समजवलंसुद्धा जातं. मुळात एकाच वयात असल्यामुळे प्रत्येकजण कमी-अधिक प्रमाणात सारख्याच परिस्थितीतून जात असतो, त्यामुळे एकमेकांच्या अनुभवातून शिकता येतं. त्यामुळे तरुणाईला मित्र अधिक जवळचे वाटतात. नेमकं हेच चित्र मालिकेत दिसतं. कित्येकजण मालिका संपूर्ण पाहून झाल्यावरसुद्धा तिची पारायणं करतात. बऱ्याच जणांसाठी परीक्षा, दिवसभराच्या कामामुळे आलेली मरगळ किंवा कंटाळा आल्यावर त्यावरील रामबाण उपाय म्हणजे ही मालिका आहे. कारण मालिकेतील नेमकेपणा, विनोदी शैली ताण कमी करते.
अर्थात मालिकेत उणिवा नाहीत असं नाही. इंटरनेटची पोतडी उघडली, तर मालिकेविषयीच्या स्तुतिसुमनांइतकीच तिच्यावरील टीका पाहायला मिळेल. मुळात करिअरच्या सुरुवातीच्या काळात हातात कमविण्याचं कोणतंही ठोस साधन नसताना न्यूयॉर्कसारख्या शहरात दोन खोल्यांच्या घरात राहणं, बऱ्यापैकी विलासी जीवन जगणं यापैकी प्रत्येकाला कसं शक्य आहे? हा यातील सगळ्यात मोठा प्रश्न. सोबत रेचल-रॉस यांचं सतत एकत्र येणं आणि तुटणं, रेचलची स्वार्थी वृत्ती, जोईचं परावलंबित्व, फिबीचा विक्षिप्तपणा, काही ठिकाणी कथानकात झालेला गोंधळ अशा बऱ्याच बाबी मालिकेत खटकतात. पण मालिका म्हटली, तर कथानकात थोडाफार अतिरंजितपणा येणारच ही बाब मान्य केली तर या बाबींकडे दुर्लक्ष करता येतं. तुम्ही मालिका पहिल्यांदा पाहणार असाल, तर ती आवडेलच अशी खात्री नाही. पण चार घटका मनोरंजन करेल हे नक्की. (समाप्त)