मोहन गद्रे
हिंदू धर्मामध्ये असंख्य देवदेवता आहेत. असंख्य असे मोघम म्हणण्यापेक्षा त्यांची संख्या ३३ कोटी सांगितली जाते. परंतु इतक्या कोटय़वधी देवदेवतांमध्ये सर्वसमावेशकता गजाननाइतकी कोणालाच मिळालेली नाही. भक्ताला ज्याप्रमाणे त्याला साकार करावा किंवा त्याचे पूजन करावे असे वाटेल त्या प्रमाणे ज्याला त्याला त्या बाबतीत पूर्ण मुभा आहे. त्याचा आकार असो किंवा त्याचे स्तवन असो. त्याला भाषेचे बंधन नाही आणि प्रांताच्या सीमा नाहीत. मनात भक्तिभाव असला की भक्ताला त्यासाठी कोणासाठी थांबायची किवा विचारत बसण्याची आवश्यकता नाही.
सूक्ष्मदर्शक यंत्रामधून पाहावा लागणारा तांदुळावर कोरलेला गणपती असो किवा अगदी मलभर अंतरावरून सहज दिसू शकणारी महाकाय गणपतीची मूर्ती असो. त्याची मूर्ती साकार करण्यासाठी परंपरागत वापरात असणारी शाडूची माती तर आहेच, शिवाय वेगवेगळी धान्यं, कडधान्यं, भांडीकुंडी, नाना प्रकारची फुले, फळे, यंत्राचे पार्ट, कापड, वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी विविध हत्यारे.. कुठल्याही माध्यमाचे त्यासाठी बंधन नाही. त्यासाठी माणसाकडे कल्पकता असणे तेवढे मात्र गरजेचे आहे. त्यासाठी कलेचे वरदान मात्र श्रीगजाननाकडून प्राप्त करून घ्यायला हवे.
कशातूनही त्या कलेच्या देवतेला तुम्ही मूर्त स्वरूप देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य मूर्तीचा संग्रह फक्त याच देवाचा तुम्हाला पाहायला मिळेल. सुलेखनकार, चित्रकार आणि मूर्तिकारांनी तर त्याला आकार देण्यासाठी जगातली कुठलीही संकल्पना शिल्लक ठेवलेली नाही. त्याचे अधिकृत वाहन उंदीरमामा पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला, कोणत्याही प्राण्यावर आरूढ झालेला पाहू शकता. त्याची परंपरागत वस्त्रे म्हणजे पितांबर आणि उपरणे पण तुम्हाला त्याला फेटा, कोट टोपी, बाल मूर्ती असल्यास झबले, कुठलेही वस्त्र प्रावरण नेसावयाचे असेल तर तशीही तुम्हाला मुभा आहे. पण त्याचे पावित्र्य आणि मांगल्य जपले गेले पाहिजे.
जे वस्त्र प्रावरणाचे तेच त्याच्या रूपरंगाचे. आसन मांडी घातलेला, उभा, सिंहासनारूढ, एका पायावर तोल सांभाळत नृत्याविष्कार करणारा नटराज, एका कुशीवर, मस्तकाला हाताचा आधार देऊन स्वस्थपणे पहुडलेला, अशा कुठल्याही पोजमध्ये तुम्हाला तो दर्शन देतो.
तुमच्यात त्याची शिस्त पाळण्याची हिंमत असेल तर तुम्ही उजवीकडे सोंड असलेली मूर्ती पुजू शकता किवा त्याच्याशी जास्तच जवळीक साधायची इच्छा असेल तर मात्र डाव्या सोंडेची मूर्ती हवी. पण त्याच्या पोटाचा आकार मात्र खूप मोठा ठेवणे तुमच्या फायद्याचे. कारण ‘अन्याय किवा अपराध माझे कोटय़ांनी कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी’ अशी तुमची त्याला विनंती कायम असते. त्यासाठी पोटाच्या आकारात जरादेखील कमी करता येण्याची शक्यता तुम्हीच संपवून टाकली आहे.
तुमच्या देवघरात रोजच्या पूजेसाठी तो विराजमान आहेच, पण वर्षांत काही काळासाठी म्हणजे वर्षभरात दोनदा, म्हणजे माघ महिन्यात आणि भाद्रपद महिन्यातही त्याचा उत्सव म्हणून खास पूजा करू शकता. त्यातही परत दोन पंचांगानुसारही म्हणजे टिळक पंचांगानुसार किवा निर्णयसागर पंचांगानुसार तुम्हाला त्याची प्रतिस्थापना करता येऊ शकते. एक दिवस, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, एकवीस दिवस किवा अगदी वर्षभरदेखील त्याचा सण म्हणून साजरा करता येतो.
झोपडीपासून महालापर्यंत कुठेही त्याची प्रतिष्ठापना करता येते. इतकेच काय, भिन्न धर्मीयातदेखील तो मनोमीलन घडवून आणतो. टेबलावरच्या काचेखाली किंवा भिंतीवर कुठेही त्याचे दर्शन सहज साध्य असते. तो नाटकात आहे. सिनेमात आहे, तमाशात आहे. नाटय़संगीतात, भावगीतात, सिने संगीतात, लावणीत, शास्त्रीय संगीतात आणि नृत्यामध्ये सर्व प्रकारच्या सादरीकरणात अग्रभागी आहे.
तुम्ही त्याची पूजा अगदी एकटय़ाने घरात करू शकता किवा प्रचंड जनसमुदाय जमवून त्याची आरती करू शकता. देवघरात त्याची एकटय़ाची किवा त्याच्याच आठ रूपांची अष्टविनायक म्हणून पूजाअर्चा करणेही शक्य आहे.
भारतातच नव्हे तर इतर कितीतरी देशामध्ये त्याची साग्रसंगीत पूजा होत असते. त्यामुळेच जेव्हा परमेश्वराचे अस्तित्व, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्व चराचर व्यापून राहिले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतके अनंत कोटी देव असूनही मला तरी त्याच परमेश्वरी रूपाचीच आठवण येते. मला खात्री आहे तुम्हालाही त्याच विघ्नहर्त्यां श्री गजाननाच्याच रूपाची प्रचीती येत असणार.