साधारण सातव्या-आठव्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावाने विघ्नकारी भूत अथवा दानव म्हणून गणेशाला स्थान मिळाले होते. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्धतांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.
काही देवता लोकपरंपरेतून विकसित होऊन मुख्य देवतांच्या बरोबरीला येऊन बसतात. गणपती हा त्यापकीच एक. त्याला केवळ बरोबरीचे स्थान न मिळता अग्रपूजेचा मानही आहे. दु:खकारक ते दुखहारक असा या विनायकाचा प्रवास विविध सांस्कृतिक टप्प्यांतून झाला. हा गणेश विविध नावांनी तसेच विविध रूपांनी ज्ञात आहे. त्याचे संपूर्ण स्वरूप कळणे हे सामान्य बुद्धीच्या आकलनापलीकडले आहे. ही परिस्थिती भारतातली, िहदू परंपरेतली, जिथे तो विकास पावला, तिथली असेल तर मग इतर परंपरा आणि देशांमधील त्याचे स्वरूप समजून घेणे किती अवघड आहे याची कल्पनाच करावी.
साधारण इ.स.च्या सहाव्या शतकापासून आपल्याला बौद्धपरंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. सुवर्ण युगापूर्वीचे मथुरा शैलीतील गणेशाचे स्वरूप हे यक्ष कोटीतील देवतांसारखे वाटते. हा तुंदिलतनू आहे, गजमुख आहे परंतु भक्तांची दुखे वारणारा नसून, तो थोडाफार दुष्ट आहे.
सुरुवातीच्या बौद्धसाहित्यामध्येही गजवदनाचे असेच काहीसे स्वरूप आहे. इ.स.च्या पाचव्या शतकात चिनी भाषेत धर्ममक्षेमाने भाषांतरित केलेला ‘धर्मगुप्तविनय’ नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. यात असा उल्लेख सापडतो की ‘जे कोणी विनयाचे नियम तोडल्याबद्दलची शिक्षा भोगणार नाहीत, ते पुढील जन्मी शारीरिक व्यंग अथवा घोडय़ाचे किंवा हत्तीचे तोंड घेऊन जन्माला येतील.’ ही विनयाची परंपरा प्राचीन असावी. ‘विनय’ग्रंथ हे बौद्धांच्या प्रमुख तीन (विनय, अभिधम्म आणि सुत्त) पिटक ग्रंथांपकी एक. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच या ग्रंथांचे संकलन केले गेले. विनयपिटकामध्ये भिक्षूंसाठीचे नियम दिले आहेत. बौद्धधर्मात अनेक निकाय (संप्रदाय) होते. सम्राट अशोकापूर्वीच साधारण १८ निकाय अस्तित्वात होते. त्यापकीच एक ‘धर्मगुप्तिक’ निकाय होता. या संप्रदायांपकी अनेकांचे स्वतंत्र विनयग्रंथ होते.
ह्युएनत्सांग या सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाचा वॉनचूक नावाचा कोरियन विद्यार्थी आपल्या ग्रंथात म्हणतो, ‘घेतलेल्या व्रतामध्ये अडथळा आणायचं काम गजवदन असलेले आत्मे करतात.’ इ.स. ९८३ मध्ये दानपालाने भाषांतरित केलेल्या ‘अष्टसाहस्रिकप्रज्ञापारमिता’ सूत्रामध्ये तो हत्तीचे मुख असलेल्या यक्षाचा उल्लेख करतो. याचाच अर्थ असा की पूर्व आशियातील बौद्धसंस्कृतीमध्ये गजमुख असलेले जीव वाईट कर्माचे फलित घेऊन जन्माला आलेले अथवा दुरात्मे, यक्ष म्हणून प्रचलित होते. दहाव्या शतकातील भारतातील गणेशाला पूजेत अग्रस्थान देण्याची परंपरा अजून तेथे पोहोचली नव्हती. साधारण सातव्या-आठव्या शतकात मुख्य बौद्ध धार्मिक परंपरेत गणेश, विनायक नावाने विघ्नकारी भूत अथवा दानव म्हणून गणेशाला स्थान मिळाले होते. यातूनच पुढे बुद्धांच्या तंत्राचारात त्याचा शिरकाव झाला. बौद्धतांत्रिक परंपरेत विनायकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्याचे मंत्र, धारणी, मुद्रा आणि त्याच्याशी संबंधित विधी यांची मोठी रेलचेल या साहित्यामध्ये पाहायला मिळते. इ.स.च्या आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या एका ग्रंथात असे म्हटले आहे की, ‘एक दिवस-रात्र अथवा तीन दिवस उपास करून, अधिष्ठान करून, विशिष्ट मंत्र १०८ वेळा म्हटल्याने विनायक व त्याने निर्मिलेली अरिष्टे दूर होतात. भिक्षूला ध्यानधारणेसाठी चित्त एकाग्र करता येते.’
अतिगुप्ताने इ. स. ६५४ मध्ये चिनी भाषेत भाषांतरित केलेल्या ‘धारणीसमुच्चय’या ग्रंथात विनायकाशी संबंधित एका विधीची माहिती येते. यात ‘आिलगनावस्थेतील, स्त्री-पुरुष स्वरूपातील, गजवदन व नरदेह असलेल्या दोन मूर्ती बनवाव्या. कृष्णपक्षातील प्रतिपदेला त्यांची विशिष्टविधी आचरून स्थापना करावी. त्याला १०८ वेळा मंत्र म्हणून तीळाच्या तेलाचा अभिषेक करावा. यामुळे विघ्नांचा नाश होऊन, दुर्दैव दूर होण्यास मदत होते.’ विनायकाचे हे स्वरूप महत्त्वाचे आहे, कारण यातूनच पुढे जपानमध्ये पाहायला मिळणाऱ्या गणेशद्वय मूर्तीचा विकास झाला असावा.
जपानी बौद्ध मूर्तिशास्त्रामध्ये गणेशाचे तीसहून अधिक मूर्तिप्रकार दिसतात. त्यापकी काही प्रमुख प्रकार हे गणेशद्वय अथवा विनायकद्वय स्वरूपाचे आहेत. त्यांपकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ‘कंगी’ विनायकद्वय. त्यांच्या अनेक कथा जपानी बौद्ध परंपरेत लोकप्रिय आहेत. त्यापकी एक पुढे देत आहे.
एक विनायक नावाचा पर्वत होता. तो पर्वत विघ्नकर्ता अथवा विघ्नकर्त्यांचा पर्वत म्हणूनही ओळखला जाई. त्या पर्वतावर अनेक विनायक राहत असत. त्यामध्ये त्यांचा राजा ‘कंगी’ही होता. महादेवाच्या आदेशानुसार तो बौद्ध भिक्षूंना त्रास देत असे. त्यांना ध्यान करताना, चित्त एकाग्र करताना विघ्न आणत असे. त्यांची ‘चेतना’ हरत असे. हे पाहून बोधिसत्त्व महाकारुणिक अवलोकितेश्वराने त्यांना मदत करायचे ठरवले. त्याने एका स्त्री विनायकाचे (वैनायकीचे) रूप घेतले व तो विनायक पर्वतावर गेला. त्याला पाहून ‘केंगी’ त्या स्त्री-विनायकरूपी अवलोकितेश्वराचा अनुनय करू लागला. हे पाहून अवलोकितेश्वराने त्याला सांगितले की, ‘जर त्याने बौद्ध होऊन बुद्धाच्या अनुयायांना त्रास देणे बंद केले तरच तो स्त्री-विनायकरूपी अवलोकितेश्वर राजा केंगीच्या बाहुपाशात यईल.’ हे ऐकून केंगीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि स्त्री-विनायकरूपी अवलोकितेश्वराला वचन दिले की कोणीही विनायक यापुढे बौद्धांना त्रास देणार नाही. म्हणून स्त्री-विनायकरूपी अवलोकितेश्वराने केंगीला बाहुपाशात घेतले आणि केंगीला पूर्णानंदाची प्राप्ती झाली.
याचे चित्रण अनेक मूर्तीतून आपल्याला जपानमध्ये पाहायला मिळते. या कथेची धाटणी लोककथेसारखी असली तरी त्यात तंत्रमार्गाचे सूचनही आहे. अशा प्रकारच्या विनायकमूर्ती इ.स.च्या सातव्या -आठव्या शतकापासूनच जपानमध्ये पाहायला मिळतात. जपानमधील विनायकाचा संबंध तो बौद्ध होण्यापूर्वी महादेवाशी होता त्याच्याच प्रेरणेने विनायक बौद्धांना त्रास देत असे, अशी लोकमान्यता दिसते.
आग्नेय आशियामध्ये गणेशाचे स्थान िहदू आणि बौद्ध दोन्ही धर्माच्या अनुयायांसाठी महत्त्वाचे आहे. येथील गणेशाच्या संप्रदायावर िहदूंचाही मोठा प्रभाव आहे. अनेकदा त्याची पूजा कला, विद्या आणि व्यापाराची देवता म्हणूनही केली जाते. येथील बौद्धधर्मात रक्षणकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणूनही त्याची प्रतिमा आहे. अनेकदा विधींसाठी वापरात येणाऱ्या साहित्यावर त्याच्या प्रतिमांचे अंकन दिसते. लॉस एंजेलिसमधील वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या कंबोडियातील तेराव्या शतकातील एका घंटेवर एका बाजूला बुद्ध तर दुसऱ्या बाजूला गणेश प्रतिमा पाहायला मिळते.
बौद्धांच्या पूर्व आणि आग्नेय आशियामधील गणेश-विनायक परंपरेत गणेशाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रमुख पलू दिसतात. एक म्हणजे त्याचे विघ्नकर्ता म्हणून असलेले प्राचीन स्वरूप, जे त्याच्या यक्ष कोटीतील व्यक्तिमत्त्वाशी साधम्र्य सांगते आणि दुसरे म्हणजे त्याचे विघ्नहर्ता हे रूप. ते पूर्व मध्ययुगीन काळातील भारतातील त्याच्या पूर्ण विकसित देवता स्वरूपाशी साधम्र्य दाखवते. भारतातूनच विविध कालखंडांत विविध माध्यमांतून या विलक्षण देवतेच्या संप्रदायाचा प्रसार इतर देशात झाला. तो कधी भिक्षूंनी केला तर कधी व्यापाऱ्यांनी. आग्नेय आशियाशी असलेल्या भारताच्या घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांमुळे गणेशाच्या विविध स्वरूपांचा विकास आणि प्रसार येथे विविध कालखंडात झाला. त्याचे स्वरूप पूर्व आशियातील गणेश संप्रदायापेक्षा भिन्न झाले. आग्नेय आशियातील गणेश संप्रदायाची नाळ कायम िहदू परंपरांशी जोडलेली राहिली.
पूर्व आशियातील चीन आणि जपान यांपेक्षा वेगळे विनायकाचे एक स्वरूप आपल्याला तिबेटमध्ये पाहायला मिळते. बरेचदा तिबेटी बौद्धमठाच्या प्रवेशद्वारापाशी विनायक आणि महाकालाच्या प्रतिमा अथवा चित्रण पाहायला मिळते. येथे त्याचे स्वरूप रक्षणकर्ता असे असून तो मठाचा रक्षणकर्ता म्हणून येतो. दुष्ट आत्म्यांच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या तिबेटी लोकांच्या स्थानिक बोन-पो धर्मामध्ये आणि तिबेटी बौद्ध धर्मामध्ये या दुरात्म्यांना विशेष स्थान आहे. त्यांपासून रक्षण करण्यासाठी ते मठामध्ये अनेक देवतांची व क्षेत्रपाळांची स्थापना करतात. गणपती हा त्या पकीच एक. अशा प्रकारचे मठांचे अधिपती अथवा रक्षणकत्रे यक्ष आपल्याला प्राचीन भारतातही दिसतात. बौद्धांच्या माहामायुरी या ग्रंथात त्यांची एक जंत्रीच दिली आहे. अजिंठय़ाच्या लेणी क्र. दोनमध्ये पद्मनिधी आणि शंखनिधी यांच्यासाठी एका लहानशा उपगर्भगृहाची रचना केलेली दिसते. ते दोघे इतर लेण्यांतही कधी मनुष्यरूपात तर कधी प्रतीकरूपात येतात. विनायक हा कधी स्वतच त्रास देतो तर कधी त्रास देणाऱ्यांपासून रक्षण करतो.
तिबेटमधे गणेशाशी संबंधित विपुल ग्रंथरचना झाली. त्याचे स्वरूप मुख्यत: भाषांतरित धार्मिक साहित्याचे आहे. त्याचे वर्गीकरण विद्वानांनी आठ प्रकारांत केले आहे. मूळ बौद्ध तंत्रग्रंथ, मूर्तिशास्त्रावरील ग्रंथ, बली आणि होम विधींशी संबंधित ग्रंथ, दुष्ट विनायकाशी संबंधित ग्रंथ, साधना, स्तोत्र व स्तुती ग्रंथ आणि काम्य ग्रंथ. या भाषांतरित ग्रंथांचे मूळ संस्कृत ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. हे जवळजवळ सर्व ग्रंथ तंत्रसाधनेशी संबंधित आहेत. वस्तुत: तिबेटी बौद्ध धर्माचे तंत्रसाधना हे एक वैशिष्टय़ असल्याने तेथील गणेशाचा संप्रदाय तंत्रसाधनेचा एक भाग असणे साहजिकच आहे. उदाहरणार्थ ‘महागणपतीतंत्राच्या’ तिबेटी भाषांतरामध्ये अकरावा अध्याय हा महागणपती मंडलाचे वर्णन करणारा आहे. ‘महाविनायक रूप उपदेशरत्न’ या ग्रंथात त्याचे वर्णन येते. त्याला हत्तीचे तोंड असून, चार हात आहेत. तो त्रिनेत्र आहे. त्याचे सुळे धारधार असून, चेहरा उग्र आहे. तो नरमुंडमाला धारण करतो आणि व्याघ्रचर्माचे वस्र परिधान करतो.’ असे भयानक रूप धारण करणारा हा देव आहे. परंतु अभावाने का होईना त्याची सौम्यरूपेही आपल्याला आढळतात. त्याच्या विविध वर्णावरून त्याचे स्वरूप ठरवले जाते. दुष्ट विनायकाशी संबंधित एका ग्रंथाचे नाव ‘विनायक ग्रह निर्मोचन’ असे आहे. यावरून िहदू परंपरेतील विनायकाच्या प्राचीन स्वरूपाची आठवण होते. गणपती स्तोत्र या ग्रंथानुसार तो तुषितनामक स्वर्गामध्ये राहतो. याच तुषित स्वर्गामध्ये भविष्यातला बुद्ध ‘मत्रेय’ राहतो अशी बौद्धांची धारणा आहे.
तिबेटमधील बौद्धधर्मात गणेशाची काही इतर रूपेही पाहायला मिळतात. वज्रयान बौद्धांच्या चक्रसंवर तंत्रामध्ये तो ‘महारक्त गणपती’ म्हणून येतो. त्याची उत्पत्ती अवलोकितेश्वरापासून झाली असे मानले जाते. तोही उग्र स्वरूपाचाच असतो. तिबेटी कलेतील गणेश भूत वाहन किंवा मूषक वाहन असतो. अनेक तिबेटी प्रतिमांमध्ये तो महाकालाच्या पायाखाली दबलेला दिसतो. महाकाल हा धर्म रक्षक आहे. तो धर्माचरणात विघ्न आणणाऱ्या विनायकांचा उच्छेद करतो किंवा त्यांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवतो. परंतु या चित्रणातील विनायक दु:खी दिसत नाही. महाकालाव्यतिरिक्त तिबेटी बौद्ध देवतासमूहापकी अपराजिता, पार्णशबरी आणि विघ्नांतकासारख्या देवताही त्याला नियंत्रणात ठेवतात, अशी काही संप्रदायांची धारणा आहे.
तिबेटी बौद्ध धर्मामध्ये विशेषत: तंत्रामध्ये गणेशाला विशेष स्थान असले तरी ती प्रमुख देवता नाही. या देवतेला प्रमुख कुठल्याही तंत्र विधीत मुख्य देवतेचे स्थान मिळालेले दिसत नाही. भौतिक जग आणि त्यातील भौतिक व आध्यात्मिक मार्गावरील अरिष्टे निर्माण करणारा अथवा त्यांचे हरण करणारा असेच त्याचे स्वरूप राहते. त्याला भारतातील िहदू परंपरेतील त्याच्या स्थानाप्रमाणे अग्रस्थान कधीच मिळताना दिसत नाही किंवा अग्रपूजेचा मानही नाही.
बौद्धविश्वामध्ये गणेशाची अनेक रूपे पाहायला मिळतात. श्रीलंकेतही गणेशपूजेला महत्त्व आहेच. गणेशाने प्रवास करताना त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व सोबत नेले. तो ज्या मातीत गेला तिथलाच झाला आणि तेथेच रमला. लोककथांमधून त्याने आपली िहदू धर्माशी असलेली नाळ कायम ठेवली. चीन आणि जपानमध्ये तो चांगल्या-वाईटाच्या युगुलामध्ये अवतरला. ते तेथील परंपरेला साजेसेच होते. आग्नेय आशियामध्ये त्याने आपली िहदू किंवा बौद्ध ही ओळख टिकवूनही त्यातील दुरावा नाहीसा करण्यात यश मिळवले. तर तिबेटमध्ये तंत्राचा भाग होऊन तेथील लोकधर्मात मिसळून गेला. गणेशाची हीच तर खासियत आहे. म्हणूनच तो आजही आबालवृद्धांना आपलासा वाटतो.
गणेश ही मुळातली एक लोकदेवता. भारतीय समाजमनात जन्मलेली, रुजलेली. या समाजाने प्रसवलेल्या सर्वच प्राचीन धर्मपरंपरांनी गणेशाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अंगीकार केला. या धर्मपरंपरा जिथे गेल्या तिथे या गणेशाला बरोबर घेऊन गेल्या. लोकदेवतांच्या विश्वातल्या अधिपतीने सहजपणे भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या. त्याला धर्माची बंधने कधीच नव्हती. तो जिथे गेला त्या संस्कृतीला आपला रंग देऊन त्यात रमला. सामावून जाण्याची आणि सामावून घेण्याची कला तशी सर्वच भारतीय परंपरांना परिचित. भारताचा लाडका गणपती तरी त्याला कसा अपवाद असणार!
सूरज पंडित – response.lokprabha@expressindia.com