ganesh vishesh‘‘विथ ऑल डय़ू रिस्पेक्ट टू टिळक, सार्वजनिक गणेशोत्सव ही अगदी चुकीची संकल्पना आहे, असं आमचं ठाम मत झालं आहे.’’

‘‘का हो, एकदम काय झालं?’’

‘‘एकदम नाही. गेली काही वर्षे हा संताप आमच्या मनात धुमसतो आहे.’’

‘‘तुमचा राग सार्वजनिक गणेशोत्सवावर आहे की टिळकांवर?’’

‘‘दोन्हींवर. सार्वजनिक गणपती उत्सव हा दर्जाच्या बाबतीत अगदी रसातळाला गेला आहे, त्यामध्ये भक्तीचा लवलेशही राहिलेला नाही, उलट हिडीस गोष्टींचा त्यात शिरकाव झाला आहे. म्हणून त्याच्यावर आणि आपला घरगुती धार्मिक उत्सव सार्वजनिक करून या ऱ्हासाला कारणीभूत झाले म्हणून टिळकांवर.’’

‘‘या उत्सवाचा दर्जा घसरला, हे एकवेळ मान्य. पण आत्ता जे सुरू आहे त्याला लोकमान्यांना जबाबदार धरणे म्हणजे आपण आपली जबाबदारी झटकल्यासारखे झाले.’’

‘‘आपली काय जबाबदारी? आपण काही करू म्हटले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्याला काही किंमत देतील का?’’

‘‘त्यांचा काय संबंध? आपण लोकमान्यांच्या पावलावर पाऊल टाकू. ते आपण करू शकतो ना?’’

‘‘म्हणजे दुसरा कुठला उत्सव सुरू करायचा की काय?’’

‘‘कशाला? आपण लोकमान्यांच्या विचारसरणीचे अनुकरण करू या. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यामागे तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती होती. आपला देश पारतंत्र्यात होता, समाज असंघटित होता आणि त्याला जागृत व संघटित करण्यासाठी त्यांनी आपल्या धार्मिक संकल्पनेचा कुशलतेने वापर केला.’’

‘‘हा इतिहास आम्हालाही माहीत आहे. पण आज आपला देश स्वतंत्र झाला आहे. असल्या उत्सवी समारंभासाठी काही सामाजिक कारण उरले नाही. तेव्हा ते बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत.’’

‘‘असे म्हटले, तर आपण लोकमान्यांकडून काहीच शिकलो नाही, असे होईल. त्यांनी आपल्या समाजाची नस अचूक ओळखली होती. आपल्या लोकांच्या मनावर एखाद्या गोष्टीचे महत्त्व बिंबवायचे, तर धर्माचे वेष्टन घालून परिणाम साधता येतो, हे त्यांनी जाणले होते. आजही परिस्थिती काही फार बदललेली नाही. त्यामुळे एवढा दणक्यात सुरू असलेला उत्सव बंद केला तर त्याचा विघातक परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा त्याचा आशय बदलण्यासाठी प्रयत्न करणं इष्ट ठरेल.’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘गणपती विघ्नहर्ता, संकटमोचक आहे, अशी आपली श्रद्धा आहे. आपला देश स्वातंत्र्य उपभोगत असला तरी त्याची एकसंधता हे मोठे आव्हान आहे. आपल्या समाजात अनेक फुटीरतावादी घटक आपापले प्रताप दाखवत आहेत; पण त्यामधूनही आपल्या नागरिकांना एकात्मतेचा अनुभव देतात ती आपली संरक्षण दले. लष्कर, नौसेना आणि वायुसेना आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येक क्षणी सज्ज असतात. कारगिलसारखे युद्ध असो, सीमेवरील खडा पहारा असो, की भूकंप वा प्रलय यांसारखी महाभयंकर नैसर्गिक आपत्ती असो, ज्या शिस्तबद्धतेने आणि समर्पण भावनेने जवान त्या संकटाला तोंड देतात त्याला तोड नाही. देशबांधवांच्या हाकेला धावून जाताना आपला देश आणि त्याची व त्यातील नागरिकांची सुरक्षितता हाच जवानांचा अग्रक्रम असतो. खऱ्या अर्थाने आपले जवानच आधुनिक विघ्नहर्ते आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव आपण आपल्या जवानांना समर्पित केला पाहिजे.’’

आम्ही गेली अनेक वर्षे अत्यंत गांभीर्याने हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. देशाच्या संरक्षण कार्यात ज्यांची आहुती पडली आहे, त्या जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अत्यंत सन्मानाने कार्यक्रमाला आमंत्रित करणे, आपले कर्तव्य बजावत असताना जे जखमी होऊन निवृत्त झाले, त्या जवानांना त्यांच्या परिवारासहित आमंत्रित करणे, कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वाना त्यांच्या यशोगाथा ऐकवणे, त्यांचा यथोचित सन्मान करणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. तेथे रडारडीला किंवा दया, करुणा असल्या भावनांना थारा नसतो. कार्यक्रमाचे व्यासपीठ हे एक धगधगते रणकुंड आहे आणि जवानांच्या वीरश्रीला आम्ही तेवढय़ाच वीरश्रीने सलामी देत आहोत, अशी कार्यक्रमाची भूमिका असते. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानसिक बळ देणे, त्यांच्या दु:खाचा घाव भरून काढण्यासाठी प्रेमाची फुंकर घालणे व त्याबरोबरच त्यांच्या शूर योद्धय़ाचा आम्हालाही त्यांच्याइतकाच अभिमान आहे, याची हमी देणे हा आमचा उद्देश असतो. जखमी जवानांनाही आम्ही सन्मानपूर्वक सत्कार करून हीच खात्री देत असतो की तुम्ही आपल्या मातृभूमीचे सुपुत्र आहात, आमचे शिरोभूषण आहात. या कार्यक्रमातील अंगावर रोमांच उभे करणारा भाग म्हणजे रक्ततिलक. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना व उपस्थित जखमी जवानांना आमची तरुण मुले-मुली आपल्या रक्ताचा तिलक लावतात व त्यांच्या पायावर मस्तक ठेवून वंदन करतात. हा सर्व सभागृहाला स्तब्ध करणारा क्षण असतो!

विविध महाविद्यालयांतील एन.सी.सी.चे छात्र आणि आमच्या विशाल मित्रपरिवारातील तरुणवर्ग यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांतून देशाभिमान व आपल्या वीर जवानांविषयीच्या कृतज्ञतेची व अभिमानाची रुजवात त्यांच्या मनात होते. त्याचबरोबर आपला समाज आपल्याला विसरलेला नाही, उलट त्यांना आपल्याविषयी प्रेम व अभिमान आहे, या जाणिवेने जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही समाधान वाटते. आजपर्यंत भारतभरातील अशा अनेक कुटुंबांशी आमचे स्नेहबंध जुळले आहेत व हे पुढेही सुरूच राहील. त्यांच्यापैकी काही जण आमच्या इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले सामाजिक भान आम्हीही गणेशोत्सवाच्या या रूपाने अर्थपूर्णरीत्या जागे ठेवले आहे, ही आम्हाला खात्री आहे.

या गणेशोत्सवानिमित्त सर्व आधुनिक विघ्नहर्त्यां गणेशांना आमचे मनोभावे वंदन!

response.lokprabha@expressindia.com

Story img Loader