प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना आला, की बाजारात नवीन वर्षांच्या कॅलेंडरचे- दिनदर्शिकेचे पेवच फुटलेले असते. अशी कॅलेंडर्स ही ज्या त्या भागात ज्या त्या संस्कृतीप्रमाणे व गरजेप्रमाणे तयार केलेली असतात. ही कॅलेंडर्स पंचांगातल्या माहितीवर आधारित असतात. एकाच कॅलेंडरवर इंग्रजी महिने, मराठी महिने, सणवार, सूर्य, चंद्रग्रहणांच्या वेळा, देवदेवतांच्या जयंत्या, महापुरुषांच्या पुण्यतिथी इत्यादींचा उल्लेख असतो. इसवी सन, विक्रम संवत, शालिवाहन, शके, शिवशके, हिजरी सन यांचा उल्लेख एकत्रितपणे केलेला असतो. अनेक धर्माच्या नववर्षांचा उल्लेख केलेला असतो. उदा. मराठी वर्षांची सुरुवात गुढीपाडव्याला, तेलगू वर्षांची सुरुवात वैशाखीला, मुस्लीम धर्माची सुरुवात मोहरमला तसेच ख्रिश्चन वर्षांची सुरुवात एक जानेवारीला होते. अशा ख्रिश्चियन, इंग्रजी कॅलेंडरला ग्रेगरिन कॅलेंडर असेही म्हणतात.
आजचे प्रचलित असे ग्रेगरियन कॅलेंडरचे स्वरूप असे नव्हते. प्रत्येक शतकात त्यात बदल झालेला दिसून येतो. बऱ्याच राजांनी त्यात बदल केला व आपल्या सोईनुसार त्याला स्वरूप दिले व आजचे स्वरूप त्याला प्राप्त झाले. त्याचे मूळचे स्वरूप पाहिल्यास आपणाला हे दिसून येईल. अशा कॅलेंडरची सुरुवात भारतात व इतर राष्ट्रांत अगदी प्राचीनकाळी झालेली दिसून येते. उदा. इजिप्त संस्कृती, बॅबोलियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती, ख्रिश्चियन संस्कृती व मुख्य भारतीय संस्कृती यांच्या संस्कारांतून हे आजचे अद्ययावत कॅलेंडर तयार झाले.
इजिप्त संस्कृतीमध्ये त्यांच्या वर्षांची विभागणी तीन भागांत केलेली होती. त्यात आठवडय़ाचे दिवस दहा धरलेले होते. बॅबोलियन संस्कृती चंद्राशी संबंधित होती. त्यांनी दिवसाला त्यांच्या भाषेतील ग्रहांची नावे दिलेली होती. उदा.- मारदुक (गुरू), नाबू (बुध), नरगल (मंगळ), राम्स (रवी), सिन (चंद्र), निबिक (शनी), तर इश्तार (शुक्र) अशी होती. आपल्या भारतीय दिनदर्शिकेत अशा वारांना याच ग्रहांची नावे दिली आहेत. जसे रवि-वार, सोम-वार, मंगळ-वार इत्यादी. ग्रीक साम्राज्यात वर्षांचे एकूण महिने दहा धरले होते व त्यांना त्यांच्या देवदेवतांची नावे दिली होती. त्यांचे वर्ष मार्च ते डिसेंबर असे होते. पुढे रोम साम्राज्यात त्यात दोन महिन्यांची वाढ झाली व ते बारा महिन्यांचे झाले.
त्यात वाढवलेल्या महिन्यांची नावे जानेवारी व फेब्रुवारी अशी होती. असे नवीन वर्ष मार्च ते फेब्रुवारी असे बनले. पहिला महिना मार्च होता, तर शेवटचा महिना फेब्रुवारी असा होता. अशा सर्व महिन्यांना रोम देवदेवतांची व लॅटिन भाषेतील नावे दिली होती. जशी- माट्रीअस, एपेरिया, मेथस, ज्युनिअस, क्वेटीलीयस, सेक्टाटीयस सेप्टेबर, आक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानुवारीअस व फेब्रुअस. पुढे रोम साम्राज्यात हा क्रम बदलला गेला व तो बदलून जानुवारीअस ते डिसेंबर असा झाला. अशा प्रकारे पहिला महिना जानुवारीअस असे, तर शेवटचा महिना डिसेंबर झाला. पुढे रोमन सम्राट ज्युलिअस सीझर व ऑगस्टस यांनी मूळ कॅलेंडरमधील दोन नावे बदलून त्यांना आपली नावे दिली. ती अशी- क्वेटीलीयसऐवजी जुलै, तर सेक्टाटीअसऐवजी ऑगस्ट. कालांतराने ही सर्व रोमन नावे बदलून त्या जागी इंग्रजी भाषेतील प्रतिशब्द दिले गेले व त्यांचे नवीन स्वरूप असे झाले- जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर.
त्यानंतर प्रत्येक महिन्याला ३१-३० दिवस धरून ३६५ दिवसांचे वर्ष बनवले. त्यात जानेवारीचे ३१, तर फेब्रुवारीचे ३० दिवस धरले होते, तर जुलै व ऑगस्ट या महिन्यांना ३० दिवस दिले होते. त्यात ज्युलियस सिझर व ऑगस्टस यांनी आपल्या महिन्यात आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी प्रत्येकी एक दिवस वाढवून घेतला व जुलै व ऑगस्ट महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस केले. हे वाढवलेले दोन दिवस फेब्रुवारी महिन्यातून कमी केले व फेब्रुवारीचे (३०-२=२८) असे दिवस झाले. त्यानंतर पुढे लीप वर्षांच्या वेळी त्याला एक दिवस वाढवून दिला व त्याचे एकोणतीस दिवस केले. (२८+१=२९) असे हे परिपूर्ण सर्व दृष्टीने बदलून एक नवे कॅलेंडर तयार झाले. तेच पुढे ग्रेगरियन कॅलेंडर म्हणून प्रसिद्धीस आले.
अशा रीतीने सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांची नवीन वर्षांची सुरुवात एक जानेवारीस होते. आपले मराठी कॅलेंडर गुढीपाडव्याला सुरू होते.
इतर राष्ट्रांत नवीन वर्षांला खालील नावे दिलेली आहेत. ती अशी:- इराण- नौरोज, जपान- यायुरी, इंडोनेशिया- गांलूगन, बर्मा- तिंजान, चीन- थानडान, ज्यू- रॉश हशनाह. असा हा ग्रेगरियन कॅलेंडरचा इतिहास.
प्रा. जी. एन. हंचे – response.lokprabha@expressindia.com