‘माय लाइफ सक्स. अ‍ॅम अ बिग टाइम लूजर.’ व्वाह! नवीन वर्षांच्या डायरीची सुरुवात याहून चांगली होऊच शकत नाही. गेल्या तीन वर्षांपासून डायरीच्या पहिल्याच पानावर अडकलेय मी. पुढे जातच नाहीये. डायरीचं हे पहिलं पान आणि आपलं आयुष्य या दोन्हीची गाडी तिथल्या तिथेच रुतून बसते हे समजलंय मला आणि याही वेळी फार वेगळं काही होईल अशी अपेक्षाच करत नाहीये मी; पण तरीही सुरुवातीची सुरुवात पुन्हा एकदा करायला आपलं काय जातंय. मात्र या वेळी ठरवलंय रोज नाही पण जेव्हा लिहावंसं वाटेल तेव्हा मात्र लिहायचं.
त्याच दिवशी आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी भेटलेलो, थर्टी फर्स्टचा प्लान डिस्कस करायला.. मी तर शंभर टक्के कॉन्फिडंट होते की काहीच ठरणार नाही. कारण रीतच आहे ती. न्यू इयरचा प्लान ठरवायला भेटायचं, खूप बडबड करायची आणि काहीच न ठरवता घरी परतायचं. त्यामुळे त्या दिवशी काही ठरलं असतं तर तो चमत्कारच म्हणावा लागला असता; पण असं काहीच घडलं नाही आणि आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो.
हे सगळं ‘प्लान न ठरणं’ प्रकरण झाल्यावर मी घरी येऊन फुरंगटून बसणं हीसुद्धा दरवर्षीची प्रथा. त्यामुळे माझं घरी आल्यावर टीव्हीसमोर न बसता तडक बेडरूम जाणं झालं, की आई आणि दादाला धोक्याचा इशारा आपसूकच मिळतो. थोडक्यात काय तर माझा कोणताही प्लान न ठरणंसुद्धा प्लान्ड झालेलं. तर त्या दिवशीसुद्धा माझी धुसफूस चालूच होती अन् मग कोनाडय़ात पडलेली ही डायरी घेतली आणि लिहून काढलं. ‘माय लाइफ सक्स’ हे सगळे लोक पंचविशीचे झाले तरी घरून सोडणार नाहीत. दहाच्या आत घरी परतावं लागेल.. कसं बोलू शकतात.. अरे थर्टी फर्स्टला कोण जातं दहा वाजता घरी.. ‘काहीही हां..’च्या पण पुढचा जोक आहे हा. अह्ह्.. कधी मॅच्युअर होणार ही मुलं.. तिथे अमेरिकेत चौदा-पंधराव्या वर्षीच मुलं स्वतंत्र होऊन घर सोडतात आणि यांना बघा.. २५ वर्षांची घोडी झाली तरी रात्री तेही थर्टी फर्स्टच्या रात्री घरी दहा वाजता पोहोचायचंय. बेक्कार लोक..
असं काहीबाही मनात चालू असताना छकुली रूममध्ये आली. छकुली म्हणजे आमची शेजारीण. असेल चौथी-पाचवीत. हिला कोणी रागावलंय, संतापलंय असे धोक्याचे इशारे कळत नाहीत. ती आपली तिच्या वेळेस येते, तिला जे काय सांगायचंय ते सांगून निघून जाते. तिला पाहिलं की, मला माझी कीव येते. तिच्या वयाची असताना मी किती महाबावळट होते याची क्षणोक्षणी जाणीव करून देते मला ती. त्यामुळे मीच तिला शिस्तीत छकुलीताईच म्हणते. तर अशी ही छकुलीताई रूममध्ये आली. एका हातात तिच्या ‘मम्माचा’ फोन आणि दुसऱ्या हातात छोटा आरसा घेऊन.. ‘‘दी.. हे बघ ना ग..’’ मी तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. निष्फळ अशासाठी की ती कोणाचंच तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला देतच नाही. तर.. ‘‘दी ऐक ना..’’ ‘‘छकुलीताई, मी कामात आहे आता.. तू आईला जाऊन सांग.’’ ‘‘अरे नाही सांगू शकत. आंटीना नाही कळणार.’’ त्या फ्रस्र्ट्ेशनच्या क्षणीसुद्धा मला मनापासून हसावंसं वाटलं. चला.. माझ्यापेक्षा मागास आहे कोणी तरी. ‘‘बोला.. काय झालं?’’ ‘‘दी.’’ असं म्हणून ती बिछान्यावर बसली. आता काही तरी गहन प्रश्न चच्रेला येणार ज्याने जगाचं भवितव्य ठरवलं जाणारेय अशा आवेशात बोलती झाली. ‘‘हे बघ, हा सेल्फी बघ माझा..’’ असं म्हणत तिनं तिच्या मम्माच्या फोनमधला सेल्फी दाखवला आणि मी अजूनच ओशाळले. मी अजूनही फ्रंट कॅमेरा नसलेला फोन वापरतेय याची जाणीव मला त्या चिमुरडीने करून दिली. ‘‘हां त्याचं काय झालं छकुलीताई..’’ ‘‘अरे हा सेल्फी बघ आणि आता हा आरसा बघ. या आरशात आणि सेल्फीत मी किती वेगळं दिसतेय.. ना.. बापरे, पण असं कसं होईल दी.. सेम टू सेम दिसायला पाहिजे ना मी.. मी खरी कशी दिसते दी..’’ खरंच जगाचं भवितव्य ठरवणारा प्रश्न होता हा. आता हिला काय उत्तर द्यायचं बरं.. ती कितीही स्मार्ट असली तरी आहे ते छोटंसं पिल्लूच. ‘‘अगं छकुली, बाळा कसं असतं ना, फोनमध्ये खूप सारे इफेक्ट्स असतात ना मग त्या इफेक्ट्समध्ये आपण वेगळे दिसतो. तू रोज आरशात पाहात नाहीस का कशी दिसतेस तू..’’ ‘‘पाहते गं.. पण या आरशात मी किती वेगळी दिसते. सेल्फीसारखी नाही दिसत.’’ ‘‘अगं राणी, आता तू मोठी होतेस की नाही, मग आता तू प्रत्येक वेळी वेगवेगळी दिसत जाणार.’’ ‘‘ओह.. म्हणजे मी मोठी होतेय..’’ मोठ्ठाले डोळे करून तिने विचारलं.. म्हणजे हे उत्तर आवडलेलं दिसतंय हिला. ‘‘हो मग काय. निमी दीदी (म्हणजे हिची मोठी बहीण जी दहावीत आहे) इतकी मोठी होणार ना तू..’’ ‘‘ओह.. म्हणून काय..’’ आर्किमिडीजला पण युरेका बोलताना जितका आनंद झाला नसेल तितका तिच्या ‘ओह’मध्ये होता.
तर अशा गप्पा मारून छकुली गेली आणि मी सहज म्हणून आरशात डोकावले. क्षणासाठी.. फक्त एक क्षणापुरतं मी ओळखलंच नाही स्वत:ला. हे असं का वाटलं मला.. जाड झालेय ना मी.. चेहरा खराब झालाय.. अं.. की केस गळताहेत खूप म्हणून एकदा पाहिलं.. नाही.. या सगळ्याच्या पलीकडेही खूप काही बदललंय. वेगळंच काहि तरी.. एक मिनीट अशीच आरशासमोर उभी राहिले आणि मला धक्का बसला. मी ते एक मिनीट स्वत:च्या डोळ्यात एकटक पाहातच नव्हते, किंबहुना पाहूच शकत नव्हते. गचकन डोळे मिटले. पुन्हा उघडले.. छे.. पुन्हा तेच. आता मात्र घाबरले मी.. असं का होतंय. अचानक मला छकुली आठवली. सेल्फीतली मी आणि आरशातली मी मधल्या फरकाचं कारण विचारणारी.. खरंच की, हाच तर फरक आहे आणि तेच मला ओळखता नाही आलं. आपण खरं किती वेगळे असतो.. मला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे, मी स्वत:ला पूर्णपणे ओळखते. केवढा मोठा भ्रम.. इल्यूजन. या भ्रमात इतके अडकतो की, खरी मी आपण दूर कोठे तरी फेकतो. आणि त्या भ्रमालाच वास्तव समजतो.. गॉड.. काय सॉलिड फिलॉसॉफिकल बोलतेय मी. या छकुलीने तर फुलटॉसच टाकलाय, पण किती खरंय हे. आज मी स्वत:च्या डोळ्यांत डोळे घालून पाहू शकत नाही. कसल्या तरी अनोळखीपणाचा पडदा आहे आमच्या दोघांत. ‘‘आम्ही दोघं.. स्प्लिट पर्सनॅलिटी.. काय.. नो नो.. शांत व्हायला हवं.. पण स्वत:च स्वत:ला माहीत नसणं अनोळखी असणं.. किती दुर्दैवी आहे हे.. वर्षांसोबत नवीन गोष्टी करायच्या म्हणजे मूळ गोष्टींना पुरून टाकायचं असं असतं का.. नोप.. अजिबात नाही.. आत्ता हळूहळू मला जाणवतंय मी माझ्याशी कधी गोष्टी शेअरच नाही केल्या. कारण मी घाबरते. माझ्या चुकांवर मी मलाच रागवेन. माझ्या चुकीच्या निवडींवर मी स्वत:लाच ओरडेन आणि मग मीच माझी नावडती होईन.. मी दूर गेलेय स्वत:पासून. इतक्या नात्यांमध्ये मी हे नातं कसं काय विसरले.. स्वत:शी असलेले.. पण आता मला खूप मस्त वाटतंय. स्वत:चा स्वत:शी संवाद.. कठीण आहे खरं. जणू काही कोणा अनोळखी व्यक्तीशीच बोलायचंय मला. किती दुरावलेय मी माझ्यापासूनच.. बस्स ठरलं तर..
नवीन वर्षांच्या रस्त्यावर मागे कुठे तरी थांबलेल्या ‘मी’ला ओढत स्वत:सोबत आणायचे. कितीही भांडणं झाली तरी साथ नाही सोडायची.. कारण नये साल तो बहोत आएंगे, पर यह पुराना दोस्त तो सिर्फ एक ही होगा ना..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा