प्राजक्ता पाडगांवकर – response.lokprabha@expressindia.com
आपल्या प्रत्येकाच्या कपाटात अशी एक तरी वस्तू असते जी आपल्याला आपल्या विशीत अगदी मापात बसत होती आणि आता मात्र अजिबात बसत नाही! कदाचित वजन कमी अधिक झाल्याने, बहुतेक करून अधिकच झाल्याने! ती एक पॅन्ट, तो एक साडीवरचा ब्लाऊज म्हणजे सगळय़ांचा एकदम वीक पॉइंट असतो!
त्यानंतरची सगळी र्वष आपण ती वस्तू पाहून हळहळतो किंवा मनाशी चंग बांधतो, कसेही करून आता इतकी बारीक होईन! मात्र पुष्कळदा कितीही प्रयत्न केले तरी ते काही साध्य होत नाही, आणि जसजसे दिवस आणि र्वष सरतात, ते अधिक अधिक अवघड वाटू लागते.
तशीच गोष्ट जागरणाची, विशीत रात्र रात्र जागून केलेली कामे, नाटकाच्या तालमी किंवा पार्टी, पुढे झेपेनाशी, आवडेनाशी होते..
अगदी तसेच होते खाण्याचे! विशीत काहीही खाल्ले तरी सहज पचायचे, वेळी-अवेळी, बाहेरचे किंवा अजून कुठलेही काही खाल्ले तरी कपडे अगदी मस्त बसायचे आणि आता म्हणजे जरा इकडेतिकडे झाले काही की लागलीच पित्त, अपचन किंवा इतर काही सुरू!
हे सगळं नेमकं होतं तरी काय? का असे आपल्याच शरीराचे गणित आपल्याला कळेनासे होते? जातात कुठे त्या सगळय़ा सहज सोप्प्या गोष्टी? याचे उत्तर आहे वयोवर्धन!
अतिशय नैसर्गिक अशी ही प्रक्रिया, मात्र त्यावर पुरेशी माहिती सहज उपलब्ध नसल्याने अथवा त्याबाबत अनास्था असल्याने आपण या गोष्टीबद्दल खोलात जाऊन जाणून घेत नाही.
आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. वय होते म्हणजे नेमके काय होते? वय होणे चांगले की वाईट?
वय होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, मात्र त्याचा वेग हा आपल्या आनुवंशिक पूर्वस्थितीवर अवलंबून आहे.
आणि आपण आपल्या शरीरास कोणकोणत्या सवयी लावल्या आहेत, शरीराला कसे वापरले आहे यावर अवलंबून आहे. त्याचा वेग आपण नियंत्रित करू शकतो.
वय होणे निश्चित चांगले आहे, कारण त्याला दुसरा काही पर्याय नाही, मात्र वयोमानानुसार होणारे शारीरिक बदल, होणारे आजार याला आपण निश्चित काही प्रमाणात तरी रोखू शकतो.
खूपदा आपल्याला जेव्हा अंतिम स्थितीतले बदल ठळकपणे जाणवू लागतात तेव्हा आपण या सगळय़ाचा गांभीर्याने विचार करू लागतो. याचा विचार दररोज आणि नित्यकर्मातून व्हायला होणे महत्त्वाचे आहे.
शरीरातील विविध अवयव आणि त्यांच्यात होत जाणारे बदल, याचे अवलोकन आज करू या, जेणेकरून हे लक्षात येईल की वय हे प्रत्येक दशकात वेगवेगळय़ा प्रकारे जाणवत राहते आणि सरतेशेवटी आपण वृद्धत्व जेव्हा अनुभवतो तेव्हा आपल्याला गेलेल्या दशकांची, गेलेल्या शक्तीची आणि शारीरिक क्षमतांची जाणीव ठळकपणे होऊ लागते. तसे न होता जर प्रत्येक दशकात शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर निश्चित फायदा होऊ शकतो आणि आपण हा वयोवर्धनाचा वेग नियंत्रित करू शकतो.
मान आणि त्यावरील अवयव :
केस, चेहऱ्याची त्वचा : विशीपर्यंत आपली वाढ सुरूच असते, शरीरात अजून ऊर्जा, शक्ती वृिद्धगत होत असते. त्या वेळी निसर्गाने तुमचे सर्वोत्कृष्ट रूप तुम्हला बहाल केलेले असते, त्यामुळे केस अतिशय चमकदार, दाट आणि काळेभोर अथवा नैसर्गिक जो तुमच्या केसांचा रंग असेल, त्या रंगाचे असतात. त्वचा अतिशय नितळ, तुकतुकीत असते, त्वचेतील छिद्रं अतिशय छोटी आणि समप्रमाणात असतात. त्वचेत एक आद्र्रता असते आणि मुळात त्वचा लवचीक असते. तिशीपर्यंत वाढीचा वेग पुष्कळ मंदावलेला असतो. केसांचे गळणे, कोंडा, केस पांढरे होणे, केस टोकांशी दुभंगणे हे सुरू होते. यामागील कारणे अशी, की केसांना पुरेसे पोषण मिळत नाही, अथवा त्यांची योग्य निगा राखली जात नाही. जागरण, अन्नघटकांतून अपुरे पोषण आणि अनियमित जीवनशैली यामुळे केस पिकू लागतात, गळू लागतात.
त्वचेतदेखील बदल जाणवू लागतात, त्वचेची आद्र्रता कमी होऊ लागते, लवचीकता कमी होऊ लागते. इलास्टीन आणि कॉलेजन फायबर्समुळे त्वचेतील लवचीकता टिकून असते, कॉलेजनचे प्रमाण जसजसे घटत जाते, तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्या, ओठांपाशी, डोळय़ांपाशी पुसट रेषा दिसू लागतात. शरीरातील नैसर्गिक तेल ग्रंथी घटू लागतात, त्यामुळे त्वचा ही सहज सुरकुतू लागते, छोटय़ा छोटय़ा जखमा, अथवा दबावाने, त्वचेवर काळे-निळे चट्टे उमटू लागतात. तसेच चरबी साठत गेल्याने, त्वचा खेचली जाते, आतून काही त्वचेचे थर फाटून स्ट्रेच मार्क्स येतात.
डोळे आणि कान : विशीपर्यंत जेव्हा आपली वाढ होत असते, तोवर दूरवरचे आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतात, लांबचे अक्षर स्वच्छ वाचता येते. वरच्या पट्टीतले स्वर कानावर व्यवस्थित पडतात आणि त्यांचे आकलन मेंदू करू शकतो. मात्र तिशीत आणि चाळिशीत, कानांची आणि डोळय़ांची क्षमता घटू लागते, सध्याच्या काळात हा वेग अधिक आहे, कारण सातत्याने आपण हेडफोन्सवर काही ऐकत असतो आणि कृत्रिम प्रकाशात डोळे काम करत असतात. यामुळे डोळय़ांच्या आजूबाजूचे स्नायू, बुबुळ आणि डोळय़ावरील पडदा यांच्यावर ताण येत असतो. यातून मग अंधुक दिसणे, डोळय़ासमोर अंधारी येणे, डोळे चुरचुरणे, डोळे कोरडे पडून त्यातील ओलावा नाहिसा होतो.
ग्लॅऊकोमा, प्रेसबायोपिया, कॅटरॅक्ट हे सर्व आजार चाळिशीत सुरू होतात, मात्र त्यांचे निदान उशिरा होते, अथवा सुरवातीच्या खुणांकडे आपण दुर्लक्ष करतो.
कानांची तीच गत होते. दर दशकात आपल्याला थोडे कमी ऐकू येते, आपण हळूहळू टीव्ही, हेडफोन यांचे आवाज वाढवत नेतो आणि कानाची क्षमता जिथे अपुरी पडते तिथे कृत्रिम पर्याय शोधतो. मात्र हळूहळू वरच्या पट्टीतले सूर कमी ऐकू येऊ लागतात, पुढे कानाच्या पडद्यावर ताण वाढतो. कानातले जे अतिशय बारीक केस असतात, ज्यातून ध्वनी परावर्तित होत असतो, त्याची संख्या कमी होऊ लागल्यानेदेखील कमी ऐकू येते. कधी कधी कानात खूप मळ साठल्यानेदेखील कमी ऐकू येते. या गोष्टी तिशीत, चाळिशीत अतिशय कमी वेगाने बदलत जातात, मात्र हा वेग पन्नाशीच्या पुढे वाढतो आणि कमी ऐकू येते हे तेव्हा जास्त जाणवते, अर्थात कानाचे आरोग्य जपणे हे अतिशय आवश्यक आहे, कारण ऐकू न आल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
दात आणि हिरडय़ा : जसजसे वय वाढते तसतसे दात ठिसूळ होऊन झिजू लागतात. कॅल्शियमच्या प्रमाणात घट झाल्यास दातांमध्ये होणारी कीड, दाताचे टवके उडणे, असले प्रकार होऊ लागतात. हिरडय़ा, ज्या दातांना घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात, त्या हळूहळू मागे सरकू लागतात. त्यामुळे दातावरील पकड कमी होते,ज्यातून दात सहज पडू शकतात. प्लाक आणि मुख दरुगधी याही समस्या वयासोबत वाढीस लागतात. दात हे पचनासाठी अतिशय महत्त्वाचे घटक असल्याने दातांचे आरोग्य हे एकंदर संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, दातांचे आरोग्य बिघडल्याने केवळ दातांवर परिणाम होत नाही तर मधुमेह, पोटाचे विकार आणि अपचनदेखील संभवते. हिरडय़ा जसजशा मागे सरकतात, तसतसे त्यांचे सुजणे, दातांची संवेदनशीलता वाढणे, असे होऊ लागते. कोणतीही आंबट, गार वस्तू खाल्ल्याने दातात कळ येऊ लागते आणि कडक, चिकट किंवा अतिगोड पदार्थ खाणे कठीण जाऊ लागते.
मेंदू आणि मज्जासंस्था : विशीत मेंदूची वाढ सुरू असते, आणि मेंदूची लवचीकता, प्लास्टिसिटीही उत्तम असते, यामुळे आपण सहज नवनवीन संकल्पना, गोष्टी शिकू शकतो आणि नवनवीन भाषा, कौशल्य आत्मसात करू शकतो. मेंदूची वाढ ही वयानुसार थांबत अथवा घटत नाही हे विशेष. किंबहुना मेंदूची वाढ ही प्रत्येक माणसागणिक निरनिराळी होते. काही व्यक्ती वयाच्या नव्वदीतही तल्लख बुद्धी टिकवून असतात, तर काही व्यक्ती साठीत मेंदूचे विकार अनुभवतात. मुळात मेंदूतल्या विविध भागांत वयानुसार निरनिराळे बदल घडत जातात. मातृत्व आणि पितृत्व अनुभवणारी मंडळी, यांचे मेंदू मूलत: बदलून जातात, त्यांचे प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्स हे कायमचे बदलून जाते, अमिगडीला आणि मध्य मेंदूत काही प्रमाणात वाढ आढळते. त्यामुळे संवेदनशीलता, ममत्व, लाघवीपणा वाढतो. सेवाभाव वाढतो आणि मुलांचे कौतुक आणि लाड करावेसे वाटल्याने शरीरात ऑक्सिटोसिन, इस्ट्रोजेन आणि प्रोलॅक्टिन यांचा स्राव वाढतो. पुढे जसजसे वय होते, तसतसा मेंदूला होणारा रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत गेला तर मात्र मेंदूची वाढ खुंटते. विस्मृतीचा अनुभव येऊ लागतो. साध्या गोष्टी आठवत नाहीत, अथवा खोलीत कोणत्या कारणास्तव आपण आलो हे लक्षात येत नाही. सातत्याने तणावग्रस्त वातावरणात अनेक र्वष काढल्यानेदेखील मेंदूवर विपरीत परिणाम होतो. हिप्पोकॅम्पस आकाराने घटू लागतो आणि त्याचमुळे आठवणी पुढे मागे होऊ लागतात, गोष्टी विसरल्या जातात.
मज्जासंस्था ही वयानुसार अधिक शिथिल होऊ लागते, त्यामुळे तोल जाणे, अचानक खूप थंड अथवा गरम होणे याचे अनुभव येऊ लागतात. एक मात्र निश्चित, जसजसे वय वाढत जाते, तसतसे मेंदूचे निरनिराळे भाग कार्यरत होतात, ज्यातून एक स्थायिभाव निर्माण होतो, दूरदृष्टी मिळते, एखाद्या गोष्टीला कितपत महत्त्व द्यायचे अथवा संपूर्ण घटनेचे अवलोकन योग्य प्रकारे कसे करायचे हे समजू लागते. न्युरॉन्सची उत्पत्ती आणि वाढ ही आयुष्यभर होत असते, त्यामुळे मेंदूचे कार्य आणि क्षमता ही बदलत राहिली तरी सहसा कमी होत नाही. मात्र स्मृतिभ्रंश अथवा तत्सम संलग्न आजार यांची शक्यता ही आहारावर आणि व्यायामावर अवलंबून आहे. स्मृतिभ्रंश हा काही वाढत्या वयातील नैसर्गिक टप्पा नाही, आणि त्याची दखल लवकरात लवकर आणि गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
मानेखालील अवयव :
हृदय आणि फुप्फुसं : हृदयाची कार्यक्षमता ही विशीत जर उत्तम असेल, तरी पुढील प्रत्येक दशकात केलेल्या आहार-विहारावर खूप जास्त अवलंबून आहे. जसजसे वय वाढते तसतसे हृदयाचे कप्पे, त्याच्या झडपा आणि िभती ह्या कडक होऊ लागतात, हृदयाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांचेदेखील तेच होते, यामुळे हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब संभवतो. हृदयाच्या कप्प्यातून प्लाक साठून हृदयाची एकूण क्षमता कमी होऊ लागते. तसेच हृदयाचे जे इलेट्रिकल सर्किट असते, ज्याद्वारे हृदयाचे ठोके नियंत्रित होतात, ते जर कमजोर पडू लागले तर ठोके अनियमित होऊ लागतात. एकंदर हृदयाची क्षमता कमी होऊन शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. पाय खूप सुजू लागतात, छातीत दुखणे, चक्कर येणे, व्यायाम करतेवेळी अशक्तपणा जाणवणे हे होऊ लागते. या सर्वाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून हृदयाचे स्वास्थ्य राखणे सोप्पे जाईल.
फुप्फुसांचे देखील थोडय़ाफार फरकाने तसेच होते. खोलवर श्वास घेण्याची सवय नसल्यास, कोणतेही मैदानी खेळ तिशीनंतर न खेळल्याने फुप्फुसांची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. सखोल श्वास न घेतल्याने फुप्फुसाला उथळ श्वास घेण्याची सवय लागते. त्यात धूम्रपान, प्रदूषण यामुळेदेखील फुप्फुसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
पचनसंस्था : विशीत आपण काहीही खाऊन दिवस काढले असले तरी तिशीनंतर हे सहसा शक्य होत नाही. पुष्कळदा पचनसंस्था नीट काम करू शकत नाही, याचे कारण अपुरे पोषण, कमी प्रमाणात तंतुमय पदार्थाचे सेवन, अवेळी आणि अपुरे जेवण घेणे हेही असू शकते. हिरव्या पालेभाज्या, नैसर्गिक स्वरूपात असतील तशी खाल्लेली फळे, भाज्या, कमीतकमी प्रक्रिया झालेले अन्न, उसळी, डाळी यांचे सेवन हे अतिशय महत्त्वाचे ठरते. नाहीतर पित्त वाढणे, उमासे येणे, छातीत जळजळणे, घशात करपट वाटून ढेकर येणे असे होऊ शकते. त्याचबरोबर साखर आणि चहा-कॉफीच्या प्रमाणानुसार पोटात अल्सर, गाठी निर्माण होणे, आतडय़ांमध्ये छिद्र निर्माण होणे असे सगळे होऊ शकते. शरीरातील स्नायू शिथिल पडू लागल्याने सर्व विकारांत भर पडत जाते. पचनक्रिया कमजोर होऊन, मलमूत्र विसर्जनाच्या क्रियादेखील गडबडू लागतात. बद्धकोष्ठता वाढीस लागते. यातील पुष्कळ आजार हे तिशीतच सुरू होऊन, पुढे त्यांच्यावर योग्य असे उपचार आणि सवयीत बदल केला नाही, तर वयानुसार वाढू लागतात.
वयोवर्धन हे सर्वार्थाने वाईट नसले तरी हळूहळू होणारे बदल जर वेळीच जाणीवपूर्वक टिपले नाहीत तर मात्र त्याचा त्रास पुढे जाऊन पुष्कळ होऊ शकतो. वय कसे आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या अवयवांत बदल घडवते हे समजले की हा बदलाचा वेग नियंत्रित कसा करायचा आणि तो कसा आपल्याच हातात आहे, हे समजले तर आपण बरीच र्वष निरोगी आणि आनंदी राहू शकतो.