रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
पश्चिम बंगालमध्ये अत्यंत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या हिल्सा माशांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत कमी होत गेले आहे. मोठय़ा ट्रॉलर्समधून होणारी मासेमारी आणि नद्यांमध्ये होणारं प्रदूषण ही त्यामागची कारणं आहेत.
भारताच्या किनारपट्टीवर वसलेली राज्ये आणि तेथील लोकांच्या आहारातील मासे यांचे एक अतूट नाते आहे. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आवडीने खाल्ले जातात. किनारपट्टीवरची अर्थव्यवस्थाही बऱ्याचदा माशांवर अवलंबून असते. पश्चिम बंगालमध्ये ‘हिल्सा’ हा मासा अत्यंत आवडीने खाल्ला जातो. मात्र सध्या या हिल्सा माशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे बंगाली लोकांना त्यांचे हे आवडीचे खाद्य आणखी किती काळ खाता येईल यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
‘हिल्सा’ मासा हा खाऱ्या आणि गोडय़ा दोन्ही पाण्यात वाढणारा मासा आहे. टिनुआलोसा इलिशा हे त्याचे शास्त्रीय नाव. बंगालमध्ये हे मासे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये आणि समुद्रात आढळतात. समुद्रात राहणारे हे मासे अनेकदा २०० ते ३०० किलोमीटरचा प्रवास करून गोडय़ा पाण्यात जाऊन अंडी घालतात. हा प्रवास करण्यासाठी त्यांना २० ते ३० मीटर खोली आणि वाहते पाणी हवे असते, तर त्यांची अंडीही २० ते ३० मीटर खोल पाण्यात घातली जातात. अंडय़ातून बाहेर आलेले मासे पुन्हा प्रवास करून समुद्रात येतात. असे त्यांचे नसíगक चक्र वर्षांनुवष्रे सुरू आहे.
पूर्ण वाढ झालेल्या हिल्साचे वजन ७०० ग्रॅम ते तीन किलोग्रॅम एवढे असते, तर सर्वात मोठय़ा हिल्साची लांबी ६० सेंटिमीटपर्यंत असते. लहान माशांना खोका इलिश म्हणतात. हे मासे जानेवारी ते मार्च दरम्यान आढळतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चक्र बिघडले आहे. बंगालच्या उपसागरात होणारी प्रचंड प्रमाणातील मासेमारी, त्यासाठी मोटरबोटचा, ट्रॉलर्सचा वापर आणि माशांच्या प्रजनन काळातही केली जाणारी मासेमारी ही काही कारणे याला कारणीभूत ठरत आहेत. भारताप्रमाणेच बांगलादेशातही हिल्सा हा मोठय़ा प्रमाणात खाल्ला जाणारा मासा आहे. हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. बांगलादेशात जगभरात आढळणाऱ्या एकूण हिल्साच्या ६० टक्के मासेमारी केली जाते. बांगलादेशाची अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणात या माशांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. अर्थात तिथेही हिल्साचे प्रमाण कमी होत चालले आहे.
बंगालच्या उपसागरात १४ हजारांहून अधिक ट्रॉलर्स मासेमारी करतात. यामुळे प्रजननासाठी समुद्रातून नद्यांमध्ये स्थलांतर करणाऱ्या माशांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. तर कित्येकदा मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी ९० मिलिमीटरपेक्षाही लहान असल्याने पूर्ण वाढ न झालेले लहान हिल्सा त्यात अडकतात. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा वर्षांपासून हिल्साचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. गंगेच्या खोऱ्यातच नव्हे तर रूपनारायण तसंच अन्य नद्यांमधूनही हिल्सा मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
हे प्रमाण कमी होण्याचे कारण सहा-सात सििलडरवर चालणाऱ्या उच्च क्षमतेच्या मोटारबोट हेच आहे. या बोटी खोलवर समुद्रात जातात. त्यांची एक हजार फुटांची जाळी समुद्रात बरीच खोल जात असल्याने त्या जाळ्यांत हिल्साचीच नव्हेत तर अन्य माशांची पिल्लेही अडकतात. दहा ग्रॅमपेक्षा लहान आकाराचे हिल्सा पुन्हा समुद्रात फेकले जातात, या प्रकारामुळे त्यांच्यावर नष्टचर्य ओढवले आहे. लहान मासेच जाळ्यात अडकल्याने आपोआपच पूर्ण वाढ झालेल्या माशांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
हिल्साच्या संख्येत होत असलेली ही चिंताजनक घट पाहून पश्चिम बंगाल सरकारने २०१३ पासून ठरावीक काळासाठी हिल्सा मासेमारीवर पूर्णत: बंदी आणली आहे. मालदा, मुíशदाबाद, नादिया, वर्धमान, हुगळी, हावडा, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर या जिल्ह्य़ांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली. ही बंदी केवळ मासेमारीसाठीच नाहीये तर मासे विक्री, मासे वाहतूक आणि २३ सेंटीमीटरपेक्षा कमी लांबीचे हिल्सा जवळ बाळगणे, ९० मि.मी.पेक्षा कमी व्यासाची जाळी लावणे अशा अनेक प्रकारची होती. ती फेब्रुवारी ते एप्रिल आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये घालण्यात येते.
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही सरकारी नियमांचे नेहमीच पालन करतो. मात्र मोठमोठे ट्रॉलर्स वापरून मच्छीमारी करणारे सर्व नियम धुडकावून लावून मासेमारी करतात. त्यांच्या या बेलगाम मासेमारीनेच हिल्साची संख्या कमी होत आहे.’ तर ट्रॉलर्सचालकांचे म्हणणे आहे की, ‘एक हिल्सा शेकडो अंडी घालतो, त्यातली काहीच हिल्साची पिल्लं आमच्याकडून नष्ट होत असतील तर फारसा काही फरक पडत नाही.’ मात्र मासेमारीत मिळणाऱ्या माशांची आकडेवारीच सगळे स्पष्ट करते.
मोठय़ा प्रमाणातील मासेमारी हे एकच कारण हिल्साच्या घटत्या संख्येसाठी कारणीभूत नाहीये, तर नद्यांचे प्रदूषित पाणी हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. हिल्साच्या स्थलांतरासाठी, प्रजननासाठी स्वच्छ, खोल व वाहते पाणी आवश्यक असते. मात्र सर्वच नद्यांच्या खाडींमधील पाणी हे अत्यंत प्रदूषित आणि संथ आहे. शिवाय गंगेच्या पाण्यात डायरिया होण्यास कारणीभूत असलेल्या ई-कोलाय या जिवाणूंचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने नेमून दिलेल्या प्रमाणापेक्षाही अधिक आहे. ज्याने हिल्साचे पुनरुत्पादन कमी होत आहे.
गंगेवर बांधली जाणारी धरणे, बंधारे यामुळे गंगेचे पात्र दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदीमुखाशी खारे पाणीच अधिक प्रमाणात आढळते.
हिल्साच्या घटत्या संख्येने प. बंगालप्रमाणेच बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर आणि अन्नसाखळीवर मोठा परिणाम केलेला आहे. त्याची दखल घेऊन पश्चिम बंगाल सरकारने ठरावीक काळात बंदी घालण्याव्यतिरिक्तही काही पावले उचलली आहेत. राज्याच्या मत्स्यसंवर्धन मंत्रालयाने हिल्साची अंडी घालण्याची रायचक-गोदाखली, त्रिवेनी-बालागड आणि लालबाग-फरक्का ही तीन ठिकाणे अभयस्थळे म्हणून जाहीर केली आहेत. तर डायमंड हार्बर येथे असणारे ‘हिल्सा कन्झर्वेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ हिल्साचे पुनरुत्पादन तलावात करता येईल काय यावर संशोधन करत आहेत. अर्थात शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ‘हिल्साच्या पिल्लांचे संवर्धन झाल्यास, या संशोधनावर मोठा खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही.’
मधल्या काळात बांगलादेश सरकारतर्फेही हिल्सा संवर्धनासाठी नद्यांच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांनी मिळून काही उपाययोजना अवलंबण्याचेही ठरवण्यात आले आहे.
आता पुन्हा फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान हिल्सा संवर्धनासाठी मासेमारीवर बंदी घातली जाईल आणि ज्यांना नियम पाळायचेच नाहीत ते पुन्हा या बंदी काळात मासेमारी करून हिल्सांची संख्या कमी करण्याचे काम करत राहतील. नवीन तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली म्हणून माणसाची हाव अधिकाधिक वाढत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण आपलीच पर्यावरण व्यवस्था बिघडवत आहोत का हे तपासणे गरजेचे आहे. अन्यथा माशांच्या घटत्या संख्येच्या चिंतेचे ग्रहण इतर किनारपट्टीलाही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.