केवळ हक्काचं घर असणं इतकीच वृद्धांची गरज मर्यादित नाही. तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजांचा विचार करुन त्यांच्या घरात काही बदल हे खास ठरवूनच करावे लागतात. तरच त्यांचं राहणीमान सुरेल होईल.

खूप पूर्वी एक जाहिरात होती- ‘साठ सालके बुढ्ढे, या साठ सालके जवान?’ त्यात एक वयस्कर माणूस पळत जाऊन बस पकडतो असे दृश्य होते. आजकाल साठ वर्षांला मला ‘बुढ्ढा’ म्हणणार असाल तर मी जाहिरातीत कामच करणार नाही, असे म्हणणारी माणसे भेटतील. परवाच माझ्या ७३ वर्षांच्या काकाने रॅपिलग केले, ७० वर्षांच्या आत्याने दांडिया खेळतानाचे फोटो वॉट्सअ‍ॅपवर टाकले. या मंडळींचा उत्साह व काळाप्रमाणे बदललेले राहणीमान बघून या ‘तरुणांचा’ गर्व वाटतो. याला आजची सामाजिक परिस्थितीही  कारणीभूत असायची शक्यता नाकारता येणार नाही. बऱ्याच वयस्कर जोडप्यांची मुले परदेशात वास्तव्याला असतात. त्यामुळे स्वत:च स्वत:ची काळजी घेण्यावाचून पर्याय नसतो. पण, न कुरकुरता ‘हम भी कुछ कम नहीं’ म्हणून स्वत:ची तब्येत सांभाळून, स्काइप व ऑनलाइनद्वारे ट्रेिडग करणारे आजी-आजोबा तरुणांनापण ‘कूल’ वाटतात. आजकाल काळाची गरज असल्याने बरेच बिल्डर्ससुद्धा या वयस्कर लोकांसाठी खास वसाहती निर्माण करीत आहेत. ही खरंच कौतुकाची बाब आहे. परवा अशाच खास सीनियर सिटिझन्ससाठी म्हणून उभारलेल्या इमारतीत जाण्याचा योग आला आणि नवऱ्याकडे करायच्या हट्टामध्ये येथील एका फ्लॅटची भर पडली.

आतापर्यंत आपल्याकडे वृद्धांसाठी म्हणून कधीच काही खास सोयी केल्या गेल्या नव्हत्या. पण येथील अभ्यासपूर्वक केलेले छोटे-छोटे बदल बघून आपण आपल्या राहत्या घरातसुद्धा यातील काही बदल करायला पाहिजेत याची प्रकर्षांने जाणीव झाली. जेणेकरून आपल्या वृद्ध आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची नीट काळजी घेतली जाईल. या वसाहतीतील जाणवलेली महत्त्वाची बाब म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा व आजूबाजूला मोकळी जागा. खरे तर या गोष्टी कुठल्याही घरासाठी आवश्यक अशाच आहेत. पण वृद्धांसाठी याचे महत्त्व किती तरी पटीने जास्त असते. वृद्धांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी सूर्यप्रकाश व खेळती हवा हवीच. त्याचबरोबर शरीराची हालचाल होण्यासाठी सोसायटीमध्येच खाली फिरल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. पण काही कारणाने वृद्ध लोक घराबाहेर पडू शकत नसतील तर घरातल्या घरात त्यांना फिरता येईल हे बघणे फार गरजेचे आहे. त्यासाठी काही फíनचर, सामान कमी करून घरात मोकळी जागा करावी. फíनचरचे कोपरे गोलाकार केल्यास ठेच लागून दुखापत होणार नाही. बसायच्या सोफ्याची, बेडची उंची कमीत कमी २०’’ असावी. भारतीय बठकीप्रमाणे खूप खाली नसावी. त्यामुळे उठायला बसायला त्रास होतो.

घरातील व बाथरूममधील फरशा या न घसरणाऱ्या असाव्यात. कारण चकचकीत फरशीवरील सांडलेले पाणी दिसत नाही व त्यावर घसरून झालेला अपघात आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरतो. फरशांप्रमाणेच काळजी घ्यावी सरकणाऱ्या सतरंजी किंवा काप्रेटची. या दोन्ही गोष्टी जमिनीला वेल्क्रो लावून नीट घट्ट बसवल्यास जागेवरच राहतील, सरकणार नाहीत. त्याचबरोबर यांची टोके लूज नाहीयेत ना हे बघावे. शक्यतो काप्रेटच्या बाजू भिंतीला लागून किंवा फíनचरच्या खाली घालाव्यात. जेणेकरून त्याला अडखळून पडण्याची भीती राहणार नाही.

घर शक्यतो एकाच लेव्हलवर असावे. पूर्वी मला स्वत:लाच एखादी पायरी वरती किंवा खालती असलेले दिवाणखाने, स्वयंपाकघरे आवडायची. पण ती एखादी पायरीसुद्धा जेव्हा माझ्या बाबांना त्यांच्या वयामुळे त्रासदायक होऊ लागली तेव्हा त्यातील नावीन्य संपून तिची भीती वाटू लागली. ती पायरी न दिसणे, अडखळून पडणे या गोष्टी मग अशा वेळी सुरू होतात. त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. पायरीपेक्षा रॅम्प चढायला उतरायला सोपा असतो. त्यामुळे पायऱ्यांच्या बाजूला रॅम्प करू शकलात तर उत्तमच.

स्वयंपाकघरात काम करताना ओटय़ाची उंची अशी ठेवावी की जेणेकरून या मंडळींना फार वाकावे लागणार नाही. काम करणे सुलभ जाईल. त्याचप्रमाणे ओटय़ाखाली ठेवलेले सामान ट्रॉलीत ठेवावे. शक्यतो हाताच्या उंचीवर नेहमीचे सामान ठेवावे. संधिवातामुळे बऱ्याच वृद्धांचे हात, खांदे आखडतात. अशा वेळी बेसिन किंवा सिंकवर वाकून नळ उघड-बंद करणे त्यांना त्रासदायक जाते. तेव्हा लांब दांडय़ाचे नळ लावून घेणे हे श्रेयस्कर.

कोणाही वृद्धांना चालताना दोन्ही बाजूला पकडायला रेिलग/ बार दिल्यास तोल सांभाळणे सोपे जाते. असेच रेिलग कमोडच्या बाजूलापण असावे. जेणेकरून कमोडवर उठणे- बसणे विनासायास होऊ शकते. बाथरूमच्या दाराला कडीच्या शेजारी चौकोनी दुधी काच लावावी. अशाने, दुर्दैवाने कधी कोणी बाथरूममध्ये पाय घसरून पडले तर काच फोडून कडी उघडता येते व वेळीच उपचार केला जातो. बाथरूमचे दार एक तर बाहेर उघडणारे हवे किंवा सरकते हवे. अशाने काय होते की, जर का कोणी दरवाज्याजवळच पडले तर दार उघडायला त्रास होणार नाही. बाथरूममध्ये लगेच हात पोहोचेल, अशा ठिकाणी अलार्म बेलसुद्धा तुम्ही करू शकता. जेणेकरून बाहेरच्यांना तातडीची मदत देणे शक्य होईल. या सर्व वृद्ध मंडळींना रात्री बाथरूमला जायला उठावे लागते. सर्वात जास्त अपघात हे रात्रीच्या वेळीच होतात. हे टाळण्यासाठी त्यांच्या पलंगापासून ते बाथरूमपर्यंत जमिनीच्या लेव्हलला दिव्याची सोय करावी जेणेकरून त्या प्रकाशात त्यांना वाट नीट दिसेल. या वाटेत कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.

तुम्ही जर का नवीन सोसायटीत राहायला जाणार असाल आणि तुमच्या घरी वृद्ध मंडळी असतील तर घर घेताना असे घर घ्यावे ज्याची लिफ्ट मोठ्ठी आहे. ज्यामध्ये कमीत कमी व्हीलचेअर जाऊ शकेल. सुरुवातीला ज्या वसाहतीबद्दल सांगितले, तिथे स्ट्रेचर जाऊ शकेल अशा लिफ्टची सोय केली आहे. या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. ज्याची जाणीव आपल्याला दुर्दैवाने संकटकाळीच होते. आपल्या वृद्ध आई-वडिलांना इमर्जन्सीच्या वेळी याच गोष्टी वेळेवर उपचार मिळण्यासाठी उपयोगी येऊ शकतात. चिंचोळ्या पॅसेज आणि जिन्यावरून स्ट्रेचर फिरवताना त्रास होतो. त्यामुळे वेळ लागून पेशंटची परिस्थिती बिघडू शकते. या गोष्टी टाळणे जरुरीचे आहे.

जे वृद्ध व्हीलचेअरवर आहेत त्यांच्यासाठी स्विचेसची उंची साडेतीन-चार फुटांवर ठेवावी. जेणेकरून या मंडळींना त्याचा उपयोग करणे सोपे जाईल. त्यांच्या बेडजवळ, सोफ्याजवळ टेलिफोन असावा, ज्यामुळे गरज लागल्यास ते मदतीची हाक देऊ शकतील. त्याच बरोबर प्रत्येक खोलीत दिव्या- पंख्यासाठी टू-वे स्विचेस असावेत. अशाने सारखे सारखे उठावे लागणार नाही.

यातील बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या राहत्या घरातसुद्धा करून घेऊ शकतो. अशाने आपल्या वृद्ध मंडळींचा शारीरिक व मानसिक त्रास कमी होऊन राहणीमान सुरेल होईल यात शंका नाही. मग आपल्याला सुद्धा ‘कूल’ आई-वडिलांची मुले म्हणून मिरवता येईल!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader