सगळ्या जगाच्या दृष्टीने अतिशय संपन्न देश असलेल्या अमेरिकेत कित्येक बेघर लोक रस्त्यावर जगतात. त्यांच्याकडे राज्ययंत्रणेला संवेदनशीलतेने बघायला लावणाऱ्या अमेरिकी नागरिकांविषयी..
अमेरिकेच्या आग्नेय भागातलं प्रसिद्ध राज्य म्हणजे फ्लॉरिडा. फ्लॉरिडा हे १२ महिने सूर्यप्रकाशाचे वरदान असलेलं राज्य. सुंदर समुद्र किनारा, हिवाळ्याच्या ३—४ महिन्यांत जेव्हा अमेरिकेतली इतर राज्ये थंडीच्या कडाक्याला तोंड देत असतात, तेव्हा फ्लॉरिडामधले लोक उबदार सूर्यप्रकाश पाठीवर घेत दैनंदिन व्यवहार करत असतात. साउथ फ्लॉरिडामधला फोर्ट लॉडरडेल या शहराचा समुद्रकिनारा, बीचेस आणि शांत आयुष्य अमेरिकेतल्या आणि अमेरिकेबाहेरच्या लोकांना नेहमीच आकर्षित करते. टूरिझम हा फोर्ट लॉडरडेलचा सर्वात मोठा आर्थिक सहारा आहे. तेव्हा टूरिझमच्या संबंधित सर्व बाबी सरकारी खाती जपत असतात. पोलिसांचा हस्तक्षेप बऱ्याच वेळा जरा जाचकही होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरनल्ड अॅबट या ९० वर्षांच्या स्वयंसेवकाला पोलिसांकडून होणारा त्रास.
अॅबट हा दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन आर्मीमध्ये सैनिक होता. युद्धानंतर तो आणि त्याची बायको बरीच वर्षे फिलाडेल्फियात राहिले. तो दागिने विकायचा व्यवसाय करायचा. बायको बेघर आणि गरीब लोकांना मदत करण्यात आनंद मानणारी होती. अॅबटनी तिची आठवण मनात जागी ठेवत स्वत:ला बेघर लोकांना अन्नदान करण्याच्या कार्यात गुंतवून घेतले.
फोर्ट लॉडरडेलमध्ये अंदाजे तीन हजार बेघर लोक आहेत. डोक्यावर छप्पर नसताना उघडय़ावर रहायचं, तर सूर्यप्रकाशात १२ महिने न्हाऊन निघणाऱ्या साउथ फ्लॉरिडाहून जास्त सोयीची जागा कुठली असणार? शहरात बेघरांना रहायला असणारी सरकारी व्यवस्था अपुरी आहे. बेघर लोक सगळे भिकारी नसतात. छोटी-मोठी कामं करून मिळणारा पैसा घर घ्यायला, बँकेकडून कर्ज काढायला पुरेसा नसतो. सरकारी आश्रयस्थानांमध्ये ढेकूण असतात, जेवण चांगलं नसतं, अशा तक्रारी बेघर करतात. बेघरांच्या मोठय़ा संख्येला सरकारने केलेली सोय तुटपुंजी आहे. अॅबट गेली ३०-३५ वर्षे बेघरांना सार्वजनिक ठिकाणी, चर्चच्या अंगणात, समुद्र किनाऱ्यावर अन्नदान करत आहे.
सरकारी यंत्रणेचा बेघरांबद्दलचा दृष्टिकोन संपूर्णपणे व्यवहारी आहे. बेघर लोक बरेचदा नशिल्या पदार्थाचं सेवन, गुन्हेगारी, मानसिक आजार यामध्ये गुरफटलेले असतात. बेघर लोकांची ये-जा बीच, सार्वजनिक बागा अशा ठिकाणी वाढली, तर इकडे येणाऱ्या सधन प्रवाशांची संख्या घटेल, जे राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे अॅबटसारख्या लोकांनी चर्चच्या प्रांगणातून किंवा ठरावीक सार्वजनिक बागांमधूनच अन्नसत्र चालविले पाहिजे अशा तऱ्हेच्या सरकारी नियमांची अंमलबजावणी सक्तीने सुरू झाली. कुठल्याही ठिकाणी अन्नदान करण्यापूर्वी मालकांची परवानगी घेणे सक्तीचे केले गेले. बीचची मालकी सरकारची असल्यामुळे तिथे अॅबट बेघरांना जेवण देण्यावरून त्याच्यावर कारवाई झाली. बेघरांनी आठवडय़ातून एकदा तरी बीचवर येऊन तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यावा असं अॅबटला वाटतं. बीचवर जाऊन पोलिसांनी अॅबटला पकडण्याचं वॉरंट दाखवल्यावर याबाबत अमेरिका आणि अमेरिकेबाहेरील लोकांनी समजले. ९० वर्षांच्या समाजसेवकाला तुरुंगवास देणाऱ्या सरकारी यंत्रणेची निर्भत्सना सगळीकडे झाली. सरकारी अधिकाऱ्यांना आपली बाजू समजावून सांगता आली नाही. तसंच असल्या सहानुभूतिशून्य सरकारी धोरणामुळे परदेशी प्रवाशांनी फ्लॉरिडाला न येण्याचा विचार स्पष्ट केला.
३५-४० वर्षांपूर्वी पोलीस अधिकारी बेघर लोकांना कायमचं गप्प करण्याचे अनेक उपाय विचारात घेत असत. त्यांना बसेसमध्ये घालून फ्लॉरिडा स्टेटच्या अगदी एका टोकाला नेऊन ठेवायचं- जिथून पायी परत यायला त्यांना किती तरी वर्षे लागतील. डस्ट बीन्समध्ये (डंपस्टर्समध्ये) विष घालायचं (बेघर लोक बेरोजगार असताना त्यांना अन्न मिळवायचं एकमात्र ठिकाण म्हणजे मोठय़ा कचरापेटय़ा असत.) बरेच वेळा बेघर लोकांची तुलना कीड, मुंग्या, झुरळं यांच्याशी होत असे. बेघर लोकांची संख्या वाढत गेल्यावर समाजातल्या सुजाण लोकांची त्यांच्याकडे बघायची वृत्तीही बदलली.
अॅबट प्रकरण शांत होत असतानाच एका व्हीडिओ क्लिपमध्ये पोलीस ऑफिसर ५८ वर्षांच्या एका बेघर माणसाला बेदम मारताना लोकांनी बघितलं. पोलिस खात्याची बदनामी झाली. आता पोलीस खात्याने झालेली बदनामी पुसून टाकून आपली इमेज सुधारण्याचा चंग बांधलेला दिसतोय. पोलीस खात्याने समाजसेवा खात्याशी हातमिळवणी करून एक वेगळ्याच प्रकारचा उपक्रम राबवायला सुरुवात केली. अमेरिकेत बेघरांचा प्रश्न थोडय़ा फार फरकाने सगळ्याच राज्यांना आहे. फ्लॉरिडामध्ये सुरू झालेल्या या उपक्रमावर सगळ्यांचंच लक्ष टिकून राहिलेलं आहे. बेघरांचा प्रश्न जमेल तितक्या सामोपचाराने सोडविण्याच्या प्रयत्नाची सुरुवात लॉरी अॅन वॉल्टन या सर्टिफाईड समाजसेविकेला पोलीस खात्यात नोकरी देऊन झालेली आहे. ‘मी समाजसेवक आहे. माझं काम लोकांमधले संबंध सलोख्याचे करणं हे आहे. बेघरांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांचे माझ्याबरोबर आणि बाकी नागरिकांशी असलेले संबंध, त्यांचे आणि पोलीस खात्याचे एकमेकांशी असलेले संबंध हे सलोख्याचे असायला हवेत’ असं लॉरीचं सांगणं आहे. वेळप्रसंगी लॉरी पोलिसांचं प्रबोधनही घेईल कदाचित. लॉरी आणि तिच्या बरोबर असणारा पोलीस अधिकारी यांच्या टीममध्ये शेवटचा शब्द लॉरीचा असतो. पोलिसाचा नाही.
एक पोलीस आणि लॉरी अशी दोघींची टीम रस्त्यावरील बेघरांना भेटून मदत करीत असते. पुढाकार लॉरीचा असतो. समाजसेविकेकडून मिळणारा सहानुभूतीचा दिलासा ही फारच दुर्मिळ आणि मोलाची गोष्ट आहे असं कितीतरी बेघर लोक सांगतात. ३० वर्षांपासून बेघर असलेला कोडी कॉकर सांगतो, ‘कितीतरी दिवसांमध्ये/ वर्षांमध्ये आमच्याबरोबर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा घरात रहाणाऱ्या लोकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाहीये.’ बरेच बेघर मादक पदार्थाच्या विळख्यात अडकलेले असतात. त्यांच्या ट्रीटमेंटची व्यवस्था लॉरी करते. (त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या खास दवाखान्यांमध्ये दाखल करून). मनोरुग्णही बरेच असतात. त्यांना योग्य त्या दवाखान्यात पाठविणे, आसरा नसलेल्या बेघरांना आसरा मिळवून देणे, छोटी-मोठी नोकरी मिळवून देणे अशा तऱ्हेची मदत लॉरी आपलेपणाने करते. (पोलिसांमुळे) गणवेशाची वाटणारी भीती लॉरीशी बोलताना बेघर लोकांना वाटत नाही. पोलिस खातं तिच्या मदतीने आपली इमेज सुधारण्याच्या प्रयत्नात आहे.
फ्लॉरिडा राज्याच्या ब्रॉवर्ड जिल्ह्यची लोकसंख्या १८ लाखाच्या आसपास आहे आणि बेघर लोकांची संख्या जवळपास ३०००. बेघर लोक हे जास्तकरून ३१ आणि ५० या वयोगटातले असतात. ६२ टक्के बेघर हे पुरुष असतात. प्रत्येक चार बेघरांमध्ये एक मनोरुग्ण असतो. जिल्ह्यत तीन ठिकाणी बेघर लोकांसाठी आसराघरं आहेत, पण तिथे जेमतेम ६०० लोकांची व्यवस्था होऊ शकते. सगळ्या बेघर लोकांना शेल्टर्समध्ये रहायला आवडतं असं नाही. कोडी म्हणतो, ‘‘मी १२ वर्षांचा असल्यापासून मारुआना स्मोक करतो. माझी आई क्रॅकअॅडिक्ट होती, आणि माझ्या हातांचा उपयोग तिने अॅश-ट्रेसारखा केला. मी कायम स्वेट शर्ट घालून भाजलेल्याच्या खुणा लपवतो. माझे वडील कोण आणि कुठे आहेत माहीत नाही. घर सोडून अनेक र्वष झाली. मला घर म्हणजे बंदिस्त कोठडीच वाटते. मग ते माझं घर असो किंवा शेल्टर. वारा जिथे नेतो, तिथे मी जातो, झाडांच्या सान्निध्यात आसरा शोधतो. सगळीच शेल्टर्स चांगली असतात, असं नाही. अल्प खर्चात असलेलं शॉन कोनोनी याचं शेल्टर जरा जास्तच अस्वच्छ आहे असं बेघर अँड्रय़ूचं म्हणणं आहे. अँड्रय़ू हा डब्लिनमध्ये जन्मलेला आणि वयाच्या आठव्या वर्षी एका अमेरिकन कुटुंबाने दत्तक घेतलेला मुलगा. तो १६ वर्षांचा असताना त्याला अमेरिकेतल्या त्याच्या आई-वडिलाने घराबाहेर काढलं, कारण तो स्मोक करायला लागला होता (मारुआना सुद्धा). अँड्रय़ू आता २२ वर्षांचा आहे. एका रँचवर घोडय़ांची निगा राखायचं काम करतो. तिथेच रहातो. बेघर असतानाचे दिवस तो विसरलेला नाही. चुकीच्या ठिकाणी (मोठय़ा मॉलच्या जवळ असलेल्या पुलाखाली) राहिल्यामुळे काही दिवस तुरुंगातही राहून आलेला आहे. अँड्रय़ू जरी कोनोनीच्या शेल्टरबद्दल बरं बोलत नसला, तरी पुष्कळ बेघर लोकांना तो मोठाच दिलासा ठरलेला आहे. हॉलिवूड शहरात बेघरांचा मोठा आधार ठरलेला कोनोनी आता शहर सोडून निघाला आहे. शहरातल्या नगरपालिकेने मोठी रक्कम देऊन त्याची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. आणखीन काही प्रॉपर्टीज विकत घेऊन, स्वच्छ करून जास्त भावात विकायचा नगरपालिकेचा विचार आहे. कोनोनीच्या शेल्टरमध्ये रहाणारे बरेच जण त्याच्याबरोबर शहर सोडून जाणार आहेत. न जाणाऱ्यांना लॉरी मदत करणार आहे. लॉरीच्या बरोबर मेरी एल्रिच नावाची पोलीस ऑफिसर असते. ती म्हणते, लॉरीसारख्या अजून १० प्रशिक्षित समाजसेविका आमच्याबरोबर असायला हव्यात. गणवेषातल्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बेघर लोक कधीच मनातलं बोलू शकत नाहीत. शिवाय प्रशिक्षित समाजसेवकांमध्ये सर्व तऱ्हेच्या लोकांबरोबर वागण्याचं कौशल्य असतं. ते पोलिसी खाक्यात बसत नाही. मनमोकळ्या, हसऱ्या लॉरीचा स्वभाव बोलका आहे.
बेघर भुकेल्यांना इतर नागरिकांचा दर्जा देऊन अन्नदान करणारा, फ्लॉरिडाच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटता यावा म्हणून वयाच्या ९०व्या वर्षी तुरुंगात जाणारा अॅबट आणि समाजसेवेचं प्रशिक्षण घेऊन बेघर लोकांना स्थिर आयुष्य मिळावं म्हणून त्यांना मदत करणारी लॉरी या दोघांच्या रूपात ब्रॉवर्ड जिल्ह्यतल्या बेघर लोकांना दोन मोठे तारणहार मिळालेले आहेत. पोलीस खात्याने आपल्या खाक्या जरा सौम्य करून अॅबट, लॉरी आणि यांसारख्या स्वयंसेवकांच्या मदतीने बेघर लोकांची समस्या समाधानपूर्वक हाताळणे जरुरीचे आहे.
शशिकला लेले – response.lokprabha@expressindia.com