लोकल आणि ग्लोबल यांचं अफलातून मिश्रण असलेलं गोवा म्हणजे हनिमूनर्ससाठी एकदम हटके ठिकाण. गोव्याच्या मोकळ्या वातावरणातल्या गर्दीत हनिमूनर्सना हवा तो एकांतही मिळू शकतो ही गोव्याची गंमत आहे.

‘हनिमूनर्स पॅराडाइज’ असं वर्णन करतात ते इवलंसं राज्य गोवा. पर्यटन व्यवसाय हा तिथल्या प्रमुख व्यवसायांपैकी एक असल्यामुळे हौशी पर्यटकांच्या खातीरदारीत गोवा कधीच कमी पडत नाही. तिथला निसर्ग आल्हाददायक आहेच, तिथे पर्यटकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधाही इतर कुठल्याही पर्यटनस्थळाच्या मानाने दर्जेदार आणि मुबलक आहेत; पण या सगळ्याबरोबरच नवपरिणित भारतीय जोडप्यांना खुणावतो तो गोव्याचा मोकळेपणा. गोवन संस्कृतीतला निवांतपणा आणि सर्वसमावेशक खुलेपणाच हनिमून साजरा करायला जाणाऱ्यांना जास्त भावतो.

Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Dhule district fake death case to collect insurance money
विम्याचे पैसे मिळावेत म्हणून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव
Ratnagiri loksatta
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पक्ष प्रचारापुरते; महाविकास आघाडी, महायुतीत एकही जागा नाही
sangli district assembly election
सांगली जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना; मिरज, खानापूरमध्ये जागेवरून तर सांगलीत उमेदवारीवरून वाद
maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap got married
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
Cyclone Dana which formed in Bay of Bengal is now just few kilometers off coast of Odisha
‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; ‘दाना’ चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर…
dadar kazipet special train
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-काजीपेट विशेष रेल्वेसेवा

गोव्याबद्दल मराठी माणसाला खरं तर काही वेगळं सांगायला नको. गोव्याला आयुष्यात एकदाही न गेलेला मराठी तरुण माणूस तसा विरळाच. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला तर गोवा हे सर्वात जवळचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनस्थळ आहे. तिथली तरुण मंडळी गोव्याला एकदा तरी गेलेलीच असतात. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलं तरीही आपल्या मनाच्या जवळचं.. अगदी आपलं वाटावं असं आहे. गोव्याची हीच खासियत आहे. ग्लोबल आणि लोकल याचं बेमालूम मिश्रण इथल्या संस्कृतीत आहे. तिथे प्रत्येक वेळी काही वेगळं गवसतं. एकदा जाऊन स्थलदर्शन उरकून यायचं यासाठी गोवा नाहीच मुळी. पर्यटनाची अनेक रूपं गोव्याच्या छोटय़ाशा राज्यात सामावली आहेत. काही तरी वेगळं शोधणाऱ्या तरुण पिढीला गोव्यात हमखास ते सापडू शकतं. हनिमूनला केवळ निवांतपणा आणि एकांतातला वेळ हवा असणाऱ्या तरुणांनादेखील गोव्याच्या गर्दीतही तो एकांत सापडू शकतो, हे गोव्याचं विशेष.

नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हे गोव्याचे दोन मुख्य भाग. पर्यटकांना चिरपरिचित असणारा बहुतेक भाग येतो नॉर्थ गोव्यात. राजधानी पणजी याच भागात आहे. दोना पावला, अंजुना, कळंगुट, बागा, वागातोर, मोर्जिम, कँडोलीम, सिंक्वेरिअम हे गोव्यातले प्रसिद्ध समुद्रकिनारे याच भागात येतात. साऊथ गोव्यातले बीच गेल्या काही वर्षांत नव्याने प्रसिद्धीस येऊ  लागले आहेत. बेनौली, कोळवा, बोगमालो, अ‍ॅगोंडा, माजोरडा, मोबोर हे किनारे तिथल्या शांततेसाठी, स्वच्छ आणि तुलनेने कमी गर्दीच्या आणि कमी व्यावसायिक वातावरणासाठी प्रसिद्धीला येताहेत. दक्षिण गोव्यात बीच रिसॉर्ट तुलनेने मोजके असले तरीही गर्दीपासून दूर जाऊ  इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी ते आदर्श आहेत. (पर्यटन हंगामात मात्र इथेदेखील गर्दी असते आणि लिमिटेड रिसॉर्ट्स असल्याने अ‍ॅडव्हान्स बुकिंग अत्यावश्यक असते.)

सर्वासाठी पॅकेज

हनिमूनसाठी गोवाच का? याची अनेक कारणं देता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक गणितात बसतील अशी राहण्याची-खाण्याची ठिकाणं इथे उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी सुशेगात राहण्यासाठी खिसा हलका करण्याची तयारी आहे अशांसाठी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह अनेक मोठी हॉटेल्स उपलब्ध आहेत, बीच रिसॉर्ट्स आहेत. यामध्ये सर्व पंचतारांकित लक्झरी सुविधा देण्यात येतात. त्याच वेळी समुद्रकिनाऱ्याजवळ राहूनही परवडतील अशी हनिमून पॅकेज देणारी हॉटेल्स, बेड अँड ब्रेकफास्ट सुविधा देणारी गेस्ट हाऊस असे बजेट पर्यायही आहेत. सर्व स्तरांतील पर्यटकांना परवडतील अशी राहण्याची व्यवस्था गोव्यात आहे. साधारण दर दिवशी ८०० ते १००० रुपयांपासून हनिमूनर्ससाठीच्या हॉटेल्सचे दर सुरू होतात. नोव्हेंबर ते जानेवारी या पीक सीझनमध्ये मात्र दुपटीने (काही लोकप्रिय ठिकाणी तर चौपट) दर वाढतात. गोवा पर्यटन महामंडळाची रिसॉर्टही रास्त किमतीत आहेत.

रोमँटिक हनिमून

भारतात खूप कमी ठिकाणी गोव्यासारखे मोकळे वातावरण असेल. इथे विदेशी पर्यटकांचा राबता असल्याने हे सर्वसमावेशक सांस्कृतिक मोकळेपण टिकून राहिले आहे. गोव्यातले बीच प्रसिद्ध आहेत स्वच्छतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी. उत्तर गोव्यातल्या बहुतेक प्रसिद्ध बीचेसवर निवांत पहुडण्यासाठी श्ॉक टाकलेल्या दिसतात. छोटी आरामखुर्ची आणि छत्री असलेल्या या श्ॉकवर आपल्यासाठी गरमागरम जेवण (किंवा थंडगार बीअर) आणलं जातं. बीचवर असलेली छोटी रेस्टॉरंट्स ही सेवा देतात. त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतलं की, श्ॉक मोफत मिळते. अन्यथा ५०-१०० रुपये तासाला मोजलेत तर तुम्हालाही एक टॉवेल आणि ही निवांत श्ॉक वापरू देतात. समुद्रस्नान झाल्यावर सूर्यस्नानासाठी ही सुशेगात व्यवस्था केवळ गोव्यातच. समुद्रस्नानाला जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने छोटे, पण सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ओले कपडे बदलण्याची सोय, स्वच्छ स्वच्छतागृह, सामान ठेवायला सुरक्षित जागा गोव्यात बहुतेक सर्व बीचवर दिसतात. बागा, कलंगुट, वागातोर हे बीच अशा सुशेगात समुद्रस्नानासाठी आदर्श आहेत. ‘डोण्ट डिस्टर्ब’ हे इथे लोकांना सांगावं लागत नाही, हे विशेष. याशिवाय रोमँटिक हनिमूनसाठी सगळी वातावरणनिर्मिती रिसॉर्टवर असते. अगदी छोटय़ा रेस्टॉरंटमध्येदेखील कँडललाइट डिनर, वाइन अँड डाइनची सोय असू शकते. लाइव्ह म्युझिक हीसुद्धा गोव्यातल्या रेस्टॉरंटची खासियत. चांगल्याशा रेस्टॉरंटमध्ये अशा ‘वाइन अँड फाइन डाइन’चा अनुभव दोन ते चार हजार रुपयांत (दोघांचा मिळून दर)  मिळू शकतो.

क्रूझ आणि नाइट लाइफ

गोव्याचं नाइट लाइफ अनुभवण्यासारखं आहे. क्रूझ आणि कॅसिनोसाठी गोवा प्रसिद्ध आहे. पणजीला मांडवीच्या काठाजवळ काही भव्य कॅसिनो उभे आहेत. एक वेगळं जग बघण्यासाठी, भाग्य अजमावण्यासाठी कॅसिनोची चक्कर मारायला हरकत नाही. पणजीतच मांडवीच्या किनाऱ्यापासून मिरामार बीचपाशी जाणाऱ्या संध्याकाळचा क्रूझचा अनुभव घ्यायला लहान-थोर सगळेच जातात. या क्रूझवर गोवन संस्कृतीचं दर्शन घडवणारी नाच-गाणी असतात तसा ‘डीजे’ही असतो. तासाभराच्या क्रूझचे दर माणशी ३०० रुपयांच्या आसपास आहेत. हनिमूनर्सना अशी ‘सार्वजनिक’ क्रूझ नको असेल तर आलिशान क्रूझ सेवा देणारी काही महाकाय जहाजंदेखील गोव्यात आहेत. आतल्या सुविधांनुसार यांचे दर असतात. ऑल नाइट क्रूझ हा प्रकारही इथे दिसतो. या आलिशान क्रूझवर हनिमूनर्सना अपेक्षित प्रायव्हसी मिळू शकते.

साहसी खेळ

हल्ली पर्यटनाला जाणाऱ्या तरुण जोडप्यांना साहसी खेळात रस असतो. त्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट्स अनेक किनाऱ्यांवर उपलब्ध आहे. बनाना राइड, वॉटर स्कूटर, बोट राइड या अशा पाण्यातल्या खेळांसाठी माणशी ३०० ते ५०० रुपये आकारले जातात. समुद्रातल्या आणि किनाऱ्यावरच्या पॅरासेलिंगचा अनुभव अनेक जण घेतात. या अनुभवासाठी साधारण १५०० रुपये लागतात.

सध्या तरुणाईला खुणावणारा आणखी एक साहसी प्रकार म्हणजे हॉट एअर बलून राइड. गोवा पर्यटन विकास मंडळाने नुकतीच याचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. दक्षिण गोव्यात आसोल्डा इथे हॉट एअर बलून स्टेशन निर्माण केलंय. आकाशातून संथपणे विहरताना गोव्याचं विहंगम दृश्य या राइडमध्ये दिसतं. अनुभव चिरकाल स्मरणात राहणारा असला तरी ही राइड तशी महागडीच.

याशिवाय वेगाची क्रेझ असणाऱ्यांना गो-कार्टिगची सोयही गोव्यात आहे. पणजी-मडगांव रस्त्यावर नुवेम इथे हा ‘गो कार्टिग’चा ट्रॅक उभारण्यात आला आहे.

समुद्रकिनाऱ्यापलीकडचा गोवा

गोवा म्हणजे बीचेस असं समीकरण असलं, तरीही केवळ समुद्रकिनाऱ्यांखेरीज गोव्यात बघण्यासारखं पुष्कळ आहे. काही तरी नवं, वेगळा अनुभव हवा असणाऱ्या पर्यटकांसाठी गोव्याच्या आतल्या भागात खजानाच आहे. पाहुणचार हा गोवन मंडळींच्या रक्तातच असावा, कारण गोव्यातल्या छोटय़ा खेडय़ातही पर्यटकांची व्यवस्थित सोय होऊ  शकते. पश्चिम घाटाचं सौंदर्य गोव्याच्या आतल्या भागात खुलून येतं. हिरवा निसर्ग, लाल माती आणि त्यातून वर दिसणारी देवळांची शिखरं हे पाहण्यासाठी गोव्याच्या अंतर्गत भागात जायला हवं. अर्थातच इथेच तुम्हाला ‘ऑथेंटिक गोवन फूड’देखील चाखता येईल. याशिवाय पोर्तुगीज अमलाखालच्या गोव्यात जुने किल्ले स्थापत्यशास्त्राचे आणि युद्धनीतीचे पुरावे देणारे आहेत, ते बघण्यासारखे. गोव्यातली मंदिरं, चर्च हेदेखील स्थापत्य सौंदर्यात रस असणाऱ्यांसाठी आवर्जून पाहण्यासारखे आहेत.

गोव्यात हनिमूनसाठी जाणाऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू म्हणजे इथे तुम्हाला हवं त्या ठिकाणी आपलं आपण हिंडता येतं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहेच, पण सेल्फ ड्रिव्हन कार आणि बाइक भाडय़ाने मिळत असल्याने फिरण्याचं स्वातंत्र्य अनुभवता येतं. साधारण दिवसाला ३०० रुपयांपासून बाइक रेण्टचे दर सुरू होतात. कारसाठी दिवसाला १५०० च्या आसपास लागतात. पणजी आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर ही रेण्टेड बाइक आणि कारची सुविधा उपलब्ध असते.

गोव्याचे ‘यूएसपी’

निवांत किनारे, मोकळा निसर्ग, तुलनेने निर्धोक आणि सुरक्षित वातावरण, मुक्त संस्कृती, रास्त दरात सेल्फ ड्रिव्हन कार आणि दुचाक्यांची सोय.

केव्हा जाल : वर्षभरात केव्हाही जाण्यास हरकत नाही, पण अतिपावसाळा आणि अतिउन्हाळा टाळावा. वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध फेस्टिव्हलची माहिती गोवा पर्यटन मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
कसे जाल : रेल्वे-रस्ता-विमान अशा सर्व मार्गानी देशातून कुठूनही पोहोचता येते.
सुनील जोशी – response.lokprabha@expressindia.com