ऐतिहासिक, धार्मिक आणि त्याच वेळी तरल प्रेमकहाणीची किनार लाभलेलं मध्य भारतातलं मांडू हनिमूनर्ससाठी सर्वागसुंदर ठिकाण म्हणावं लागेल.

मांडू ऊर्फ मांडवगड या भारतातल्या सर्वात मोठय़ा किल्ल्याला ऐतिहासिक, धार्मिक पाश्र्वभूमी आहे. तसंच बाझबहाद्दूर आणि राणी रूपमतीच्या प्रेमाची एक सोनेरी किनारही याला लाभलेली आहे.   रूपमती महाल, रेवाकुंड, जहाज महाल, अश्रफ़ी महाल अशा एकाहून एक सुंदर, ऐतिहासिक आणि प्रेमाचेदेखील प्रतीक असणाऱ्या वास्तूच्या सान्निध्यात चार दिवसांची रम्य भटकंती नक्कीच आनंददायी ठरू शकते.

मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यत येणारा हा किल्ला दोन हजार फूट उंचीवर वसलेला आहे. दक्षिणेला असलेलं नर्मदेचं खोरं आणि उत्तरेला असलेल्या काकराकोह या दरीमुळे हा किल्ला माळव्यातील डोंगररांगेपासून वेगळा झालेला आहे. यामुळे किल्ल्याला नसíगक तटबंदी लाभलेली आहे. याच कारणामुळे या ठिकाणी अनेक राजसत्ता नांदल्या आणि उत्तरोत्तर या गावाचा राजधानीचे शहर असा प्रवास होत गेला.

आज मांडू एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असले तरी या गावाचे धागेदोरे थेट इसवीसनपूर्व सहाव्या शतकापर्यंत जातात. इथे मिळालेल्या पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेखात सहाव्या शतकातील या गावाचा उल्लेख आहे. अकराव्या शतकात इथे परमारांची सत्ता होती. त्या वेळी या ठिकाणाचा उल्लेख मांडवगड या नावाने केलेला आढळतो. १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने मांडवगड जिंकून त्याचं नाव शबिदाबाद ठेवलं. चौदाव्या शतकात दिल्लीची सत्ता तिमुरच्या हाती गेल्यावर माळव्याचा सुभेदार दिलावर खान याने मांडव्याची सत्ता ताब्यात घेतली. या घौरी घराण्याच्या काळात मांडव्याची राजधानी धार येथून मांडूला हलवण्यात आली. घौरी घराण्याच्या अस्तानंतर सत्ता खिलजी घराण्याच्या ताब्यात गेली. या घराण्यातील घियासुद्दीन याने ३१ र्वष सत्ता उपभोगली. संगीत आणि कलेच्या रसिक असलेल्या या सुलतानाच्या काळात बांधल्या गेलेल्या जहाज महाल, िहदोळा महाल इत्यादी अनेक वास्तू आज मांडूचं आकर्षण ठरलेल्या आहेत.

मांडू नीटपणे पाहायचे असेल तर किमान दोन ते तीन दिवस येथे राहावे लागेल. मांडूमधील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जहाज महाल आणि रूपमती महाल. यापकी एक उत्तर टोकाला आहे तर दुसरं दक्षिण टोकाला. त्यामुळे पहिल्या दिवशी सकाळी होशंगशहाचा टोंब, जामी मशीद, अश्रफ़ी महाल पाहून घ्यावा. दुपारनंतर बाझ बहाद्दूरचा राजवाडा, रेवाकुंड आणि रूपमतीचा महाल पाहावा. तर दुसऱ्या दिवशी निळकंठ मंदिर, महाल, जहाज महाल आणि िहदोळा महाल पाहावा.

होशंगशहाचा मकबरा (टोंब) ही ताजमहालापूर्वी संगमरवरात केलेली अजोड कलाकृती आहे.

ताजमहाल बांधण्यापूर्वी हुमायूने उस्ताद हमीद याला या वास्तूचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. होशंगशहाने हा मकबरा बांधायला सुरुवात केली पण तो १४४० मध्ये खिलजीच्या कारकीर्दीत पूर्ण झाला. मकबऱ्याच्या मुख्य घुमटाच्या बाजूला चार छोटे मिनार आहेत. कमानदार प्रवेशद्वारातून मकबऱ्यात प्रवेश केल्यावर आत राजघराण्यातल्या लोकांच्या कबरी पाहायला मिळतात. मकबऱ्यात हवा आणि प्रकाश येण्यासाठी ज्या खिडक्या आहेत त्यावरील संगमरवरी जाळीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आत-बाहेर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मकबऱ्याचा घुमट, बाजूचे चार मिनार, नक्षीकाम आपल्याला ताजमहालाची आठवण करून देतात.

होशंगशहाच्या मकबऱ्याजवळ जामी मशीद आहे. दमास्कसमधल्या मशिदीपासून प्रेरणा घेऊन या मशिदीची निर्मिती करण्यात आली आहे. मशिदीचा प्रार्थना कक्ष भव्य असून तो मुख्य घुमटाखाली आहे. त्याच्या बाजूला अनेक छोटे छोटे घुमट आहेत. मशिदीला कमानदार ओवऱ्या आहेत.

जामी मशिदीजवळ अश्रफ़ी महाल आहे. या महालात जाण्यासाठी उंच पायऱ्या आहेत. इथे अशी दंतकथा सांगितली जाते की, सुलतानाच्या बेगमा पौष्टिक आहार आणि आरामदायी दिनचय्रेमुळे स्थूल झाल्या होत्या. त्यांना परत सुडौल करण्यासाठी सुलतान या महालांच्या पायऱ्यांवर सोन्याची नाणी (अश्रफ़ी) ठेवत असे आणि जास्तीत जास्त नाणी गोळा करण्यास बेगमांना प्रवृत्त करत असे.

या वास्तूच्या बाजूला महम्मद शाह खिलजी याने १४४० मध्ये राणा कुंभाचा पराभव केल्याच्या निमित्त सात मजली मनोरा बांधला होता. त्या काळी ती मध्य भारतातील सर्वात मोठी इमारत होती असे म्हणतात. दुर्दैवाने या वास्तूचा आज एकच मजला अस्तित्वात आहे. या महालाच्या जवळच पुरातन राम मंदिर आहे. सकाळच्या सत्रात ही ठिकाणं पाहून

दुपारी बाझ बहाद्दूरच्या महालात जावे. हा सुंदर महाल रूपमती महालापासून खालच्या बाजूस दोन किलोमीटरवर आहे. या महालात कमानदार खोल्या आहेत. महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत. त्यापकी घुमटात बसल्यावर रूपमती महालातली राणी रूपमतीच्या दालनातील खिडकी दिसते. या महालात एक खासगी तरण तलाव आहे. बाझ बहाद्दूरच्या महालाकडून राणी रूपमतीच्या महालाकडे येताना वाटेत नर्मदा कुंड लागते. नर्मदाभक्त राणी रूपमतीसाठी बाझ बहाद्दूरने हा तलाव बनवून घेतला. नर्मदा परिक्रमेतही या तलावाला महत्त्व आहे.

बाझ बहाद्दूर आणि राणी रूपमतीची तरल प्रेमकहाणी मांडू किल्ल्याच्या साक्षीने फुलली आणि तिचा अंतही याच किल्ल्यात झाला.  मांडूचा राजा बाझ बहाद्दूर एकदा शिकारीसाठी नर्मदेकाठी जंगलात गेला असताना त्याला स्वर्गीय आवाजातील गाणं ऐकू आलं. कविमनाच्या राजा आवाजाचा वेध घेत गेला असता त्याला रूपमती दर्शन झालं. तिच्या रूपाने आणि आवाजाने घायाळ झालेल्या राजाने इतर राजांसारखं अपहरण न करता तिला लग्नाची मागणी घातली आणि तिला मांडूला चलण्याची विनंती केली. रूपमतीने राजाला आपली अडचण सांगितली की, ती रोज नर्मदेचं दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. राजाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडु गडाच्या दक्षिण टोकावर रूपमती महालाची आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी रेवाकुंडाची निर्मिती केली.

रूपमती महालाच्या अगोदर त्या ठिकाणी टेहळणी करणाऱ्या सनिकांसाठी वास्तू बांधलेली होती. त्यावर दोन मजली रूपमती महाल बांधण्यात आला. या महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत, त्याच्या कमानदार सज्जातून दूरवरचा प्रदेश दिसतो. येथूनच राणी रूपमती नर्मदेचं दर्शन घेत असे. राणी रूपमती चांगली कवयित्री होती, गायिका होती तर राजा बाझ बहाद्दूर चांगला वादक संगीतकार होता. संगीताच्या साथीने दोघांचं प्रेम बहरलं, पण त्याच वेळी त्याचं राज्याकडे दुर्लक्ष झालं. याचा फायदा मोगलांनी घेतला. अकबरापर्यंत राणी रूपमतीच्या सौंदर्याची वार्ता पोहोचली होती. त्याने आपला सावत्र भाऊ आदम खानाला माळव्यावर हल्ला करण्यास सांगितले. १५६१ मध्ये आदम खान माळव्यात पोहोचला. हे वृत्त कळताच बाझ बहाद्दूर छोटय़ा फौजेनिशी मोगलांच्या अफाट सन्याला सामोरा गेला. त्याचा दारुण पराभव झाला आणि रणांगणातून पळून गेला. आदम खानाने मांडूवर कब्जा केला. हे वृत्त कळताच राणी रूपमतीने विष प्राशन केलं. एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.

बाझ बहाद्दूरने परत काही काळ मांडूचा ताबा घेतला, पण नंतर तो अकबराला शरण आला आणि त्याचा मनसबदार झाला. बाझ बहाद्दूर आणि राणी रूपमतीची ही प्रेमकहाणी आजही स्थानिक लोकगीतांतून ऐकायला मिळते. रूपमती महालातून सूर्यास्त पाहताना ही प्रेमकहाणी आणखीनच गहिरी होत जाते.

दुसऱ्या दिवशी निळकंठ मंदिर आणि त्याच्या बाजूचा निळकंठ महाल पाहावा. मोगलांच्या काळात अकबराच्या िहदू पत्नीसाठी हा महाल बांधला गेला होता. त्यानंतर सराई पाहावी. मांडू त्या काळी राजधानीचे शहर असल्यामुळे तेथे व्यापारी लोकांची मोठय़ा प्रमाणात ये-जा असे. त्यासाठी येथे मोठी सराई बांधण्यात आली. चार बाजूला खोल्या व मध्ये जनावरे ठेवण्यासाठी मोठे पटांगण अशी याची रचना आहे.

सराई बघून जहाज महाल गाठावा. मुंज तलाव आणि कापूर तलाव या दोन कृत्रिम (मानव निर्मित) तलावांची निर्मिती करून त्याच्या काठावर आपल्या राण्यांसाठी स्वप्नवत असा जहाज महाल बनवला. १२० फूट लांब आणि दोन मजले उंच असलेल्या या महालाला अनेक सज्जे, दालनं आहेत. इमारतीबाहेर डोकावणाऱ्या सज्ज्यांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तिन्ही बाजूला पाणी दिसावे आणि आपण पाण्यावर उभे आहोत असा भास व्हावा. या तलावातील पाणी नळांद्वारे महालांच्या िभतींमधून फिरवलेले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हे महाल थंड राहात.

महालाच्या प्रवेशद्वाराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की हत्तीवरील अंबारीसकट राणी महालात प्रवेश करू शकत असे आणि तिची उतरण्याच्या जागेची उंची अशा प्रकारे ठेवलेली आहे की अंबारीतून कुठलेही कष्ट न घेता ती पायउतार होऊ शकेल. राण्यांचे एवढे लाड केल्यावर त्या लठ्ठ होणे सहाजिकच आहे. त्यावरूनच अश्रफ़ी महालाच्या दंतकथेचा जन्म कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून झाला असावा.

जहाज महालाच्या परिसरात सुंदर बाग बनवलेली आहे. जहाज महालात येणारे पाणी शुद्ध होऊन यावे म्हणून पाणी आणणाऱ्या पन्हाळींच्या मार्गात चक्राकार रचना पाहायला मिळतात. या रचनेमुळे पाण्याबरोबर येणारा काडीकचरा यात अडकून शुद्ध पाणी तरण तलावात पडत असे. या महालात एक कासवाच्या आकाराचा तलाव आहे. जहाज महालाजवळ िहदोळा महाल आहे. त्याच्या बाहेरच्या भिंतींना दिलेल्या तिरक्या आकारामुळे याला िहदोळा महाल नाव दिले गेले. हा रंगमहाल असून यात संगीत-नृत्याचे कार्यक्रम होत असत. याशिवाय या परिसरात अनेक वास्तू आहेत.

मांडू परिसरात फिरताना आपल्याला जागोजागी गोरखचिंचेची मोठमोठी झाडं दिसतात. प्रचंड मोठा बुंधा आणि वर विरळ पान असलेलं फांद्यांचे फराटे अशी या झाडाची रचना असते. कमंडलूसारखी दिसणारी त्याची फळही तिथे स्थानिक लोक विकताना दिसतात, पोर्तुगिजांनी (मादागास्कर) अफ्रिकेतून भारतात आणलेलं हे झाड मांडू परिसरात दिसतं.

इंदूरहून किंवा धारमाग्रे येताना मांडू गावाच्या आधी छोटा घाट लागतो. मांडूमध्ये मध्यप्रदेश पर्यटन विभागाची दोन ठिकाणी कॉटेजेस् आहेत. त्यातील माळवा र्रिटीट हे दरीच्या टोकाला आहे. इथून माळव्याचा दूरवरचा प्रदेश सुंदर दिसतो. तर दुसरं कॉटेज तलावाच्या किनारी आहे. दोन्ही ठिकाणी निसर्गाचा वेगवेगळा, पण सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. याशिवाय मांडूमध्ये अनेक खाजगी हॉटेल्स आहेत.

मांडु किल्ला तेथील निसर्ग आणि वास्तुवैभव पाहण्यात दोनतीन दिवस पटकन संपून जातात. मांडूसोबत उजैन, इंदूर, धार, मांडू, महेश्वर आणि ओंकारेश्वर पाहाता येईल.

केव्हा जाल : मार्च ते मे सोडून वर्षभरात केव्हाही.कसे जाल : इंदोर ते मांडू रस्तामार्गे. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader