भूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी दहा ठिकाणे
एखाद्या पर्यटन स्थळामध्ये अनेक वेगवेगळ्या खुबी दडलेल्या असतात. लडाखचंदेखील असंच काहीसं आहे. साधारण २००० पासून लडाख पर्यटनाच्या नकाशावर चमकू लागलं. पर्यटकांची गर्दी वाढू लागली. पण हिवाळ्यातला लडाख पाहणारे तसे कमीच होते. हिवाळ्यात येथे गर्दी असायची मुख्यत: चद्दर ट्रेकसाठी. गोठलेल्या
झंस्कार नदीवरून केला जाणारा ट्रेक भटक्यांच्या विश्वात चांगलाच लोकप्रिय होता. लडाखचा हिवाळा हा साहसी खेळांसाठीच अशी धारणा त्यातून तयार झाली. त्यातही विशेषत: परदेशी ट्रेकर्स आवर्जून येथे यायचे. आल्पसच्या पायथ्याहून येणाऱ्या भटक्यांनी लडाखचा हिवाळा पाहिला आणि त्यांना एक वेगळीच कल्पना सुचली. आईस हॉकी खेळायची. त्यांच्याकडे आईस हॉकी हा अगदी नियमित खेळ होता. पण लडाखसाठी सारं काही नवं होतं.
त्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून आइस हॉकी खेळायची परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारे विशिष्ट मैदान तयार केले. जेथे हॉकी खेळायची तेथे पाणी ओतायचे, ते गोठले की यंत्राच्या सहाय्याने ते समपातळीत करायचे. आइस हॉकीचे विशिष्ट शूज (ब्लेड रिंग लावलेले) आणि इतर साधनसामग्री जमा केली. आणि युरोपियनांनी लडाखच्या बर्फात हॉकी रुजवायला सुरुवात केली. लडाखी लोकांसाठी हा खेळ नवीन होता. पण बर्फ रोजचाच होता. लडाखी लोकांनी बर्फाच्या उपजत सवयीतून हा खेळ शिकून घेतला. त्यात प्रावीण्य मिळवलं. आइस हॉकी खेळण्याचा एक नवा ट्रेण्ड लडाखमध्ये मूळ धरूलागला. इतका की त्यांनी त्यांची एक स्वतंत्र टीमच तयार झाली. आणि गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी जानेवारीत आइस हॉकीच्या जागतिक स्तरावरच्या टूर्नामेंट्स लडाखमध्ये खेळल्या जाऊ लागल्या. त्यात लडाखची टीम तर असतेच, पण जगभरातून अनेक टीम्स येत असतात. विशेष म्हणजे मागच्याच वर्षी लडाखच्या टीमने सर्वाना हरवून विजेतेपददेखील मिळवले.
केवळ आइस हॉकी पाहायला किती पर्यटक येतात वगैरे आकडेवारीत सांगणे कठीण आहे. पण हिवाळी पर्यटनाला मात्र नक्कीच उठाव मिळाला आहे. हिवाळ्यातल्या चार महिन्यात केवळ बर्फ असणाऱ्या या प्रदेशाकडे फारसे न वळणारे पर्यटक या मोसमातदेखील येथे येऊ लागले. पूर्ण पानझड झालेल्या लडाखमध्येदेखील एक वेगळे सौंदर्य आहे अनेकांच्या लक्षात येऊ लागल आहे. थेट खुल्या मैदानात सुरू असणाऱ्या आइस हॉकीचा आनंद घेऊ लागले आहे. स्थानिक मुलांनादेखील या हॉकीचं इतकं वेड लागलंय की आपल्याकडे जसे गल्लीबोळात क्रिकेट खेळले जाते, तसेच येथे आइस हॉकी चालते. उणे पाच ते पंचवीस तापमानातील चद्दर ट्रेक, स्नो लेपर्ड ट्रेल अशा पर्यटनलादेखील चालना मिळाली आहे. लडाखमधील हॉटेल्स व इतर पर्यटन सुविधादेखील आता हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीने विचार करु लागल्या आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये मध्यवर्ती हिटरव्यवस्था, गाडय़ांमध्ये हिटरची सोय, अशा गोष्टी येथे हल्ली होताना दिसतात.
केव्हा जाल : आइस हॉकी आणि इतर हिवाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, फ्रोजन लडाख पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा उत्तम काळ. इतर उपक्रमांसाठी योग्य काळ – जून ते सप्टेंबर
कसे जाल : मुंबई-लेह थेट विमानाने. (हिवाळ्यात श्रीनगर आणि मनालीकडून येणारे रस्ते बंद असतात.)
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com