19-lp-paryatan-sthalभूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वर्षे लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी  दहा ठिकाणे

सृष्टीचक्रात ज्या असंख्य घडामोडी होत असतात त्यातून कित्येक वेळा काही अद्भुत गोष्टी घडतात. असंच अद्भुत घडलंय ते न्यूझीलंडच्या उत्तरेला वायटोमा केव्हज्मध्ये. मावोरी ही या भागातील स्थानिक भाषा. वाय म्हणजे पाणी आणि टोमो म्हणजे सिंक होल. जमिनीखाली असलेल्या गुहांमधील पाणी आणि वैशिष्टय़पूर्ण अशा लाइम स्टोनच्या वर्षांनुवर्षांच्या प्रक्रियेतून वायटोमा केव्हज् चमकत असतात. लाइमस्टोनमध्ये असणाऱ्या ग्लोइंग वर्ममुळे ही जागा ग्लोइंग केव्हज म्हणून ओळखली जाते.

१८८९ मध्ये टेन टिनोरु आणि त्याची पत्नी घुटी यांनी या गुहांचा शोध घेतला. पर्यटकांना तिकडे घेऊन जायला सुरुवात केली. एकंदरीतच या जागेचे भौगोलिक महत्त्व पाहिल्यावर न्यूझीलंड सरकारने १९०६ मध्ये त्या स्वत:च्या ताब्यात घेतल्या. संरक्षित केल्या, संवर्धित केल्या आणि पर्यटनाला चालना दिली.

या गुहांमध्ये जाण्यासाठी खास होडय़ांची व्यवस्था केलेली असते. ठरावीक अंतर आतमध्ये गेला की सर्व लाइटस बंद केले जातात. आणि आपल्या तीनही बाजूंनी असंख्य काजवे चकाकू लागतात. एका वेगळ्या जगात असल्याचा आनंद देणारं एक निसर्गाचं अद्भुत आपण स्तिमित होऊन पाहत राहतो. ते सारं दृश्य केवळ अवर्णनीय असेच म्हणावे लागेल. ‘शंभर टक्के शुद्ध’ ही न्यूझीलंडच्या पर्यटनाची टॅगलाइन सार्थ ठरवणारं असे हे ठिकाण आहे.

अर्थातच तेथील शासनाने पर्यटन विकासासाठी मोठय़ा खुबीने गुहांचा वापर केला आहे. या गुहांतील गूढ अशा अंतर्गत रचनेचा वापर करून येथे साहसी पर्यटनाच्या काही सुविधा तयार केल्या आहेत. छताला असलेल्या दोराला लटकतदेखील या गुहेतील प्रवास तुम्ही करू शकता. थेट काजव्यांच्या बाजूने होणारा हा प्रवास अत्यंत रोमांचक असाच म्हणावा लागेल. तसेच पाण्यावरील इतर साहसी पर्यटनाच्या सुविधा येथे आहेत. गुहेच्या आत कॅमेरा फ्लॅश वापरायची परवानगी नाही. तुमची होडीदेखील एका विशिष्ट दोराला बांधलेली असते. त्यामुळे तुम्ही उगाच भरकटत नाही.

वायटोमा केव्हजपासून जवळच पुईया हे गावदेखील असेच निसर्गाच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या संपूर्ण गावात गरम पाण्याचे फवारेच्या फवारे उसळत असतात. ते अद्भुत पाहण्यासाठी पुईयाला नक्कीच जावे.

न्यूझीलंडचे आपल्यापासूनचे अंतर आणि त्यामुळे होणारा विमान प्रवासाचा खर्च पाहता, केवळ यासाठीच येथे येणे परवडत नाही. आठदहा दिवसांची न्यूझीलंडची टूर करावी. दक्षिण न्यूझीलंडमध्ये तर आणखीनच धम्माल ठिकाणं पाहायला मिळतात. क्विन्स टाऊन या ठिकाणी मुक्काम करून अनेक ठिकाणांना जाणे शक्य आहे. क्विन्स टाऊन जवळच काही ग्लेशिअर्स आहेत. आपल्याकडच्या हिमालयीन ग्लेशिअर्सच्या तुलनेत अगदीच छोटी. पण या ग्लेशिअर्ससाठी हेलिकॉप्टर्स टूर असते. चाळीस ते पन्नास हेलिकॉप्टर दिवसभरात या ग्लेशिअर्सवर उतरतात. क्विन्स टाऊन ते मिडफर्ड साउंड हा प्रवास जरूर करावा. तीनही बाजूंनी मोठय़ा काचा असणाऱ्या आणि खुच्र्याची उतरती रचना असणाऱ्या बसने १८० अंशातील नजारा पाहत होणारा प्रवास हा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे.

केव्हा जाल : आपला उन्हाळा हा त्यांचा हिवाळा आणि आपला हिवाळा त्यांचा उन्हाळा असतो. त्यामुळे ऑक्टोबर ते एप्रिल हा येथे जाण्यासाठीचा योग्य कालवधी आहे.
कसे जाल : थेट विमानसेवा
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader