आयुष्यात एकदा तरी युरोप बघायचा आहे, असं स्वप्न अनेकजण बघत असतात. त्यासाठी आपापल्या परीने सगळेच प्रयत्नही करतात. मनमोहक युरोपचा अविस्मरणीय अनुभव युरोपचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठीच खूप जवळचा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयुष्यात कधी ना कधीतरी युरोप बघणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी लोक कितीतरी आधीपासून तयारी करतात. पैसे साठवतात आणि युरोपची वारी करुन येतात. वेगवेगळे अतिशय सुंदर, निसर्गसंपन्न देश, तिथले देखणे लोक, तिथल्या प्राचीन संस्कृतीच्या खुणा, तिथल्या भव्यदिव्य ऐतिहासिक वास्तू, तिथलं हवामान, तिथल्या नागरी व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणा हे सगळं बघून, अनुभवून भारावून जातात. खुपदा युरोप टूर केली जाते ती एखाद्या ट्रॅव्हल कंपनीसोबत. पन्नास जणांच्या गटाबरोबर. देखणा युरोप त्यामुळे भोज्जाला हात लावल्यासारखा बघितला जातो. हे सगळं टाळून आम्हाला युरोप बघायचा, अनुभवायचा होता. म्हणून आम्ही सर्व काही नियोजन आमच्याच पातळीवर केलं आणि कोणत्याही प्रवासी कंपनीच्या मदतीशिवाय युरोप बघितला आणि याचि देही युरोप बघितल्याचा अनुभव घेऊन परत आलो.

जर्मनी – म्युनिक सिटी टुर..

युरोपला जाण्यासाठी मुंबईहून साडेआठ तासांचा विमान प्रवास करून सकाळी सहाच्या सुमारास आम्ही म्युनिकला पोहोचलो. हॉटेलमध्ये चेकइन करून सिटी टुरसाठी म्युनिक रेल्वे स्टेशनसमोर जाऊन बस पकडली. आमची बस झोकदार वळणे घेत म्युनिकमधले सुंदर रस्ते, सुंदर इमारती आणि सुंदर युवती दाखवत फिरू लागली.

सर्वप्रथम त्यांनी आम्हाला  बिअरच्या कारखान्यात बिअर कशी तयार केली जाते ते दाखविण्यासाठी नेले. तिथली बिअरची मोठमोठाली प्रोसेसिंग युनिट पाहून झाल्यावर आम्हाला बिअर चाखायला देण्यात आली.

सिटी टुरच्या बसच्या वरच्या डेकवर बसून आम्ही काटकोन- चौकोनातले रस्ते पाहिले, पिवळ्याजर्द पानांची झाडे पाहिली, म्युनिक शहरातून सळसळत वाहणाऱ्या नदीत, चौका-चौकातल्या एका ओळीने मांडून ठेवलेल्या ऐतिहासिक इमारतीत डोकावण्याचा प्रयत्न केला, चौकातल्या लुडविगचे म्हणजेच राजाचे शिल्प डोळ्यात साठवले, युनिव्हर्सिटी, तसेच तिथला फिल्म कॅसिनो पाहिला.

दुसरा दिवस तब्बल साडेदहा तासांच्या टुरचा होता. बस शहराबाहेर पडून हमरस्त्याला लागली. नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडे हिरवे-हिरवे लॉन्स होते. विनाखड्डय़ाचा सुंदर रस्ता पाहून मन हरखून जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आखीव-रेखीव सायकल ट्रॅकही. रस्त्याच्या दुतर्फा डोंगरही हिरव्या नवलाईने नटले होते. जणू सारे जर्मनी हिरव्या रंगाची शाल लपेटून शांत पहुडले होते. दोन तासांनी रॉयल कॅसल (किल्ला) बघायला पोहोचलो.

कॅसलची पांढरी शुभ्र इमारत त्या हिरवाईवर अगदी उठून दिसत होती. या हॉलमध्ये लाल रंगाच्या संगमरवरी खांबावर सुंदर व कलात्मक रीतीने वेलबुट्टी चितारण्यात आलेली आहे. समोरच्या वेस्ट गोबोलिन रूममध्ये एक सुंदर कलाकृतीचा मोर दृष्टीस पडला त्याच्याच बाजूला बठकीचे आसन. या खोलीला म्यूझिक रूम असेही म्हटले जाते. याच रूममध्ये पियानो आणि हार्मोनियम एकत्र असलेले एकोणिसाव्या शतकातील वाद्य ठेवण्यात आलेले आहे. ही संपूर्ण खोली विविध सोनेरी कलाकृतींनी नटलेली असून सीलिंगवरही अनेक सुंदर चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. तसेच पुढे जात आम्ही ऑडियन्स चेंबरमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी राजाचे लिहिण्याचे टेबल ठेवलेले असून वर मेणबत्त्यांकरिता झुंबर. भितींवर तसेच दरवाजावर अनेक पेंटिंग्ज असून अत्यंत सुंदर अशा कलाकृतींनी युक्त अशी या खोलीची रचना आहे. हे सारे पाहताना जर्मनीमधल्या कलासक्त राजाची दृष्टी आपणांस दिसून येते. याच कासलमध्ये बेड चेंबर, रोझ चेंबर, डायनिंग रूम, हॉल ऑफ मिरर अशा अनेक सुंदर कलाकृतींनी युक्त अशी दालने आहेत.

पुढचा कार्यक्रम न्युसवानस्टेन कॅसल पाहणे हा होता. घाटाच्या रस्त्याने प्रवास करत पोहोचलो. या कॅसलची बांधणी सन १८६९ ते १८८६ या १७ वर्षांच्या कालावधीत किंग लुडविग-२ याने केल्याचे इतिहास सांगतो. बांधकाम पाच मजली असून रोमन शैलीत स्वान रॉकमध्ये करण्यात आलेले आहे.  डाव्या अंगाच्या पायऱ्या वर चढून गेलो की आपण येतो ते थेट थ्रोन रूममध्ये. इस्तांबुल येथली कलाकुसरही या ठिकाणी दिसून येते. गोल्डन आणि आयव्हरी रंगात सारी कलाकुसर करण्यात आलेली असून या ठिकाणी तळपणारा सूर्य आणि निळ्या रंगाचे तारेही आपले लक्ष वेधून घेतात. याच्याच मध्यभागात एक क्राउन लटकविण्यात आलेला असून त्यावर शहाण्णव मेणबत्त्या लावण्याची सोय केलेली आहे. पश्चिमेकडच्या बाजूला गॅरेट टॉवर असून येथून आल्प्स पर्वतराजींचे विहंगम दर्शन होते. असेच पुढे-पुढे येत आपण डायनिंग रूममध्ये येऊन पोहोचतो. या रूमच्या मध्यभागी अत्यंत सुंदर असे लाकडी कोरीव काम केलेले डायनिंग टेबल ठेवलेले असून त्याची कलात्मकताही आपल्या नजरेत भरते.

पुढे गेल्यावर उजव्या हाताच्या कोऱ्यात एक शाही पलंग दिसतो आणि आपण दिग्मूढ होऊन जातो. त्या पलंगाला असलेले छत, पलंगावरची गादी, सारेच अप्रतिम आणि अद्वितीय. तदनंतर आपण येतो ड्रेसिंग रूममध्ये. कलात्मकरीत्या सजविलेले ड्रेसिंग रूम पाहून डोळ्याचे पारणे फिटते.  पुढे असणाऱ्या स्टडी रुमच्या भिंतीवर अनावृत स्त्रियांची अत्यंत सुंदर अशी भित्तिचित्रे रेखाटण्यात आलेली असून हे स्टडी रूम गॉथिक शैलीत बनवण्यात आलेले आहे. त्यानंतर  सिंगर हॉल. या ठिकाणची कलात्मकतेची श्रीमंती पाहून अनुभवून जेव्हा खाली उतरतो तेव्हा आपण इतक्या लांब आलो, त्याचे चीज झाले, असेच आपणास वाटत राहते.

पुढचा दिवस म्युनिक शहरातील बीएमडब्ल्यू म्यूझियम व ऑलिम्पिक पार्क पाहण्यासाठी राखीव होता. सकाळी आम्ही बीएमडब्ल्यू म्यूझियमला निघालो. प्रवेश करताच समोर बीएमडब्ल्यू गाडय़ांचा ताफाच जणू स्वागताला हजर झाला. जर्मनीमध्ये आल्यापासून बीएम्डब्ल्यूशिवाय इतर कार दिसत नव्हत्याच. अगदी टॅक्सीसुद्धा बीएमडब्ल्यूच. जणू काही आम्ही बीएमडब्ल्यूच्या म्युझियममध्येच उभे होतो. छोटय़ा-मोठय़ा, लाल-पिवळ्या, पांढऱ्या-काळ्या, निळ्या-हिरव्या, सगळ्याच रंगाच्या बीएमडब्ल्यू आमच्या स्वागताला दिमाखात उभ्या होत्या. भारतात अशा म्यूझियमच्या ठिकाणी ती गाडी दुरूनच पाहायची असते. इथे या नव्या कोऱ्या बीएमडब्ल्यू गाडय़ांमध्ये बसून पाहण्याची सोय उपलब्ध होती. वरच्या मजल्यावर तर बीएमडब्ल्यू मोटारसायकलींचे दालन होते. अनेक आकाराच्या, प्रकाराच्या, रंगाच्या, ज्या फक्त परदेशी सिनेमातच दिसायच्या त्या इथे आम्ही प्रत्यक्षात पाहात होतो.

पुढचा टप्पा ऑलिम्पिक पार्कचा. प्रचंड उंचीचे टॉवर पाहून स्तंभित व्हायला होते. आत शिरताच उजव्या बाजुने समोरच्या तलावाच्या कडेकडेने पुढे निघालो तर पायाखाली असलेल्या लाद्यांवर काही हातांचे ठसे व हस्ताक्षरे दिसली. कुतूहल म्हणून पाहिले तर ते हातांचे ठसे व हस्ताक्षरे आलिम्पिक विजेत्यांची असल्याचे दिसून आले. विस्तीर्ण ऑलिम्पिक गार्डन पाहून मन समाधान पावले.

डखाउ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प

या टूरला निघण्याअगोदर नेटवर सìफग केले होते. तेव्हा डखाऊ कॅम्पबद्दल वाचलं होतं. डखाउ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मानवजातीवर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करण्यात आले, रशियाच्या युद्धकैद्यांचे शिरकाण करण्यात आले, ज्यू कैद्यांचे कपडे उतरवून जबरदस्तीने त्यांना गॅस चेंबरमध्ये लोटण्यात आले, हिटलरने त्या काळात म्हणजे सन १९३३ ते १९४५ या बारा वर्षांच्या काळात या छळछावणीत ३० देशांच्या सुमारे दोन लाखांवर कैद्यांना यमसदनी धाडले.

एप्रिल १९४५ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपायच्या सुमारास अमेरिकेचे सन्य म्युनिकच्या डखाऊ या छोटय़ा उपनगरात आले आणि त्यांनी या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला भेट देऊन तिथली छायाचित्रे प्रसारित केली तेव्हा, साऱ्या जगाला प्रचंड धक्का बसला. इतके भीषण क्रौर्य जगाने कधीच पाहिले नव्हते. म्युनिकमधल्या कित्येक इमारतींतून आजही त्या ऐतिहासिक क्रौर्याच्या काळ्याकुट्ट आठवणी दडलेल्या आहेत.

म्युनिकमधून सकाळी आमची टॅक्सी शहराबाहेर पडली. थोडय़ाच वेळात कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या जागेत पोहोचलो. जाण्याच्या मार्गावर स्मृतिस्तंभ स्वरूपात माहिती लावण्यात आलेली होती. ती पाहात पाहात आम्ही त्या कॅम्पमध्ये प्रवेश केला. या आंतरराष्ट्रीय स्मारकातील काळ्याकुट्ट लोखंडी मानवी सांगाडय़ांनी आमचे लक्ष वेधले. तसेच पुढे कॅम्प रोडने पुढे जाताना मध्यभागी नळकांडय़ासारखे उंच असलेल्या कॅथलिक मॉर्टल एगोनी ऑफ ख्रिस्ट चॅपेलने आमचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या डाव्या बाजूला प्रोटेस्टन्ट चर्च व उजव्या बाजूला ज्यू मेमोरिअल पाहून आम्ही डाव्या हाताला असलेले एक छोटे कॅनल ओलांडून ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्यूंचे शिरकाण केले गेले त्या ठिकाणच्या इमारतीत येताच आमच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यात होते, ज्यू कैद्यांना दाटीवाटीने ठेवण्यासाठी लाकडी फळ्यांचे एकावर एक असे अनेक रॅक्स, कैद्यांना कोंडून मारण्यासाठी गॅस चेंबर, आणि असे अर्धवट मृत तसेच मृत कैदी त्या इमारतील धगधगत्या भट्टय़ांमध्ये एका लोखंडी स्ट्रेचरवर लादून जाळण्याची शिस्तबद्ध व्यवस्थाही त्या ठिकाणी केलेली होती.

इन्सब्रुक सिटी सेंटर

म्युनिकवरून युरेलने दोन तासांत आम्ही इन्सब्रुकला पोहोचलो. दुपारी दोन वाजता आमची बस इन्सब्रुकवरून सुटणार होती. दहाच्या सुमारास हॉटेलसमोरच्या टुरिस्ट इन्फॉम्रेशन सेंटरमधून स्वरोस्की क्रिस्टॉलवेल्टन (Swarovksi Kristalwelten) पाहण्यासाठी बसचे तिकीट घेतले. वेळ शिल्लक असल्याने तिथेच असलेले ‘गोल्डन डॅचेल म्युझियम’ पाहण्यासाठी निघालो.

म्युझियम प्रवेशाचे तिकीट व सोबत एक हॅण्डसेट व इयर फोन मिळाले. ज्यातून आम्हाला म्युझियममध्ये प्रत्येक दालनातून जाताना तिथल्या शिल्पांची व चित्रांची माहिती मिळत होती.

नंतर तेथून जवळच असलेल्या ‘डोम सेंट जेकब कॅथ्रेडेल’मध्ये आलो. पुरातन अशा या कॅथ्रेडेलचे बांधकाम दगडी असून त्याला प्रचंड मोठे असे तीन लाकडी दरवाजे आहेत. उजवीकडच्या दरवाजातून आत शिरतो तेव्हा समोरच लाल रंगाच्या मध्यभागी क्रॉसचे चिन्ह आपले लक्ष वेधून घेते. त्याच्यावरच मदरमेरी व त्यावरच एक अतिभव्य डोम असून मध्यभागी असलेल्या डोमवर मात्र एक सुंदर कलाकृती चित्रित करण्यात आलेली आहे. त्यात वेगवेगळे प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत. ते पाहून पावणेदोनच्या आसपास तेथून बाहेर पडलो. सव्वादोन वाजता आमची बस आली. चित्रातल्याप्रमाणे सुंदर व स्वच्छ असलेल्या रस्त्यावरून आमची बस धावत होती. पंधरा मिनिटांतच आमची बस उजवीकडे वळली आणि हिरव्यागार टेकडीचा वापर करून एक मनुष्याचा बनविलेला चेहरा आणि त्याच्या मुखातून वॉटरफॉलप्रमाणे पडत असलेले पाणी पाहून, जगप्रसिद्ध स्वरावक्सी पार्कजवळ आम्ही पोहोचल्याची आम्हाला खात्री पटली.

डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेले होते ‘येस टू ऑल’ आणि समोरच्या टेकडीतल्या मानवी चेहऱ्याच्या खालून आत शिरत तेथे असलेल्या एन्ट्रन्स स्लॉटमध्ये तिकीट टाकून आम्ही आत प्रवेश केला. समोरच क्रिस्टलने मढविलेल्या एका काळ्या घोडय़ाने आमचे स्वागत केले तिथून दुसऱ्या दालनात आलो तो पांढऱ्याशुभ्र रंगाची एक स्त्रीची व एक पुरुषाची मानवी आकृती आम्हाला अधांतरी दिसली, त्या दालनात प्रवेश करताच अनेक भागांनी बनविलेल्या त्या मानवी आकृतीचे नर्तन सुरू झाले आणि शेवटी त्या मानवी आकृतीचे सर्व भाग वेगवेगळे झाले. दुसऱ्या दालनात येताच तेथे एक मोठा क्रिस्टलयुक्त पृथ्वीचा गोल निर्माण केलेला होता, त्यात शिरल्यानंतर आम्हाला आमच्याच हजारो प्रतिमा दिसू सागल्या. डोळे दिपवणाऱ्या कृती-प्रतिकृती पाहत, शेवटी आपण येतो ते स्वरावक्सी शॉपीमध्ये. ज्या ठिकाणी आपणांस स्वरावक्सीचे दागिने विकत घेण्याची सोय केलेली असते. काही वस्तूंची खरेदी करून आम्ही तेथून बाहेर पडलो आणि पुन्हा इन्सब्रुकला आलो.

इन्सब्रुकमधला सिटीसेंटर हा भाग प्रसिद्ध असून यात अनेक रोमन व गॉथिक शैलीतील सुंदर-सुंदर इमारती असून मार्केटिंग एरिया आहे. दोन इमारतींच्या समोर असलेल्या प्रचंड मोकळ्या जागेत खुच्र्या-टेबले टाकून खाद्यपदार्थावर ताव मारला जातो. सिटीसेंटरला उतरून निवांत गल्लीबोळातून इमारतींच्या सौंदर्याचा आस्वाद घेत भटकावे, भिरभिरणारा थंडगार वारा अंगावर घ्यावा, त्या थंडीतच हॉटेलसमोरच्या असलेल्या टेबल-खुच्र्यावर बसून वाईन किंवा बीअरचा आस्वाद घ्यावा. यासारखे दुसरे सुख तरी त्या क्षणाला आम्हाला दिसत नव्हते.

म्युझिक सिटी

इन्सब्रुकवरून ट्रेनने साल्झबर्गला आलो. आमची साल्झबर्गची सिटी टुर सुरू झाली. जगप्रसिद्ध संगीतकार ‘मोझार्ट’ याचा जन्म याच साल्झबर्गच्या मातीतला. साल्झबर्ग हे शहर १९९७ मध्ये युनोस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेले असून, हे शहर साल्झाक नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी साल्झबर्ग पॅलेस हा युरोपमधील सर्वात मोठा पॅलेस आहे. या शहरात प्रसिद्ध मिराबेल गार्डन असून बागेत फिरताना ‘साउंड ऑफ म्युझिक’ चित्रपटातील संगीताची धून वाजविली जाते.

या शहराचा सिटी बसने फेरफटका मारल्यानंतर साल्झबर्गची मिठाची खाण बघायचे ठरवले. बरोब्बर साडेतीन वाजता आम्हाला आत सोडण्यात आले. काही पायऱ्या उतरून खाली आलो तोच त्यांनी आम्हाला खाणीत जाण्यासाठी आवश्यक असा पांढरा पोशाख आम्हाला दिला.

खाणीत नेण्यासाठी एक छोटी रेलगाडी तयारच होती. मिठाच्या खाणीतल्या अरुंद बोगद्यातून आमचा प्रवास सुरू झाला. अत्यंत रोमहर्षक असा सुमारे दहा मिनिटांचा प्रवास करून आम्ही आता खाणीतील आतल्या भागात आलो. रेल्वेतून उतरून काही अंतर चालल्यानंतर खाणीच्या मधोमध एक सभागृह तयार करण्यात आलेले होते, त्या ठिकाणी आम्हाला खाणीच्या संदर्भात एक फिल्म दाखविण्यात आली.

खाणीच्या त्या बोगद्यातून जागोजागी ठेवलेली शिल्पे, शिल्पाकृतीतून मांडलेली युरोपियन ग्रामीण जीवनातील प्रसंग पाहात-पाहात काही अंतर पुढे आलो. शंभर ते सव्वाशे फूट लांबीच्या एका लाकडी पट्टीवरून घसरगुंडी करत आम्हाला खाली उतरायचे होते. एका शेजारी एक अशा दोन घसरगुंडय़ा होत्या. प्रत्येकी घसरगुंडीवर जोडीने बसून खाली उतरायचे होते. एका क्षणात घसरत खाली आलो.

पुढे जात अनेक शिल्पाकृती न्याहाळत होतो. काही पावले पुढे जाताच आम्हाला त्या खाणीतल्या तलावात असलेल्या एका प्रचंड मोठय़ा बोटीत बसविण्यात आले. इतक्या खोल खाणीच्या पोटात ते तळे कसे निर्माण झाले असेल असा प्रश्न निर्माण झाला.

अत्यंत निर्मळ व स्वच्छ पाण्यातून ती बोट हळूहळू पुढे सरकत होती. काही वेळातच आम्ही पलीकडे पोहोचलो आणि उतरून पुन्हा खाणीच्या अरुंद बोगद्यातून चालू लागलो. पुन्हा एके ठिकाणी थांबून आम्हाला सुमारे दीडशे वष्रे जुन्या असलेल्या त्या खाणीबद्दल माहिती देण्यात आली. परत येताना प्रत्येकाला मिठाची एक छोटी डबी भेट म्हणून देण्यात आली.

क्रुझवरून..

आज आम्ही इन्सब्रुक सोडणार होतो. आता युरेलने इटलीतील व्हेनेझिया एस लुसिया येथे जाऊन तेथून क्रूझने इतर देशांची भटकंती करणार होतो. ऑस्ट्रिया सोडून ट्रेनने इटलीमध्ये प्रवेश केला तेव्हा वातावरणातील तसेच बाहेरच्या दृश्यातील फरक ठळकपणे जाणवायला लागला. शिस्तबद्धता जाऊन अस्ताव्यस्तता आता आमच्या सभोवताली फेर धरून नाचू लागली.

शेवटचे व्हेनेझिया लुसिया स्टेशन येण्याअगोदर आमची ट्रेन समुद्रातच शिरलेली दिसली. कारण, आमच्या ट्रेनच्या डाव्या व उजव्या बाजूला अथांग पसरलेला सागरच दिसत होता आणि त्यात उभ्या असलेल्या क्रुझ. थोडय़ाच वेळात आमचे स्टेशन आले.

दुपारी दोन वाजता व्हेनिस लुसियाना पोर्ट स्टेशनवर पोहोचलो. पोर्टवर वॉटर टॅक्सींची लगबग चालू होती. थोडय़ाच वेळात आमच्यासाठी खास बुक केलेली वॉटर टॅक्सी आली. आमच्या क्रुझकडे आम्ही निघालो. काही वेळात आमची पांढरीशुभ्र क्रुझ आमच्या नजरेच्या टप्प्यात आली. लगतच्या किनाऱ्यावर आम्ही उतरलो, क्रुझ कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आमचे लगेज दिले आणि अवाढव्य अशा क्रुझवर प्रवेश केला. आता किमान सात दिवस या क्रुझवरील चौदाव्या मजल्यावर आमचे वास्तव्य राहणार होते. या सात दिवसांत आम्ही वेगवेगळे देश फिरणार होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा मुक्काम इटलीतील बारी या पोर्टवर होता. सकाळी दहा वाजता आम्हाला पोर्टवरून ‘सासी दी मतेरा’ला नेण्यासाठी बसेस तयार होत्या. या संपूर्ण शहरात बाल्कनी असलेल्या आधुनिक इमारती दृष्टीस पडतात. इथली वाहतूक व्यवस्था सर्वसाधारण आपल्या मुंबईसारखीच असल्याचे दिसून येते. सुमारे तासाभराच्या प्रवासाने आम्ही सासी दी मतेरा येथे येऊन पोहोचलो. समोरच एक कॅसल  होता, परंतु आमच्या कार्यक्रमपत्रिकेत तो नसल्याने कॅसल समोरून आमच्या गाइडच्या मागोमाग चालत एका पुरातन चर्च जवळ आलो. मग त्या चर्चच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने खाली-खाली उतरत निघालो.

डाव्या बाजूला विस्तीर्ण टेकडय़ांच्या परिसरात पसरलेले प्राचीन शहर दिसत होते. हे शहर पाण्याने तसेच दऱ्याखोऱ्याने समृद्ध असून यातील गुहा शिकारी टोळ्या आश्रयस्थान म्हणून वापर करीत असत. जगातील पुरातन शहरापकी हे एक शहर असून इतिहासपूर्व काळातील पांढऱ्याशुभ्र लाइमस्टोनमधील हे प्राचीन शहर पाहताना या ठिकाणी असे दिसून येते की हे शहर संपूर्णपणे गुहेत वसलेले आहे. या शहराला एनशंट केव्ह सिटी इन रॉक असेही म्हटले जाते. जागतिक वारशाच्या यादीमध्ये युनोस्कोने याचा समावेश सन १९९३ मध्ये केला आहे.

या ठिकाणी असलेल्या गुहेत पुरातन ग्रामीण जीवनाच्या खाणा-खुणा जपण्यात आलेल्या असून त्यातून आपणांस इतिहासपूर्व कालातील ग्रामीण जीवनाची माहिती होते. पायऱ्यावरून खाली खाली जात हे पुरातन असलेले संपूर्ण सासी शहर आपण नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळी या आणि इथे नांदलेल्या प्राचीन संस्कृतीची पाळेमुळे आपल्या मनात घट्ट व्हायला लागतात. सान्ता लुसिया चर्च पाहण्यासाठी आमची गाइड अनाच्या मागोमाग गुहेत शिरलो. त्या प्रचंड मोठय़ा गुहेतील ‘फ्रेस्को ऑफ सेंट बेनडिक्ट आणि फ्रेस्को ऑफ मॅडेना डी लॅट्टे’ यांच्या भित्तिचित्रांनी आमचे ध्यान आकर्षून घेतले. येतानाच्या रस्त्यावर एका पंख लावलेल्या परीचे तलम कपडे घातलेले असलेले एक सुंदर शिल्प पाहावयास मिळाले.

दुपारी दोनच्या सुमारास क्रुझवर आलो. पोटपूजा झाल्यावर क्रुझवर फेरफटका मारण्यासाठी निघालो. कुठे डान्सपार्टी चालू होती, तर कुठे मद्यपान करत लोकांच्या गप्पा चालू होत्या, कोणी खरेदीत दंग होता, तर कोणी सनबाथ घेत पहुडले होते. क्रुझवरच्या मयसभेत सारे आपआपल्यापरीने आपले जीवन रंगीन करण्यात गुंतले होते. समुद्री पक्षी हवेतून तरंगत मजेत चालले होते. निळ्याशार पाण्यावरचा पांढराशुभ्र फेस माझ्या मनात आनंदाचे तुषार निर्माण करत होता. सभोवार पसरलेला अथांग निळा सागर आणि त्यात हेलकावे खात जाणारी आमची प्रचंड मोठी क्रुझ एक अवर्णनीय असा पंचतारांकित आनंद उपभोगत आमच्या साऱ्यांचा प्रवास मजेत चालला होता.

मेरी हाउस

सकाळी साडेनऊ वाजता आमची बोट टर्कीमधील ‘इझमीर’च्या किनाऱ्याला लागली. चेकआउट करून आम्ही बाहेर पडलो. सकाळची कोवळी उन्हे, सोनेरी किरणे, समुद्राच्या अथांग पाण्यावर लकाकत असल्यामुळे एक वेगळीच वातावरणनिर्मिती झाली होती, मन उत्साहाने ओथंबून वाहत होते. बस सुरू झाली आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती पाहून भारताची आठवण व्हायला लागली. जसजसे आपण शहराबाहेर पडायला लागतो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा मुंबई-ठाण्यासारख्या इमारती दिसायला लागतात. या शहरातही नव्या इमारतींसमोर जुन्या इमारतींच्या भिंती अर्धवट स्वरूपात उभ्या राहून आपले गतकालाचे वैभव दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.

जसजसे आपण घाटाच्या रस्त्याने डोंगरावर जाऊ लागतो तसतसे सारे शहर नजरेच्या टप्प्यात येते आणि काही क्षणातच आपण द हाऊस ऑफ व्हर्जिन मेरी येथे येतो. दगड आणि विटांचे बांधकामाचे असलेले मेरीचे घर, समोरच एक पुरातन वृक्ष. आपण शिस्तीत आत जातो व समोरच्या मेरीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बाहेर पडतो. बाहेर पडल्यावर समोरच डाव्या बाजूला असलेल्या मेणबत्ती लावण्याच्या ठिकाणी मेणबत्त्या पेटवून आपण माघारी फिरत खाली येतो. उजव्या बाजूला आपणास एका भिंतीवर आपल्या मनातील इच्छा लिहून ते कापड त्या भिंतीवरील दोरीवर ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. कुणी कपडय़ावर तर कुणी कागदावर आपल्या मनातील लिहिलेल्या हजारो इच्छांचे कापड कागद त्या ठिकाणी दिसून येतात.

आता परतीच्या वाटेवर जवळच कुसाडासी या गावाजवळ इफेसास (एस्र्ँी२४२) नावाचे एक पुरातन ग्रीक शहर पाहावयाचे होते. आमच्या गाइडने सूचना दिल्या की तिच्या मागोमागच आम्ही यावे. गाइडच्या हातात आमचा बस क्रमांक असलेला एक बोर्ड होता त्यामुळे आम्हाला चिंता नव्हतीच. त्या वेळच्या ग्रीकमध्ये असलेले पुरातन शहर प्रचंड मोठे असल्याचे जाणवत होते. जागोजागी दिसत होत्या त्या ग्रीक साम्राज्याच्या  खाणाखुणा. त्या पुरातन शहरातील प्रचंड उंचीचे असलेले कोरीव खांब त्या उद्ध्वस्त शहराच्या सौंदर्यात अद्याप भर घालत होते. आम्ही पुढे आलो तोच आमच्या नजरेच्या टप्प्यात आले ते एक प्रचंड मोठे ग्रँड थिएटर. त्या अर्धगोलाकार असलेल्या थिएटरची उंचीच मुळी अठरा मीटर म्हणजे तीन मजली होती. त्यात सुमारे २४ हजार ५०० इतक्या प्रेक्षकांना बसण्याची सोय केलेली होती.

ग्रीक साम्राज्याची निशाणी असलेल्या या शहराचा इतिहास ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापर्यंत मागे जात असून तदनंतर ख्रिस्तपूर्व सन १२९ (ख्रिस्तपूर्व) या कालावधीत हे शहर रोमन प्रजासत्ताकखाली आल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. त्या काळी या शहराची लोकसंख्याच मुळी ३३ हजार ६०० ते ५६ हजार  असल्याचे इतिहासातून प्रतीत होते. अत्यंत प्रगत असे हे शहर त्या काळी अनेक शिल्पांनी नटलेले होते. साऱ्या सोयी-सुविधा या शहरात होत्या याची जाणीव सतत होत राहते. आम्ही सारे गाइडच्या मागे चालत चालत इतिहासात डोकावून येण्याचा प्रयत्न करत होतो. जागोजागी अनेक पाषाणशिल्पे आपल्या उद्धाराची वाट पाहत सुन्न मनाने पडून होती. अजून खाली आलो तोच समोर असलेल्या एका सुंदर शिल्पाने म्हणजेच ममीज मोन्यूमेंट (टी्रे४२ टल्ल४ेील्ल३) या शिल्पाने आमचे लक्ष वेधून घेतले. तेथे फोटोसेशन करून पुढे निघालो. हजारो वष्रे ऊन, पाऊस, वारा झेलत बेवारसपणे पडलेल्या या कलाकृतींचे जतन टर्की सरकारद्वारे करण्याचे प्रयत्न चालू असून गतकाळचे वैभव पुन्हा साकारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालल्याचे दिसून येते.

इस्तंबूल

सकाळी आठ वाजता आम्ही इस्तांबूलच्या किनाऱ्याला लागलो. इस्तंबूल शहर हे मुस्लिमबहुल आहे. शहरात फिरताना आपणास जागोजागी मशिदी दिसून येतात. सुमारे चार ते पाच घुमट एकत्रित असलेल्या व उंचच उंच रॉकेटच्या आकाराचे मिनार असलेल्या मशिदी हे येथले वैशिष्टय़. जगातल्या अनेक शासकांचा पराभव करून मुस्लिमांनी सत्ता काबीज केल्याचा इतिहास आहे. हे ठिकाणही याला अपवाद नसून कित्येक चर्चचे रूपांतर मशिदीत झाल्याचे दिसून येते.

खरे तर इस्तंबूल हे शहर दोन खंडात विभागले गेलेले. या ठिकाणचा समुद्रावरील पूल हा दोन खंडांना जोडणारा आहे. प्रचंड दाटीवाटीच्या इमारती, टेकडय़ांवर वसलेल्या वसाहती, त्याला जोडणारे कधी वर तर कधी खाली धावणारे रुंद-अरुंद रस्ते.

आमचा गाईड कबीरने या शहराचा इतिहास सांगताना शहरात लागलेल्या एका पोस्टरकडे बोट दाखवून तो म्हणाला की, हे जे आमचे शासक आहेत ते खरे राजकारणी नाहीत. त्यामुळे ते त्याला आवडत नाहीत. परंतु, त्यांना चार वष्रे सहन करायचेच आहे.

या शहरात फिरताना जागोजागी असलेल्या पुरातन मशिदी, जागोजागी असलेल्या भेंडय़ाच्या विटांच्या मातीतल्या पुरातन इमारतींच्या िभती, जणू आपणास त्यांची कहाणी तर ऐकवण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना, असेच वाटत राहते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या टेकडय़ांवर  विस्तारलेले हे प्रचंड शहर क्रुझवरून पाहताना विलोभनीय दिसते.

दोन खंडात पसरलेले इस्तंबूल हे जगातील एकमेव शहर आहे. सात टेकडय़ांचे शहर म्हणूनही संबोधले जाते. या ठिकाणी सहाव्या शतकातील जगातील सर्वात मोठे चर्च आयादफाया असून सुल्तान मोहम्मद विजेता याने २९ मे १४५३ साली जिंकून घेऊन त्याचे रूपांतर मशिदीत केले आहे. आता त्या ठिकाणी संग्रहालय असून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. इस्तंबूल एक असा देश आहे, जिथे युरोप आणि आशियाचे मनोमीलन झालेले दिसून येते. म्हणूनच या शहराला दोन खंडात पसरलेले शहर म्हणतात. मुंबईतल्याप्रमाणे फेरीवाले या ठिकाणीही रस्ता व्यापून बसलेले दिसतात. येथे एकंदरच मुंबईतल्या फोर्टसारखे वातावरण असते. रस्त्यावर धावणाऱ्या बसेसच्या सोबतीने ट्रामही मार्गक्रमणा करीत असते. या ठिकाणी खाऊगल्लीही आहे. एकूण काय तर मुंबईसारखे गर्दीचे शहर म्हणूनच इस्तंबूल ओळखले जाते.

क्रोएशिया

क्रुझचा पुढचा पडाव क्रोएशिया. अंतर जास्त असल्याने आमचा हा दिवस आरामाचा होता. समुद्री पक्ष्यांच्या सोबतीने माझेही मन त्या अथांग सागराच्या आकाशामध्ये अलगद विहार करू लागले. पाणी कापत जाणारी क्रुझ आणि फेसाळणाऱ्या लाटा, वर पसरलेलं पांढरंशुभ्र आभाळ. एक सुंदर नजारा माझ्या दृष्टीसमोर साकारत होता. अलगद तरंगत होतो या अथांग समुद्राच्या लाटेवर. स्पर्श करू पाहात होतो माझ्याच मनाला.

दुसऱ्या दिवशी म्हणजे साडेअकरा वाजता क्रोएशियाच्या किनाऱ्याला लागलो. टेकडय़ांवर वसलेला संपूर्णपणे पर्यटनावर आधारलेला हा एक छोटासा देश आहे. हे शहर यू आकाराच्या समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीवर वसलेले असून या शहरात सुंदर इमारती जागोजागी दिसून येतात. त्या ठिकाणी असलेले म्युझियम आणि शहराच्या भोवतालची प्रचंड मोठी िभत ही या शहराची वैशिष्टय़े आहेत. आपण ज्यावेळी डुब्रोवनिक या शहराच्या िभतीखालून असलेल्या जागेतून प्रवेश करतो त्यावेळी आपणास त्याच्या भव्यतेची साक्ष पटायला लागते. पांढऱ्या दगडातील बांधकाम केलेल्या िभतीची रुंदी म्हणाल तर सुमारे चार ते साडेचार मीटर अतिभव्य.

येथील किल्ला, म्युझियम फारच सुंदर आहे. येथे मनसोक्त शॉपिंगदेखील करण्याची सुविधा आहे. किल्ल्याच्या िभतीवरून समुद्राच्या साक्षीने आकाशाला गवसणी घालू शकतो. आम्ही डुब्रोवनिक येथील किल्ल्याच्या परिसरात आलो तेव्हा एक तरुण आपल्याच नादात मस्तपकी गिटार वाजवत पर्यटकांचे मनोरंजन करत होता. थोडे पुढे आलो तोच एक गृहस्थ अरबाचा वेश करून तोंडाला सोनेरी रंग फासून उंचावर उभे राहून सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. असेच पुढे निघालो. किल्ल्याच्या िभतीवरून सारा समुद्र न्याहाळला. तेथून खाली येऊन पुन्हा एका अरुंद गल्लीतून म्युझियममध्ये आलो. अनेक चित्रे, शिल्पे आणि क्रोएशियाचा इतिहास तेथे मांडलेला होता. या ठिकाणी एक अतिभव्य ओनोफ्रिन फाऊंटन असून त्यातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याच्याच समोर असलेले एक अतिउंच बेल टॉवरही आपले लक्ष वेधून घेते. स्वच्छ व सुंदर असेले क्रोएशियातील डुब्रोवनिक पाहून पुन्हा क्रुझवर आलो.

क्रुझवरचा शेवटचा दिवस. रात्रीच दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सकाळी सहा वाजताच उठून तयार झालो. रात्रीच आमचे लगेज दाराबाहेर ठेवलेले होते. क्रुझमध्ये प्रवेश करताना आमचा पासपोर्ट जमा करून घेण्यात आलेला होता. तो पासपोर्ट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी डेक सातवर जमा होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. काही वेळातच पासपोर्ट ताब्यात आला, मग एक्झिट घेतली.

मुक्त प्रेमाविष्कार

मंतरलेले ते सात दिवस हृदयात साठवत साठवत व्हेनेझिया एस. लुसिया स्टेशनवर आलो. आम्ही बसलो होतो त्या ठिकाणीच एका तरुण मुलाचा पुतळा उभा केलेला होता. नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेल्या त्या तरुण मुलाच्या एका हातात गुलाबाचे फूल, तर दुसऱ्या हातात असलेली एक कागदी बोट पाहून मनाला प्रश्न पडला, नक्की यातून काय सुचवायचे असेल शिल्पकाराला.

इटलीतील रोम व व्हेनिस ही शहरे तर प्रेमाचे प्रतीक. त्याचे तर प्रतिनिधित्व करीत नसावा ना हा पुतळा. असा मनाशी विचार येताच अचानक पियानोमधून सप्तसूर झंकारले. त्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पियानोवर एक तरुण सप्तसूर आळवत होता. मग सारा उलगडा होत गेला. आपल्या चिमटीत पकडलेले बालपण, तारुण्याच्या उंबरठय़ावर हातात आलेले गुलाबाचे फूल. हे तर सारे प्रेमाचेच प्रतीक.

त्या पुतळ्याच्या अगदी समोरच एक तरुण आणि एक तरुणी एकमेकांना बिलगून घट्ट आिलगन देत होते. साऱ्या दुनियेला विसरून. त्यांच्या त्या कृतीत यत्किंचितही चोरटेपणाचा लवलेश नव्हता. होता तो फक्त मुक्त प्रेमाचा आविष्कार.

रोमच्या व्हेनिस नगरीतल्या सप्तसुरांकित रेल्वेस्टेशनवरचा हा सप्तसुरांकीत प्रेमाच्या वर्षांवाने न्हाऊन गेलेला अनुभव मला बरेच काही सांगून गेला. त्याचवेळी आपल्या कोत्या मनोवृत्तीचा, कोत्या संस्कृतीरक्षकांचा, मनापासून राग आला. माझ्या कार्यालयात एकदा इटालियन जोडपे आले होते. त्यांचे काम संपल्यानंतर त्यांनी माझ्यासमोरच एकमेकांना आिलगन देऊन एकमेकांचे चुंबन घेतले. या कृतीतून त्यांनी एक मुक्त प्रेम त्यांनी एकमेकांविषयी दर्शविले होते. तेव्हापासून इटलीविषयी माझ्या मनात आकर्षण निर्माण झालेले होते आणि आज ते विशुद्ध प्रेम मी त्या रेल्वे स्टेशनवर अनुभवत होतो.

त्याचवेळी काहीतरी गमावल्याची जाणीव मला झाली. असे तरुणपण, असे प्रेम, कधीच न अनुभवल्याची खंत मला वाटत होती. भारतातले संस्कृतीरक्षक माझा पाठलाग करत असल्याच्या जाणिवेनेही मी त्या व्हेनिसमध्ये अस्वस्थ झालो. येथे कुणाचीही पर्वा नव्हती, कित्येक प्रवासी येत-जात होते, कुणीही अचंबित होऊन त्या प्रेमी युगुलाकडे पाहात नव्हते. सारे प्रवासी घडीचे आपल्याच जगात वावरत होते.

तेवढय़ात पुन्हा पियानोचे सूर झंकारले. ते प्रेमी युगूल विभक्त होत आपआपल्या वाटेने निघून गेले. आता त्या पियानोनर एक छोटी सुंदर जपानी मुलगी आणि तिची दोन भावंडे कुतुहलाने तो पियोनो आपल्या मनाला येईल त्या पद्धतीने वाजवत होती. व्हेनिस स्टेशनवरचे ते सुंदर दृश्य बघून मला स्वतला स्वर्गात असल्याचा भास झाला.

युरोप प्रवासात हे लक्षात असू द्या

  • परदेशातील पर्यटन स्वतच्या मर्जीनुसार करावयाचे असल्यास ऑनलाइन बुकिंग करून स्वतही नियोजन करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर असे नियोजन करून देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची मदत घ्या.
  • पासपोर्ट व व्हिसा सतत जवळ बाळगा. त्याची स्कॅन कॉपी स्वतच्या ई-मेल अ‍ॅड्रेसवर स्वतला मेल करा. पासपोर्ट आणि व्हिसा कधीही बॅगेत ठेवू नका स्वतजवळ ठेवा.
  • योग्य त्या परकीय चलनाबरोबरच ते खरेदी केल्याच्या पावत्याही सोबत ठेवा.
  • अनोळखी व्यक्तीकडून परकीय चलन विकत घेऊ नका.
  • ट्रेनची तिकिटे व बसचे व्हाऊचर स्वत:जवळ असू द्या.
  • हॉटेलमध्ये तसेच रेल्वेस्टेशनवर वायफायची सुविधा असते त्याचा लाभ घ्या.
  • परकीय चलन रोख व ट्रॅव्हलर कार्डात स्वत:जवळ ठेवणे केव्हाही इष्ट.
  • क्रुझमध्ये वास्तव्याला असताना दररोज किमान ८.५ युरो टीप म्हणून द्यावेच लागतात. ते तुमच्या बिलामध्ये परस्पर समाविष्ट केले जातात, याची माहिती असू द्या. क्रुझचे बिल फक्त ट्रॅव्हलर कार्डानेच पे करता येते.
  • क्रुझमध्ये चेकइन करतानाच तुम्हाला िड्रकचे व पाण्याचे कूपन घेण्याचा आग्रह केला जातो, त्याला बळी पडू नका. एकदा का तुम्ही क्रुझमध्ये वास्तव्याला आला की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कुपन घेऊन खर्च करू शकता. त्यामुळे परकीय चलन तुम्हाला हवे तसे काटकसरीने वापरता येते.
  • तुम्ही कोणकोणत्या देशांना भेटी देणार आहात. तेथे तुम्ही कुठल्या शहराला भेटी देऊन काय काय पाहणार आहात याची यादी तयार करा. त्याप्रमाणे तुम्ही ट्रेनची, बसची व प्रेक्षणीय स्थळांची तिकिटे ऑनलाइन बुक करू शकता. अगदी रिझव्‍‌र्हेशनसुद्धा करता येते.
  • सोबत जादा क्षमतेचे पेनड्राइव्ह ठेवा. फोटो काढल्यानंतर त्यात सेव्ह करता येतात. परदेशात पेनड्राइव्हसारख्या वस्तू महाग असतात याचे भान असू द्या.
  • परदेशातील टुरिस्ट इन्फॉम्रेशन सेंटरमध्ये बऱ्याच वेळा सिटी बसेसचे पासेस मिळतात.
  • जर्मनीमध्ये हॉप-ऑन हॉप-ऑफ या बसेस सिटी टुरसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही ऑनलाइन बुकिंग करून त्याचे व्हाऊचर सोबत ठेवून सिटी टुर करू शकता.
  • क्रुझमध्ये जास्त दिवसाचे वास्तव्य असेल तर क्रुझ ज्या ज्या देशाच्या बंदरात थांबते त्या देशातील प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यासाठी नेले जाते, परंतु त्याचे वेगळे पसे भरावे लागतात.
  • ज्या देशात तुम्ही सर्वप्रथम जाणार असता त्या देशाच्या परदेशी वकिलातीकडे व्हिसाचा फॉर्म देणे आवश्यक असते. युरोपातील अनेक देशात जायचे असल्यास शेन्जान व्हिसासाठी अर्ज करा.
  • युरोपात पाणी महाग आहे, अध्र्या लिटरची बाटली अडीच युरोला मिळते.
    धनराज खरटमल – response.lokprabha@expressindia.com