हनिमूनला कुठे जायचं हा प्रश्न पडलाय..? थायलंड..? का नको..? खूपजण तिकडे फिरायला जातात म्हणून..? डोन्ट वरी.. सगळेजण पन्नाससाठच्या ग्रुपने कुठे जातात ते माहितीये ना आपल्याला..? मग त्या ठिकाणांकडे आपण फिरकायचंच नाही ना.. त्याशिवायसुद्धा मोप ठिकाणं आहेत थायलंडमध्ये. हो.. हो.. अगदी फक्त जोडीनं बघता येतील अशीच. तुम्हाला कोणती ठिकाणं सांगितली आहेत तिकडे जाऊन आलेल्यांनी..? बँकॉक, पट्टाया..? ओक्के.. सूरत थानी हे नाव सांगितलंय कधी कुणी? नाही ना? थायलंडच्या दक्षिणेला आहे ते. थायी भाषेय सूरत थानी म्हणजे चांगल्या लोकांचं शहर. पण त्याचा अर्थ थायलंडमधला ग्रामीण भाग असाही होतो. तर या सूरत थानीच्या जवळच आहे, कोह सामुई आणि कोह फंगन. यातलं कोह सामुई तर हनिमूनसाठी एकदम बेश्ट. तिथले रुपेरी बीच. तिथलं समुद्राचं निळंशार पाणी. सुंदर रेस्तरामध्ये कँडल लाइट डिनर. तिथली सुंदर जंगलं, दऱ्याखोरं.. आहाहा. सुरत थानीमध्ये वेळ न घालवता लगेचच कोह सामुईला चला. खिशाचा विचारच करू नका. इथं प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशी हॉटेल्स आहेत. कोह सामुईचे बीच एकदम फेमस आहेत. चेवांग बीचवर कायमच पार्टी सुरू आहे असं वातावरण असतं तर बाकीचे बीच निवांत असतात. चावेंग बीच आणि लामाई बीचच्या मधल्या धबधब्याच्या ठिकाणी तुम्ही एखादी संध्याकाळ अविस्मरणीय करू शकता. कोह सामुईमध्ये तुम्ही स्कूटर भाडय़ाने घेऊन फिरूसुद्धा शकता. प्रेमाच्या गुलुगुलु गप्पांमध्ये तुम्हाला थ्रीलही आणायचं असेल तर तुम्हाला इथे डायिव्हग आणि स्नॉर्किलगही करता येईल. थायी जेवणाबरोबरच तुम्हाला इथे भारतीय, युरोपीयन असं कोणत्याही प्रकारचं जेवण मिळू शकतं. त्यामुळे त्याची चिंताच सोडा. जाता जाता शॉिपग करायचं तर तुम्ही बोफूत, नाथॉन, लमाई बीचवर गेलंच पाहिजे. इथली हवा नेहमीच छान असते, पण तरीही इथे येण्यासाठी उत्तम मोसम एप्रिल ते नोव्हेंबर हाच.
बँकाक एअरवेजने कोह सामुईला जायला थेट विमानसेवा दिली आहे. तिथे जायला बँकॉकहून तासभर तर पट्टायाहून पाऊण तास लागतो. कोह सामुईवर व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. थायी एअरवेजच्या मात्र कमी फ्लाइट्स आहेत. बसनेही जाता येतं. पण बँकॉकहून ११ तास लागतात. बस आणि फेरी बोट असाही प्रवास करता येतो, पण वेळ लागतो.
दुसरा पर्याय आहे फुकेतचा. इथल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांवर सुंदर रुपेरी वाळूत तुम्हाला एकमेकांमध्ये हरवून जायची आणि सगळं जग विसरायला लावायची जादू आहे. तुम्हाला हवं तर इथे सुंदर बीच, हॉटेल्स आहेत; ती नकोत तर इथल्या जवळच्याच भरगच्च जंगलातली नयनरम्य, निवांत हॉटेल्स तुमची वाट बघताहेत. इथे तुम्हाला उत्तम थायी पाहुणचार मिळेल. पताँग बीच तर खूपच रोमॅण्टिक आहे. इथे विमानाने येणं सोपं. बँकॉकहून बसने यायचं तर साधारण बारातेरा तास लागतात.
आपण दोघांनी राजाराणीसारखं राहायचं असं तुमचं स्वप्न असेल तर मात्र तुम्हाला थायलंडच्या उत्तरेला चिआंग मई इथं जायला हवं. चिआंग मईचा अर्थ आहे, उत्तरेचं फूल. चिआंग मई सारखंच शेजारचं चिआंग रायदेखील फार सुंदर आहे. इथेही तुम्ही विमानाने, बसने येऊ शकता. तुमच्या सहजीवनाची सुरुवात अविस्मरणीय करण्यासाठी थायलंड सुसज्ज आहे.
केव्हा जाल :वर्षभरात केव्हाहीकसे जाल : भारतातील सर्व प्रमुख विमानतळावरुन बँकॉक, फुकेत, पट्टाया असा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
(छायाचित्र सौजन्य : टुरिझम अॅथॉरिटी ऑफ थायलंड )
नीता काळे – response.lokprabha@expressindia.com