सेकंड होम म्हणजे फक्त आराम करण्यासाठी म्हणून बांधलेलं घर नाही किंवा ते हॉटेलदेखील नाही. म्हणूनच आपल्या राहत्या घरी जे नियोजन करतो त्यापेक्षा जास्त नियोजन सेकंड होमच्या बाबतीत करणं गरजेचं आहे.

आमच्या एका ओळखीच्या डॉक्टरांचा अलिबागला मस्त बंगला आहे. बरेच दिवसांपासून त्या बंगल्यावर पार्टी करायचे राहूनच जात होते. शेवटी एकदाची सगळ्यांची मोट बांधून जानेवारीचा एक वीकेंड नक्की झाला. इथे आमची तारीख पक्की झाली आणि तिथे डॉक्टरांनी त्यांच्या स्टाफला अगदी सहज म्हणून विचारल्यासारखे केले, ‘‘बरेच दिवसांत तुम्ही लोकांनी सुट्टी घेतली नाही, जा मजा करा. ही घ्या माझ्या अलिबागच्या बंगल्याची चावी.’’ डॉक्टरांचा उदारपणा बघून स्टाफला हुंदके आवरेनात. पुढचे दहा दिवस प्लॅिनगमध्ये आणि डॉक्टरांचे गुणगान गाण्यात गेले. पण त्या मागची मेख फक्त डॉक्टरांनाच माहीत होती. आमच्या या डॉक्टरांनी सुट्टी कधी जाहीर केली, तर आम्ही जायच्या एक वीकेंड आधी. इतके दिवस बंद असलेला बंगला स्टाफकरवी आपोआप स्वच्छ केला गेला. कारण, स्वच्छ केल्याशिवाय तिथे राहणे अशक्यच होते. त्याचा एक फायदा असा झाला की आम्हाला मात्र पुढच्या वीकेंडला पार्टी करायला एकदम चकाचक बंगला मिळाला. यातील मजेची गोष्ट सोडा. पण प्रत्येक माणसाला, ज्याचे सेकंड होम आहे, त्याला त्या घराच्या सफाईचा आणि देखरेखीचा प्रश्न कायम भेडसावत असतो. डॉक्टरांसारखा स्टाफ काही प्रत्येकाकडे नसतो. अशा वेळी दार उघडल्यावर आधी हातात येतो तो झाडू! निम्मा दिवस साफसफाईतच जातो आणि कुठून हे घर घेतले हा विचार हळूहळू डोकावू लागतो. अशा वेळी सेकंडहोम कसे असावे, जेणेकरून आपल्याला त्रास कमी होईल हे आपण बघू यात.

40-lp-second-homeमुळात सेकंड होम तुमच्या राहत्या घरापासून जायला-यायला सुलभ-सुकर होईल अशाच ठिकाणी घ्यावे. यात भावनिक गुंतवणूक कमी आणि व्यावहारिक दृष्टिकोन जास्त ठेवावा. उगीच आम्ही मूळचे धारवाडचे म्हणून तिथे घर बांधायचे आणि राहायचे मुंबईत. असे करता कामा नये. अशा वेळी पहिल्या चार खेपेला तिथे जायचा असलेला उत्साह दिवसेंदिवस मावळू लागतो. आणि हळूहळू तिथे जाणे हे एक कंटाळवाणे काम आणि घर म्हणजे एक न पेलवणारे ओझे वाटू लागते. मुळात सेकंडहोम का घेतले जाते तर पशाच्या गुंतवणुकीसाठी आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या राहत्या घरात मिळत नाही त्या मिळवण्यासाठी. उदाहरणार्थ शांतता, गच्ची, निसर्ग, विश्रांती वगरे वगरे. पण जसजसा आपला कामाचा पसारा वाढायला लागतो, मुलांची क्लासेसची झंझट मागे लागते तसतसा आपल्याला वेळ कमी पडू लागतो आणि शनिवार-रविवार फक्त हाताशी मिळतो. अशा वेळी तुमचे सेकंड होम जवळ असेल तर तुम्हाला पटकन तिकडे जाऊन आराम करणे सोयीचे जाते. ज्या कारणासाठी तो घेतला ती मजा, तो आनंद उपभोगू शकतो.

आजकाल बऱ्याच एनआरआय लोकांची घरे मेंटेन करायला व्यावसायिक कंपन्या झाल्या आहेत. या कंपन्या दर महिन्याला तुमचे घर झाडून पुसून लख्ख ठेवतात. अशा कंपन्यांकडे आपले घर सोपवल्यास आपण कधीही जरी गेलो तरी घर आपल्याला साफसुथरे मिळते. गेल्या गेल्या होणारा धुळीचा त्रास व कुबट वास यापासून सुटका होते. ज्यांचा स्वतंत्र बंगला किंवा फार्म हाऊस असेल त्यांनी माळ्यासाठी किंवा एखाद्या नोकरासाठी बंगल्याच्या आवारातच वेगळी खोली करणे गरजेचे आहे. जेणेकरून तो माळी किंवा नोकर घराची व परिसराची देखरेख करू शकेल. पण ज्यांना ही चन परवडणारी नाही, त्यांनी  कमीत कमी त्रास कसा होईल हे बघणे जरुरीचे आहे. धुळीच्या समस्येसाठी अशा वेळी सुरुवातीलाच थोडे जास्त पसे खर्च करून बिल्डरने दिलेल्या खिडक्यांऐवजी चांगल्या प्रतीच्या खिडक्या लावून घ्याव्यात. अशाने फटी न राहता बराचसा धुळीचा त्रास कमी होतो. बिल्डर लोक साधारणपणे खिडक्यांना एकच मार्बलच्या पट्टीची चौकट फिरवतात. अशाने फटी राहून पावसाचे पाणी आत शिरते. म्हणून बांधकामाच्या वेळीच चारी बाजूंनी वरती खालती अशा दोन पट्टय़ा फिरवल्यास वेडय़ावाकडय़ा येणाऱ्या पावसापासून संरक्षण मिळते व पाणी आत शिरून नुकसान तर होणार नाही ना, ही चिंता मिटते.

सेकंड होमसाठी वापरले जाणारे सर्व फíनचर, फरशा, िभतीवरील पेंट कमीत कमी मेंटेनन्सवाले असावेत. अशाने त्यांची देखरेख करणे सोपे जाते. बऱ्याच लोकांचे सेकंड होम हे ड्रीम होम असते. मग बरेचदा हौसेपायी अशा वस्तू ठेवल्या जातात ज्यांची सतत देखभाल करणे गरजेचे असते. जसे लाकडाचे उंची सोफे, पुरातन वस्तू, झुंबर, सिल्कचे पडदे. एखाद्या वास्तुतज्ज्ञाला किंवा इंटिरियर डिझायनरलासुद्धा फार्म हाऊस किंवा गावाबाहेरचा बंगला डिझाइन करणे ही अभिमानाची गोष्ट असते. अशा वेळी प्रोजेक्ट चांगले दिसण्याच्या नादापायी ‘हे रोजचे राहण्याचे ठिकाण नाहीये’ याचा विसर पडतो. त्याचा परिणाम म्हणजे देखभालीअभावी वर्षभरातच त्या घराची पूर्ण रयाच जाते. मग काय केल्यास या सेकंड होमचे रूप टिकून राहील?

41-lp-second-homeयेथील फरशा कशा असाव्यात तर ज्यावरील धूळ पटकन निघू शकेल अशा. आजकाल थोडय़ा खडबडीत (रफ) फरशांना खूप पसंती मिळते. पण या घरांसाठी त्या उपयोगी नाहीत. दिवसेंदिवस जमत जाणारी धूळ या फरशांवरून काढणे जिकिरीचे काम असते. त्याचप्रमाणे लाकडाचे फíनचरही शक्यतो टाळावे. लाकडाला सतत पॉलिश केले तरच ते टिकते. जे अशा घरांमध्ये करणे अशक्य आहे. या बंद घरांमध्ये वाळवीचा त्रासपण होऊ शकतो. त्यासाठी मग कीटकनाशकांचे फवारे नियमित करणे आले. बरेच वेळेला बंदिस्त घरामुळे लॅमिनेट पिवळा पडतो. म्हणूनच कुठल्याही धातू किंवा रॉटआयनपासून बनवलेले फíनचर वापरल्यास उत्तम. आमच्या ओळखीच्यांकडे तर दिवाणखान्यात बसायची जागा सोफ्यांऐवजी पूर्ण विटा/ प्लास्टरच्या बांधकामात केली आहे. वरती फक्त गादी आणि लोड ठेवले की जमलीच लगेच मफल! बठकीच्या गाद्यांचे कव्हर कापडाऐवजी चांगल्या प्रतीच्या रेक्झिन, कृत्रिम लेदरनी केल्यास पुसण्यास सोपे जाते. व कापडामुळे येणारा कुबट वासपण येत नाही. घराच्या िभतीसुद्धा दगडी किंवा विटांचे बांधकाम दिसणाऱ्या, खडबडीत टेक्चर पेंटच्या करण्याऐवजी गुळगुळीत पेंटनी रंगवाव्यात. हा रंग पाण्याने आरामात धुतला जाणारा असावा.

तुम्हाला पेंटिग्ज लावायची हौस असेल तर ती घराच्या आतल्या िभतींवर लावावीत. बाहेरच्या (एक्स्टर्नल) िभतींवर लावल्यास उन्हाच्या उष्णतेने किंवा पावसामुळे ओल आल्यास खराब होण्याची शक्यता असते व हे झालेले नुकसान आपल्याला समजेपर्यंत फार वेळ झालेला असतो.

अशा बंद घरांमध्ये प्रामुख्याने त्रास होतो तो कबुतरांचा. आपण नसताना स्वत:चेच घर असल्यासारखे बागडणारे हे पक्षी डोकेदुखी होऊन बसते. त्यांच्या घाणीमुळे आरोग्याला हानी पोहोचते तो भाग वेगळाच. त्यामुळे घर ताब्यात घेतानाच सर्व बाल्कन्या, खिडक्यांना आधीच कबुतराची जाळी लावणे श्रेयस्कर.

सर्व घराला एक मेन स्विच असणे फार महत्त्वाचे आहे; जो जाताना बंद करून जाऊ शकतो. न वापरल्यामुळे बरेच वेळेला विजेवर चालणाऱ्या गोष्टी जसे पंखे, गीझर, फ्रिज बंद पडू शकतात. अशा वेळी तेथील स्थानिक इलेक्ट्रिशियनचा नंबर जवळ ठेवणे हितकारक. तसेच इन्व्हर्टर लावल्यास दर ठरावीक महिन्यांनी त्याची बॅटरी चार्ज करणे आवश्यक असते. विसरलो, तर पाहिजे तेव्हा त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

आपल्याला वाटते सेकंड होम म्हणजे जाऊन नुस्ता आराम करायचा. पण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे हॉटेल नाही. वरील गोष्टी पाळल्या तरच इथे आराम करता येईल. आपल्या राहत्या घरी जे नियोजन करतो त्यापेक्षा जास्त नियोजन सेकंड होमच्या बाबतीत करणे गरजेचे आहे. कारण आपल्या राहत्या घरी काही कमी-जास्त झाले किंवा काही गरज लागली तर आजूबाजूचा परिसर, माणसे ओळखीची असतात. पण सेकंड होमच्या बाबतीत तसे नसते. बरेच वेळेला ते गाव, तो परिसर आपल्याला नवीन असतो. अशा वेळी शेजारच्या वाण्यापासून स्थानिक डॉक्टपर्यंत सगळे नंबर्स हाताशी ठेवणे गरजेचे आहे. असे केल्याने राहत्या घराच्या सोयीपण मिळतील व सेकंड होम ज्या कारणासाठी घेतले त्याचा आनंदपण उपभोगू शकू.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader