वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणवाद त्यांनी समर्पकपणे सादर केला आहे. वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, एक जीवनछत्र, एक आधार-मानवी जीवन व वृक्ष यांच्यात एक अतूट नाते आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची एकसमयावच्छेदे पूर्ती करणारे हे निसर्ग देणे. अनादी कालापासून मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वाग उपयोगी पडणारे/ उपयुक्त असणारे, स्थितप्रज्ञ योग्यासारखे, वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच इ.इ. कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. वृक्ष मानवी जीवनाचे तारक असल्याचे आपल्या पूर्वजांनी जाणले होते व त्यामुळे त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन इ. इ. सारखे कार्यक्रम सुरू केले व अनाठायी वृक्षतोड होऊ नये म्हणून ‘देवराया’ वगैरेसारखे उपक्रम धार्मिक श्रद्धांशी निगडित करून त्या उपक्रमांना एकप्रकारे सबल अधिष्ठान दिले. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहेत.
फार फार पुरातन काली वसुंधरेवर प्रचंड जंगले होती. घनदाट वृक्षरांजीने सर्व जग व्यापले होते, आणि कालांतराने भूपृष्ठावर भूकंपासारखे प्रचंड उत्पात होऊन ती महाकाय वृक्षरांजी जमिनीत खोलवर गाडली गेली. या प्रक्रियेमुळे पुढे त्या प्रचंड प्रमाणातील वृक्षांचे रूपांतर दगडी कोळशात झाले. या प्रचंड दगडी कोळशाचे साठे भूगर्भात नियतीने जणू मानवाच्या पुढील प्रगत अवस्थेत लागणाऱ्या ऊर्जेसाठी दूरदृष्टीने करून ठेवले असे म्हणावे लागले. एका दृष्टीने मानवाच्या पुढील भविष्यासाठी हे त्या वृक्षांचे सामूहिक आत्मसमर्पणच म्हणावे लागेल- मानवाच्या कल्याणासाठी, मानवी जीवन उज्ज्वलतेसाठी.
वृक्ष अनेक प्रकारचे असतात. कालौघात त्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या असल्या तरी आजही विविध वृक्ष जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. ‘वृक्ष आधी का मानव आधी’ या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, वा हा प्रश्न चूक की बरोबर हा वाद असो आजमितीस तरी दोन्ही परस्परांशी निगडित व अवलंबित आहेत. कसे ते पुढे पाहू. वृक्षांच्या असंख्य अनेकविध जाती असल्या तरी त्यांची जातीनिहाय राज्यं नाहीत हे सत्य. वृक्षांच्या सर्व जाती सर्व भागात आढळत नाहीत. विशिष्ट जाती विशिष्ट भागातच/ प्रदेशातच येतात, कारण तिथली/ तेथील भौगोलिक परिस्थिती, हवामान इ. इ. त्यांचे लागणीस व वाढीस पूर्णत: सुयोग्य असते. ही विशिष्ट हवामान स्थिती व भौगोलिक परिस्थिती अन्यत्र नसल्याने तेथे या विशिष्ट जातीचे वृक्ष येऊ शकत नाहीत आणि या वैशिष्टय़ामुळे ते ते प्रदेश त्या त्या वृक्षांचे नावे प्रसिद्ध होतात/ ओळखले जातात. जसे- कोकण, गोवा, केरळ, कर्नाटक इ. प्रदेश नारळ, ताडमाड, सुपारी, चंदन, आंबा, काजू यांसाठी प्रसिद्ध आहेत ते त्या त्या जातीच्या/प्रकारच्या वृक्षांसाठी. काही प्रदेश निलगिरी बांबू यासाठीही प्रसिद्ध आहेतच. वृक्ष अनेकविध प्रकारचे असले तरी ढोबळमानाने त्यांची वर्गवारी छाया वृक्ष व शोभा वृक्ष तसेच फळझाड वा फळवृक्ष व पुष्पवृक्ष अशी करता येईल. इंग्रजीत ती शोई ट्री व शेडी ट्री अशी करतात. आणखीही काही प्रकारे वर्गीकरण करता येणे शक्य आहे, जसे औषधी वृक्ष, विषारी वृक्ष, सुगंधी वृक्ष, उंच वृक्ष, बुटके वृक्ष, पर्णवृक्ष, फलवृक्ष, पुष्पवृक्ष, कणखर वृक्ष, इ. इ. वृक्ष आणि झाड हे तसे सर्व सामान्यांच्या दृष्टिकोनातून समानार्थी शब्द, पण वृक्ष हा शब्द तसा भारदस्त वाटणारा व सर्वसाधारणपणे मोठय़ा आकाराच्या झाडांकरता सर्वसामान्यत: वापरण्याचा प्रघात असलेला, तरी झाड हा शब्दही त्यांच्यासाठी प्रयोगी होतोच. ‘तरू’ हे आणखी एक संबोधन, तेही पण असेच भारदस्त. नाव/संबोधन भारदस्त असो वा नसो त्याचा वृक्षाच्या सर्वागी उपयुक्ततेत काही अडसर येत नाही. म्हणतात ना ‘नावात काय आहे?’ गुणातच सर्व आहे. वृक्षांना या शब्दखेळाशी काही देणेघेणे नाही. कोणताही वृक्ष मानवाचा शत्रू नाही. या उलट मानवच या अजातशत्रूंच्या जीवावर/ अस्तित्वावर उठला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखणारे हे वृक्ष कोणत्याही अपेक्षेचे भान ठेवणारे, पण भरभरून सर्वस्व देणारेच आहेत. वृक्ष त्यांचे अन्न जमिनीतून व श्वसन वातावरणातून घेतात/करतात. जमीन व आकाश यांच्यात उभा असलेला वृक्षदेह मात्र मानव व सर्व सजीवांसाठी उपयोगी पडतो.
संकटकाळी नेहमी मानव आसरा घेण्यासाठी ज्या घटकांकडे धाव घेतो अशांमध्ये वृक्षाचाही अंतर्भाव आहे.
वृक्ष मानवाला अनेक प्रकारे उपयोगी पडतात. वृक्षांपासून पाने, फळे, फुले तर मिळतातच; पण त्याचे अंगप्रत्यंग, जळाऊ सरपण ते घराच्या बांधकामापासून ते अगदी म्हातारपणाच्या आधार काठीपर्यंत असंख्य प्रकारे मानवाने वृक्षांचा जीवनात उपयोग केला आहे, करत आहे व करत राहील अव्याहतपणे. लहानपणाच्या पांगुळगाडय़ापासून ते थेट चितेपर्यंत वृक्ष मानवाला उपयोगी पडत साथ देत आहेत. वृक्षांचा उपयोग मानवाने विधायक ते विध्वंसक अशा सर्व कामांकरता केला आहे. संहारक/विध्वंसक कामाकरता जरी त्यांचा मानवाने उपयोग केला तरी वृक्षांनी त्यास ना हरकत घेतली वा आंदोलन केले. निसर्ग व वृक्ष यांचे असेच आहे. निसर्गाच्या सर्व मोसमांशी, ऋतुमानांशी हे वृक्ष सतत संघर्ष करत जगत असतात. निसर्गाचा प्रकोप झेलतात तसेच धरतीचाही. प्रसंगी ते यात उन्मळून पडतात.
सारे निसर्ग तांडव हे वृक्ष स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन करतात. त्यांची अंगे जलधारांनी भिजतात, वादळवाऱ्यात त्यांचे अवयव-फांद्या तुटतात तर भूकंपात ते अख्खे गाडले जातात- संजीवन समाधी घेतात. विजेचा लोळ अंग जाळून खाक करतो तर महापुरात मुळासकट वाहून जाऊन ते स्थानभ्रष्ट होतात. त्यांचे हे जीवन निसर्गाच्या कुशीत फुलत, बहरत व विलय पावत तसेच ते मानवाकडूनही याच चक्रातून जात. दोन विविध स्तरांशी हा त्याचा जीवनसंघर्ष सुरू असतो. कधी कधी वादळीवाऱ्यात त्यांच्याच फांद्या एकमेकांवर घासून वणवा उत्पन्न होऊन समस्त वृक्षसमूहच दग्ध होतो तसेच मानवही आग लावून त्यांचा विनाश करतात. वृक्ष त्यांचे जीवन या सर्वातून जगतात व मानव इतर सजीवांचे जगवतात.
वृक्षांचा आपण आधार घेतो पावसापासून तसेच कडक उन्हापासून बचाव करण्यास आणि त्यांच्या फांद्यांचे दहन करून शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्यास. त्यांच्या बुंध्याभोवती पार बांधून आपण विश्रांती/विसावा कट्टे निर्माण करतो तर त्यांच्या फांद्यांना झोपाळे टांगून उंच झोके घेतो. वृक्षतळी विसावा, निद्रा घेतात पांथस्थ, तर त्यांचे बुंध्याशी कधी कधी छोटी देवळी बांधून वा त्यांचे खोडावर खिळे ठोकून त्यावर देवांचे फोटो टांगून तर देवळीत देवाची मूर्ती वा फोटो ठेवून श्रद्धा/ पूजा यांचे स्थानही निर्माण करतो. अशा तऱ्हेने काही लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या खोडाचा आधार घेऊन गरीब तात्पुरते निवारा निर्मितात. काही जण वृक्षाखाली टपरीवजा दुकानेही थाटतात.
पुष्कळदा या वृक्षांच्या खोडावर नामपाटय़ा, फलक, दिशादर्शक बाण खिळे ठोकून लावतात. शहरात काही वृक्षांवर इलेक्ट्रिक शोभेच्या दीपमाळाही लावून वा लाऊडस्पिकर लावून सण/उत्सवांसाठी त्यांचा उपयोग करतात. काही प्रसंगी (निवडणुका इ.) त्यांच्यावर पक्षांचे झेंडेही लावतात. त्यांच्याखाली कधी सभा घेतात, तर कधी कीर्तन इ. कार्यक्रमही होतात. कधी त्यांच्या बुंध्याभोवती फरशा घालून छोटेसे अंगणही केले जाते. काही वेळा त्याखाली सतरंजी, पोती टाकून छोटी अस्थायी दुकानेही दिवसा असतात.
पांडवांनीही आपली शस्त्रे शमीवृक्षावर ठेवली होती लपवून. रामानेही हाच आडोसा करून वालीवर बाण सोडून त्याचा वध केला. सीताही अशोक वृक्षाखालीच राहिली होती इ. अनेक कथानके पुराणात वृक्षांशी संबंधित आहेत.
राम-रावण युद्धात तर वानरांनी वृक्ष उपटून त्यांनी राक्षसांवर हल्ला केला म्हणजे वृक्ष हे शस्त्र म्हणूनही वापरले जात. त्यावेळी मोठमोठे महाकाय वृक्ष उपटून त्यांचा शस्त्र म्हणून उपयोग करत असत.
वृक्षराजी/वने यांचासुद्धा मानवाने स्वत:स राहाणे/निवासासाठी वृक्षतोड व वृक्षदहन करून ती जागा वापरली आहे. खांडववन जाळून इंद्रप्रस्थ बसवले गेले ही गोष्ट महाभारतात आहे. आजही वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून ते निर्जीव करून नंतर ही लाकडे विकली जातात.
एक ना अनेक प्रकारे वृक्ष मानवाने त्याच्या जीवनात वापरले आहेत व आजही वापरत आहे. भविष्याचे सांगता येणे कठीण. कारण वनक्षेत्राची प्रचंड प्रमाणात झालेली हानी. वनक्षेत्र खूप कमी झाले आहे. ही चिंताजनक बाब आहे.
कसाही उपयोग केला मानवाने तरी वृक्षांनी कधी कसलीही तक्रार/ नाराजी व्यक्त केली नाही. नि:शब्दपणे अत्याचार सहन करणे तसेच परोपकाराचा कसलाही डंका न वाजविणे हा वेगळा वृक्षधर्म आहे. वृक्ष हे पाखरांचे आश्रयस्थान आहेत. तसेच काही सजीव प्राण्यांचेही. शाखामृग (वानर, माकडे) खार इ. इ. शिवाय अनेक छोटे-मोठे प्राणी वृक्षांवर राहतात, व ते वृक्षांची फळे, पाने, भक्षण करून गुजराण करतात. काही पक्षी वृक्षफांद्यांवर घरटी करतात तर काही वृक्षास- खोडास भोक पाडून अंतर्यामी वस्ती करतात. सुतार पक्षी हे करतात. पोपटही झाडांच्या/वृक्षांचय ढोलीत वसती करतात. अनेक कीटकसुद्धा वृक्षांवर जगतात, राहतात. मधमाश्यांचीही पोळी वृक्षांवर लटकत असतात. परस्परांचे शत्रू/ मित्र दोघांनाही वृक्ष थारा देतात, समानतेने वागवतात. आपल्या अंगाखांद्यावर. ‘‘ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतू॥’’ या पसायदानातील ओवीचे निसर्गाने दिलेले/ साकारलेले प्रत्यक्ष प्रमाण होय. तटस्थपणे, निर्विकारपणे राहण्याची ही वृत्ती हा महान गुण वृक्षांपासून शिकावा. सर्वाना आपले द्वार खुले ठेवतात हे वृक्ष. हाच गुण खरे संत सज्जन आचरणात आणतात. या अर्थाने वृक्ष हे जगन्मित्र आहेत. ‘‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारे॥’’ यासारखे वृक्षही जगाच्या कल्याणासाठी ‘‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’’ उपयोगी पडतात सर्व प्रकारे. राख झाली तरी राखही उपयोगी. इतके कल्याणकारी कार्य असते वृक्षांचे म्हणूनच, ते खरे जगन्मित्र.
वृक्ष फळे व पाने यांची उत्पत्ती, स्थिती व लय पाहणारे स्थितप्रज्ञ होत. चैत्रात येणारी नवी कोवळी हिरवी पालवी, फळाआधी येणारा मोहोर, फळे व शेवटी पक्व होऊन पडणारी फळे व शिशिर ॠतूत पिवळी होऊन झडणारी वा गळणारी पाने यांची कित्येक आवर्तने वृक्षास त्याच्या हयातीत पाहावी लागतात. हे पाहता पुढे तो वृक्ष वठतो. त्याचे जीवनमान संपते. सर्व अवस्थांमध्ये तो स्थितप्रज्ञ – भगवद्गीतेतील श्लोक ‘‘ सुखदु:खे समत्कृत्वा’’सारखा. भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञावस्थेचे हे उदाहरण होय.
कधी वृक्षांच्या फांद्या तुटतात, तर कधी थोडासा भाग जळून जातो, तर कधी थोडा भाग/ फांद्या मानवाकडून कापून टाकल्या जातात, ही सर्व चिन्हे वृक्ष अंगावर वागवतात व जगतात. सर्व वृक्षांचे आयुष्य सारखे नसते. तसेच एकाच जातीचे सर्व वृक्षही सारख्या आकाराचे नसतात जसे एकाच हाताची पाची बोटे सारखी नसतात. तसेच हे वृक्षांचे. वृक्षांचा शाखासंभार त्याचे विशालत्व, विस्तार याची निशाणी असते. काही वृक्ष सरळसोट उभे वाढतात तर काही डेरेदार असतात. वड हे त्यांपैकी एक उदाहरण आहे. याच्या पारंब्या मुळाकडे येऊन रुजतात व नवे नवे बुंधे त्याच्याभोवती निर्माण होऊन हा विराट रूपाचा होतो. ‘‘मोठे झालो तरी मूळ विसरू नका’’ असा संदेश जणू हा देत असतो. पिंपळ, चिंच, साग, आंबा यांसारखी झाडे महाकाय होतात. सर्वच वृक्षांना शाखासंभार नसतो. ताड माड (नारळ) यांसारखी झाडे सरळसोट तर कधी तिरपी, वेडीवाकडी परंतु बिनशाखेची उत्तुंग वाढतात. त्यांच्या शेंडय़ाला पर्णसांभर व फळे येतात, तर अशोकासारखे देवदार आदी वृक्ष निमुळते होत, पण पर्णसंभारांनी भरून वाढत जातात. मागे उल्लेखल्याप्रमाणे झाड ही संज्ञा केळी वगैरेंना वापरतात. त्यांना कोणी वृक्ष म्हणणार नाही. ही संज्ञा आपोआपच जनात रूढ होत जाते. वृक्ष व झाड कोठे वापरवावे हे शब्द याची निश्चित व्याख्या नसावी.
सागरी किनारा व त्यालगतच्या प्रदेशात नारळी-पोफळींच्या बागा तसेच आंबा, काजू, फणस आदींबरोबर पिंपळ, चिंच, वड, माड, काजरा, जांभूळ, करवंदे, इ. इ.चे वृक्ष (अनेक वृक्ष) येतात. ही सागरी दमट हवामानात वाढणारी वृक्षसंपदा. काही वृक्ष विषम हवामानात वाढतात. चंदनासारखे वृक्ष फार ठिकाणी येत नाहीत, तर निलगिरीच्या जवळपास सहाशे जाती आहेत ज्या वेगवेगळ्या भौगोलिक व नैसर्गिक वातावरणात वाढतात. दलदलीच्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष येतात तर राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात व लेह लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशात, हिमालयात वेगळ्या वृक्षांची वाढ होते. मी वनस्पतीशास्त्रज्ञ नाही, त्यामुळे प्रदेशनिहाय वृक्षांची यादी मला माहीत नाही. अर्थात तो वेगळाच विषय आहे त्यामुळे त्यास येथे विराम देतो. देवदार, साग, इ.इ.ची अशी घनदाट जंगले मी पाहिली आहेत. निलगिरीचेही जंगल असते. वड, पिंपळ यांसारखी वृक्ष प्रजाती सर्वत्र आढळते. असे काही वृक्ष सर्व तऱ्हेच्या वातावरणात वाढतात. भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाप्रमाणे यांची वाढ कमी-जास्त होऊ शकते, तसाच आकारही मोठा, मध्यम व खुजा असू शकतो.
काही वृक्ष बाभळीसारखे काटेरी असतात. प्रत्येक जातीच्या वृक्षांची पाने अगदी भिन्न आकाराची असतात. काही वृक्षांची पाने खूप मोठी तर काहींची अगदी लहान असतात. आकार, लांबी-रुंदी भिन्न असते. केळीची पाने, नारळाच्या झावळ्या, सागाची पाने, आंब्याची पाने, बदामाची पाने, चिंचेची पाने, वडाची व पिंपळाची पाने, इ. इ. पाहा किती वेगळी आहेत. पानांच्या या वैशिष्टय़ामुळे केवळ पानावरूनही वृक्ष ओळखता येतात. वृक्षांची पर्णसंपदा मानवाला विविध प्रकारे उपयोगी पडते ते पुढे पाहू या. दरवर्षी वृक्षांची पानगळ होते व नवीन पर्णसंभार निर्माण होतच असतो.
वृक्ष विविध प्रकारचे/ जातीचे असल्याने त्यांचे उपयोग वेगवेगळ्या प्रकारे मानवाने केले आहेत. सर्व वृक्षांचे औषधी उपयोगही आहेत. ‘‘नास्ति मूलम् अनौषधम्’’ या संस्कृत सुभाषितातील पंक्तीत हेच सांगितले आहे. आयुर्वेद हे औषधी शास्त्र याच वृक्षांच्या औषधी गुणधर्मावर आधारित आहे. काही वृक्ष पुष्पवृक्ष म्हणूनच ओळखले जातात. बकुळ वृक्ष, प्राजक्त वृक्षसारखे वृक्ष हे फुलांनी डवरून आले की आसमंतास सुगंधी करतात, तर गुलमोहोर, पळस आदी वृक्ष शोभायमान असा पुष्पसंभार धारण करून वातावरण चित्रमय, रंगमय करतात. रंगांची उधळण करणाऱ्या, सुगंधांची उधळण करणाऱ्या फुलांप्रमाणे झिंग आणणारी मोहवृक्षाची फुलेही असतात.
वृक्षांच्या पानांचे द्रोण, पत्रावळी, आसने अद्यापही उपयोगात आहेत. वृक्ष फळे विविध रसगुणांनी युक्त असतात. विविध चवींची, रसांची, रंगांची फळे विविध उपयोगाची आहेत व त्यापासून आज काय काय पदार्थ, रस आपण करतो हे सर्वज्ञात आहेच. वृक्षाचे शरीरही विविध उपयोगी पडते. चंदनवृक्ष तर त्याच्या शरीरी सुगंध असल्याने तोडले जातात ते अमोल शीतल, सुगंधी चंदनासाठी व चंदन तेलासाठी. सागासारखे वृक्ष हे तर उत्तम टिकाऊ इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. शिसवीसारखे वृक्ष, सुंदर, कलात्मक तसेच उत्तम टिकाऊ वस्तू करण्यासाठीचे लाकूड देतात, ज्यापासून उत्तम दर्जेदार फर्निचर, विविध कलामत्मक वस्तू तयार होतात. धावडा, खर हे वृक्ष उत्तम जळाऊ सरपण देतात. यांचे लाकूड जसे उत्तम जळाऊ सरपण देते तसेच त्यापासून दर्जेदार कोळसाही तयार करतात. फणसाचे लाकूड भक्कम मजबूत असते बांधकामात वापरण्यास. अनेक प्रकारचे उपयोग किती प्रकारच्या वृक्षांचे आहेत हा छोटय़ा प्रबंधाचा विषय होईल. येथे एवढेच नमूद करतो की वृक्ष रासायनिक, औषधी, अन्न, सुगंधी द्रव्ये, तेल, रस, खत, इ. देणारे एक समृद्ध भांडारच आहे निसर्गाचे.
वृक्ष हेसुद्धा आपणासारखेच रोगराईचे बळी ठरतात. बीरुड/ वाळवी लागून मोठमोठे वृक्षसुद्धा नाश पावतात. बांडगुळामुळेही मूळ वृक्ष क्षय पावतो. हे बांडगूळ म्हणजे एक दुसऱ्या जातीचा वृक्ष एखाद्या वेगळ्या जातीच्या वृक्षावर त्या मूळ वृक्षाचे शोषण करून वाढतो, परिणामी मूळ वृक्षवाढ खुंटते वा तो नष्ट होतो. मानवांमध्येही असे परोपजीवी लोक असतातच. काही वेळा एकापेक्षा अधिक बांडगुळे वाढतात. परावलंबित्वाने जगणारे हे वृक्ष- वृक्षजातीचेच शत्रू. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे. माणसेच माणसांची वैरी तसाच वृक्षच वृक्षवैरी हा प्रकार मानवी जीवनाशी साधम्र्य दाखवतो.
वृक्षांपासून जे लाकूड मिळते त्याचा एक उपयोग कुऱ्हाडीचा दांडा म्हणूनही होतो व हीच कुऱ्हाड वृक्षावर चालविली जाते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण यामुळे तर नाही ना आली? वृक्षांच्या लाकडांचा शस्त्रांमध्येही उपयोग होतो. रायफलचा दस्ता, गुप्ती, बाण, धनुष्य, इ.इ. कधी कधी याच वृक्षांच्या फांद्यांचा उपयोग माणसे आत्महत्येसाठी तर कधी कोणास फाशी देण्यासाठीही करतात. तर त्यांच्या बुंध्यात असलेल्या ढोलीचा उपयोग कधी लपण्यासाठी (मोठी असल्यास) तर कधी चोरवस्तू लपविण्यासही होतो. कोणी कसाही उपयोग केला तरी वृक्ष त्यास हरकत घेतात का? सर्वस्व अर्पणारे, कसलीही कधीही चौकशी न करता हे वृक्ष खरे दानशूर.
वृक्ष हे पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्यामुळे पक्ष्यांच्या कलकलाटापासून ते त्यांच्या सुरेल तानांचे सर्व संगीत हे ऐकतात. वृक्षांचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांचा संगीत व तालवाद्यांसाठी उपयोग तंबोरा, संवादिनी, सतार, इ. इ. वाद्ये करायला (सूरवाद्ये) वृक्ष उपयोगी पडतात. वृक्षांच्या पानांच्या पिपाण्या करून त्या वाजविताना मुलांना आपण पाहतोच, तसेच ढोल-ताशांसाठी ते वाजविण्याच्या काठय़ाही करतात. संगीतविश्वातही वृक्षांचे योगदान आहेच. त्यांच्या बिया, पाने, इ.चा उपयोग करून काही चित्रे व कलाकृती तयार करतात.
वृक्ष दिवसा हवेतील कार्बन डाय ऑक्साइड शोषून प्राणवायू सोडतात तर रात्री याउलट क्रिया त्यामुळे वृक्षातळी रात्री झोपलेल्यांना मृत्यू येतो असे म्हणतात. वृक्षाची सावली (डेरेदार वृक्षांची) मानवास व इतर सजीवांना उन्हापासून संरक्षण देते म्हणूनच कडक उन्हाळ्यात वृक्षातळी पांथस्थ व जनावरे विश्रांती घेतात तसेच पावसातही संरक्षणासाठी यांचा आश्रय घेतला जातो. वृक्ष वादळवारे, ऊन, थंडी, पाऊस सर्व सोसतात. वृक्षांचा आश्रय तपस्वी लोकसुद्धा घेतात. त्यांचे तळी बसून तपश्चर्या करतात. खेडय़ात तर शाळासुद्धा वृक्षतळी भरतात. वृक्ष सावलीचे छत्र ही त्यांची सजीवांवर मायाच म्हणावी लागेल. पक्ष्यांचा संसारच वृक्षांवर होतो, घरटी बांधून ते घरटी रिकामी पडेपर्यंत/ ओस पडेपर्यंत. त्यांची उत्पत्ती स्थिती व लय वृक्षावरच होते. त्यांच्या अंगाखांद्यावर हे पक्षी बागडतात. एका कवितेची ओळ ‘‘पाखरांची शाळा भरे पिंपळावरती’’ येथे आठवते. तसेच आणखी एका कवितेतील ओळ ‘‘गांवसीमेच्या वृक्षसावलीस, बसे कोणी पांथस्थ विसाव्यास’’ हीपण आठवते. अशी अनेक प्रत्ययकारी काव्ये/ कविता आहेत वृक्षांसंबंधी.
काही वेलीसुद्धा या वृक्षांच्या आधाराने वृक्षावर चढतात व वृक्षास लपेटतात, त्यांचीही शोभा वेगळीच. त्यामुळे वृक्षरूपही कधी कधी मोहक वाटते. कोकणात तर पावसाळ्याआधी असंख्य काजव्यांनी हे वृक्ष रात्रभर चमकतात. तर काही वृक्षांचे लाकूड रात्री स्वयंप्रकाशी असल्याने चमकते.
वृक्षांचे महत्त्व संतांनीही जाणले होते. प्राचीन काळी तपस्वी, ऋषी-मुनी घनदाट जंगलात आश्रम उभारून वास्तव्य करीत. त्यांना ‘तपोवन’ म्हणत. आपल्या संस्कृतीतही ‘वानप्रस्थाश्रम’ सांगितला आहे. वयाच्या ५० ते ७५ वर्षे कालावधीसाठी ज्यात अरण्यात वास करून राहण्याचा संदेश आहे. पुराणात तसेच महाभारतात काही त्या वेळची महावने उल्लेखलेली आहेत ज्यात श्रीकृष्णाने, पांडवांनी व अन्य महात्मे, संत, तपस्वी यांनी वास्तव्य केले होते. ही महावने राजेमहाराजे वन्यप्राणी शिकारीसाठी वापरत, तसेच वनविहारासाठी. स्वच्छ सूर्यप्रकाश नैसर्गिक कंदमुळे फळफळावळे, शुद्ध हवा, पाणी, निर्झरांचे झुळझुळ वाहणारे प्रवाह. पशुपक्ष्यांचे आवाज इ. इ.मुळे मन-तन प्रसन्न ताजेतवाने होत असे. वृक्षांची अमाप संख्या असलेली ही वने मानवाला वरदान होती. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय १२ तला श्लोक १८ असा :-
‘‘सम:शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:॥
शीतोष्णसुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:॥’’
अर्थ : ‘‘जो शत्रू मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी- ऊन, सुख-दु:ख इत्यादी द्वंदात ज्याची वृत्ती सारखीच राहते’’ असा स्थिर बुद्धीचा भक्तिमान परमेश्वराला (श्रीकृष्णाला) प्रिय असतो. यावरील भाष्यात ज्ञानेश्वरीत अ. १२, ओवी ९९ अशी आहे :-
‘‘जो खांडावया घावो घाली।
कां लावणी जयाने केली।
दोघा एकचि साउली।
वृक्षु दे जैसा॥’’
म्हणजे आपणास तोडण्यासाठी घाव घालणाऱ्यास तसेच आपली लागवड करणाऱ्यास, दोघांनाही वृक्ष/ झाड सारखीच सावली देते.
संत नामदेवांचाही असाच दृष्टिकोन त्यांच्या एका भजनात आहे. ते भजन असे :- (यात त्यांनी खऱ्या साधुसंतांची वृक्षाशी तुलना केली आहे.)
‘‘जैसा वृक्ष नेणे मान- अपमान।
तैसे ते सज्जन वर्तताती।
येऊनियां पूजा प्राणी जे करिती।
त्याचे सुख चित्तीं तया नाही।
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।
तया न म्हणती छेदूं नका।
निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैयवंत साधु ऐसे।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी।
जीवा शिवा गाठी पडुनी जाय॥’’
देवांनाही वृक्ष प्रिय होते. भगवद्गीतेतल्या १५ व्या अध्यायात वृक्षाची उपमाच या संसाराला दिली आहे. संसाराला संसाररूप वृक्ष म्हटले आहे. तो श्लोक क्र. १ व २ असा आहे :
‘‘उध्र्वमूलमध:शाखामश्वस्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित॥१॥
अधश्चोध्र्व प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवाला।
अधश्व मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके॥२॥’’
अर्थ :- आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या बह्मदेवरूपी मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वस्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वत: जाणतो, तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे.॥१॥
त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत, तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहंता- ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.॥२॥
एकंदरीत फार पूर्वीपासून वृक्षमाहात्म्य आहे. देवदेवतांनाही वृक्ष प्रिय आहेत. विशिष्ट देवतांना / देवांना विशिष्ट वृक्ष प्रिय आहेत. त्यामुळे काही वृक्ष पूजनीय वंदनीय झाले आहेत. भगवान विष्णू पिंपळवृक्षात वास्तव्य करतात. शिवशंकराला बेलाची पाने प्रिय आहेत. रुई वृक्ष मारुतीला व शनीला प्रिय, अशोकवृक्ष कामदेवास प्रिय, आवळ्याचा वृक्ष विष्णूस प्रिय, औदुंबर दत्तास प्रिय, वटवृक्ष सौभाग्यकारक, ब्रह्मतेजप्रतीक पळसास मानतात. एका पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या शापाने विष्णू ‘अश्वस्थ’, शंकर ‘वड’ तर ब्रह्मदेव ‘पळस’ झाले. ‘पळसाला पाने तीनच’ अशी म्हण प्रचलित आहे. मधल्या पानात विष्णू, डाव्या पानी ब्रह्म व उजव्या पानात शिव असतात. सर्व वृक्षांत पलाश वृक्ष (पळस वृक्ष) श्रेष्ठ आहे, म्हणून मौंजीत बटूला पलाश दंड देतात. तुळस विष्णूस प्रिय. चंदनाचे गंध देवांना प्रिय असल्यामुळे त्याशिवाय पूजा होतच नाही.
आपटय़ाच्या झाडावर/ वृक्षावर कुबेराने सुवर्णमोहोरांचा वर्षांव केला म्हणून दसऱ्याला आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटतात. ही प्रथा अजून आहे. आम्रवृक्ष मंगल म्हणून त्याची पाने मंगल तोरणात व कलश पूजेत वापरतात. नारळ हा तर श्रीफल म्हणून अत्यावश्यक. आम्रमंजिरीही अशाच. त्या देवांना वाहण्यास वापरतात. सुपारी तर पूजेत व ओवाळणीत मानाच्या स्थानाची. सुपारीलाच गणपती म्हणूनही पूजतात. श्रीगणेशांना शमीपत्री प्रिय. मंदारवृक्ष म्हणजे गणेशउत्पत्तिस्थानच. असे सांगतात एकवीस वर्षांनंतर मंदारमुळाशी गणेशमूर्ती तयार होते त्यास मंदार गणेश म्हणतात. रुद्राक्ष तर सर्वत्र पूजनीय व धारण करण्यास सुयोग्य. हे रुद्राक्ष शिवभक्तांना जणू चिंतामणीच. हे जपमाळेत वापरतात. रुद्राक्षजपमाळ सर्वश्रेष्ठ मानतात. तुळशीची माळ वारकऱ्यांना/ वैष्णवांना प्रिय. अनेक प्रकार आहेत. हे वृक्ष उपयोगाचे वानगीदाखल थोडे वर्णन केले आहेत. सगळेच वृक्ष पूजनीय, वंदनीय, देवदेवताप्रिय नाहीत. त्यांच्यातही आवडते नावडते आहेतच.
देवदेवतांनाच नव्हे तर भूतपिशाच्च योनींनाही वृक्ष/ काही वृक्ष आवडतात व त्या त्यावर वास करतात असा समज आहे. कोकणात हे प्रमाण समजाचे अधिक आहेत. त्यातल्या त्यात त्यांना म्हणे असुर/ दानव व मानव सर्वाचेच आश्रयस्थान तसेच अन्य सजीव पशुपक्ष्यांचेही.
समुद्रमंथनातून ‘कल्पवृक्ष’ निघाला असे पुराणे सांगतात. जे जे हवे ते ते देणारा आज पृथ्वीतलावर कोठेच नाही दिसत. तो देवलोकात नेला असे पुराणात आहे. मग पृथ्वीवरच कोठे नारळाला तर कोठे कडुनिंबाला कल्पतरू संज्ञा देतात. केरळमध्ये ‘रबर’ देणारे वृक्ष उपजीविकेचे साधन. चंदनवृक्ष देवपूजेसाठी गंधाकरता वापरतात त्याचे लाकूड. त्याचे खोड घासून गंध करतात म्हणून सज्जनांना/ सत्पुरुषांना आपण चंदनवृक्षाची उपमा देतो. अनेक प्रकारे समाजसेवा करणाऱ्या व आधार देणाऱ्या सज्जनास आधारवड म्हणतो ते या वृक्षाचे गुण प्रत्यक्ष आचरणारे म्हणूनच. हल्ली वृक्षांमध्येही संकरित करून वेगळ्या प्रकारचे गुणधर्माचे वृक्षनिर्मिती प्रयोग सुरू आहेत. त्यातून निष्पन्न काय? काळच ठरवेल. ‘‘कालाय तस्मै नम:॥’’
पंचांगातही जन्मनक्षत्रानुसार आराध्य वृक्ष दिले आहेत. यांना नक्षत्र वृक्ष म्हणतात. ते येणेप्रमाणे :-
१ अश्विनी कुचला
२ भरणी आवळी
३ कृत्तिका उंबर
४ रोहिणी जांभळी
५ मृग खर
६ आद्र्रा कृष्णागरु
७ पुनर्वसु वेळू
८ पुष्य पिंपळ
९ आश्लेषा नागचाफा
१० मघा वट
११ पूर्वा पळस
१२ उत्तरा पायरी
१३ हस्त जाई
१४ चित्रा बेल
१५ स्वाती अर्जुन
१६ विशाखा नागकेशर
१७ अनुराधा नागकेशर
१८ जेष्ठा सांबर
१९ मूळ राळ
२० पूर्वाषाढा वेत
२१ उत्तराषाढा फणस
२२ श्रावण रुई
२३ धनिष्ठा शमी
२४ शततारका कळंब
२५ पूर्वाभाद्रपदा आम्र
२६ उत्तरभाद्रपदा कडुनिंब
२७ रेवती मोह
आजही श्रीकृष्णाचे वटपत्रावर अंगठा चोखत पडलेले बालरूपाचे चित्र पाहतो. वटपौर्णिमेला वडांना दोरा गुंडाळून महिलांच्या द्वारे पूजन पाहतो, आवळी भोजन पाहतो. आजही श्रीक्षेत्र आळंदी येथील सोनियाचा पिंपळ, अजानवृक्ष (ज्याखाली बसून ज्ञानेश्वरी वाचली तर अर्थ कळतो अशी लोकांची श्रद्धा आहे), गयेचा बोधीवृक्ष हे प्रसिद्ध आहेत.
पूर्वी माणसे आपल्या आयुष्यात काही फळवृक्ष लावून जात जे पुढील पिढीला ती तारुण्यात येई तेव्हा उपयोगी पडत (उदा. आंबा, फणस, इ. इ.). त्यांच्या जवळ दूरदृष्टी व कर्तव्यभावना होती आज परिस्थिती वेगळीच आहे. पूर्वी दंडकारण्य, खांडववन अशा महान वनराया/ वृक्षराजी होत्या. वृक्षांवर देव, संत यांनी प्रेम केले आहे. प्रेमी लोकसुद्धा भेटण्यासाठी वृक्षातळी वाट बघत. काही वृक्षांच्या सालीसुद्धा ग्रंथलेखनासाठी वापरल्या गेल्या आहेत. विविध प्रकारे हे वृक्ष मानवास ‘‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’’ उपयोगी पडत असतात.
आज मात्र विपरीत चित्र/ परिस्थिती आहे. पूर्वजांची दूरदृष्टी नाही- वृक्षलावणी व वृक्ष संगोपन, वर्धन याची. केवळ हव्यासापोटी मानवाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली. अनेक अरण्ये नष्ट झाली, होत आहेत. त्यामुळे पर्जन्यमान घटले, जमिनीची धूप प्रचंड प्रमाणात झाली जी वृक्षांमुळे थांबत असे. जमिनीचे वाळवंटात रूपांतर होऊ लागले. पर्यावरण तोल गेला. दुष्काळ पडू लागला. जनावरे, पक्षी यांचे आश्रयस्थान गेले. काही प्रजाती नष्ट झाल्या तर काही त्या वाटेवर आहेत. मानवाने आपल्या हाताने आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतली. फार फार उशिराने हे लक्षात आले, आणि मग ‘‘वने वाचवा, वाढवा, लावा’’ अशी हाकाटी व क्रांतिपर्व सुरू झाले. पर्यावरण चळवळ जोर धरू लागली. ‘चिपको’सारखे आंदोलन उभे राहिले. अनेक चळवळी उभ्या राहिल्या व जोर धरू लागल्या. परिणामी नवे वनसंरक्षक, कायदे योजना सुरू झाल्या, पण हे उशिरा का होईना सुचलेले शहाणपण आहे. या सर्व योजना, कायदे यांचा वापर कसा केला जातो प्रभावीपणे हे एक प्रश्नचिन्ह. त्यामुळे त्या सर्वाचे फळ किती मिळते व त्यासाठी किती कालावधी लागेल याचे उत्तर मिळणे कठीण. शिवाय गरजा व उपलब्धता यांचे प्रमाण अति व्यस्त आहे ते एकदम कमी होणार नाही. कायदे योजना यांची भ्रष्टाचारामुळे अंमलबजावणी कितपत यशस्वी होईल व ती कितपत प्रभावी ठरेल याची शंका आहेच. जनमानसात वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण व वृक्षपालन ही संस्कृती रुजली तरच हे शक्य आहे. नुसती जनजागृती नको तर सक्रिय जनसहभाग हवा तरच या योग्य गोष्टींचे/ उद्देशांचे फळ मिळेल. अन्यथा ‘‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’’ असेच चित्र दिसेल. आज काँक्रीट जंगल अधिवासी मानव वृक्षांचा मित्र खऱ्या अर्थाने कितपत होईल? ही कठीण गोष्ट आहे. कारण मानवाची शहरी जीवनप्रणाली वृक्षांविषयी उदासीनच आहे. केवळ वीकेण्डला पार्कमध्ये जाणे एवढेच त्यांच्या प्रवृत्तीत असते.
वृक्षांचे महत्त्व खेडोपाडीच्या लोकांना पटवून त्यांच्या सक्रिय सहभागानेच वृक्षवर्धन चळवळ जोर धरेल. वनराजीचा नाश केल्याने होणारे दूरगामी दुष्परिणाम पटवून देऊनच त्यांना वृक्षलागवडीसाठी प्रवृत्त करावे लागेल. कोणत्या प्रदेशात भौगोलिक परिस्थितीनुसार कोणते वृक्ष लावणे योग्य याचा (जमिनीचा पोत, पर्जन्यमान, हवामान) सम्यक अभ्यास करून तसे करणेच श्रेयस्कर.
वनराईचे वाढत्या शहरी आकाराने आकुंचन होत आहे, त्याला पर्याय शोधावा लागेल. तसेच कारखान्यांचे प्रदूषणही थांबवणे गरजेचे आहे. नवीन वनराया सुनियोजित पद्धतीने तयार कराव्या लागतील, तसेच जुन्या नष्ट झालेल्या व त्या मार्गाव्र असलेल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल. नुसते वृक्षारोपण नव्हे तर त्याचे संवर्धन/ पालन व संरक्षण अमलात आणावे लागेल. निसर्गप्रेमी संस्था, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, वृक्षप्रेमी यांनी एकत्र येणे व त्याचबरोबर सरकारनेही द्रव्यनिधी, भूखंड, मनुष्यबळ व अन्य सर्व मदत पुरविणे गरजेचे आहे. यासाठी एखादा मास्टर प्लॅन दीर्घ कालावधीचा करावा लागेल व त्याची सक्षम भ्रष्टाचारमुक्त कारवाई/कार्यवाही करावी लागेल तरच वने वाढतील, वृक्ष वाढतील, पर्यावरण तोल सावरेल व मानवी जीवन सुखी, समृद्ध होईल. लेखान्ती एवढेच म्हणेन ‘‘वृक्षांनी अंधकार संपून उष:काल येऊ घातलाय. लवकरच तो येवो, सूर्योदय होवो व परत पुन्हा घनदाट वनराया प्रफुल्ल स्वरूपात दिसोत, अरण्ये समृद्ध होवोत वृक्षराजीने’’ हा विश्वास व्यक्त करून हा लेख तुम्हाला व वनदेवतेला अर्पण करतो. इत्यलम्.
आचार्य वसंत गोडबोले – response.lokprabha@expressindia.com