मोबाइल ही आता गरज नाही तर अपरिहार्य गरज झाली आहे. तरुण पिढीपेक्षा ज्येष्ठ नागरिक मोबाइलच्या माध्यमातून व्यक्त होण्याचं जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं नवं स्वातंत्र्यपर्वच आहे.

नेहमीप्रमाणे गजर होतो. दोन-तीनदा तो गजर स्नूज केल्यानंतर खऱ्या अर्थाने सकाळ होते. प्रथा असल्यासारखं वायफाय सुरू केलं जातं. व्हॉट्स अ‍ॅप सुरू केल्यानंतर साधारण नऊ-दहा चॅट्स आणि ८०-९० मेसेजेस असतात. यातले सहा ते सात ग्रुप्स नातेवाईकांचे असतात. तर उरलेले दोनेक ग्रुप्स मित्रपरिवाराचे. खरं तर त्या गजरने जाग आली नाही तरी सकाळ झाली हे कळतं ते या फॅमिली ग्रुप्सवर आलेल्या ‘शुभ सकाळ’, ‘सुप्रभात’, ‘गुड मॉर्निग’, ‘आजचा सुविचार’ अशा मेसेजेस आणि ते सूचित करणाऱ्या फोटोंमुळे. असे मेसेज, फोटो पाठवणाऱ्यांमध्ये आई, वडील, काकू, मावशी, आत्या, मामा, आजोबा, आजी असे या पिढीचे अनेकजण असतात. मग अशा मेसेजेसमध्ये कधीतरी संकष्टी चतुर्थी, पौर्णिमा, अमावास्येच्या शुभेच्छाही असतात. कधी कधी तर ‘हॅपी वीकेण्ड’ आणि ‘हॅपी सण्डे’ अशा शुभेच्छांचाही त्यात समावेश असतो. तरुण पिढीला या सगळ्या प्रकाराचा काही अंशी त्रास होत असला तरी त्यांच्या आधीच्या पिढीचं म्हणजे मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांचं ते व्यक्त होण्याचं माध्यम आहे. अशा माध्यमांवर व्यक्त होण्याचं त्यांचं स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगताना दिसून येत आहे.

स्वातंत्र्याच्या व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जातात. बोलण्याचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य असं अनेक प्रकारचं स्वातंत्र्य लोकांना आहे. जो तो आपापल्या परीने त्याचा उपभोगही घेत असतो. बोलण्याचं म्हणजे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगताना मात्र काहीसा विचार केला जातो. यात त्या-त्या व्यक्तीच्या स्वभावाचाही मुद्दा येतो. प्रत्येकालाच व्यक्त होण्याची इच्छा असते. आवडनिवड, पटणं-खटकणं, योग्य-अयोग्य काय ते सांगणं असं सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटत असतं. पण सगळ्यांनाच ते पूर्णपणे जमतंच असंही नाही. काहींना अनेकांसमोर थेट बोलण्याचा संकोच वाटतो तर काहींना बोलण्यापेक्षा लिहून व्यक्त होणं सोयीचं वाटतं. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगणं मोबाइलमुळे आणखी सोयीस्कर झालंय. इथे कोणाही समोर न जाता व्यक्त होण्याची संधी मिळते. मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक याच संधीचा फायदा घेतात. मग ते साधं ‘गुड मॉर्निग’ असेल किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ हेही असेल.

मध्यमवयीन वैभव जोशी व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक ही माध्यमं वापरायला शिकण्यामागचं कारण सांगतात. तसंच आजच्या जगात वावरताना हे माध्यम फायदेशीर असल्याचंही ते स्पष्ट करतात. ‘‘पूर्वीच्या काळी आपण एकमेकांच्या घरी जायचो. तेव्हा आजच्या इतकी गर्दी नसायची. तेव्हा एकमेकांना भेटायला वेळ असायचा आणि वाहतुकीचा आजसारखा खटाटोपही नव्हता. आज जीवन गतिमान झाले आहे. वेळ कमी झाला आहे. अशा वेळी एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा कनेक्टिव्हिटीचा योग्य मार्ग उपलब्ध होतो. यात सगळ्यांचाच वेळ वाचतो. प्रत्येकाच्या वेळेनुसार ते आपापल्या मोबाइलमध्ये आलेले मेसेजेस वाचतात. एकाच वेळी अनेकांसोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येतात, घरगुती कार्यक्रम, सहलीचं नियोजन करता येतं. वयस्कर मंडळींना फरसा प्रवास करता येत नाही. अशांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे सगळ्यांना भेटता येतं. कुठल्याही बातम्या त्वरित पाठवता येतात. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक या माध्यमांमुळे परदेशी गेलेल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहता येतं. त्यांचे फोटो, व्हिडीओ बघता येतात. रितं घर, रितं मन गोकुळगत भरतं आणि एकटेपणा दूर होतो. म्हणून मी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, स्काइप शिकलो. हे सगळं करून एक नवी उमेद मिळते.’’

या माध्यमांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन पिढी वेगवेगळ्या पातळीवरचं स्वातंत्र्य उपभोगत आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, जुने मित्रमैत्रिणींशी बोलण्याचं स्वातंत्र्य, त्यांची स्वत:ची एखादी कलाकृती सादर करण्याचं स्वातंत्र्य, हवी ती कलाकृती बघण्याचं स्वातंत्र्य, नवीन गोष्टी शिकण्याचं स्वातंत्र्य असा सगळ्याचा आनंद ते घेतात. पूर्वी न केलेल्या गोष्टी आता करता येतील असं एक खुलं व्यासपीठ या माध्यमांच्या निमित्ताने या पिढीला उपलब्ध झालेलं आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हळी मध्यमवयीन आणि वयस्क पिढीच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या वाढत्या वापरासंबंधी अधिक विस्तृतपणे सांगतात. ‘वयस्क आणि मध्यमवयीन पिढीला नवनवीन शिकण्याची उत्सुकता असते. उत्सुकता आणि कुतूहल यामुळे ही पिढी समाजमाध्यमांचा वापर कसा करायचा ते शिकत असते. शिवाय यात माध्यमाचा उपभोग (मीडिया कन्झम्पशन), माध्यमातला संवाद (मीडिया कम्युनिकेशन) आणि माध्यमाचा दुरुपयोग (मीडिया अब्युज) असे तीन वर्ग आहेत. व्हीडिओ बघणं, एखादी पोस्ट शेअर करणं, एका ग्रुपमधून आलेला एखादा मेसेज दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवणं हे माध्यमाचा उपभोग यामध्ये येतं. निरोप देणे, गप्पा मारणे, मत नोंदवणे हे माध्यमातला संवाद यात येतं. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा तत्सम माध्यमांवर अवलंबून राहणे, विकृत व्हीडिओ बघणं, विकृत छंदांमध्ये वाहत जाणे हे माध्यमाचा दुरुपयोग यामध्ये येतं. या तिन्ही वर्गापैकी माध्यमाचा उपभोग या वर्गामध्ये दिसून येणारं स्वरूप या पिढीमध्ये अधिक आहे. या पिढीमध्ये माध्यमाचा दुरुपयोग होताना दिसत नाही. ही सकारात्मक बाब आहे’, असं मध्यमवयीन आणि वयस्क पिढीच्या मोबाइलच्या वापराबद्दल डॉ. कुल्हळी सविस्तर वर्गवारी करून सांगतात.

एखाद्या मध्यमवयीन व्यक्तीला विशिष्ट गोष्टीवर स्वत:चं मत द्यावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं, एखादा प्रस्ताव मांडावासा वाटू लागला तर त्यात गैर काहीच नाही. त्यांच्या हातात आता मोबाइल आहे. त्यातून व्यक्त होणं हा त्यांच्या स्वातंत्र्याचाच एक भाग आहे. या मोबाइल वापरकर्त्यांमध्ये आताच्या तरुण पिढीच्या आधीची पिढीही समाविष्ट आहे. म्हणजे चाळीशी-पन्नाशीपुढची मंडळी. थोडक्यात, काहींच्या घरातले आजी-आजोबाही यात दिसून येतात. समाजमाध्यमांमध्ये सक्रिय असणं ही काही ज्येष्ठ नागरिकांची सध्याची गरज आहे. त्यांची मुलं शिक्षण-नोकरीनिमित्ताने घरापासून दूर राहत असल्यामुळे सतत त्यांच्या संपर्कात राहणे ही त्यांची गरज असते. तर काही वेळा ज्येष्ठ नागरिक असले तरी त्यांची छोटी-मोठी कामं सुरूच असतात. त्या कामासाठी अशा माध्यमांचा वापर करणं त्यांना आवश्यक आणि सोयीचं असतं. त्यांच्या कामात व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाचा उत्तम उपयोग होत असल्यामुळे ते माध्यम त्यांच्या अधिक जवळच झालंय. त्यामुळे गरज म्हणून सुरू झालेला हा मोबाइलचा खेळ आता मात्र सवयीचा झाला आहे. या सवयीचा अनेकांना चांगला फायदा होतोय. मोबाइल वापरण्यामध्ये मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, युटय़ुब, चॅनल्सचे अ‍ॅप्स, गेम्स असं सारं काही येतं. सगळेच सगळं वापरत असतील असं नाही. व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास अतिशय सोपं असल्यामुळे ते वापरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.

सुहास पटवर्धन भिक्षुकी करतात. काही ठिकाणी पूजेसाठी अनेक भटजींची आवश्यकता असते. अशा वेळी सगळ्यांनी एकच वेळ ठरवून एकमेकांशी संपर्क साधत विशिष्ट ठिकाणी पोहोचणं गरजेचं असतं. अशा वेळी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपचा खूप फायदा होत असल्याचं ते सांगतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरायला खरंतर एक निमित्त ठरलं होतं. मी भिक्षुकी करत असल्यामुळे एकदा एका ठिकाणच्या पूजेबद्दल मला अनेकांना सांगायचं होतं. त्यावेळी मी सगळ्यांना फोन करत होतो. त्यावेळी माझा भाचा अमितने मला ‘असे सगळ्यांना वेगवेगळे फोन करत बसण्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप तयार करून त्यात सगळ्यांना एकाच वेळी निरोप दे’ असं सुचवलं. सुरुवातीला मला ते काही कळलं नाही. पण, नंतर त्याने सगळं शिकवलं. मलाही ते आवडलं. त्यात खूप वेळ वाचतो हेही माझ्या लक्षात आलं. नंतर मात्र ते अगदी सोपं वाटू लागलं. माझा मुलगा, सून आणि नात कतारला असतात. त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी मला फेसबुकवर माझं अकाऊंट सुरू करून दिलं. फेसबुकचाही मला माझ्या कामासाठी खूप उपयोग होतो. माझ्याकडे ज्यांचे फोन नंबर्स नाहीत पण, त्यांना विशिष्ट धार्मिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाबद्दल सांगायचे आहे त्यांना मी फेसबुकद्वारे संपर्क करू शकलो. पूर्वी ज्याच्याकडे पूजा असायची त्याला त्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी कुरिअर करावी लागायची. काही वेळा फोनवर सांगावी लागायची आणि ती तो लिहून घ्यायचा. पण, आता व्हॉट्सअ‍ॅपवर ती यादी पाठवली तर समोरच्या व्यक्तीलाही ते सोयीचं होतं. फेसबुक, व्हॉट्समुळे मी माझ्या मुलगा-सुनेशी केव्हाही बोलू शकतो. नातीचे फोटो बघू शकतो. फोटो, व्हीडिओंची देवाणघेवाण होत असते’, असं ६१ वर्षीय सुहास सांगतात.

मोबाइलचे हे नवे वापरकर्ते आता हळूहळू युटय़ुब आणि चॅनल्सच्या अ‍ॅप्सकडे वळू लागलेत. संध्याकाळी सात ते रात्री अकरा असं टीव्हीसमोर मालिकांची साखळी बघत बसण्याचा काहींचा रोजचा ठरलेला कार्यक्रम. त्यातली एखादी मालिका चुकली तर दुसऱ्या दिवशी दाखवल्या जाणाऱ्या रिपीट टेलिकास्टपर्यंत थांबावं लागायचं. पण, आता तेही सोपं झालंय. युटय़ुब आणि काही चॅनल्सच्या अ‍ॅप्समुळे हवं तेव्हा हवा तो एपिसोड बघणं शक्य झालंय. याबद्दल डॉ. कुल्हळी सांगतात, ‘पाच-दहा वर्षांपूर्वी या पिढीचं टीव्ही बघणं वाढलं होतं. त्यावेळी याचा घरातील इतर सदस्यांना त्रास व्हायचा. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रमाणामुळे आणि त्यात होणाऱ्या चांगल्या बदलांमुळे ज्येष्ठ नागरिक आता स्मार्टफोनचा पुरेपूर वापर करतात. त्यासोबत इअरफोन तर आहेच. त्यामुळे त्यावर सुरू असणाऱ्या व्हीडिओचा आवाजही मोठा नसल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होण्याचा प्रश्नच नाही.’ काही वयस्कर जोडप्यांची अडचण काहीशी वेगळीच असते. काहींना फक्त मुलीच असतात. त्यामुळे त्यांची लग्न झाली की फक्त ते जोडपं त्या घरात राहतं. त्यांच्या मुली काहीसं लांब राहत असल्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला, त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीच नसतं. अशा वेळी त्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना व्हॉट्सअ‍ॅपचा आधार मिळतो. सुचेता नातू ७३ वर्षांच्या आहेत. त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. तसंच त्यांना खालीही बसता येत नाही. दुसऱ्या कानाने थोडं कमी ऐकू येतं. असं सगळं असतानाही वयाच्या ७३ व्या वर्षी त्या व्हॉट्सअ‍ॅप वापरायला शिकल्या. त्यांना तीन मुली आहेत. तिघींची लग्नं झाली आहेत. त्यामुळे त्या घरी एकटय़ाच असतात. पण, व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्याने त्यांच्या तिन्ही मुलींना त्यांच्याविषयीची माहिती सतत मिळत असते. घरात एकटय़ा राहत असूनही त्यांना एकटं असल्यासारखं वाटत नाही, असं त्या सांगतात. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर आता काही ग्रुप्सही झाले आहेत. कॉम्प्युटरवर फेसबुक आणि मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप वापरताना त्यांना आनंद मिळतो.

या पिढीला त्यांच्या तरुणपणी मोबाइलसारखी माध्यमं उपलब्ध नव्हती. सहजपणे एकमेकांना निरोप देणं शक्य नसायचं. एखाद्या घटनेबद्दल स्वत:चं मत मांडण्याचं तितकंसं स्वातंत्र्य तेव्हा नव्हतं. कारण तेव्हा व्यक्त होण्याची माध्यमं मर्यादित होती. पण, आता चित्र बदललंय. त्यांच्या तरुणपणी न मिळालेलं माध्यम त्यांना आता उपलब्ध होत असल्यामुळे ते विविध प्रकारे व्यक्त होताना दिसतात. ७३ वर्षांचे अशोक दीक्षित नेमकं याबद्दलच बोलतात. स्मार्टफोनच्या सोयींचा बहुपयोग ते पटवून देतात. ‘आमच्या पिढीला मोबाइल, सोशल मीडिया याबद्दल उत्सुकता आहे. हे संपर्काचे वेगवान साधन आहे. पोस्ट कार्डनंतर आलेली टेलिफोन, कॉम्प्युटर अशी माध्यमं आम्ही हाताळली. आता स्मार्टफोन हा केवळ संपर्क माध्यम नसून विविध उपयोगी आहे. बँकेचे व्यवहार, कॅमेरा, टॉर्च, फोटो गॅलरी असा बहुपयोगी स्मार्टफोन उत्तमच आहे. सोशल साइट्स हा अनेकांशी एकाच वेळी संदेशाची देवाणघेवाण, आपले मत मांडण्यात, व्यक्त होण्यास उपयोगी असा उत्तम मार्ग आहे. विशेषत: अनेकांना एकाच वेळी निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या ग्रुपवर संदेश देणं हे अतिशय सोयीस्कर आहे. कधीकधी वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या याहीपेक्षा वेगाने हे माध्यम काम करतं. सध्याच्या धावपळीच्या जगात कोणाला वेळ नसतो. अशा वेळी आम्ही वयस्कर मंडळी आमच्या मुलाबाळांच्या, मित्रमंडळींच्या, संपर्कात राहू शकतो. विशेष म्हणजे आमची नातवंडं आमच्यापेक्षा सक्षमतेने ही माध्यमे हाताळताना पाहून आम्हालाही हुरूप येतो. वेगवेगळ्या प्रकारची माहिती, तंत्रज्ञान, वाङ्मयीन-धार्मिक विचारांची देवाणघेवाण व्हॉट्सअ‍ॅपवर होत असते.’

मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समाजमाध्यमं वापरण्याच्या वाढत्या प्रमाणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. यामध्ये नकारात्मक  गोष्ट मोठय़ा प्रमाणावर दिसून येत नाही. पण झोप न लागणं, औषधांच्या वेळा चुकवणं, जेवणाची वेळ न पाळणं, तब्येतीकडे दुर्लक्ष होणं अशा किरकोळ नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. तसंच यापुढे सायबर क्राइम करणारे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करू शकतात. हा धोकाही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, असं डॉ. कुल्हळी नमूद करतात.

नातेवाईक, मित्रपरिवारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सतत बोलत असल्यामुळे या पिढीचा एकटेपणा कमी होतो. मानसशास्त्रीयदृष्टय़ा हे खूप उपयोगी आहे. कंटाळा आला की गाणी ऐकणं, नातवंडांचे फोटो, व्हीडिओ बघणं हा या पिढीचा विरंगुळा आहे. तसंच इतर अ‍ॅपपेक्षा व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरण्यास अतिशय सोपे आहेत. तरुण पिढीमध्ये माध्यमाचा दुरुपयोग जास्त बघायला मिळतो. पण, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन लोकांमध्ये माध्यमाचा उपभोग आणि माध्यमातला संवाद हे दोन वर्ग प्रामुख्याने बघायला मिळतात. त्यांनी सकाळी एक ‘गुड मॉर्निग’चा मेसेज केला की त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. फेसबुकमुळे त्यांचे नवनवीन नातेसंबंध जोडले जातात. तर जुन्या मित्रपरिवारही तिथे मिळतो आणि नव्याने जोडला जातो. व्हॉट्सअ‍ॅपमुळे शाळेतली मैत्रीण भेटली, जुन्या सोसायटीतला मित्र भेटला अशा प्रतिक्रियाही घरगुती कार्यक्रमांमध्ये एकत्र भेटल्यावर उमटत असतात. या माध्यमांचा वापर करत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन मंडळींना पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटू लागलंय.

आता कोणत्याही घरगुती समारंभांना भेटल्यावर ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन मंडळींच्या घोळक्यात डोकावलंत तर त्यांच्या गप्पा काहीशा बदललेल्या दिसून येतील. ‘अगं रुचा लंडनला असते ना मग तिच्याशी बोलण्यासाठी स्काइप हा उत्तम पर्याय आहे’, ‘तो सिनेमा आहे का तुझ्याकडे. मला दे. शेअर इट ऑन करतो’, ‘तू पण ये ना व्हॉट्सअ‍ॅपवर. मग आपण आपला ग्रुप तयार करुया’, ‘हो अगं, सविताने व्हॉट्सअ‍ॅपवर मला तो फोटो पाठवला होता’, ‘एक पोस्ट तुला पाठवतो. वाच ती. आवडेल तुला’, ‘आता काढलेले फोटो ग्रुपवर पाठव हा’असे अनेक संवाद त्या गप्पांमध्ये रंगलेले असतात. इतकंच नाही तर परदेशात असलेल्या मुला-मुलींना नातेवाईकांमध्ये होत असलेल्या समारंभाचं लाइव्ह कव्हरेज दाखवण्यासाठी ते व्हीडिओ, फोटो काढत असतात. या पिढीत झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. तरुण पिढी टेक्नो सॅव्ही आहे असं म्हटलं जातं. पण, आता उतारवयातली ही ‘तरुण’ पिढीसुद्धा तोडीस तोड आहे!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com