खबर राज्याची
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे एक प्रकारचा उत्सवच. आता या उत्सवात वेगवेगळे रंग भरले जायला सुरूवात झाली आहे. तेलंगणा तसंच केरळमधील वायनाड इथल्या निवडणुकीसंदर्भातील घडामोडींचा आढावा-
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि वायनाड एकदमच चर्चेत आले. त्यांच्या वायनाड येथील उमेदवारीमुळे विरोधक आणि राहुल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना येथील काही मतदारांनी मात्र मतदानच न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण वायनाडचे मतदार अन्न, निवाऱ्याचा प्रश्न आणि हत्तींचे हल्ले अशा वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहेत.
वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्यासह लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रन्टचे पी.पी. सुनीर आणि रालोआचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांनी अर्ज दाखल केले आहेत. वायनाडमधील १८ टक्के मतदार हे दुर्गम भागातील आदिवासी आहेत. सुल्तान बाथेरी आणि मनंथवडी हे दोन्ही विभाग आदिवासींबहुल आहेत. कुपोषण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दळवळणाचा प्रश्न, जमिनींचे हक्क आणि मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष, त्यातही हत्तींकडून मानवी वस्तींवर होणारे हल्ले यांमुळे येथील स्थानिक आदिवासी त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांत हत्तींच्या हल्ल्यांमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या भागात पनियास, कुरुमास, अदियार, कुरीच्यास आणि कट्टूनायकन हे आदिवासी वर्षांनुवर्षे वास्तव्यास आहेत. ते एक प्रकारे जंगलांचे रक्षणही करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून जंगलांविषयी, वन्य उपज याविषयी सगळेच नियम बदलले आहेत. त्यामुळे हे आदिवासी दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत.
जंगलात लागणारे वणवे, मग ते मानवनिर्मित असो की नैसर्गिक, त्याने जंगलांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे जंगलांवर अतिक्रमणे होत असल्याने जंगलांच्या सीमा दिवसेंदिवस आक्रसत चालल्या आहेत. निवाराच कमी कमी होत असल्याने जंगलांच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले हे नेहमीचेच झाले आहेत. वायनाड हा भाग हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगलात हत्तींचे कळप, वाघ आणि इतर प्राणी आढळतात. येथील आदिवासींची घरे जंगलातच असल्याने हत्तींचे हल्ले, त्यामध्ये अनेकांचा बळी जाणे हे नित्याचेच झाले आहे. आमच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, मग मतदानात सहभागी होऊन काय फायदा, असा सवाल येथील आदिवासी करीत आहेत. आमच्या समस्यांसाठी त्यांना (लोकप्रतिनिधींना) वेळ नाही. त्यांना त्या समजून घ्यायच्या नाहीत, तर मग आम्ही मतदान करणार नाही, असेही येथील आदिवासी सांगतात. आम्हाला योग्य निवारा नाही, की येथे चांगले रस्ते, पिण्याची पाणी नाही. आम्हाला राजकारण्यांकडून काही उपाययोजना करण्याची आशाच उरलेली नाही, अशा शब्दांत आदिवासी आपली निराशा व्यक्त करताहेत.
वायनाड हा भाग आदिवासींचाच. तेथील जमिनी (म्हणजे जंगलाचा भाग) आपल्या नावावर असाव्यात याबाबत त्यांना कधीच चिंता नव्हती. मात्र आता ते त्यांच्याच भूमीत परके झाले आहेत असे येथील आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉ. जितेंद्रनाथ यांचे म्हणणे आहे. येथील आदिवासींचे मुख्य अन्न आहे मांस आणि फळे आणि त्यांच्या कुपोषणाच्या समस्येवर येथील सरकार उपाय म्हणून त्यांना दूध पावडर आणि तांदळाचे वाटप करते. ज्याचा त्यांना पुरेशा प्रमाणात उपयोग होत नाही आणि कुपोषण वाढतच आहे. यामागे फक्त अन्नाची कमतरता हा एकच प्रश्न नसून त्यांच्या मूलभूत जगण्याची एकंदर पद्धतच समजावून घेतली जात नाही हे प्रमुख कारण आहे. या मतदारसंघातील उमेदवारांनी प्रथम आदिवासींचे प्रश्न समजून घ्यायला हवेत, असेही डॉ. जितेंद्रनाथ सांगतात.