विनायक परब – @vinayakparab/ response.lokprabha@expressindia.com
मुंबईमध्ये २००१ साली भारतीय नौदलातर्फे पहिले आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन पार पडले. त्यानिमित्ताने भारतीय नौदलाचा स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या दिशेने सुरू झालेला प्रवास प्रथमच पाहायला मिळाला होता. अर्थात तो केवळ वरवरचा म्हणजे रंगाच्या संदर्भातील होता. नौदलाने स्टेल्थ गुणधर्म असलेला रंग वापरण्यास सुरुवात केली होती. हा रंग ध्वनिप्रारणे काहीशी शोषणारा तर उर्वरित बाहेर फेकून देणारा असा होता. रडारवर युद्धनौकेचे नेमके चित्रण येऊ नये यासाठीची ती रंगरंगोटी होती. नंतर खऱ्या अर्थाने स्टेल्थ पर्व सुरू झाले ते आयएनएस तलवार या युद्धनौकेच्या आगमनाने. कारण आता त्यात स्टेल्थ रचना व बांधणी या दोन्हींचा समावेश झाला होता. हा खरा स्टेल्थ प्रकार होता. कारण स्टेल्थ गुणधर्म हा वापरावयाच्या स्टील आणि युद्धनौकांची रचना- डिझाइन यामध्ये असावा लागतो. पण त्याही वेळेस स्टेल्थ १००% आहे, असे म्हणता येत नव्हते. आता मात्र ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही गायडेड मिसाइल स्टेल्थ विनाशिका नौदलात दाखल झाली असून त्यानिमित्ताने हा स्टेल्थ प्रवास १०० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता याला ‘स्टेल्थक्रांती’ म्हणता येईल, इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. सुमारे २० वर्षांचा असा हा प्रवास आहे. या नव्या विनाशिकेमध्ये स्टेल्थ गुणधर्म सर्वच बाबींमध्ये असून युद्धनौकेच्या तळासाठी वापरलेले स्टील हा त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे स्टील स्वदेशी बनावटीचे आहे, हे विशेष. वजनाला तुलनेने हलके आहे. त्यामुळे विनाशिकेचा आकार अधिक लांबीचा असूनही वजन काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. वजन कमी असल्याने कमीतकमी इंधन वापर करून अधिक पल्ला गाठणे शक्य होणार आहे. विशाखापट्टणम ही आजवरची सर्वाधिक लांबीची अशी विनाशिका आहे. असे असले तरी तिला लागणारे इंधन हे आजवरच्या युद्धनौकांपेक्षा तुलनेने कमी असणार आहे. विषुववृत्तापासून निघाल्यानंतर जगाच्या कोणत्याही एका टोकाकडे जाताना म्हणजे दक्षिण किंवा उत्तर ध्रुवाकडे सरासरी वेगाने जाताना इंधन भरावे लागण्याची वेळ येणार नाही, एवढा मोठा पल्ला या युद्धनौकेला लाभला आहे, हे विशेष! हे अंतर साधारणपणे आठ हजार किलोमीटर्सपेक्षा अधिक आहे.
‘आयएनएस विशाखापट्टणम’मधील दूरसंवेदक आणि युद्धप्रणाली पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. शत्रूला चकवा देतानाच त्याच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ांसाठी भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली हा भारतीय नौदलाचा आता नवा चेहरा आहे. संदेशवहन आणि युद्धप्रणाली या दोन्ही यंत्रणा कोणत्याही युद्धनौकेसाठी सर्वात महत्त्वाच्या असतात. या दोन्हींची अतिअद्ययावता या नव्या विनाशिकेमध्ये पाहायला मिळते. या दोन्ही अतिअद्ययावत प्रणालींनी सज्ज असलेली विशाखापट्टणम ही प्रोजेक्ट१५ ब्राव्होमधील पहिलीच विनाशिका त्यामुळेच बहुपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे.
एरवी पाणबुडय़ांवर मारा करण्यासाठी वापरले जाणारे पाणतीर युद्धनौकांच्या दोन्ही बाजूंना असायचे मात्र या विनाशिकेच्या मध्यवर्ती भागात त्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. या विनाशिकेवरील शस्त्रसामग्रीही आजवरची सर्वात अद्ययावत अशी आहे. भूपृष्ठावर स्वनातित वेगात मारा करणारी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे यावर तैनात आहे. या विनाशिकेचे वैशिष्टय़ म्हणजे अतिवेगवान संदेशवहन प्रणाली आणि युद्धप्रणाली. परिसर वेगात स्कॅन करणारे सरफेस सव्र्हिलन्स रडार असलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. त्यामुळे आजूबाजूचा सुमारे ३०० किलोमीटर्सचा परिसर विनाशिकेच्या टापूत आला आहे. नव्या अतिअद्ययावत युद्धप्रणालीमुळे पूर्वी संदेशवहनानंतर शस्त्रास्त्रांचा मारा करण्यास लागणारा वेळ आता कमी झाला आहे. विनाशिकेवरील अतिअद्ययावत संदेशवहन प्रणाली आधुनिक युगाला साजेशी दुहेरी आहे. यामध्ये शत्रूच्या यंत्रणेला ब्लॉक करण्याची त्याचप्रमाणे त्याची दिशाभूल करण्याचीही या दोन्ही क्षमता आहेत. त्याचप्रमाणे आक्रमक वापरासाठी त्यांच्या संदेशवहनाचा माग काढण्याचीही क्षमता यामध्ये आहे. या तिहेरी वापरामुळे शत्रूला मात देणे सहज शक्य होऊ शकते. याशिवाय बराक ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा असून ‘शक्ती’ ही नव्याने विकसित केलेली इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रणाही कार्यरत आहे. एकूणच या नव्या अतिअद्ययावत यंत्रणांमुळे या विनाशिकेचा वापर बहुपयोगी युद्धयंत्रणा म्हणून सहज करता येऊ शकेल, असा विश्वास या विनाशिकेचे नेतृत्व करणारे कॅप्टन बिरेंद्र बैन्स व्यक्त करतात. नौदलामध्ये युद्धनौकांचा ताफा कार्यरत असतो. युद्धसदृश परिस्थितीत त्यातील सवरेत्कृष्ट युद्धनौकेकडे नेतृत्व असते. आदेश देणाऱ्या नेतृत्वाला वेगात काम करावे लागते. असे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या युद्धनौकांमध्ये आता ‘आयएनएस विशाखापट्टणम’ अग्रणी असेल!