19-lp-hanumanथेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता  सर्वच स्तरांमध्ये दिसून येते. सर्वमान्य असं हे हनुमानाचं रूप आलं कुठून? त्याच्या मूर्तिरूपातून त्याची कोणकोणती वैशिष्टय़ं आढळतात? त्यातून या देवतेविषयी नेमकं काय समजतं ?

हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्याची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो. तंत्रात त्याला स्थान आहे. हनुमान, अंजनेय, महावीर, महाबली इत्यादी त्याची नावं आहेत. गावोगावी आणि गावाबाहेर झाडाखाली आणि ओटय़ावर शेंदूरचर्चित अशी मारुतीची मूर्ती सामान्यत: महाराष्ट्रात सर्वदूर पाहायला मिळते. मारुतीचं महत्त्व लोकप्रिय करण्याचं काम उत्तरेत तुलसीदासांनी आणि दक्षिणेत समर्थ रामदासांनी केलं.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

वाल्मीकी रामायण, महाभारत, पुराणे इत्यादी साहित्यग्रंथांतून मारुतीची माहिती उपलब्ध होते. पण प्रत्येक ग्रंथात त्याच्या मूर्तीचं वर्णन आलेलं असतंच असं नाही. हनुमानाचं वर्णन आलेलं असतं, त्याच्या जन्माच्या कथा आलेल्या असतात. अशा कथा सर्वसामान्यपणे आपणास माहीत असतात. त्याचे आई-वडील अंजनी आणि केसरी यांचा तो पुत्र. पण ही पुत्रप्राप्ती त्यांना वायूपासून किंवा शिवापासून झाली आहे अशी कल्पना आहे. त्याला हनुमान का म्हणायचे, तर इंद्राशी त्याची झटापट झाली, तेव्हा इंद्राचं वज्र हनुमानाच्या हनुवटीला लागून तुटलं असं मानलं जातं. भागवत पुराणात त्याला किन्नर म्हटलं आहे. शरीर मानवी आणि चेहरा माकडाचं म्हणून कदाचित असं म्हटलं गेलं असावं. त्याला ताम्रमुख असंही म्हटलं गेलं आहे कारण त्याचं तोंड तांबडं असावं अशी कल्पना आहे.

मारुती हा मल्लयुद्धात, गदायुद्धात निष्णात होता. तो विज्ञान होता आणि संगीततज्ज्ञही होता असा पद्मपुराणात उल्लेख आहे. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. जन्मत:च तो सूर्यावर झडप घालतो अशीही कथा आहे. राम रावण युद्धात लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी त्याने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला अशीही कथा आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अशीही कथा ऐकायला मिळते की शत्रुघ्नाला वाचवण्यासाठी त्याने क्षीरसागर तंत्राने द्रोणाचल आणला होता.

मारुतीच्या प्रतिमा नाण्यावरदेखील पाहता येतात. कलचुरी, चंडेल यांच्या नाण्यावर ११ व्या शतकात मारुतीचे अंकन झालेले आहे. पृथ्वीदेव कलचुरीच्या नाण्यावर चतुर्भुज, गदाधारी असा हनुमान आहे. यादवांच्या राजमुद्रेवर हनुमान तर  आहे. तसेच कदंब, होयसळ यांच्या राजचिन्हावर हनुमान आहे. विशेष म्हणजे अर्काटचा मुस्लिम राजा महमद अली वलजा यानेदेखील हनुमान चिन्हाचा उपयोग केला होता.

मूर्तीकलेत जो हनुमान पाहायला मिळतो तो इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकानंतर मिळतो. गुप्तपूर्व काळात रामकथेतही अंकन मिळत नाही. कथा मिळते पण अंकन मिळत नाही. त्यामुळे हनुमानाचं अंकनही मिळत नाही. त्याच्या प्रतिकृतीचं वर्णन अर्जुनाच्या रथावर असल्याचं आपणास महाभारतात मिळतं. पण ती त्याची प्रतिकृती आहे. मूर्ती नाही.

गुप्त काळ आणि गुप्तनंतरच्या काळात दिसतो तो देवगड, नचनाकुठार, चौसा (बिहार) या ठिकाणी शिल्पांकित केलेल्या रामकथांमधून. पण पूजावह अशी मूर्ती आठव्या शतकात मिळते. ज्या मूर्तीची पूजा व्हायला लागली अशी मूर्ती तेव्हा प्रत्यक्षात आली. तो प्रतिहार राजांचा काळ आहे. म्हणजेच आठव्या शतकातला. अशी मूर्ती आता लखनौच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते.

राजस्थानात चितौडगड येथे याच काळातील मूर्ती प्राप्त झाली असून ती आत्ता दिल्लीच्या वस्तूसंग्रहालयात आहे. इस ९२२ च्या खजुराहो येथील शिलालेखात मारुतीच्या मूर्तीचा उल्लेख आहे. नंतर मग वर उल्लेखलेल्या राजांच्या काळात नाण्यांवरील मूर्ती दिसते.

उत्तर मध्ययुगीन काळातील मूर्ती ११-१२ व्या शतकात दिसून येते. त्या काळातील मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यात वनमाला आहे, क्वचित यज्ञोपवीत आहे, लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या स्थितीतील मूर्ती. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते. वस्तुत: शनिवार आणि मारुतीचा काहीही संबंध नाही. पण मग शनिवारी का मारुतीची पूजा करतात, तर मारुती साडेसातीला पायाखाली ठेचतो, नियंत्रण करतो म्हणून त्याची पूजा केली जाते. बंगालमध्ये अशा मूर्ती अधिक ठिकाणी पाहायला मिळतात.

दक्षिणेला काही ठिकाणी मारुतीच्या शेपटीला लोणी लावतात. लंकादहनाच्या वेळी त्याचं शेपूट भाजलं असणार, तो दाह कमी व्हावा म्हणून लोणी लावण्याची प्रथा असावी असे मानले जाते. नाशिकला गंगाघाटावर राजेबहाद्दरांचं मारुतीचं देऊळ आहे. त्यात मारुतीच्या शेपटीत एका महिलेला गुंडाळलेलं दाखवलं आहे. ती हीच पनवती म्हणजे राक्षसीण.

20-lp-hanuman

मारुतीचे मूर्ती प्रकार

वीर मारुती – वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. त्याच्या हातात गदा असते.

दास मारुती – हात जोडून उभा असलेला. सेवेसी तत्पर असा दक्ष हनुमान.

रामसेवक मारुती –  दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असतो. रामाची सेवा करतो म्हणून दास मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.

मिश्र मूर्ती – पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती.

योगी मारुती – योगांजनेय (अंजनी + योगी)

वार्ता विज्ञापन करणारा हनुमान – वार्ताहर हनुमान म्हटलं तरी चालेल. विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.

वीणा पुस्तकधारी हनुमान – मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते.  मारुती चांगला संगीत-गायनतज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

पंचमुखी मारुती – हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुख्य तोंड वानराचे, सिंह, गरुड एका बाजूला आणि  दुसऱ्या बाजूला वराह आणि अश्व यांचे मुख असते. या संदर्भात एक कल्पना अशीही आहे की वैकुठांची मूर्ती आहे त्यालादेखील सिंह, वराह, अश्व, गरुड यांचे तोंड असते. मधले तोंड हे वासुदेवाचे असते. येथे वानराचे आहे. त्यामुळे यावरून या मूर्तीची संकल्पना घेतलेली असावी असा समज आहे.

महाराष्ट्रातील मारुतीची देवळं सर्वसाधारणपणे लहान असतात. आंध्र आणि कर्नाटकात खूप मोठमोठी मंदिरं आहेतच, पण मारुतीची मूर्तीदेखील ५० फुटापर्यंत उंच असते. या मूर्तीना लिंबाचा हार घातला जातो. दक्षिणेत हनुमानाचा इतका प्रसार होण्यामागे आणि इतक्या भव्य मूर्ती असण्याचे ठोस असे कारण मिळत नाही. पण असा अंदाज मांडता येतो की मारुती हा दक्षिणेतला आहे. विजयनगरचे जे साम्राज्य होतं, त्यातील हंपीजवळ किष्किंधानगरी आजही दाखवली जाते. त्या ठिकाणी मारुतीची आणि रामाची भेट झाली असे वर्णन आहे. राम-लक्ष्मण जेव्हा सीतेच्या शोधात भटकत होते, तेव्हा वालीने त्या दोघांचा कानोसा घेण्यासाठी मारुतीला पाठवलं होतं. मारुती हा राजकारणचतुर असा होता. त्याची रामाची ती पहिली भेट. रामायणातील मारुतीचे सारं कथानक हे दक्षिणेतच घडलं आहे. त्यामुळे जेथे त्याने कर्तृत्व गाजवले तेथे 21-lp-hanumanत्याचा सन्मान होणं साहजिकच म्हणावं लागेल. उत्तरेत तुलसीदासांनी मारुतीला महत्त्व आणून दिलं. पण तेथील देवळंदेखील लहानच आहेत.

मारुतीच्या मूर्तीचं ठळक वैशिष्टय़ मूर्तीशास्त्रानुसार काय मांडता येईल, तर मारुतीच्या मूर्ती एक तर ती वानरमुखी असते, कमरेला गुंडाळलेलं शेपूट असतं. या दोन गोष्टी दुसरीकडे कोठेच येत नाहीत. त्याशिवाय वेगळं असं काही वैशिष्टय़ नाही. एखाद्या ठरावीक काळातील मूर्ती ही त्याच्या हातातील शस्त्राच्या काळानुसार ती मूर्तीचा काळ ठरवता येतो. म्हणजे जर त्याच्या कंबरेला जंबिया खुपसलेला असेल तर ती अकराव्या- बाराव्या शतकातील मूर्ती असे म्हणता येईल.

शेंदूर फासलेला मारुती ही प्रतिमा आपल्याकडे खोलवर रुजली आहे. शेंदुरचर्चित प्रथा कोठून आली, असा एक प्रश्न पडू शकतो. शेंदुराबाबत फार चर्चा करता येणार नाही. शेंदरामागे कारण असे असावे की मारुती, गणपती, देवीचे तांदळे आणि म्हसोबा यांचे केवळ दगड ठेवणं असं स्वरूप राहू नये. त्याला एक विशिष्ट स्वरूप यावं, एक रूप यावं म्हणून त्या काळी जो रंग उपलब्ध होता त्यापासून हे रूप प्राप्त झालं.

मारुती असा पुराणातून, साहित्यातून, नाण्यातून, मूर्तीतून ठिकठिकाणी भेटतो. गुप्तपूर्व काळात मारुती आहे तो केवळ रामकथेत दिसतो तर आठव्या शतकातील वेरुळच्या कैलास लेणींमध्येदेखील रामकथा आहे. पण स्वतंत्रपणे मारुती नंतरच्या काळात आढळतो. गणपतीचे स्थानदेखील जनमानसात पाचव्या शतकापर्यंत नव्हतेच. दत्ताचेदेखील स्थान जनमानसात खूप नंतर आले. रामदासांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली त्यापूर्वी मारुती होताच. पण साहित्य आणि शिल्पांमध्ये जेव्हा ते प्रकर्षांने जाणवायला लागते तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहचते. समर्थानी त्याला बलोपासक म्हणून त्यावर भरपूर लिखाण केलंय. तसंच उत्तेरत तुलसीदासांनी भक्त मारुतीचं वर्णन केलं आहे.

आपल्या समाजात मारुतीचं स्थान अगदी सर्व स्तरांवर पोहचलेलं आहे. पण वेशीवरचा किंवा गावाबाहेरचा गावाचा रक्षणकर्ता मारुती यामागे नेमकं काय हे पाहावे लागेल. मूर्तिशास्त्रानुसार योग, भोग, वीर आणि अभिचारिक अशा चार प्रकारच्या मूर्ती असतात. त्यातील वीर प्रकारची मूर्ती असते ती मारुतीची, महिषासुरमर्दिनीची असते. गावाच्या रक्षणासाठी वीर प्रकारचीच मूर्ती असावी लागते.

थेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता आहे. तसाच तो सर्वच स्तरांमध्ये दिसून येतो. त्याची थोडक्यात कारणमीमांसा अशी आहे की, त्याला रुद्रावतारातील ११ वा रुद्र मानतात, त्यामुळे तो शैव झाला. रामपंचायतनातदेखील तो असतो, त्यामुळे तो वैष्णवांचादेखील आहे. गावाच्या बाहेर किंवा वेशीवर असल्यामुळे त्याला जातीपातीचे सोवळ्याओवळ्याचे काही बंधन नाही. शिवाय तो जनसामान्यांचा देव आहे. ज्यांना सामथ्र्य प्राप्त व्हावं असे वाटत असते त्यांचा देखील तो देव आहे. तो गावाचा रक्षक असल्यामुळे सारेच त्याची पूजा करतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मारुतीची उपासना सर्वदूर पसरलेली आहे. शैव-वैष्णव-शाक्त असा काहीही संबंध नाही.  ही देवता त्यापलीकडे आहे.

मग ही अशी देवता नेमक्या कोणत्या कालावधीत झाली असावी. त्यानुसार विचार करता, साधारण इ. पूर्व २५०० वर्षे अशी महाभारताची विद्वत्मान्य कालनिश्चिती जवळजवळ झाली आहे. त्याआधी रामायणाचा काळ होता असे म्हणता येईल. मारुती हा रामकथेत घुसडला गेला असेदेखील म्हटले जाते. पण जर वाल्मिकी रामायण मानणारा असेल तर तुम्हाला मारुती मानावा लागेल. मारुतीशिवाय रामायणकथा पूर्ण होतच नाही.
(शब्दांकन : सुहास जोशी) / (लेखातील सर्व फोटो विकिपीडिया)
डॉ. गो. ब. देगलूरकर – response.lokprabha@expressindia.com