आशुतोष बापट

ताम्हिणीच्या डोंगराजवळ उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांनी केवळ येथील जमीनच सुपीक केली नाही, तर त्यांच्या खोऱ्यात ज्ञानाची गंगादेखील आणली. आणि त्याचबरोबर पराक्रमाचे बाळकडूदेखील पाजले.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?
ai in Indian Institute of Science
कुतूहल : भारतीय विज्ञान संस्था आणि खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था
loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!

भीमाशंकर पर्वतावर गजानक राजाने कठोर शिवभक्ती सुरू केली. त्यामुळे महादेव त्याला प्रसन्न होतील आणि आपलं इंद्रपद जाईल अशी भीती इंद्राला वाटू लागली. त्याने आपल्या दरबारातील दोन अप्सरांना गजानकाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा हा डाव गजानकाच्या लक्षात आला. त्याने त्या दोन अप्सरांना शाप दिला की ‘‘तुम्ही नद्या व्हाल!’’ त्या अप्सरांनी गयावया केल्यावर त्याने उ:शाप दिला की भीमा नदीशी संगम झाल्यावर तुम्हाला मुक्ती मिळेल. इंद्राच्या दरबारातील त्या अप्सरा मुळा-मुठा नद्यांच्या रूपाने वाहू लागल्या. या दोन नद्यांचे हे असे वर्णन आले आहे ते ‘भीमा-माहात्म्य’ या प्राचीन हस्तलिखितात. या संस्कृत हस्तलिखिताचं भाषांतर केलं आहे दत्त किंकर नावाच्या कवीने. या ग्रंथात एकूण ४२ अध्यायात २४४९ ओव्यांमध्ये भीमा नदीचे माहात्म्य वर्णन केलेले आहे. भीमेच्या सोबतच तिच्या उपनद्यांच्या रंजक कथासुद्धा त्यात येतात. या काव्याच्या २६व्या अध्यायात मुळा-मुठा आणि भीमा यांच्या संगमाची वर्णने येतात. त्या अध्यायाचा शेवट. ‘‘इति श्री पद्मपुराणे, उत्तरखंडे, भीमा माहात्म्ये मुळा-मुठा संगम महिमानम् षट् विंशती नमो अध्याय:’’

मुळा-मुठा म्हणजे दैवी अप्सराच जणू. शापित असल्या म्हणून काय झाले. युगानुयुगे या दोघी भगिनी आपल्या प्रवाहाने आपल्या आजूबाजूचा अवघा प्रदेश सुपीक करीत येत आहेत. नुसता प्रदेश सुपीक करताहेत असे नसून या प्रदेशात ज्ञानाची गंगा या दोघींनी प्रवाहित केलेली पाहायला मिळते. ज्ञान आले की त्यासोबत उद्योग, भरभराट, सामर्थ्य आणि विजय या गोष्टीसुद्धा आपोआप येतातच. मुळा-मुठेचा प्रदेश पाहिला की या सगळ्या गोष्टींची अगदी प्रकर्षांने जाणीव होते. या दोघींमध्ये मुळा आकाराने तशी लहान, आणि अर्थात तिची लांबीसुद्धा कमीच. पण म्हणून तिचे कर्तृत्व काही कमी होत नाही. दुसरे असे की या दोघींना खूप प्राचीन इतिहास लाभलेला आहे. हजारो वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवाची हत्यारे या नद्यांच्या प्रवाहात सापडलेली आहेत. मुळा नदीच्या शेजारी डेक्कन कॉलेजपाशीच डॉ. सांकलिया यांना ही हत्यारे सापडली. बंडगार्डनपाशी सुरुवातीला दगडी हत्यारे मिळाल्यावर त्याचा शोध घेता घेता मुठा नदीच्या पात्रात त्यांना दत्तवाडीजवळ पाषाणयुगीन मानवाची हत्यारे मोठय़ा प्रमाणात सापडली. तसेच शहामृगाच्या अंडय़ांचे फॉसिल्स मिळाले.

दत्तवाडीजवळ मुठा नदी पुष्कळ वर्षे उंच पातळीवर वाहत होती. हवामानातील बदलामुळे तिचे पात्र सध्याएवढे झाले. तासणी, हात कुऱ्हाड, बोरर अशी बरीच दगडी हत्यारे एकाच ठिकाणी सापडल्यामुळे इथे या दगडी हत्यारांचा कारखानाच असावा असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे. मुळा-मुठा नद्यांचे आयुष्यसुद्धा  दीड-दोन लाख वर्षांचे आहे हेसुद्धा यातून सिद्ध होते!

मुळशीच्या पश्चिमेला मुळा नदीचा उमग होतो. प्रत्यक्षात तिथे छोटे-मोठे सात प्रवाह निरनिराळ्या ठिकाणांहून येतात आणि हे सगळे प्रवाह पौड गावाच्या पूर्वेला असलेल्या लवळे गावाजवळ एकत्र होतात. हीच ती मुळा नदी. पौड खोऱ्यातली ही नदी पुण्याच्या उत्तरेला असलेल्या कळस गावाजवळ दक्षिणवाहिनी होते. पौडच्या पुढे मुळशी धरणामुळे मुळा नदी अडवली गेलेली आहे. प्रचंड साठा असलेल्या या पाण्यावर टाटा कंपनीकडून वीजनिर्मिती केली जाते आणि ती वीज मुंबईला पुरवली जाते. मुळशी जलाशयात मोठे बोगदे केलेले असून त्यातून ते पाणी खाली कोकणात भिरा इथे नेले जाते. आणि त्यावर होते वीजनिर्मिती. मुळशीवरून पुढे वाहणाऱ्या मुळेला पुढे दापोडीजवळ मावळात उगम पावलेली आणि तुंग-तिकोना या ऐतिहासिक दुर्गाना आपल्या कवेत घेऊन वाहणारी, िपपरी-चिंचवड या उद्योगनगरीची साक्षीदार असलेली पवना नदी येऊन मिळते. मुळा आता तिची मोठी बहीण मुठेला भेटायला पुण्याच्या दिशेने वाहते आहे. ती दापोडी-खडकी या मुंबई-पुणे महामार्गाच्या शेजारून वाहते. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीयिरग आणि पुढे खडकी इथे किर्लोस्करांचा कारखाना याच मुळा नदीच्या साक्षीने बांधला गेला. ज्ञानगंगा हे तिचे बिरुद ती अशा रूपाने इथे मिरवते आहे. सामर्थ्य आणि उद्योजकता हे गुणही या दोन्ही नद्यांच्या पाण्यातच असावेत याची ठायी ठायी प्रचीती येत राहते. मुळा नदी जिथे मुठेला मिळते त्या संगमावर ब्रिटिशांनी मोठा पूल बांधला. वेलस्ली पूल असे त्याचे जुने नाव. त्याला आता संगम पूल म्हणून ओळखतात.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या शिवचरित्रात मुठेबद्दल लिहितात. ‘‘गर्द झाडीत पुणं वसलं होतं. हिरव्या मखमलीवर टपकन टाकलेला मोती जसा रुतून बसावा अन खुलून दिसावा, तसं पुणं खुललं होतं. पुण्याच्या नर्ऋत्येकडील दाट झाडींतून नागिणीसारखी सळसळत मुठा नदी येत होती. पश्चिमेकडून तशीच मुळा नदी येई. या दोघींच्या संगमाजवळ थोडं अलीकडे मुठेच्या नाजूक कमरेवर पुणं वसलं होतं.’’ मुळा नदीची मोठी बहीण मुठा. दोघींचा जन्म हा मावळातलाच. सहय़ाद्रीच्याच दोघी लेकी. ताम्हिणीच्या डोंगररांगेने दोघींचे उगमस्थान विभागले आहे. पुण्यापासून जवळजवळ ४५ कि.मी. पश्चिमेकडे असलेल्या ‘वेगरे’ गावी मुठा नदीचा एका शांत निवांत स्थळी उगम आहे. ‘वेगऱ्याचा महादेव’ असे मंदिर आहे. त्याच्याच शेजारी मुठेचा उगम आहे. हिच्या उगमापाशी कोणतेही तीर्थक्षेत्र नाही. पण हिच्या खोऱ्यात विविध क्षेत्रांतील उत्तुंग अशी तीर्थक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. इथून उगम पावलेल्या मुठेवर पहिलं धरण बांधलेले आहे ते टेमघर धरण. दुर्दैवाने ते गळकं धरण म्हणून कुप्रसिद्ध झालेलं आहे. इथून पुढे येणाऱ्या मुठेला दोन नद्या येऊन मिळतात. एक आहे आंबी आणि दुसरी आहे मोसी. आंबी नदीवर १९५० साली पानशेत धरण बांधले गेले. त्या धरणातून पुढे येणारी आंबी शेजारच्या मोसी नदीला मिळते. आणि मोसी आणि आंबी यांचा संयुक्त प्रवाह मुठेमध्ये सामील होतो. मोसी नदी आणि मोसे खोरे हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. मोसे खोरे म्हटले की आठवतात वीर बाजी पासलकर. मोसे खोऱ्यातील पासलकर हे एक तोलदार घराणे. शहाजीराजांच्या वयाचे कान्होजी जेधे हे बाजी पासलकरांचे जावई. कान्होजींचा मुलगा बाजी सर्जेराव जेधे हा शिवरायांचा सहकारी. आदिलशहाने फत्तेखानाला शिवरायांवर सोडला. खळद, बेलसर परिसरात ही लढाई झाली. ही सारी लढाई त्या वेळी इवल्याशा असलेल्या स्वराज्याच्या सीमेवर बाजी पासलकरांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. या लढाईत दुर्दैवाने बाजींचा मृत्यू झाला.

मोसे खोऱ्यातील कुर्डू विश्रामगड हा किल्ला बाजी पासलकरांच्या ताब्यात होता. बाजींच्या ताब्यात पार रोहय़ापर्यंतचा मुलुख होता. कुर्डूगडाच्या पायथ्याशी बाजींनी जावळीच्या मोरेंनासुद्धा पराभूत केलेले आहे. बाजींसोबत त्यांचे एकनिष्ठ सेवक एल्या मांग आणि अनंता खुरसुले यांचे स्मरण अगत्याने होते. या दोघांच्या मदतीने बाजींनी आपल्या शत्रूवर वचक ठेवलेला होता. मोसे खोऱ्यातील मोसे नदीवर पुढे वरसगाव धरण बांधले गेले आणि त्या धरणाच्या जलाशयात बाजी पासलकरांचे मोसे खोरे आणि मोसे गाव बुडून गेले. वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकर जलाशय असे नाव दिलेले आहे. वरसगावच्या पुढे मोसी आणि आंबी एकत्र होऊन मुठेला मिळतात. या एकत्रित प्रवाहाला मुठा असेच म्हणतात. सन १८६८ साली मुठेवर खडकवासला धरण बांधायला सुरुवात झाली आणि पुढे १८७३ साली त्याच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी जलसिंचन सुरू झाले. पुढे सन १८७९ मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. पाणलोट क्षेत्रातली जवळजवळ १७०० एकर जमीन पाण्याखाली बुडाली. त्यात काही गावे, देवळे, जुने वाडे पाण्याखाली गेले. ८७.५३ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या या धरणाला पूर्वी छोटे दरवाजे होते. पुढे विख्यात अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेरय्या यांनी स्वयंचलित दारांची योजना मांडून ती पूर्ण करून दिली. या धरणाच्या उभारणीला ६५ लाख रुपये खर्च आला होता. पुण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी कालांतराने पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांची निर्मिती करणे क्रमप्राप्त झाले.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या प्रदेशातून मुठा नदी वाहते. कधी काळी शिवरायांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घोडय़ांनी या नदीचं पाणी प्यायलं असणार. उत्साहाने आणि उच्च ध्येयाने भारावलेले ते लोक. किल्ले सिंहगड हे त्याचेच एक ज्वलंत उदाहरण. ४ फेब्रुवारी १६७२ रोजी शिवरायांचा लहानपणापासूनचा सवंगडी तानाजी मालुसरे याने जिवाची बाजी लावून सिंहगड स्वराज्यात दाखल केला. अभिमान आणि दुख अशा दोन्ही भावना त्या वेळी मुठा नदीने अनुभवल्या असतील. अगदी असाच पराक्रम पुढे १ जुलै १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोबा करके यांनी केला. मुठेच्या पाण्यातच जणू धाडसाचे, पराक्रमाचे रसायन भरलेले असावे. स्वराज्याच्या या वीरपुत्रांचा वारसा मुठा नदी आजही पुढे चालवीत आहे. मुठेच्या नशिबात अत्यंत दुर्मीळ आणि अभिमानाचे क्षण आलेले आहेत.

भारताच्या लष्करात उच्च दर्जाचे सेनाधिकारी निर्माण करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एन.डी.ए. ही संस्था याच मुठेच्या खोऱ्यात वसलेली आहे. भारतात एकमेव असलेल्या या संस्थेच्या सहवासाचा लाभ फक्त आणि फक्त मुठा नदीला प्राप्त झालेला आहे. सन १९४७ साली लॉर्ड लिनलिथगो भारताचे व्हाइसरॉय असताना, सुदान सरकारकडून एक लाख पौंडाची घसघशीत देणगी मिळाली. भारतीय सेनेने सुदानमुक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या वेळच्या गौरवशाली वीरांचं यथोचित स्मारक व्हावं म्हणून ही देणगी दिलेली होती. त्या वेळी फिल्डमार्शल सर अकिनलेक ब्रिटिश िहदुस्थानचे कमांडर इन चीफ होते. भारतात सेनाधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी असावी अशा मताचे ते होते. अशी एखादी प्रबोधिनी व्हावी याला तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९४५ साली तत्त्वत: मंजुरी दिलेली होती. ज्या वेळी एन.डी.ए.साठी जागा निवडण्याचं काम सुरू झालं त्या वेळी बंगळूरू, बेळगाव, डेहराडून, भोपाळ, जबलपूर, सिकंदराबाद, विशाखापट्टण अशी अनेक नावं चच्रेत होती. मात्र छत्रपती शिवरायांच्या प्रदेशात, तानाजी मालुसरे आणि नावजी बलकवडे यांनी पराक्रम गाजवलेल्या सिंहगडाच्या कुशीत, खडकवासला जलाशयाच्या काठावर असलेल्या या जागेला पसंती मिळाली. खरं तर या प्रकल्पासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीही जागा लागली तरी विनामूल्य देऊ असं जाहीर केलेलं होतं. मुंबई आणि हैदराबादची नावेही चच्रेत होती. पण पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डब्ल्यू. एक्स. मस्कारन्हेस आणि सॅण्डहर्स्टमध्ये प्रशिक्षण घेतलेले ब्रिगेडियर एस.पी.पी. थोरात यांनी मात्र गुणवत्तेवर पुण्याचाच आग्रह धरला. तत्कालीन राज्य सरकार याला फारसं अनुकूल नव्हतं. विनामूल्य जमीन तर अजिबात मिळणार नाही, हवे तर ही संस्था दुसरीकडे जाऊ दे, असाच पवित्रा महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेला होता. तरीसुद्धा ब्रिगेडियर थोरात यांनी उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडून संरक्षण प्रबोधिनीसाठी मुंबई सरकारकडून मोफत जमीन मिळवली. मग सुदान ब्लॉक, कॅडेट कॅम्पस, एन.डी.ए. रोड ही तीन कामं अग्रक्रमाने हाती घेतली. ६ ऑक्टोबर १९४९ रोजी पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचा कोनशिला समारंभ झाला. १९५५ साली सर्व इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं. शिवरायांच्या पवित्र कर्मभूमीमध्ये संरक्षण प्रबोधिनीची इमारत आज मोठय़ा डौलाने उभी आहे. अत्यंत खंबीर असे सेनाधिकारी निर्माण करण्याचं कार्य इथे केलं जात आहे. हौशी, बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरुण मुलांना इथे खडतर परीक्षेनंतर निवडलं जातं, आणि त्यांच्यातून हरहुन्नरी, तडफदार अशा सेनाधिकाऱ्यांची जडणघडण केली जाते. ‘सेवा परमो धर्म:’ हे ब्रीदवाक्य असलेली ही संस्था मुठा नदीच्या तीरावर वसलेली आहे. मुठेच्या आयुष्यातली ही किती अभिमानास्पद गोष्ट असेल.

पराक्रमाचं आणि ज्ञानाचं बाळकडू मुठेच्या पाण्यातूनच अनेकांना मिळालेलं आहे. मुठेच्या काठावरच असलेल्या लाल महालात अकस्मात हल्ला करून छत्रपती शिवाजी राजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली. अत्यंत धाडसी असा हा हल्ला होता, पण महाराजांनी स्वत: आघाडीवर राहून त्यात भाग घेतला आणि तो पूर्णत्वाला नेला. तीन वर्ष पुण्याला बसलेली खानाची मगरमिठी पुढे अवघ्या तीन दिवसांत सुटली आणि खान निघून गेला. याच पराक्रमाचा वारसा पुढे पेशव्यांनी जोपासला. छत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेशव्यांनी पराकाष्ठा केलेली दिसते. मुठेच्या काठावर असलेला शनिवारवाडा हे तत्कालीन मराठी साम्राज्याच्या भारतभर असलेल्या दराऱ्याचेच प्रतीक आहे. देशी अन् परकीय सत्तांना आपल्या पायाशी झुकवून त्यांना आपल्या काबूत ठेवण्याचं कार्य या शनिवारवाडय़ाने केलेलं आहे, ते या मुठेच्याच साक्षीने. पुनवडीपासून ते आजच्या पुण्यनगरीपर्यंतची पुणे शहराची झालेली भरभराट ही या मुठेमुळेच झालेली पाहायला मिळते. मुठेच्या पाण्याचा आणि सान्निध्याचा हा एक गुणधर्म असावा. तो म्हणजे मुठा नदी इथल्या कोणालाही प्रवाहपतित होऊ देत नाही. अगदी छत्रपती शिवराय, पेशवे, ब्रिटिश अमदानीतील अनेक सुधारक, प्राण पणाला लावणारे जहाल क्रांतिकारक ही त्याचीच उदाहरणं. प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस त्यांच्यात या मुठेच्या पाण्यामुळेच येत असणार.

धाडसाची, ज्ञानाची परंपरा ही काही फक्त एतद्देशीय लोकांनीच चालवली, असं नसून इंग्रजसुद्धा याला अपवाद राहिले नाहीत. आजच्या कॉलेज ऑफ इंजिनीयिरगचं आधीचं नाव रॉयल कॉलेज असं होतं. तब्बल २८ वर्ष त्याचे प्राचार्य असलेल्या थिओडोर कुक यांना मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम दिलेलं होतं. त्या वेळी या परिसरात असलेल्या विविध वृक्षराजींनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. या माणसाने त्या सर्व झाडं, वनस्पती यांचा अभ्यास सुरू केला. शिक्षणाने इंजिनीयर असलेल्या कुकसाहेबाने वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्या झाडांची शास्त्रीय नावं, स्थानिक भाषेतील नावं, वनस्पतीचा प्रकार, त्यांच्या पानाफुलांची मोजमापं अशी सर्व शास्त्रीय माहिती एकत्र करून ‘दि फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी ऑफ बॉम्बे’ हा १९०० पानांचा तीन खंडांचा ग्रंथ प्रकाशित केला. आजही तो ग्रंथ  वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अधिकृत कोश म्हणून उपयोगात येतो. थिओडोर कुक पुढे बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या वेस्टर्न सर्कलचे डायरेक्टरही झाले. सी.ओ.ई.पी. कॉलेजमध्ये त्यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. मुठेच्या पाण्यातून मिळणाऱ्या ज्ञानामृताचा फायदा तिच्या सान्निध्यात आलेल्या सर्वानाच होतो.

लोकमान्य टिळक, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा अनेक जहाल नेत्यांना देशभक्तीचे बाळकडू मुठेकडून मिळालेले आहे. आजच्या पुण्यात रुजलेली संस्कृती आणि इथे राहणाऱ्या लोकांना ‘पुणेकर’ हे मिळालेले बिरुद ही तर मुठेचीच देणगी म्हणायला हवी. इ.स.च्या नवव्या शतकात खोदलेली पाताळेश्वर लेणी मंदिर ही प्राचीन पुण्याची ओळख. यांची रचना अनोखी आहे. प्राचीनत्वाच्या बाबतीत पाताळेश्वरबरोबर किंबहुना त्याहीपेक्षा प्राचीन स्थापत्य पुण्यात सापडते ते म्हणजे मुळामुठेच्या काठावर असलेल्या येरवडा येथील लेणी. पुण्याहून नगरला जाताना बंडगार्डन पुलावरून डावीकडे टेकडीवर एक शिवमंदिर दिसते. तो येरवडय़ाचा तारकेश्वर महादेव. शिवकालीन पत्रात वेहेरवाडे असा येरवडय़ाचा उल्लेख आला आहे. खरे तर हे एक लेणी मंदिर आहे. दगडात खोदलेल्या गुहेमध्ये शिविपडी आहे. सध्या मंदिरात संपूर्णपणे संगमरवराची लादी बसवली आहे. मंदिरात एका कडेला बसण्यासाठी दगडी बाकही आहे. सन १८६७ साली व्याकरणकार तर्खडकर यांनी वपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या असे सांगतात. वर जायला पक्का रस्ता केलेला आहे. हा प्राचीन विहार असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. विहारवाडे-वेहेरवाडे-येरवडे अशी येरवडा नावाची उत्पत्ती सांगितली जाते.

ज्ञानगंगा असणाऱ्या या मुठा नदीने एकदा निम्म्या पुण्याला आपल्या कवेत घेतले होते. १२ जुलै १९६१ या दिवशी ज्येष्ठातली अमावस्या होती. त्या दिवशी सकाळी पानशेत धरण फुटले. त्याचे पाणी खडकवासला धरणात आले. तेही धरण फुटले (किंवा फोडावे लागले). आणि मग मुठा नदीने रौद्र रूप धारण करून निम्म्या पुण्यावर कब्जा केला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. १७६१ सालचे पानिपत आणि १९६१ सालचे पानशेत या दोन आपत्ती पुण्यावर आल्या. मुठेच्याच साक्षीने त्यातूनही पुणे सावरले आणि उत्तरोत्तर बहरत गेले. सध्याचे मुठेचे स्वरूप अत्यंत ओंगळ झालेले दिसते. मुठेचेच कशाला सगळ्याच लोकमातांचे स्वरूप असे आहे. पण मुठा नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, म्हणून लोकमान्य टिळकांनी १७ जानेवारी १८८८ च्या ‘केसरी’त मुठेची ‘सडकी नदी’ अशी संभावना केलेली होती. आजची स्थिती पाहून टिळकांनी काय केले असते कोण जाणे!

पुण्यनगरीला आपल्या ज्ञानरूपी जलाने पावन करून पुढे जाणारी नदी मुळा-मुठा अशीच ओळखली जाते. पुण्यावरून ती लोणी काळभोरवरून पुढे थेऊरला येते. तिचा प्रवास आता भीमेमध्ये विसर्जित होण्याकडे सुरू आहे. अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान थेऊर. थोरले माधवराव पेशवे आणि त्यांची लाडकी पत्नी रमाबाईसाहेब यांनी जिथे अखेरचा श्वास घेतला ते स्थान थेऊर.

इथला गणपती तो चिंतामणी. भक्तांच्या चिंतांचे हरण करणारा असा हा चिंतामणी, थेऊर या रम्य ठिकाणी वसलेला आहे. तसेच थेऊरचा हा चिंतामणी, मराठी साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या पेशव्यांचे आराध्यदैवत होता. थोरल्या माधवराव पेशव्यांनी याच्याच चरणी आपला देह ठेवला आणि त्यांच्या पत्नी रमाबाईसाहेब थेऊर या ठिकाणीच सती गेल्या. त्यांचे वृंदावन मुळा नदीच्या काठावर बांधलेले आहे. थेऊरला तीनही बाजूंना मुळा-मुठा नदीने वेढलेले आहे.

उत्तराभिमुख असलेल्या मंदिराला महादरवाजा आहे. परंतु गणपतीची मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिर अत्यंत देखणे असून त्याला लाकडी सभामंडप आहे. गणेशाची इथे स्वयंभू मूर्ती असून ती डाव्या सोंडेची आहे. गणेशाच्या डोळ्यांच्या जागी हिरे बसवलेले दिसतात. मोरया गोसावींचे पुत्र धरणीधर देव यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा सभामंडप बांधला. त्यानंतर हरिपंत फडके आणि इतर गणेशभक्तांनी वेळोवेळी या मंदिराची दुरुस्ती केली. वसई विजयानंतर त्याचे स्मरण असलेली एक भव्य घंटा चिमाजी अप्पांनी या देवळामध्ये आणून बसवली आहे. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांनी इथे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली होती त्या वेळी त्यांना गजाननाने वाघाच्या रूपात दर्शन दिल्याचे सांगतात.

थेऊरच्या चिंतामणीचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालेली मुळा-मुठा दहिटणे, वाळकीवरून देलवडीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन रांजणगाव सांडस इथे भीमेला जाऊन मिळते. सकन्या भीमा ही मुळा-मुठेचीच मोठी बहीण. भीमाशंकरला उगम पावलेली भीमा ही पंढरीला पांडुरंगाच्या भेटीला जाताना आपल्या लहान बहिणींना सोबत घेऊन जाते. या बहिणी तिला वाटेत येऊन भेटतात. मुळा-मुठा ही अशीच भीमेची बहीण. आपल्या ज्ञानामृताने पुण्यनगरी आणि आजूबाजूचा परिसर पावन करून ही पुण्यसरिता ज्ञानगंगा विठुरायाच्या दर्शनासाठी भीमेमध्ये विलीन होते.

response.lokprabha@expressindia.com