गांधीजींनी जिथून मूठभर मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला, त्या गुजरातमधल्या दांडी इथं नुकतेच देशभरातले काही संवेदनशील लोक पुन्हा जमले होते. देशातल्या वाढत्या असहिष्णुतेवर विचारमंथन करण्यासाठी..
तीस जानेवारी २०१६ची सकाळ. देशातील विविध प्रातांतून समविचारी लेखक, कलाकार, लघुपटकार, कार्यकत्रे नवसारीला जमले होते. तेथून दांडीला जायचा मनोदय होता. हा महात्मा गांधींचा स्मृती दिवस. मनं भारलेली, विचार पक्के. एकमेकांचा आधार वाटेल असे वातावरण. वास्तविक तेथे जमलेले सगळेच गांधीजींचे चेले होते असे म्हणता येणार नव्हते. साम्यवादी, आंबेडकरवादी, कँाग्रेसी, समाजवादी, पण सारे सर्जनशील वृत्तीचे, शांतताप्रिय, अिहसेवर विश्वास असलेले. गांधीजींच्या सर्वोदयाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या विचारांनी भारलेले सर्व वयाचे लोक होते. गांधीजींचा काही विशेष स्मृतिदिन नव्हता, मिठाच्या सत्याग्रहाचा दिनही नव्हता. तो त्यांनी १९३० च्या एप्रिलमध्ये ३९० मल चालत जाऊन केला होता. पण स्थळ तेच होतं. कुणा राजकीय पक्षाने वा कुणा एनजीओने भरवलेली सभा नव्हती. व्यक्ती महात्म्याचा विषय नव्हता. मग कशाला हजारभर लोक स्वखर्चाने तेथे जमले होते?
हाच प्रश्न कदाचित गुजरात सरकारला पडला असावा. एरव्ही त्या किनाऱ्यावरील स्मारकाला भेट द्यायला चिटपाखरूही जात नसेल. त्या छोटय़ाशा गावात इतकी बुद्धिजीवी, तसे पाहिले तर निरुपद्रवी माणसं कशाला आली होती? नावं द्यायची म्हटली तर प्रत्येकच व्यक्ती आपापल्या परीने महत्त्वाची होती. साहित्यिक आणि आदिवासी भाषांचे अभ्यासक गणेश देवी यांनी सामाजिक चळवळीतील लोक, लेखक, कलाकार यांना तेथे येण्याचे आवाहन केले होते. ही कुणाविरुद्ध सभा नव्हती. सर्वत्र पसरत चाललेल्या अस्वस्थतेला, असहिष्णुतेच्या खदखदीला वाट करून देण्याचा उद्देश होता. लोकशाहीच्या मार्गाने शांतपणे सर्व भाषासंवाद साधायचा होता. सध्या नागरिकांचा आपापसातला संवादच संपुष्टात आला आहे. म्हणूनच हे ‘दक्षिणायन’. दिवस मोठा नि रात्र लहान होण्याचा हा काळ. नव्याने एकत्र येऊन दमनकारी शक्तींचा मुकाबला करायसाठीचा काळ. चित्रपट, लेखन, सामाजिक कार्य याने समाजात चांगले, स्वच्छ, समतेचे वातावरण स्थापू इच्छिणाऱ्यांनी विचार करायचा काळ. भयमुक्त होऊन विचार मांडण्याचा काळ, देशातील सांस्कृतिक, वैचारिक, भौगोलिक, भाषिक विविधता; खऱ्या अर्थाने सामाजिक समता स्थापण्यासाठी यत्न करायचा काळ. दक्षिणायन म्हणजे जात, जमात, धर्म, वर्ग, िलग, भाषा, भिन्नता यांच्या पलीकडे जात समानता आणण्यासाठी संघर्ष करण्याचा काळ. ही समविचारींनी एकत्र येण्याची चळवळ कुणाच्याही विरोधातील मोर्चा वा सभा नाही हे वारंवार सांगितले, लिहिले, बोलले गेले होते. तरीही लोकांना दांडीच्या किनाऱ्यावर सकाळी चालत जाऊ दिले गेले नाही. न पटणारे कारण दिले गेले की तेथे पाटेदारांची सभा आहे. अकरा-साडेअकरा वाजता पोलिसांच्या गाडीच्या मागे सर्वानी वाहनांतूनच जावे असे सांगण्यात आले. तेथे भरपूर पोलीस बंदोबस्त होता. असो.
सभा कुणाच्या विरोधात नव्हती वा कुणाच्या प्रचाराची नव्हती त्यामुळे लोक येऊन विविध सत्रात आपापल्या राज्यात घडलेल्या घटनांबद्दल होणाऱ्या घुसमटीबद्दल शांतपणे नि स्पष्टपणे व्यक्त होत होते. विवेकवादी, प्रागतिक विचारांचा हा मेळावा होता. मुळात पावणेआठला दांडीच्या किनाऱ्यावर (आता तो किनाराही बदलला आहे. तेथे आता मिठागरं नाहीत) जिथून गांधीजींनी मूठभर मीठ उचलले नि ब्रिटिश सत्ताधीश हादरले तो क्षण त्या जागी कदाचित अनुभवता आला असता. तेथे एक प्रातिनिधिक चालणे म्हणून दोनेक किलोमीटर पायी स्मारकापर्यंत जाऊन ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हे भजन म्हणून नाश्ता करून सभा सुरू होणार होती. पण दांडीचे रस्ते पोलिसांनी (म्हणे) आमच्या सुरक्षेसाठी वा गरसोय होऊ नये म्हणून रोकले होते! मग नवसारीतील कृषी विद्यापीठाच्या सभागृहात भजन होऊन ‘सप्रेस्ड व्हॉइसेस अँड स्ट्रगल फॉर एक्सप्रेशन’ यावर विचार मांडले गेले. राकेश शुक्ला याने पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिटय़ूटमध्ये झालेल्या आपल्या संघर्षांविषयीची मांडणी केली. १९४७ ची लढाई ही स्वातंत्र्यासाठी होती तर आज संविधानाच्या रक्षणासाठी लढावे लागणार आहे. कला, साहित्य यांविषयींच्या संस्थांवर ताबा मिळवून मुस्कटदाबीचे प्रकार सहन होणार नाहीत, वेमुलाला आत्महत्या करणं ज्या व्यवस्थेने भाग पाडले ती विचारधारा विशिष्ट भूस्वामीत्व असलेल्या मध्यमवर्गाची आहे. या सत्रात राजमोहन गांधी, हमीद दाभोळकर, मेधा पानसरे, विजय कलबुर्गी यांनी आपापले विचार मांडले. या सत्रात चार हुतात्म्यांचे कुटुंबजन उपस्थित होते, आपले विचार स्पष्टपणे मांडत होते. त्यामुळे त्या सभेला एक वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले होते. मुद्दे बरेच होते त्यांपकी काही मुद्दे मांडत आहे.
याच सत्रात आजही दलितांना कशी वागणूक मिळते याचं चित्र उभं केलं गेलं. ९० टक्के दलित मंदिरात जाऊ शकत नाहीत, ६४ टक्के गावात पंचायतीत निवडून आलेल्या दलित सभासदाला बसायला खुर्ची नसते, दुपारच्या जेवणात दलित मुलांना वेगळं बसवलं जातं. धर्माचा आधार घेत घृणेचं राजकारण होत आहे. विविध भाषेतील, राज्यातील लेखक, नाटय़कर्मी, कार्यकत्रे खासकरून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, पंजाब, प. बंगाल, पूर्वेकडील राज्यांतून आलेल्यांनी आपली मतं आणि व्यथा मांडली. प्रत्येकाचं मत व विचार महत्त्वाचा होता, तरी सर्वाचीच वक्तव्यं देणं शक्य नाही. आनंद पटवर्धन हे नेहमीच धर्माधशक्तींच्या विरोधात अनुबोधपट तयार करून आपलं वक्तव्य मांडत असतात. वेमुला मृत्यू, लव्ह जिहाद, गो हत्या अशा अनेक मुद्दय़ांना घेऊन समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे.
समाजात बादशाह खान वा खुदाबक्ष यांसारख्या देशभक्तांचं काम नि बलिदान नजरेआड करून सारेच मुस्लीम हे फाळणीच्या बाजूचे होते असं चित्र उभं केलं जातं. बक्ष हे सिंधचे प्रीमियर प्रमुख होते. त्यांचा फाळणीला विरोध होता. हजारो लोक त्यांच्या बाजूने उभे होते. हेच धर्माधांना नको होतं म्हणून त्यांची हत्या झाली.
राजमोहन, गांधींनी ‘महात्माजींनी दिलेला निर्भयतेचा संदेशच आपल्याला पुढे नेईल. त्यात इतरांचं हित जर डोळ्यांसमोर असेल तर मग कामातलं भय निघून जातं. त्या व्यासपीठावर जे हुतात्म्यांचे कुटुंबजन उपस्थित होते ते ह्यच धर्याचं प्रतीक होतं. आजवर कधीही हत्या जिंकलेली नाही, विचारच जिंकला आहे. एकमेकांच्या सहकार्याने शक्ती मिळते. त्या शक्तीसमोर बाकी घाबरतात. आज खरोखरीच मोकळेपणाची वाट अरुंद होत चालली आहे,’ असं प्रतिपादन केलं.
कर्नाटकमधून अनेक लेखक, नाटककार, कवींचा मोठा गट आला होता. त्यातील स्त्री वक्त्यांचा जोश जाणवण्यासारखा होता. त्यात एक १६ वर्षांची मुज्जू तीर्थहल्ली आली होती, जिने अकादमी पारितोषिक निषेध म्हणून परत केलं होतं. तिचं धर्य सर्वानाच कौतुकास्पद वाटत होतं. तिचं म्हणणं होतं-आजच एवढा अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल हलकल्लोळ का होत आहे? हे पूर्वीही होत होतंच, पण आता मोबाइल, टीव्ही ह्य आधुनिक साधनांमुळे एकमेकांशी संपर्क अधिक सोपा झालाय, त्यामुळे लोक एकत्र येऊन आवाज उठवू शकतात-जे तिने केलं होतं.
गंगाधर मूर्तीनी कर्नाटकात अनेक ऐतिहासिक सत्यांना बदलायचा कसा प्रयत्न चालला आहे हे निदर्शनास आणलं. चूप बसायची नि बसवायची संस्कृती मूळ धरत आहे. अनंतमूर्तीच्या मृत्यूनंतर फटाके वाजवून उत्सव केला गेला!! सीतायन लिहिलं तर हल्ले झाले हे कशाचं द्योतक आहे. आमच्याहून वेगळे आवाज चालू देणार नाही, अशी दहशत बसवली जात आहे.
भीतीचं वातावरण निर्माण करून सर्जनशील माणसांना नामोहरम करायचा डाव आहे. ही मंडळी कुठल्या पक्षाला वा संस्थेला धरून नसतात ती एकेकटी कामं करीत असतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणं सोपं जातं. अशा वेळी जर समविचारी एकत्र असतील तर एकमेकांचा आधार वाटू शकतो. अन्यथा सफदर हाशमी वा पेरुमल असो त्यांना लिहिण्यावर बंधनं जिवाचा मोल देऊन सोसावी लागली आहेत. कुठल्याही सत्तेतील मग ती जातपंचायत असो, विशिष्ट वर्ग असो वा विशिष्ट जातीनिहाय नेते असोत वेगळं मत ऐकायची त्यांची तयारीच राहिलेली नाही. आपल्या दंडुकेशाहीने ते मुस्कटदाबी करताना दिसत आहेत. स्त्रिया, भिन्न आवडीचे लोक हे नेहमीच अशा दुढ्ढाचार्याचे आणि पर्यायाने गुंड प्रवृत्तीचे बळी होत जातात. स्त्रियांची अवहेलना, लग्नाबाबतचे जातीचे नियम, समाजातील उतरंडीला दिलेलं आव्हान कधीच सहन केलं जात नाही. िहसाचार हा त्या शक्तीच्या मते लोकांना गप्प करायचा एकमेव उपाय आहे. त्याविरुद्धच ही शांतता मार्गाने जाणारी चळवळ आहे. वैविध्य हे ह्य देशाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग ती विचारांची असेल, आचाराची, पोषाखाची, भाषेची, अन्नाची, परंपरेची, संगीताची, साहित्याची, इतिहासाची, वागणुकीची असेल; ती तशी ठेवायचा आपल्याला घटनेने हक्क दिला आहे. आज ते सारं बदलण्याचं षड्यंत्र तयार होत आहे. त्याविरुद्ध दक्षिणायन हे पाऊल आहे.
दुपारी दांडी येथील मंडपात ‘इन सॉलिडॅरिटी-आर्ट, लिटरेचर, सिनेमा, थिएटर’, ‘अवर कलेक्टिव्ह होप्स आणि रिस्पॉन्स फ्रॉम द महात्माज लॅण्ड’ अशा विषयांवर परिसंवाद झाले. गणेश देवी, उत्तम परमार नि के. के. चक्रवर्ती यांनी समापन करून पुढील वाटचालीची रूपरेखा मांडली. ‘सॉक्रेटिस ते दाभोळकर’ हे नाटय़ समुद्रकिनाऱ्यावर सादर करायचं ठरलं.
या दांडीयात्रेनंतर वेगवेगळ्या राज्यात जाऊन विवेकाचा आवाज बुलंद करायची गणेश देवी आणि समविचारी सहकाऱ्यांची योजना आहे. सारी बंधनं मोकळी करून माणसाच्या समानतेचा मार्ग खुला करायचा हा प्रयत्न आहे. केवळ सभा घेऊन वा बोलून काही ठोस होणार नाही. सृजनशीलांनी निर्मितीक्षम कार्यक्रम घेऊन ह्य ऊर्जेला दिशा देण्याचं काम केलं तरच ते प्रयत्न सार्थकी लागतील. महात्मा गांधींनी चिमूटभर मिठाची किंमत देशाला नि जगाला दाखवून दिली. माझ्यासाठी तर त्या अिहसा नि शांतीप्रिय नेत्याच्या कार्यस्थळाला भेट म्हणजे एक तीर्थयात्राच होती. प्रेरणा देणारी, विचारांना दिशा देणारी.
विंदा करंदीकरांच्या कवितेतील दोन ओळींची आठवण ताजी केली मीना गोखले यांनी.- ‘सत्ता तेथे असते पोळी, सत्य तेथे असते गोळी!!’ किती विदारक!
अस्वस्थ भारत
अतुल पेठे बोलायला उभे राहतात. माइक ठिकठाक करतात, पाणी पितात, घाम पुसतात, पुन्हा बसून बोलायची तयारी करतात, पुन्हा पाणी पितात, रुमालाने चेहरा पुसतात, बोलू पाहतात, गप्प राहतात. सारे सभाजनही अस्वस्थ होतात. काय होतंय कळतच नाही, बोलायसाठी तोंड उघडतात, तसेच उभे राहतात नि सभेला संबोधतात. हे सारं नाटक होतं. त्यामुळे जी अस्वस्थता पसरली ना तशीच अस्वस्थता तुम्हाला-आम्हाला सर्वत्र जाणवत आहे. नाटकवाला आहे तर नाटकच करीन ना! नाटकात असतात तसे डेड सायलेन्स नि प्रेग्नंट पॉजेस नाटय़ पुढे नेत असतात. नाटकवाले नि लेखन करणारे लोक हे धोकादायक समजले जातात. एकाधिकारशाहीत सामान्य कुवतीच्या माणसाची शक्ती वाढते, सामान्यांची नव्हे. गोळ्यांचे उत्तर आम्ही कवितेने देऊ. नाटक नेहमीच समाजाला मूल्य देतं. कला नेहमी सत्याच्या बाजूने बोलते. फॅसिझममध्ये कला फोफावत नाही, फक्त कारागिरी वाढते.
संजीवनी खेर
response.lokprabha@expressindia.com