38-lp-forestएखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्याऐवजी शिक्षण, पदवी मग नोकरी अशा ठरावीक चौकटीत आपण अडकत जातो. म्हणूनच प्राणिशास्त्राच्या औपचारिक अभ्यासानंतर प्रत्यक्ष वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी जंगलात वास्तव्याला गेलेल्या या तरुण मुलीचं अनुभवविश्व आपल्याला आकर्षून घेतं.

एकटीने कर्नाटकमध्ये प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ. मुंबई-बंगलोर आणि मग पुढे म्हैसूर. तिथून पुढे अजून एक बस, चामराजनगर नावाच्या गावाजवळ नेणारी. अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झालेला या सगळ्या प्रवासात. अंधार व्हायला सुरुवात झालेली. जिथे पोहोचायचं होतं तिथे फोन केल्यावर उत्तर मिळालं, ‘‘तू फारच उशीर केलास. आता तू बस स्टॉपवरून चालत येऊ शकणार नाहीस. रस्त्यात हत्ती आडवे येऊ शकतील रात्री, आम्हीच येतो घ्यायला.’’ तशी मनाची तयारी होती कुठल्या तरी ऑड ठिकाणी राहण्याची, पण पुढे कशाची आशा करावी याची कल्पनाच येईना. खिडकीतनं बाहेर बघावं तर काहीच कळायला मार्ग नाही. कंडक्टरबुवा विसरले तर मला सांगायला कुठे उतरायचं ते? बाजूला बसलेल्या माणसाला बहुधा माझ्या चेहऱ्यावरची काळजी जाणवली असावी. त्याने मला मोडक्या िहदीत विचारलं, ‘‘कहाको जानाय आपको मेडम?’’ मी मोठ्ठे कष्ट घेत त्या जागेचं लांबलचक कन्नड नाव बोलून दाखवलं. ‘‘कोई आयेगा ना? आप चिंता मत करना, मं उतार के देता है’’ संवाद पुढे गेल्यावर समजलं की बुवा वन विभागातच कामाला आहेत. मग काय, स्टॉप येईपर्यंत गप्पा.

three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

त्या दिवशी जिथे पोहोचायचं होतं तिथे सुखरूप पोहोचले. एक जुनी मिहद्रा जीप आणि ज्यांच्याबरोबर मी काम करणार होते ते लोक थांबलेच होते. राहायच्या ठिकाणी जाताना त्या दिवशी हत्ती नाही पण ससे आणि हरणं दिसली. आम्ही राहणार होतो ते बिलिगिरी रंगस्वामी व्याघ्र अभयारण्यातील (बी.आर.टी.) एका जुन्या आय. बी. ऊर्फ इन्स्पेक्शन बंगल्यात. त्या दिवशी अंधारात तिकडे काम करणाऱ्यांचे चेहरेही दिसले नाहीत. तिथे काम करण्यास मला ज्या वन्यजीवशास्त्रज्ञाने सुचवलं होतं त्यांच्यावरच्या विश्वासाच्या बळावरच मी एका अनोळखी ठिकाणी, अनोळखी लोकांत आले होते. प्राणिशास्त्र या विषयातल्या मास्टर्सनंतरचा ब्रेक मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी आणि प्रवासासाठी वापरायचा होता. तर त्या रात्री अंधारातच एकमेकांशी नावापुरत्या ओळखी झाल्या, लाइट नव्हती. त्यात त्यांच्यातांच्यातच पार्टी चाललेली, त्यांच्या कॅमेऱ्यांच्या जाळ्यात पहिल्यांदाच वाघ आल्याची, तेही एका फोटोत दोन वाघ, आणि एकाच कॅमेऱ्यात एकूण तीन वाघ! आई आणि आकाराने तिच्याएवढेच तिचे दोन छावे. खूप रोमांचक होतं सगळं.

पुढचे तीन महिने त्या कर्नाटकच्या जंगलात बरंच बघायला, शिकायला आणि अनुभवायला मिळालं. गोष्टी आणि फोटोंचा गच्च साठा झाला. मी तिथे आले होते होन्नावल्ली कुमारा नावाच्या एका शास्त्रज्ञाला मदत करायला. वन विभागाच्या साहाय्याने ते बी.आर.टी.च्या जंगलातील मांसभक्षक प्राण्यांचा अभ्यास करीत होते. विशेषत: असे प्राणी ज्यांच्यावर आत्तापर्यंत फारसे काम केले गेलेले नाही, उदाहरणार्थ, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, इत्यादी छोटे सस्तन प्राणी. हे प्राणी कोणत्या प्रकारच्या जंगलात राहतात, त्याचा आजूबाजूच्या वनस्पतींशी, भूगोलाशी काय संबंध आहे हे त्यांना जाणून घायचं होतं. जास्त मानधनाची अपेक्षा न ठेवता आपल्या इच्छेने काम करायला तयार होतील अशा लोकांच्या मदतीची त्यांना गरज होती. मला काय, जंगल, प्राणी आणि दोन वेळचं जेवण मिळण्याशी मतलब, सगळ्यात अनमोल म्हणजे ज्ञानात पडणारी भर!

39-lp-forestएखाद्या क्षेत्रात खोलात उतरण्यास आणि प्रत्यक्ष आपल्याला रस असलेल्या कामाचा अनुभव घेण्यास कॉलेजच्या साचेबंद अभ्यासक्रमात फारसा वाव नसतो. यात भर म्हणजे बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिक्षणाशिवाय मुद्दामहून प्रवास करून, इंटर्नशिप किंवा स्वयंसेवी काम करण्याची प्रवृत्ती नसते. एकूण परिस्थिती आणि वातावरणच तसं असतं इकडचं. आधीपासूनच ठरवलेलं ठरावीक पदव्या मिळवण्याचं धेय आणि भरपूर संरक्षणात्मक असं घरातील वातावरण, थोडीफार आपली कुटुंबव्यवस्था यामुळे असं होत असावं. एक्स्ट्रा क्लासेस, लगेच नोकरीचा शोध, घरून असलेले दबाव यामुळे चौकटीबाहेर जाऊन आपल्याला खरंच काय करायला आवडतंय हे जाणून घ्याची इच्छाशक्तीच नष्ट होते. आíथक परिस्थितीशीही त्याचा संबंध असतो. हेच बघा ना, या वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रातील बरेचसे विद्यार्थी आणि संशोधक हे उच्च मध्यमवर्गीय असतात. खरं म्हणजे, बहुतेक वेळा ते काम देऊ करणाऱ्या संस्था आणि शास्त्रज्ञ हे स्वयंसेवकांना त्यांचा दैनंदिन खर्च आणि वर अजून थोडे जास्त पसे पुरवतात. एवढेच नव्हे तर बऱ्याच संस्था असे काम करण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांना निधी पुरवतात. त्यामुळे चौकटीबाहेर जाणं सुरुवातीला आíथक रीतीने फायदा करून देणारं नसलं तरी तोटय़ाचं नक्कीच नसतं. पण आजच्या जगात आíथक फायदा-तोटा बघूनच निर्णय घेतले जात असल्यामुळे इतर फायदे आणि तोटे यांच्याकडे दुर्लक्षच होतं.

तर, मुंबईतील कॉलेजच्या शिक्षणाचा अशा प्रत्यक्ष अनुभवासाठी किंवा वन्यजीवशास्त्रासारखा एखादा वेगळा विषय शिकण्यासाठी फारसा काही उपयोग नसतो हे मला आधीच जाणवलं होतं. बाहेर पडून अनुभव घ्यायलाच पहिजे. तशा हळूहळू पर्यावरण आणि वन्यजीव यांच्यावर काम करणाऱ्या लोकांच्या आणि संस्थांच्या ओळखी झाल्याच होत्या. काही वैज्ञानिकांबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या संधीही मिळाल्या होत्या. म्हणूनच मास्टर्सची परीक्षा झाल्या झाल्या पहिल्याच ब्रेकमध्ये हे काम करायचं असं ठरवलं होतं.

बी.आर.टी.च्या जंगलात अगदी सुरुवातीला एखाद्या बाहेरून आलेल्या नवशिक्या माणसाला काय शिकायला मिळतं तर कन्नडमधील काही शब्द. जंगलात राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे शब्द आहेत, उदाहरणार्थ, ‘आने’ म्हणजे हत्ती, ‘करडी’ म्हणजे अस्वल, ‘कापाडी’ म्हणजेच ‘मदत’ किंवा मग ‘ऊटा’ म्हणजे जेवण. विनोदी वाटेल खरं, पण हे काही कन्नड शब्द तिकडच्या जंगलातील उदरनिर्वाहासाठी उपयुक्त ठरले. आमच्याबरोबर मदतीला काही आजूबाजूच्या गावांतील लोक होते. शोलीगा जमातीमधील लोक गेली कित्येक वर्षे या जंगलात राहत आले आहेत. हत्ती, वाघ, बिबटे, रानकुत्रे, रानगवे, साप हे त्यांच्यासाठी नेहमीच दिसणारे प्राणी. त्यामुळे काम करताना अनपेक्षितपणे समोर कुठला प्राणी आलाच तर आमच्याबरोबरचा शोलीगा माणूस आमची काळजी घेईल हे आम्हाला माहीत होते. पण या जंगलात असा एक प्राणी आहे ज्याला हे लोक प्रचंड घाबरतात, आणि तो म्हणजे अस्वल! त्यामुळे अचानक काहीही न सांगता बरोबरीचा माणूस अचानक पळू लागला तर स्वतही त्याचे अनुकरण करून आजूबाजूला अस्वल आहे असे समजावे.

40-lp-forestते जंगल आहे खूपच सुंदर! अगदी काही किलोमीटरच्या अंतरात शुष्क पानगळी जंगलाचं निम-सदाहरित किंवा सदाहरित जंगल आणि मग शोला नावाचे उंच डोंगरांवर सापडले जाणारे गवताळ प्रदेश असे या जंगलाचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात परिवर्तन होतं. या विविधतेमुळे प्राणीपक्षीसुद्धा बरेच दिसतात इकडे. हत्ती तर जवळपास दर दिवशी आमच्या आय.बी.च्या जवळ यायचे, अगदी व्हरांडय़ापर्यंत! आमच्या खोलीजवळच बाहेर एक छोटं दोन चुलींचा स्वयंपाकघर होतं, बांबूच्या िभतींचं. हत्तींची ही खूप आवडती जागा. त्या िभती पुन्हा पुन्हा उभारून आमच्या नाकी नऊ येऊ लागलं होतं. मग आम्ही तिकडे एक बल्ब बसवून घेतला. प्रकाश बघून हत्ती येणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. हा प्रयोग बऱ्यापकी उपयोगाला आला. पण तरीही हत्ती येणं पूर्णपणे थांबलं नाहीच. एका रात्री माझ्या खोलीच्या खिडकीजवळच हत्तीचा आवाज ऐकू आला. आपापसांत बोलताना हत्ती एक वेगळाच डुरकण्यासारखा आवाज काढतात, लांब सलग अशी गुरगुर. हा आवाज अगदी आतून, खोलातून आल्यासारखा असतो. घनगंभीर. मी आवाज न करता, लाइट न लावता खिडकीतून डोकावून पाहिलं, समोरच दहा-बारा हत्तींचा कळप होता. आम्ही दुपारी कापलेल्या फणसाच्या वासाने आले असणार. त्या कळपात एक छोटं पिल्लूही होतं. त्यांना मी स्वयंपाकघराच्या प्रकाशात बघत राहिले. पिल्लू सगळ्यात मजेशीर. काय काय खेळ चालले होते त्याचे. माझी खोली आणि स्वयंपाकघर यांच्यात एक मोठा खड्डा होता. फार खोल नाही, असेल एखाद्-दोन मीटर. ते पिल्लू नेमकं त्या खड्डय़ात उतरलं आणि त्याला बाहेर येता येईना. मला काळजी वाटायला लागली. त्याने भरपूर प्रयत्न करूनही ते आपलं तिथल्या तिथेच. थोडय़ाच वेळात त्याच्या परिस्थितीची कल्पना इतर हत्तींना आली. एक मोठ्ठी हत्तीण त्या खड्डय़ाच्या कोपऱ्यावर येऊन त्याला सोंडेने आधार द्यायला लागली. पिल्लू अगदीच धडपडं. शेवटी ती हत्तीण त्या खड्डय़ात उतरली आणि तिने त्या छोटय़ाला मागून एक छोटा धक्का दिला. पिल्लू खड्डय़ाच्या बाहेर. रात्री मला असं काय काय बघायला मिळायचं. अशा खूप गोष्टी साठल्या पुढच्या दोन महिन्यांत. रात्रीच्या पावसात ऐकलेले वाघ, डोळ्यांदेखत झालेल्या शिकारी, रस्त्यात चालताना भेटलेलं अस्वल, आमचे रस्ते अडवणारी शेकडो फुलपाखरं. अद्भुत बरंच काही.

प्रत्यक्ष कामसुद्धा तसं माझ्यासाठी थोडं नवीन होतं. आम्ही सौर ऊर्जेवर चालणारे कॅमेरे वापरत होतो. बंगलोरातील एका शास्त्रज्ञाने बनवलेले हे कॅमेरे अत्यंत सुरेख पद्धतीने खास या कामासाठी तयार केले होते. सध्या भारतात वन्यजीव संशोधन करणारे बरेच लोक हे कॅमेरे वापरतात. तेव्हा मात्र आम्ही पहिल्यांदाच त्या कॅमेऱ्याचं मॉडेल वापरून बघत होतो. उष्ण रक्ताचा प्राणी येताच किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल होताच कॅमेरा त्याला जोडलेल्या सेन्सरमुळे चालू व्हायचा. या सेटअपला एका सोलार पॅनलला जोडून चार्ज करता येईल असं बॅटरी पॅक लावलं गेलं होतं. कॅमेरासुद्धा अत्यंत साधा, बाजारात सहज मिळणारा कूलपिक्स. एकूणच सगळं ‘जुगाडू’ काम. या कॅमेऱ्याला एक खास लोखंडी आवरण बनवून घेतलं होतं, हत्ती, माकडं, पाऊस, धूळ यांपासून वाचवण्यासाठी. असे सौर ऊर्जेवर चालणारे दहा कॅमेरे आम्ही जंगलात ठरावीक ठिकाणी, ठरावीक कालावधीसाठी लावायचो. कॅमेरे लावतानाच आजूबाजूच्या परिसराची, माहितीची नोंदही करायचो. कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत, झाडांची उंची किती आहे, खडकाळ भाग आहे की नदीकिनारा आहे, इत्यादी. कॅमेरा चालू करायच्या आधी आम्ही त्याच्यासमोर थोडी सुकट ठेवायचो. सुक्या माशांच्या वासाने आजूबाजूचे मांसभक्षक प्राणी तिथे आकर्षति होतील अशी आमची अशा होती. एकदा आम्ही उदमांजरांना आकर्षति करण्यासाठी जास्त पिकलेली फळं ठेवली,

पण त्या दिवशी कॅमेऱ्यात डुकरच-डुकरं आल्याने आम्ही असं करणं थांबवलं.

दिवस तसा लांब असायचा, दोन फेऱ्या मारायला लागायच्या. एक फेरी कॅमेरे लावायला आणि दुसरी आधी लावलेल्या कॅमेऱ्यांची बॅटरी बदलायला. मी नवीन असले तरी बरोबरचे स्थानिक शोलीगा मदतनीस मात्र या कामाला तोपर्यंत सरावले होते. पहिल्याच दिवशी मी कॅमेरा झाडाला बांधत असताना त्यांनी ‘केलेगडे, केलेगडे’चा धोशा लावला. मला तेव्हा कन्नड कळत नसल्यामुळे काहीच समजेना. मग त्यांनी कॅमेरा मी लावलेल्या उंचीपासून थोडा खाली घेतला. बरोबरच होतं त्यांचं, छोटा प्राणी आला असता तर त्याचा पूर्ण फोटो येणं मी लावलेल्या उंचीवर जमलं नसतं. त्या दिवशी नवीन शब्द शिकायला मिळाला, केलेगडे म्हणजे ‘खाली’. हे शोलीगा लोक जंगल खूप चांगल्या पद्धतीने जाणतात, त्यांच्याकडून मला प्राण्यांचे माग काढणं शिकायला मिळालं. याच लोकांना बी.आर.टी.च्या जंगलातून बाहेर काढलं जाण्याची शक्यता होती त्या काळात. आम्ही काम सुरू केलं तेव्हा त्या जंगलाचा अभयारण्याचा दर्जा जाऊन त्याचं रूपांतर व्याघ्र प्रकल्पामध्ये होणार होतं. दुर्दैवाने आपल्याकडे ज्या पद्धतीने जंगलाचं संवर्धन केलं जातं त्यात सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्या जंगलातून लोकांना बाहेर काढणं. हा जंगल वाचवण्याचा सोप्पा मार्ग आहे असा एकूण शासनाचा दृष्टिकोन असतो. पण फार कमी वेळा माणूस आणि जंगल यांच्यातला नातं पडताळलं जातं.

उदाहरणार्थ, या बी.आर.टी.मध्ये घाणेरीच्या (तणतणी) झुडपांनी वन विभागाला वैताग आणला आहे. लांटाना कमारा असं त्याचं वनस्पतिशास्त्रातील नाव. दक्षिण अमेरिकेतून हे झुडूप भारतात सुशोभिकरणासाठी आणलं गेलं, पण दक्षिण भारतातल्या बऱ्याच जंगलामध्ये ते वेडय़ासारखं वाढलं. काही वर्षांतच त्याने इतर वनस्पतींची जागा घेतली आणि जंगलातील प्राण्यांना त्यातनं रस्ता काढणं मुश्कील होऊन बसलं. त्याचबरोबर जंगलातल्या आवळ्याच्या झाडांवर एक प्रकारची कीड लागू लागली. या दोन्हीही गोष्टी आगीने नियंत्रित करण्यासारख्या आहेत. आधी जंगलात राहणारे लोक ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची आग लावायचे. आगीची तीव्रता किती असावी, ती कोणत्या भागात लावावी हे ऋतू आणि हवेवर ठरवलेलं असायचं. पण या जंगलाला संरक्षित घोषित केल्यापासून आग लावणं हा अपराध आहे असा नियम आला. आग ही वाईटच असं मानणारं शासन नंतर मात्र स्वतच जंगलाच्या व्यवस्थापनासाठी या आगीचाच वापर करू लागलं. काही संशोधकांनी या विषयावर अभ्यास करून हे समोर आणलं की शोलीगा ज्या प्रकाराने जंगलात आग वापरतात त्या प्रकाराने आग लावल्यास आवळ्यावरची कीड कमी होते आणि झुडपांची वाढ नियंत्रणात राहते. व्याघ्र प्रकल्प करताना शोलीगांबरोबर त्यांचं हे ज्ञानसुद्धा अतिशय अन्यायकारक पद्धतीने बाहेर काढलं जाणार होतं. आता मला हे सांगताना बरं वाटतंय की, बी.आर.टी. सध्या व्याघ्र प्रकल्प आहे, पण त्याचबरोबर शोलीगांना तिथे राहण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तर अशा या शोलीगांबरोबर काम करताना प्राणी आणि पक्षी जंगलाचा वापर कसा करतात हे समजायला मदत झाली, प्राण्यांचे माग काढणं शिकायला मिळालं, त्यांनीही कॅमेरा, गाडी आणि कामाचा इतर भाग सांभाळणं वेगाने आत्मसात करून घेतलं. एखाद्या दिवशी जास्त मेहनतीचं काम झाल्यास आम्ही याच शोलीगांच्या पाडय़ात जायचो. मग तिथे वन विभागाच्या पाळीव हत्तींना अंघोळ घालणं, कच्च्या फणसाच्या भाजीचं जेवण, आगीसमोर गप्पा मारणं असं काय काय व्हायचं.

आमच्या कॅमेऱ्यात आलेल्या फोटोंद्वारे ते जंगल आणि त्याच्यातल्या प्राण्यांचं एक वेगळंच विश्व आमच्यासमोर उलगडत गेलं. कॅमेरा कुठे लावायचा हीसुद्धा एक कला असते आणि ती जमायला थोडा वेळ लागतो. पहिला एक आठवडा कॅमेऱ्यात फारसं काही न मिळाल्यानंतर जेव्हा त्यात हळूहळू वाघ, रानगवे, रानकुत्रे, अस्वलं आणि उदमांजरं येऊ लागली तेव्हा खूप आनंद झाला. शिस्तशीर काम संपवून मग आम्ही उगीच एखादं सुंदर काम्पोझिशन मिळावं म्हणून काही जास्तीचे दिवस तिथे काढले. प्रोजेक्ट मोठा होता. माझ्या आधीही तिथे मदतीला लोक आले होते आणि नंतरही. पण त्या दोन महिन्यांच्या शेवटी मला नवीन शिक्षक आणि मित्र मिळाले. शहरात परत आल्यावरही मी त्या कामात सहभागी राहू शकले. त्या प्रोजेक्टमुळे जंगलाबद्दलच्या आणि त्यात राहणाऱ्या प्राण्यांबद्दच्या माहितीत भर पडली. या माहितीचा वनविभाग आणि इतर शास्त्रज्ञांना उपयोग झाला. त्याशिवाय त्या छोटय़ा कालावधीत मला स्वत:ला वन्यजीवशास्त्राविषयी शिकायला मिळालं, नवीन भाषा शिकायला मिळाली, जीप चालवायला शिकले, एक स्वयंसेवक फिल्ममेकर होता त्याच्याकडून एडिटिंग वगरे शिकायला मिळालं, कामाचा आणि प्रवासाचा अनुभव मिळाला.

सांगण्याचा उद्देश असा की दोन महिन्यांसारख्या छोटय़ा कालावधीत मला दोन वर्षांत कॉलेजात जे नाही मिळालं ते इथे मिळालं. हे फक्त वन्यजीवशास्त्रातच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी होणं शक्य आहे. वैद्यकशास्त्र, सामाजिक विज्ञान, भौतिकशास्त्र, आíकटेक्चर, जर्नालिझम, आय. टी. कुठल्याही क्षेत्रात रस असलेल्या माणसाला चौकटीबाहेर जाऊन स्वतहून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप संधी असतात. अगदी, ज्यांना प्रवास करून वेगवेगळ्या कामांचा अनुभव घेऊन भविष्याची दिशा ठरवायची असेल तर तेही शक्य असतं. बऱ्याच संस्थांना स्वयंसेवकांची गरजही असते. आजकाल वेगवेगळ्या कामांसाठी पसे मागण्यासाठी बरेच फोन येतात. गरजूंना पसे देणं अर्थातच खूप मदतीच ठरतं, पण कधीतरी त्याऐवजी श्रमदान करायला काहीच हरकत नाही. इंटरनेटमुळे अशा संधी शोधणं अजूनच सोप्पं झालंय. चौकटी घालतो आपणच, मग चौकटीबाहेर पडावंसं वाटतही आपल्यालाच हे मजेशीरच आहे. पण हे मात्र खरंय, की त्या प्रक्रियेत आपल्याला स्वत:बद्दल आणि जगाबद्दल नवीन काहीतरी शिकायला मिळतं. चौकटीबाहेर उडी मारण्याची इच्छा होणं एवढंच गरजेचं आहे. आणि इच्छा होऊनही बाहेर पडता येत नसेल तर त्यासाठी कधी कधी मागून धक्का लागतो आपल्या कुटुंबाचा आणि दोस्तांचा. अगदी हत्तीच्या पिल्लाला मिळाला होता तसा!
ओवी थोरात – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader