‘हा प्रेमळ, ही रागीट, ही मनमिळाऊ, हा एककल्ली’- अशा अनेक व्यक्तिविशेषणांनी आपण इतर व्यक्तींना वारंवार संबोधत असतो. आपल्या नावापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एक ओळख निर्माण करत असतो. लोकांबरोबरच्या विविध अनुभवांनी ‘व्यक्ती’ म्हणून आपण समृद्ध होत असतो आणि अशा असंख्य ‘व्यक्तिवैशिष्टय़ांनी’ लोक आपल्याला आणि आपण लोकांना ओळखत असतो!! खरं बघितलं तर हा विषय अगदी रोजचा; म्हणूनच कदाचित ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ म्हणत त्याविषयी फार बोललं जात नाही आणि विचार केला जात नाही. मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी-समूहात, समाजात इतर व्यक्तींबरोबर एकत्र राहण्याचा माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. अगदी रोजच्या दिवसाला आपण हजारो, लाखो व्यक्तींना बघत असतो, पन्नासेक लोकांशी संवाद साधतो, (फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटमुळे तर एकाच वेळी प्रचंड लोकांपर्यंत आपण पोहोचतो.) मात्र त्यातले काहीच संवाद, काही घटना, काही व्यक्ती आपल्याला भावतात; नवीन विचार, नवीन दृष्टिकोन देण्यास प्रवृत्त करतात. कधीतरी पाच मिनिटं भेटलेली व्यक्तीसुद्धा कायम स्मरणात राहते, तर कधी कधी रोजच्या संपर्कातली व्यक्तीसुद्धा परकी वाटते. का घडतं असं? काही व्यक्तींशीच आपले सूर का जुळतात? आपल्याला आवडणारी व्यक्ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही.. वर्षांनुवर्षांची मैत्री एका दिवसात कशी तुटते? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात. प्रश्न जितके कठीण तितकीच त्यांची उत्तरंसुद्धा कठीणच.. कारण मुळात ‘व्यक्ती’ समजून घेणंच अत्यंत कठीण! खरं तर अशक्यच. पण जितका हा विषय गूढ आहे तितकाच तो मजेशीर आणि कुतूहल निर्माण करणारा आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ सदरातून अशाच विविध व्यक्तींच्या मनाचा ठाव घेण्याचा, व्यक्ती विशेषणांचा, विविध घटना आणि किस्से या सगळ्यांचा विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सदरात कधी उत्तरं मिळतील तर कधी नवीन प्रश्न पडतील; कधी सभोवतालच्या व्यक्तींकडे, घटनांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळेल. काही घटना, व्यक्तिस्वभावाबद्दल चर्चा करताना त्याला मानसशास्त्राची जोड दिली जाईल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा