मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
कधी काळी इंग्रजी आद्याक्षर ‘के’ मालिकाविश्वात शुभ मानलं जायचं. भारतात दोन-तीन र्वष चालणाऱ्या दैनंदिन कौटुंबिक मालिकांचं सत्र सुरू होऊन यशस्वी झालं ते ‘के’ किंवा ‘क’च्या बाराखडीमुळे, हे समीकरण आजही प्रेक्षकांचा मनामध्ये घट्ट बसलं आहे. एकविसाव्या शतकातील ‘जेन झी’ पिढीलासुद्धा या ‘के’ अक्षराने भुलवलं आहे. ‘के पॉप’ संगीत, ‘के ड्रामा’, स्कीनकेअरमधील ‘के ब्युटी’, ‘के फॅशन’,‘के स्टाइल’ सगळीकडे या ‘क’च्या बाराखडीची भुरळ पडलेली आहे. ‘के’ हे कोण्या ब्रॅण्डच्या नावाचं आद्याक्षर नाही, तर हा ‘के’ आहे ‘कोरिया’चा. दक्षिण (साऊथ) कोरिया जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश. डोकं वर करावं तर उत्तर कोरियाच्या रूपाने एक हात अण्वस्त्रावर ठेवलेला अजस्र राक्षस त्याला कधीही गिळंकृत करायला तयार आहे आणि इतर तीन दिशांनी चीन आणि जपान फणा काढून सज्जच आहेत. अशा वेळी आपल्या देशातील तरुणाईमध्ये असलेली ताकद ओळखून या देशाने गेल्या ५० वर्षांत केलेली कामगिरी संपूर्ण जग थक्क होऊन पाहत आहे. सध्या तरुणाईच्या गळय़ातील ताईत झालेल्या कित्येक ट्रेण्ड्सचा उगम हा या देशात झालेला पाहायला मिळतो.
तुम्हाला ‘गंगम स्टाइल’ हे गाणं आठवतं का? २०१२ म्हणजे साधारणपणे यूटय़ूब लोकप्रिय होण्याचा काळ. त्या वेळी ‘साय’ नामक एका गायकाने या गाण्यातून यूटय़ूबचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. जगभरातले लोक या गाण्याच्या तालावर डोळय़ावर गॉगल लावून हात लांब करून नाचत होते. या कोरियन गाण्याचा अर्थ ठाऊक नसूनही हे गाणं आबालवृद्धांच्या तोंडी होतं. ही सुरुवात होती या ‘के पॉप’च्या जागतिकीकरणाची. आज ‘बीटीएस’, ‘ब्लॅकिपक’, ‘बिगबँग’, ‘रेड वेल्व्हेट’, ‘सेव्हेन्टीन’ असे कित्येक संगीत बॅण्ड्स तरुणाईच्या जिवाभावाचे झाले आहेत. ‘स्क्विड गेम’, ‘इट्स ओके टू नॉट बी ओके’, ‘डिसेन्डन्ट ऑफ द सन’ अशा कित्येक कोरियन मालिकांचा चाहता वर्ग जगभर पसरला आहे. कोरियन सिनेमांचे रिमेक करण्याची हिंदूी सिनेमांची परंपरा तर सर्वाना ठाऊकच आहे. ही लोकप्रियता रातोरात मिळालेली नाही. त्यामागे व्यवस्थित केलेलं नियोजन, काळाची गरज ओळखून टाकलेली पावलं अशी अनेक कारणं आहेत.
दक्षिण कोरियाचा आधुनिक इतिहास हा रक्तरंजितचं आहे. ‘जपान-कोरिया करारा’नंतर जपानने १९१०-४५ या कालावधीत कोरियावर सत्ता गाजवली. जपानपासून स्वतंत्र होत असतानाच या देशाची विभागणी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये झाली. त्यानंतर काही काळ हा देश अमेरिकेच्या आधिपत्याखाली होता. १९५०-५३ दरम्यान कोरियन युद्धात या देशाचे कंबरडे मोडले. देश आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आला. त्यानंतर या सगळय़ा महासत्तांना तोंड देऊन उभं राहायचं असेल, तर आपली स्वतंत्र ओळख जगाला करून द्यायची गरज दक्षिण कोरियाच्या जनतेला वाटू लागली. त्यासाठी त्यांनी मनोरंजन आणि लाइफस्टाइल क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं.
दक्षिण कोरिया सुरुवातीपासूनच पाश्चात्त्य देशांतील अनेक नामवंत ब्रॅण्ड्ससाठी कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करत असे. कोरियन सरकारने देशात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सेऊल फॅशन वीक’ आणि ‘कोरियन फॅशन डिझाईन कॉन्टेस्ट’ या दोन फॅशन वीक्सना आर्थिक पाठबळ द्यायला सुरुवात केली. त्यातून कित्येक कोरियन डिझायनर्स पुढे येऊ लागले. या ब्रॅण्ड्सना अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांतून पाठबळ मिळू लागलं. पाश्चात्त्य ग्राहक, उद्योजक, वितरक या शोच्या दरम्यान देशात हजर राहतील याची कोरियन सरकारकडून विशेष काळजी घेतली गेली. या ब्रॅण्ड्सनी ‘स्वस्तात मस्त’ हा मंत्र वापरून कमी प्रतीचे कपडे बनविण्यास सुरुवात करून नंतरच्या टप्प्यांमध्ये उच्च प्रतीच्या कपडय़ांच्या निर्मितीमध्ये नाव कमावलं. हीच बाब सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाची. कोरियन सरकारच्या प्रोत्साहनामुळे अनेक कोरियन ब्युटी ब्रॅण्ड्स बाजारात येऊ लागले. प्लॅस्टिक सर्जरी, बोटॉक्ससारख्या सौंदर्य शस्त्रक्रिया यांची मोठी बाजारपेठ देशात उभी राहिली.
अर्थात डिझायनर्स, कलेक्शन्स तयार करणे आणि ग्राहकांमध्ये ती लोकप्रिय करणे या दोन वेगवेगळय़ा प्रक्रिया आहेत, याची जाणीवही त्यांना होती. त्यामुळे कोरियन स्टाइल, इथली उत्पादनं आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय करणं, हे एक आव्हान त्यांच्यासमोर होतं. यासाठी मनोरंजन क्षेत्राची मदत झाली. कोरियन संगीत, मालिका, सिनेमे यामधून नवे प्रयोग प्रेक्षकांसमोर आणले गेले. वेगळी कथानके, गाणी इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचवली गेली. सुरुवातीला साचेबद्ध पाश्चात्त्य सौंदर्य परिमाणांना छेद देणारे चेहरे, कोरियन भाषेचा अडथळा, भिन्न सांस्कृतिक संदर्भ या अडचणी पार करत कोरियन मालिका, संगीत तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागलं. आजच्या घडीला ‘साँग हे क्यू’, ‘साँग जाँग की’, ‘ली जाँग सुक’, ‘पार्क शीन हये’, ‘जंगकूक’, ‘सुगा’, ‘जे-होप’, ‘लिसा’, ‘जेनी’ असे कित्येक कोरियन कलाकार, गायक जगभरातील तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. ‘आय पर्पल यू’, ‘रेड लाईट ग्रीन लाईट’, ‘कोरियन अंकओळख’ अशा कित्येक व्याख्या तरुणांना मुखोद्त आहेत. यास ‘हाल्यू’ किंवा ‘कोरियन वेव्ह’ म्हणतात. या लाटेवर सध्या अख्खं जग स्वार आहे.
साहजिकच याचा प्रभाव फॅशन आणि लाइफस्टाइलवर पडू लागला. या कलाकारांचे कपडे, स्टाइल लोकप्रिय होऊ लागली. त्यांचे लुक्स लोकप्रिय होऊ लागले. बॉडीसूट्स, फ्रेंच कोट्स, स्नीकर्स, असे कपडय़ांचे प्रकार पुन्हा ट्रेंडमध्ये येऊ लागले. त्यांच्या प्रभावामुळे कोरियन सौंदर्य प्रसाधनांची मागणी वाढू लागली. आठ ते पंधरा टप्प्यांमध्ये विभागलेली कोरियन स्कीनकेअर पद्धती जगभरात स्त्रियाच नाही तर पुरुषही तंतोतंत पाळू लागले. फेस मास्क, सिरम, स्प्रे सनस्क्रीन, कमीत कमी मेकअप असे अनेक कोरियन ट्रेंड्स जगभरात प्रसिद्ध झाले. डिझायनर डाँग जन कंगचा ‘डी.ग्नक’ ब्रँड वेगळय़ा धाटणीच्या स्ट्रीटवेअरसाठी ओळखला जातो. डिझायनर हंयेन साओला पहिलचं कलेक्शन ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये सादर करण्यासाठी आमंत्रण मिळालं. तेरेंस अँड केरिनकिम, कॅथलिन क्ये, यौनचन चंग, नोह ना असे कित्येक कोरियन डिझायनर्स सध्या जागतिक पातळीवर नावाजलेले आहेत. कित्येक जण हॉलीवूड कलाकारांसाठी कामही करतात. भारतात अजूनही कोरियन डिझायनर्सना ओळखणारा वर्ग तयार झाला नसला, तरी कोरियन कपडे, दागिने, अॅक्सेसरिज ऑनलाइन सहज मिळतात.
कोरियन स्टाइलमध्ये स्ट्रीटवेअरवर अधिक भर दिला जातो. रोजच्या वापरासाठी सुटसुटीत पण देखणा पेहराव करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे जॉगर्स, स्कर्ट्स, ड्रेसेस, जॅकेट्स असे नेहमीचे कपडे वेगळय़ा स्वरूपात पाहायला मिळतात. कोरियन डिझायनर्स रंग आणि िपट्र्सच्या बाबतीत प्रयोग करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे बोल्ड, उठून दिसणारे रंग, िपट्र्स, कलाकुसर कोरियन कपडय़ांमध्ये पाहायला मिळते. कोरियन समाजात ‘चिरतरुण स्टाइल’ला अधिक महत्त्व देतात. मिनी स्कर्ट्स, ड्रेसेस, ऑफ शोल्डर टॉप, बोल्ड िपट्र्स, गोंडस अॅक्सेसरिज असे कपडे वापरण्याचं विशिष्ट वय असतं, असा भेदभाव त्यांच्यात होत नाही. त्यामुळे विविध वयोगटांच्या मर्यादा मोडत, सगळय़ांना समाविष्ट करणाऱ्या लुक्सना डिझायनर्स पसंती देतात. ओव्हरसाइज ड्रेसिंग, लेअिरग या ट्रेंड्सना कोरियन डिझायनर्सनी वेगळय़ा स्वरूपात सादर केलं.
सिल्क स्क्रंची, हेअरक्लिप्स, इअरकफ्स, कानातले डूल यामध्ये कित्येक नवे प्रकार कोरियन ट्रेण्ड्समध्ये पाहायला मिळतात. बरं हे सगळं खरेदी करायचं तर त्याच्या किमतीसुद्धा प्रत्येक वर्गाच्या ग्राहकाला परवडतील अशा असतील, याची काळजीही या डिझायनर्सनी घेतली. त्यामुळे मध्यमवर्गापासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वामध्ये कोरियन ट्रेण्ड्स प्रचंड वेगात पसरले. आज कपाट उघडून पाहिलंत तर कोरियन फॅशनचा प्रभाव असलेली एखादी तरी वस्तू तुमच्याही नकळत तुमच्या घरात शिरलेली दिसेल. ती वस्तू तुमच्यापर्यंत किती सहज पोहोचली असेल, याची कल्पना कदाचित तुम्हालाही नसेल. पण कारण काहीही असो, त्या प्रवासात एक देश म्हणून दक्षिण कोरियाने गाठलेल्या या लांबच्या पल्ल्यालाही एकदा दाद द्याच.