lp14
ढोल-ताशे पथकांच्या जल्लोशमयी आवाजात आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ आणि ‘बम बम भोले’ अशा जयघोषात सिंहस्थातील पहिली पर्वणी साधू-महंतांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. चांदीचं आसन असलेल्या रथांवर अनेक महंत विराजमान झाले होते. नाशिक येथे वैष्णवपंथीय तीन आखाडय़ांचे जवळपास ७०० खालसे तर त्र्यंबकेश्वर येथे नागपंथीय दहा आखाडे यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. अग्रस्थानी धर्मध्वजा घेऊन मार्गक्रमण करताना भाले, तलवारी, कृपाण, दांडपट्टा आदी पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. नाशिकच्या मिरवणुकीत पुढे जाण्यावरून दिगंबरचे खालसे आणि निर्मोही आखाडय़ाचे खालसे यांच्यात वाद झाले. रामकुंडात घुसखोरी करत आखाडय़ांच्या शाही स्नानाआधीच दहा-बारा साधूंनी संधी साधत स्नान केलं. तर काही साधू प्रसिद्धी माध्यमांसाठी ‘पोज’ देण्यात गुंग झाले होते.

lp13
पहाटे तीन वाजल्यापासूनच महादेवाच्या जयघोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमली होती. नील पर्वताच्या पायथ्याशी खंडोबा मंदिरापासून जुना आखाडा, आवाहन आणि अग्नी आखाडय़ाची मिरवणूक सुरू झाली. अनेक आखाडय़ांनी सोने-चांदीचे आवरण असलेली सिंहासनं, रत्नजडित आभूषणांनी मढलेल्या देवता यांद्वारे त्यांची श्रीमंती दर्शवली. मिरवणुकीचे त्र्यंबकवासीयांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत केले. पंचनामा जुना, पंचायती आवाहन, पंचायती अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल या आखाडय़ांनी क्रमाने कुशावर्त कुंडात स्नान केले.
lp10
एकीकडे आखाडे आणि राजकारण्यांना वेगवेगळे नियम असतानाच यात भरडले जात होते ते सामान्य भाविक. पोलिसांच्या नियोजनामुळे त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना दहा किलोमीटर पायपीट करावी लागली. त्र्यंबकसह नाशिकमध्ये ठिकठिकाणी रस्ते अडवल्यामुळे स्थानिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची वाहने नाशिकच्या हद्दीलगत थांबवून तिथून अंतर्गत वाहनतळापर्यंत येण्यासाठी बसची व्यवस्था होती.
lp09
कुंभमेळ्यातील शाही पर्वणीसाठी पोलिसांनी जाहीर केलेल्या अटी व शर्ती साधू-महंतांनी धुडकावत मनमानी केली. यंत्रणेला धुडकावून लावत खुद्द महंत ग्यानदास यांनी चक्क दहा रुपयांच्या नोटांची भाविकांवर उधळण केली. प्रतिबंध असताना मिरवणुकीत काहींनी उंट व घोडे सहभागी केले. तसंच घातक शस्त्रांचे खेळ करण्यास बंदी असताना काहींनी थेट रामकुंडापर्यंत साहसी खेळांचे प्रदर्शन केले.
प्रत्येक आखाडय़ाकडे पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करणारे स्वत:चे खास पथक दिमतीला होते. मिरवणूक मार्गावर दांडपट्टा, भाले, तलवारी, चक्र, फरशे फिरविले गेले.
lp12
lp11
मिरवणूक दिमाखदार करण्यासाठी निर्मोही आखाडय़ाने सजविलेले उंट सहभागी केले. काही महंतांनी घोडय़ाच्या सजविलेल्या बग्गीतून मार्गक्रमण केले. हत्तीवगळता इतर प्राणी मिरवणुकीत सहभागी झाले.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader