रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
भटक्या लमाणांचा तांडा आता शेतीमुळे काही ठिकाणी स्थिरावत असला तरी याच शेतीच्या बेभरवशीपणामुळे त्यांना वर्षांतले काही महिने स्थलांतर करावे लागते. ते रोखण्यासाठी त्यांच्यातील पारंपरिक कलेचा वापर करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तमिळनाडूमधील धर्मापुरी जिल्ह्य़ात करण्यात आला.
शहरीकरण, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत वेगवेगळे भटके समाजही बदलत गेले. त्यांच्या पारंपरिक व्यवसायांवर अनेक नवनव्या गोष्टींनी घाला घातला. त्यामुळे अनेक भटके समाज त्यांच्या मूळ व्यवसाय, कला, चालीरीती, वेशभूषा सोडून नवीन गोष्टींकडे वळले. असाच एक समाज म्हणजे बंजारा किंवा लमाणी.
लंबाडी, सिंगाडी बंजारी, धेडोरोबंजारी, लमाणी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेला हा समाज प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळतो. ते तांडय़ाने फिरतात आणि ठिकठिकाणी वस्ती करून राहतात. हा समाज भारतभर एक भाषा, एक संस्कृती टिकवून आहे. गोरमाठी ही त्यांची भाषा. ते स्वतला राजपूत कुळातील राणा प्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या काळात ते मुस्लिमांबरोबर दक्षिणेत आले असावेत, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
काही जमातींना ‘जन्मजात गुन्हेगार’ समजलं जावं, असा कायदा ब्रिटिशांनी १८७१ मध्ये केला होता. त्यानुसार १९८ जमाती गुन्हेगार ठरवल्या गेल्या होत्या. यात भारतातली सर्वात मोठी भटकी जमात असलेल्या लमाण किंवा बंजारा जमातीचाही समावेश होता.
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी येथे शेकडो राजे राज्य करत होते आणि या सर्व राजांना खाण्या-पिण्याच्या आणि कपडय़ालत्त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम हा बंजारा समाज करत असे. ही जमात खारीक, खोबरं, मीठ, धान्य पुरवत असे. त्यासाठी राजस्थानात उंटाच्या तर इतरत्र घोडय़ांच्या तसंच बैलाच्या पाठींवर हे साहित्य लादून या जमातीची भटकंती सुरू असे. बंजारा म्हणजे त्या काळाचे मोठे व्यापारीच होते म्हटल्यास वावगे ठरू नये. राजेराजवाडय़ांना साहित्य पुरवणाऱ्या या जमातीला ही रसद पुरवणं सोईचं जावं, यासाठी खास कायदा करण्यात आला होता.
जिथं जिथं बंजारा समाजाचे तांडे व्यापारासाठी भारतात फिरतील, तिथं तिथं बंजारांच्या बलांसाठी, ‘तीन घाट का पानी’, ‘बैल का चारा’ मोफत दिला जावा, असा हा कायदा होता. हे सर्व बंजारा अर्थात लमाण लोक गोरेपान, उंच, धिप्पाड, डोक्याला मुंडासं बांधलेले, खांद्यावर रुमाल टाकलेले, मिशांचे मोठमोठे आकडे असलेले असे असत. त्यांच्या या अशा पेहरावांमुळे ते उठून दिसत असत.
बंजारा स्त्रिया अनेक प्रकारचे दागदागिने घालत. मनगटापासून ते दंडापर्यंत हस्तिदंताच्या पांढऱ्या बांगडय़ा त्या घालत. बाहेरगावी फिरताना आपलं सौंदर्य थेटपणे दिसू नये म्हणून शरीरावर व चेहऱ्यावर त्या गोंदवून घेत असत. ही गोंदणंही खूप मोठी असत. तसेच केशरचना करताना केसांना वेगवेगळ्या प्रकारचे आळेपिळे त्या देत. अशा केसांवर आरसे लावून त्यांवर सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी त्या केशभूषा करत. सजवत. वेण्या चेहऱ्यावर सोडून सारा चेहरा त्या झाकून घेत, तर त्यांचे कपडे भडक रंगावर आरसे आणि भरतकाम, जरीकाम केलेले असत. अजूनही काही ठिकाणी लमाण स्त्रिया आजही ही वेशभूषा, केशभूषा करत असल्या तरी याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. शहरीकरणाच्या रेटय़ात त्यांनीही अनेक बदल स्वीकारले. त्यातला प्रमुख बदल म्हणजे वेशभूषेचा.
वेशभूषा बदलली आणि त्यांचा पारंपरिक काचा लावलेला, भरतकाम केलेला असा पायघोळ पोशाख किंवा वस्त्रेही बदलली. पूर्वी लमाण स्त्रिया स्वतचे कपडे स्वत विणून, शिवून घालत असत. त्यांची भरतकामाची कला पंरपरेने त्यांच्या मुली-बाळीही शिकत. मात्र हळूहळू ती कलाही कमी होत गेली.
तमिळनाडूमधील धर्मपुरी जिल्ह्य़ात लमाणांच्या याच कलेने त्यांना सध्या प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. येथील सिट्टीिलगी येथे लमाणांचा तांडा आहे. व्यापारामुळे मूळ भटकी असणारी ही जमात आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावली आहे. त्यातलंच एक ठिकाण आहे सिट्टीिलगी. येथे ते काही प्रमाणात शेती करतात किंवा मजुरी करून गुजराण करतात. शेतीही बेभरवशाची असल्याचे अनेकदा हे लोक शहराच्या ठिकाणी मजुरीसाठी स्थलांतर करतात.
तमीळनाडूमध्ये ‘ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह’ (टीएचआय) हे रुग्णालय सिट्टीिलगी खोऱ्यातील लोकांच्या आरोग्याबरोबरच विकासासाठी कार्य करते. टीएचआयला या लमाणांच्या स्थलांतराची समस्या लक्षात आली. हे स्थलांतर टाळून त्यांना त्यांच्या गावातच काही रोजगाराचे साधन उपलब्ध करून देता येईल का याचा अभ्यास त्यांनी केला. त्यात त्यांना त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेविषयी समजले. याच कलेचा वापर करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे टीएचआयने ठरवले. त्यानुसार तांडय़ातील ज्येष्ठ आणि वयस्क स्त्रियांना त्यांनी तरुण स्त्रियांना प्रशिक्षण देण्यास सांगितले. आधी त्यांनी साध्या कापडावर आरसेकाम आणि भरतकाम करण्यास सुरुवात केली. याची सुरुवात झाली २००६ मध्ये. त्यावेळी अगदीच प्रशिक्षणार्थी असणाऱ्या मुली, स्त्रिया त्यांच्या कलेत पारंगत झाल्या. मग टीएचआयने त्यांच्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. यात त्यांना शिवणकाम शिकवले. त्यातून भरतकाम केलेल्या कापडाचा वापर करून तयार कपडे, पर्स, पिशव्या, शोभेच्या वस्तू, टेबलक्लॉथ, उशांचे अभ्रे लमाणी स्त्रिया तयार करू लागल्या.
एव्हढेच नव्हे तर टीएचआयच्या मदतीने त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शनही भरवले गेले. यातून मग २००९ मध्ये लमाण स्त्रियांची ‘पोरगाई’ ही संस्था स्थापन करण्यात आली. पोरगाईचा अर्थ आनंद, गर्व. लमाण स्त्रियांनी केलेल्या वस्तू या संस्थेच्या मार्फत विकण्यात येऊ लागल्या. पोरगाईची उत्पादनं लोकांपर्यंत जाऊन पोहोचली. एवढी की त्यांच्या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली. या विक्रीच्या उलाढालीतून २०१६ मध्ये या संस्थेची इमारत उभी राहिली. आता त्यांची उत्पादने ऑनलाइनही विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शिवाय या संस्थेने सेंद्रिय कॉटनचाही प्रसार या उत्पादनांच्या माध्यमातून केला आहे.
बहुतांश लमाण स्त्रियांना आता यातून रोजगार मिळत आहे. दरमहा पाच हजार रुपये त्या घरबसल्या कमावत आहेत. हे काम त्या त्यांच्या वेळेनुसार करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांकडे, घरातील वृद्धांकडेही लक्ष देता येते. स्त्रियाच नव्हे तर लमाण पुरुषांनाही शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्त्रियांना मिळालेल्या रोजगाराचा उपयोग त्या मुलांची शिक्षण, दैनंदिन गरजा आणि इतर गोष्टींसाठी करतात. या उपक्रमामुळे त्यांना कलाकार म्हणूनही प्रतिष्ठा मिळतेच आहे, शिवाय आत्मविश्वासही मिळाला आहे. ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे. ग्राहंकाच्या मागणीनुसार आणि बदलत्या ट्रेण्डनुसार काम करण्याची संधी त्यांना मिळते. एका भटक्या समाजाला स्थिरावण्याचं महत्त्वाचं काम यामुळे सुरू झालं आहे.