शर्मिला टागोर – response.lokprabha@expressindia.com
माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. माझ्या अभिनयामुळे नव्हे, तर दीदींच्या आवाजामुळे माझ्यावर चित्रित झालेली गाणी खूप गाजली, प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली! हे सगळं श्रेय त्या सात अक्षरांचं ! लता मंगेशकर- एक मखमली जादूई आवाज, सरस्वतीच्या वीणेचा झंकार..
लता दीदींशी माझी पहिली भेट शक्ती सामंत यांच्यासोबत झाली. ‘आराधना’ चित्रपटाच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. ‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ हे गीत त्यांनी त्या दिवशी रेकॉर्ड केलं! ‘आराधना’ चित्रपटाला न भूतो न भविष्यति असं यश लाभलं ज्यात गीत- संगीताची भूमिका फार महत्त्वाची होती. दीदींचं गाणं पहिल्याच टेकला ओके झालं. शक्तिदा यांनी माझा परिचय गानकोकिळेशी करून दिला. दीदींच्या आवाजात खूपच माधुर्य, आपलेपणा आणि नम्रता होती. तेव्हादेखील त्यांना बंगाली भाषा उत्तम अवगत होती. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला माझ्या पदार्पणाचा ‘अपूर संसार’ हा चित्रपट त्यांनी पाहिला होता, १९५९ मध्ये.. माझं वय तेव्हा फक्त १४ र्वष होतं. इतक्या कोवळय़ा वयातला माझा परिपक्व अभिनय त्यांना भावला, असं त्या पहिल्याच भेटीत म्हणाल्या. आमचे सूर जुळले ते असे!
पुढे मी १९६४ च्या सुमारास मी शक्ती सामंता यांच्या ‘कश्मीर की कली’मधून हिंदूी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि माझ्या सगळय़ाच हिंदूी चित्रपटांत लता मंगेशकर यांचं पाश्र्वगायन असणार हे समीकरण दृढ झालं. मी पडद्यावर परफॉर्म केलेली सगळी गाणी दीदींनी उत्कृष्ट गायली. शक्य होईल तेव्हा मी त्यांच्या रेकॉर्डिग्जना उपस्थित राहत असे. त्या काळातच लक्षात आलं की, त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे.
माझे पती आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू नवाब मन्सूर अली खान हेदेखील लतादीदींचे चाहते झाले आणि दीदींची गाणी त्यांच्या ओठांवर येऊ लागली. टायगरशी (नवाब पतौडी) त्यांच्या गप्पा मुख्यत्वे क्रिकेट, वन्यजीवन, कार्स, खाद्यसंस्कृतींवर अशा विषयांवर रंगत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रणाला टायगरदेखील आले होते. १९६० ते आजतागायत आमची कौटुंबिक मैत्री राहिली. मला आणि सोहालादेखील दीदींनी प्लेबॅक दिला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. शोभना समथ, तनुजा, त्यानंतर काजोल.. तीन पिढय़ांचा आवाज असलेली दुसरी कुठलीही गायिका या पृथ्वीतलावर नसावी! दीदी समस्त भारतीय अभिनेत्रींचा आत्मा होत्या!
‘अनुपमा’ चित्रपटात माझ्या तोंडी असलेलं ‘कुछ दिल ने कहा’ हे गीत मला अत्यंत प्रिय आहे. दीदींचा आवाज खूप मखमली, तरल लागला आहे. गुलझार यांनी लिहिलेलं ‘खामोशी’ सिनेमातलं ‘हमने देखी है इन आँखो की महकती खुशबू’ हे गीतदेखील मला फार आवडतं. त्यांच्या हजारो गीतांपैकी नेमकं कोणतं गाणं प्रिय आहे, हे सांगणं निव्वळ अशक्य!
मला स्वत: त्या लता मंगेशकर पुरस्कार देणार होत्या. त्यासंदर्भात २०१९ मध्ये आमचं फोनवर बोलणं झालं होतं. २०२० मध्ये त्यांनी मला मुंबईत आमंत्रित केलं. सारं काही ठरलं होतं; पण २०२० मध्ये करोनाची साथ पसरली आणि हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पुन्हा २०२१ मध्ये मला हा पुरस्कार द्यायचं ठरलं. त्यांना प्रत्यक्ष भेटण्यास मी उत्सुक होते; पण पुन्हा करोनाने डोकं वर काढलं. मी लता दीदींना फोनवर सांगितलं, ‘या वर्षीही मला मुंबईला येता येणार नाही.’ त्यांची भाचीकडे- रचनाकडे निरोप दिला, ‘२०२२ मध्ये मी येईनच आणि हा पुरस्कार दीदींच्या हस्ते नक्की घेईन.’ माझं दुर्दैव हे की, आता दीदी नाहीत. त्यांच्या हातून त्यांच्या नावाचा पुरस्कार घेण्याचा सुवर्णक्षण माझ्या हातून कायमचा निसटला! २०१९ मध्येच मी दीदींना म्हटलं होतं, ‘मुझे आपके साथ एक पिक्चर लेनी है,’ त्यावर त्यांनी हसून म्हटलं, ‘जी बिलकूल!’
दीदी आजारातून बऱ्या होतील अशी आशा त्यांच्या लाखो हितचिंतक, चाहत्यांप्रमाणेच मलाही होती; पण दीदींशी माझी भेट राहूनच गेली. त्यांच्या सोबत एक छायाचित्र घेणंही राहून गेलं! त्यांच्या प्रेमळ सहवासाला मी कायमची मुकले. त्यांच्या मैत्रीतील हळुवार क्षण कायम आठवतील. आता तेच क्षण माझ्यासाठी मौल्यवान खजिना आहेत.
क्रिकेट, दुर्बीण आणि समालोचनक्रिकेट पाहण्यासाठी त्या बायनॅक्युलरचा- दुर्बिणीचा वापर करत आणि त्यांच्या जवळ बसलेल्या व्यक्तीसाठी समालोचन करत.
(शब्दांकन- पूजा सामंत)