दिलीपकुमार-देव आनंद- राज कपूर या त्रयीनंतर राजेश खन्नाचा करिश्मा अनुभवणाऱ्या प्रेक्षकांना अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅनने भुरळ घातली. त्यानंतर मात्र मोठय़ा पडद्यावर बराच मोठा काळ प्रभावी असा नायकच नव्हता.
टप्पा १ १९८६ ते १९९३
ही वास्तवकथा आहे ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या भारतातील प्रत्येकाच्या कलात्मक भानाची. सिनेमा जगण्याचा आरसा की जगणे सिनेमाचा आरसा, असा प्रश्न पडणाऱ्या एका पिढीची. समाजाच्या लोकप्रियतेपुढे डोके टेकविण्याच्या प्रवृत्तीची आणि नायकांध बनलेल्या सिनेमा दर्शकांतल्या बहुतांश मानसिकतेची. नायकवजा काळामुळे हिंदी सिनेमा पाहायचे टाळून विविध पर्याय निवडणाऱ्या अल्पांश जनतेचीदेखील ही वास्तवकथा आहे..
आदल्या पिढीमध्ये सिनेमापटलावर राज्य करणारे नरपुंगव आणि नारीश्रेष्ठ सुपर-डय़ुपर स्टार होते, म्हणून नंतर आलेले सगळेच त्यांच्यापुढे सुमार असल्याचा सततचा धोशा आमच्या आदल्या पिढीकडून केला गेला. म्हणजे झाले असे की, नव्वदीच्या दशकामध्ये चित्रपट नायकामधला ‘अँग्री यंग मॅन’ शिल्लकच राहिला नाही. परिणामी त्याच्या उतारकाळातील किंवा वारसा नसलेल्या उत्तराधिकाऱ्यांचे विनोद बनलेले चित्रपट पाहण्याची वेळ आमच्या पिढीवर आली.
साल आठवते ते ‘लव्ह एटीसिक्स’ या चित्रपटाच्या नावात असलेल्या वर्षांमुळे. तेव्हा ठाणे- उपनगरांमध्ये थिएटरमध्ये जाण्याऐवजी व्हिडीओ पार्लर्समधून व्हीएचएस आणून चाळी किंवा सोसायटय़ांमध्ये सार्वजनिक सिनेमे पाहिले जात. (चाळीतील लोक एक तर टॅक्स फ्री झाल्यानंतर चित्रपट पाहायला थिएटर गाठत किंवा व्हीएचएस उपलब्ध नसेल तेव्हा.) सार्वजनिक महोत्सवांमध्ये कलर टीव्हीसह व्हीसीआर भाडय़ाने आणले जात आणि सामूहिकरीत्या ताज्या सिनेमांचा रसास्वाद कार्यक्रम चाले. वय वर्षे साडेपाच-सहा असतानाची जाणीव ही या ‘लव्ह एटीसिक्स’ चित्रपटाची व्हिडीओ कॅसेट दुर्मीळ असल्यामुळे चाळीतील चित्रपट दर्शन लांबल्याची आहे. पोरं- तरुण- तरुणी महिला आणि म्हाताऱ्या-कोताऱ्यांची ‘लव्ह एटीसिक्स’ चित्रपट पाहण्यासाठी तास-दोन तास ताटकळत गप्पा मारत राहण्याची आठवण मनात कोरलेली आहे. एकदाची ती कॅसेट आल्यानंतर शांततेच्या मुद्रेत जाण्याचाही तपशील लख्ख आहे.
तेव्हा दूरदर्शनच्या एकाच वाहिनीवर रविवारी संध्याकाळी चित्रपट लागे. (शनिवारी मराठी) त्यातही अमिताभ बच्चनचा सिनेमा लागला की त्यात साग्रसंगीत म्हणजे खरेच ट्रम्पेट आणि चित्रविचित्र वाद्यांच्या आवाजाने हाणामारी असे. हा लंबू हिरो ५० जण असले तरी मार न लागता त्यांना ‘बिशूम. बिशूम..’ आवाज करीत नमवू शकतो, ही गमतीशीर समजूत करून घेतलेली होती. नेमका हा ‘बिशूम’ आवाज चित्रपटांतून केव्हा नष्ट झाला हा संशोधनाचा विषय असला, तरी
८६-८७ पर्यंत सिंगल फसली नायकदेखील अगडबंब खलनायकाला मारताना तो आवाज येत असे.
‘लव्ह एटीसिक्स’मध्ये माझ्या वयाच्या पोरा-टोरांना अपेक्षित ‘बिशूम’ नव्हते, पण गाण्यांच्या चित्रविचित्र या विशेषणाला लाजविणारी नृत्यकला होती. तेव्हाच्या लोकांच्या कानांना सहिष्णुतेची उमेदवारी करून देणाऱ्या मुहंमद अझीझ यांच्या गीतांचा त्यात मारा होता. ही गाणी आता यू टय़ूबवर तपासली, तेव्हा त्यातल्या शब्द आणि संगीताचा प्रकार पाहून त्यावेळच्या जाणत्या दर्शकांच्या सहनशीलतेचे पुरस्कार देऊन कौतुक करायला हवे यावर कुणाचेच दुमत नसेल. या चित्रपटानंतर लक्षात राहिलेली बाब ही की, तेथल्या यच्चयावत वृद्धांनी असला चित्रपट आणल्याबद्दल तरुणांशी घातलेला वाद आणि त्या वादाचे पर्यवसान पुढे सुरू होणाऱ्या चित्रपटाचा खेळ रद्द होण्यात झाले. प्रत्येक जण गोविंदा या नटाचा ‘स्ट्रीट डान्सर’ नावाचा चित्रपट न पाहता आपापल्या घरी गेला. पुढे ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट चाळीत दुसऱ्या एका ठिकाणी व्हीसीआर भाडय़ाने आणलेला तिकडे पाहिला.
चाळीतल्या काही बिऱ्हाडांमध्ये टीव्ही नव्हता. त्यांच्याकडे व्हिडीओ आणून चित्रपट पाहण्याची असली हौस खूप असे. हे सारे केबल टीव्ही येण्याच्या पाच-सात वर्षे आधीचे आहे. त्या काळाची गंमत अशी होती, की सिनेमाविषयक वाहिलेल्या साप्ताहिक, मासिकांची चलती खूप होती. पण त्या काळाला साजेसे हिट सिनेमे आत्ता मूर्खवत वाटतील असे होते.
गोविंदा हा हडकुळा हिरो एकामागून एक भीषण पथकांचे सिनेमे करीत होता. त्याच्या बहुतांश चित्रपटांमध्ये संस्कार आणि नीतिमूल्यांचे गमतीशीर डायलॉग असत. तो वागत मात्र तसा अजिबात नसे. मिथुन चक्रवर्तीचा उतारकाळ हाच होता. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्याला बहीण असे. तिच्यावर अत्याचार होई आणि मग तो एकेका अत्याचाऱ्याला टिपून मारी. चंकी पांडे ‘आग ही आग’ नावाच्या चित्रपटात होता. त्यानंतर त्याचा ‘पांच पापी’ नावाचा सिनेमा व्हीसीआरवर पाहिल्याचे आठवते. ‘प्यार का मंदिर’ नावाच्या मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटाची मी अनेक घरांमध्ये पारायणे केल्याचे लक्षात आहे. पुढे वय वाढल्यानंतर आणि चित्रपटांचा अभ्यास केल्यानंतर या चित्रपटांच्या मर्यादेहून अधिक हा नायकवजा काळ असल्याचे लक्षात आले.
या काळात अनिल कपूरचा ‘तेजाब’ येऊन गेला होता. ‘राम लखन’ आला होता आणि त्यानंतर ‘मिस्टर इंडिया’ने काही काळ अनिल कपूरची चलती केली होती; पण तो कधीही अमिताभ बच्चन वाटला नाही. अमिताभ म्हातारा झाला होता, तरी ‘चल चल री चल मेरी राम सियारी’ की असेच कोणते तरी गाणे गाऊन तरुण असल्याचे भासवत होता. ‘शहेनशहा’ त्याच्या म्हातारपणातला सर्वात लोकप्रिय चित्रपट असेल. त्यानंतर ‘अजुबा’ आणि किती तरी चित्रपट तिकीटबारीवर कोसळले. या वर्षांत जॅकी श्रॉफ होता, सनी देओल होता, संजय दत्तही होता; पण कुणीच राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चन यांच्यासारखा काळाचा नायक बनू शकत नव्हता.
तेव्हा ‘त्रिदेव’मधून नासीरउद्दीन शहा पुन्हा एकदा हिरोसदृश भूमिकेत झळकला. त्याच्या ‘जलवा’, ‘हिरो हीरालाल’ आणि ‘जुल्म को जला दुंगा’ या चित्रपटांमधून तो आर्ट फिल्म ते व्यावसायिक फिल्ममध्ये लीलया वावरू शकतो हे त्याने दाखवून दिले होते. त्यानंतर आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ने धमाल उडवून दिली. चाळीमध्ये बारशापासून लग्नापर्यंत सगळीकडे ‘पापा कहते है’ किंवा ‘अकेले है तो क्या गम है’ वाजत होते; पण यापुढे म्हणे परफेक्शनिस्ट असा शिक्कामोर्तब झालेल्या या कलाकाराने डझनावरी फ्लॉप चित्रपट दिले. त्याला बॉलीवूडच्या सुपरस्टारपदाची रिकामी जागा काही भरता आली नाही.
कबुतरपालनाचा आणि ‘फ्रेण्ड्’ लिहिलेल्या टोप्याविक्रीचा उच्चांक ‘मैने प्यार किया’ या सिनेमाने करून दाखविला. भाग्यश्री या नायिकेची तुलना मधुबाला ते वाटेल त्या दैवी सौंदर्याशी झाली. पुढे या भाग्यश्रीने सिनेसृष्टीला लाथ मारून आपण मधुबाला किंवा कुणीही नसल्याचे सिद्धच केले. सलमान खानने पुढे काही फ्लॉप सिनेमे देण्यासाठी कंबर कसली. त्याचा ‘सनम बेवफा’, ‘एक लडका एक लडकी’, ‘निश्चय’, ‘चंद्रमुखी’, ‘सूर्यवंशी’ अशा एकापेक्षा एक वाईट सिनेमांची मजा यू टय़ूबवर आजही घेता येऊ शकते. सलमान खान आणि आमिर खान फ्लॉप सिनेमांच्या वाटेवरून जाताना एकमेकांना भेटले ते ‘अंदाज अपना अपना’च्या मनोरंजन चौकामध्ये. हा चित्रपट हिट झाला. आमिर खानचा ‘जो जिता वही सिकंदर’पर्यंत सारे ठीक होते. नंतर पुन्हा ‘गुलाम’ आणि त्यानंतरचे चित्रपट येईस्तोवर आमिर खानने डोके वर काढले नव्हते. सलमान खानही ‘ओ ओ जानेजाना’ या गाण्यामध्ये इलेक्ट्रिक गिटारवर आकुस्टिक गिटारचा आवाज काढण्याचा विश्वविक्रम करून ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटापर्यंत भूमिकांचा सुमारोत्सव करीत होता.
नव्वदीच्या आसपासच राहुल रॉय या गाणे गातानाची अॅक्टिंग तोंड प्रचंड फाकवून करणाऱ्या कलाकाराची ओळख ‘आशिकी’मुळे झाली. या चित्रपटामध्ये अन्नू अगरवालसारखी हिरॉईन परंपरेत न शोभावी अशी नायिका पाहायला मिळाली. पुढे काही वर्षांनी संजय दत्तने ‘खलनायक’ चित्रपटामध्ये ‘नायक नही खलनायक हू मै’चा जसा अभिनयातिरेक करून दाखवला, तसाच अन्नू अग्रवालने ‘खलनायिका’ चित्रपटातून दाखवून दिला. एकूणच अॅण्टीहिरो तयार होणे या काळाची गरज बनली.
गाणी सुंदर पण चित्रपटातील अनोळखी कलाकारांमुळे चित्रपट डब्यात असे अनेक प्रकार १९९२ उत्तर काळामध्ये झाले. ‘यारा दिलदारा’ चित्रपटातील ‘बिन तेरे सनम मर मिटेंगे हम’ आणि इतर अनेक गाणी जतीन-ललित यांच्या संगीतामुळे आज कित्येकांना सांगता येतील, पण त्यातल्या आसिफ शेख आणि ऋतिका पांडे या अभिनेत्रीबद्दल कुणाला सांगता येणार नाही. पैकी आसिफ शेख नंतर टीव्हीवर आल्यामुळे लोकांना परिचित असेल. त्याने आणखीही सिनेमांमध्ये काम केले होते. ‘रामा हो रामा’ हे त्यातले आणखी आठवणीय नाव. तारिक शहा, सुमीत सेहगल, रूपा गांगुली यांची भूमिका असलेला ‘बहार आनेतक’ नावाचा चित्रपट आत्ता कुणालाही आठवणार नाही. त्यातले ‘काली तेरी चोटी है, परांदा तेरा लालनी’ हे गाणे मात्र लोकप्रिय झाले होते. कालौघात यातले अभिनेते स्टारही बनू शकले नाहीत.
टप्पा २ १९९३ ते २०००
या दुसऱ्या टप्प्यामध्ये उदारीकरणाचा आणि केबल चॅनलचा सुळसुळाट मोठा झाला होता. मनोरंजनासाठी टीव्हीवरील फक्त दूरदर्शन आणि व्हीसीआरवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. दररोज दोन-तीन चित्रपट दाखविले जात. विविध टीव्ही वाहिन्यांवर सेलिब्रिटी तयार व्हायला लागले. या काळात लोकांकडे पैसा खुळखुळू लागला होता. निम्न मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात प्रवेश करू पाहत होता व उच्च मध्यमवर्ग आणखी पुढे जाऊ पाहत होता. या सर्व प्रकारामध्ये सिनेमाही मारधाडीच्या, सूड-बदलांच्या आणि प्रेमाच्या नावाने हिजड-चाळे करण्याच्या पातळीवर पोहोचला होता.
टीव्हीवरचा पहिला कलाकार शाहरुख खानच्या नावाने लोकांनी हिरो आणि खलनायकाच्या भूमिकेत पाहिला. ‘दिवाना’, ‘चमत्कार’ आणि ‘डर’, ‘अंजाम’ यासारख्या हिट-फ्लॉप चक्रामध्ये अडकत शाहरुख खानची काळाचा नायक होण्याची तयारी सुरू झाली होती. याच काळात आणखीही काही लोक टीव्हीमधून मोठय़ा पडद्यावर आले.
‘सुपरहिट मुकाबला’ नावाच्या टीव्ही मालिकेतील निवेदन करणारा बाबा सेहगल ‘आ जा मेरी गाडी मै बैठ जा’ म्हणत ‘मिस फोर ट्वेंटी’ नावाच्या रद्दड सिनेमातून झळकला. ‘आँखे’ नावाच्या टीव्ही मालिकेमध्ये काम करणारा शरद कपूर शाहरुख खानच्या समोर ‘जोश’ दाखवू लागला. मुकुल देव ‘एकसे बढकर एक’ गीत मालिकेतील अँकरपदावरून डझनभर फ्लॉप सिनेमांचा हिरो झाला. यात मनोज वाजपेयी आणि आर. माधवन या टीव्हीवरच्याच ‘बदलते रिश्ते’ नावाच्या मालिकेत झळकलेल्या कलाकारांनी खूप नाव कमावले. ‘इम्तिहान’ मालिकेतून आशीष विद्यार्थी नावाच्या कलाकाराने बॉलीवूडच्या खलनायकपदासाठी चांगलीच कंबर कसली.
या काळात सलमान खान-माधुरी दीक्षितचा ‘हम आपके है कौन’, शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हे फार थोर नसलेले सिनेमे का चालले, तर त्याचे कारण मध्यमवर्गाला आपला वर्ग सोडून पुढच्या, वरच्या वर्गात जायचे पडलेले स्वप्न.
नायक आणि नायिके पैकी एक गरीब आणि एक श्रीमंत यांचा संघर्ष नसलेले आणि सरळसोट कथानकाद्वारे संस्कार, भावभावना, डान्स नंबर गाणी आणि साजेसी प्रेमकहाणी आदी देणारे चित्रपट प्रेक्षकांना आवडायला लागले. चित्रपटात स्वित्र्झलड आणि परदेशातील कोणत्याही भागातील चित्रीकरण या काळात अनिवार्य झाले. शाहरुखचा ‘परदेस’ चालण्यामागे ‘मक्के की रोटी आणि सरसो का साँग’वाली छानपैकी प्रेक्षकशरण गोष्ट होती. अक्षय कुमारचे खिलाडीपट मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटांची कमतरता पूर्ण करीत होती. ऋतिक रोशन आपल्या वडिलांच्या खांद्यावरून ‘कहो ना प्यार है’ म्हणत अल्पपळीचा स्टार झाला. नंतर त्याच्या वाईट चित्रपटांची गणती राहिली नाही. या दरम्यान, नाना पाटेकर आणि ऋषी कपूर हे वयस्क कलाकार बॉलीवूड जिंकायच्या शर्यतीतून बाद व्हायला तयार नव्हते. ऋषी कपूर तर साठीमध्येही आपल्या वडिलांप्रमाणे नायकाच्या भूमिकेत होता. ज्यांनी ‘दामिनी’ पाहिला असेल, त्यांना त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कपाळावर सतत पडलेल्या आठय़ाही मोजता येतील. या साऱ्या सिनेमांत गाणी होती. लोकांना लईच आवडणारी स्टोरी होती. पण नायक होता का? यादरम्यान आलेल्या एकेक हिरोंची नावेही आता कुणाला स्मरणात नसतील. विवेक मुश्रान, ‘सलमा पे दिल आ गया’ चित्रपटातील आयुब खान, ‘सर’ नावाचा सिनेमा पाहून सरफोड करावेसे वाटावे असा अतुल अग्निहोत्री, अविनाश वाधवान हे तुम्हाला आठवतात का हो?
टप्पा ३ २००० ते २००८
दोन हजारोत्तर काळात आमिर खानने ‘लगान’द्वारे काळाचा नायक होण्याचा प्रयत्न केला. ‘दिल चाहता हैं’ या चित्रपटातूनही त्याचा तो प्रयत्न दिसून आला, पण या काळात कुणीच नायक बनू शकले नाही. कारण इथली चित्रपटसृष्टी एकाच वेळी परदेशी कल्पनांना जसेच्या तसे राबवून वाईटोत्तम सिनेमा बनविण्याच्या मागे लागली होती. वाईट सिनेमा म्हणजे, कथानक बँकॉक वा दुबईला घडत होतं. ते इतकं परदेशी वाटत होतं की लोकांनी त्या चित्रपटांना आठवडय़ातच अलविदा करण्याचे ठरविले. अमिताभ बच्चनच्या सुपुत्राने याच काळात बॉलीवूडच्या समुद्रात हातपाय मारायला सुरुवात केली. अक्षय खन्ना या समंजस कलाकाराला असमंजस पटकथांच्या चित्रपटात काम करावे लागत होते. बॉबी देओल, सनी देओल यांची अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू होती. ‘युवा’ चित्रपटाद्वारे अभिषेक बच्चन लोकप्रिय झाला. त्यानंतर २००५ ते २००८ या कालावधीमध्ये स्टार नसलेल्या चेहऱ्यांची बॉलीवूडमध्ये भरती झाली. २००४ ते २००८ या कालावधीपर्यंत बॉलीवूडचे संगीत आणि चित्रपट पूर्णपणे परधार्जिणे बनले. रेहमानची गाणी त्यातल्या त्यात श्रवणीय होती. आमिर, सलमान आणि शाहरुख खान यांनी वर्षांतील विशिष्ट कालावधीत ठरवून सिनेमे प्रदर्शित करण्याचे निश्चित केले. कमी सिनेमे, जास्त नफा. कमी दर्जा तरी जास्त चर्चा हे प्रसिद्धीचे गणित होते.
मोमेण्टोचा सुलटा रिमेक करून गझनी बनवत आमिरने, पोलिसाच्या भूमिकेद्वारे जेसन स्टेथमच्या हाणामाऱ्या उचलत सलमानने आणि आपल्या ओव्हर अॅक्टिंगची भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत शाहरुख खानने या काळाचे नायकपदत्व मिळविले नाही, पण तिथपर्यंत कुणी पोहोचू नये याची काळजी घेतली. या दरम्यान, लोकांनी मूर्ख व्यक्तिरेखा एकाच चित्रपटात भरणाऱ्या ‘गोलमाल’ सारख्या हिडीस विनोदी सिनेमांना उचलून धरले.
या काळात जगाचे पुरते सपाटीकरण झाले होते. प्रेक्षकवर्ग सुधारला होता. परदेशी वाहिन्यांवर तो जागतिक चित्रपट पाहत होता आणि आपल्या बॉलीवूडच्या सिनेमातील मर्यादा, दोष त्याला लख्ख कळत होते. कळत नव्हते, ते फक्त आपल्या चित्रकर्त्यांना. त्यामुळेच रोहित शेट्टीचे कारउडवे चित्रपट पाहायला मिळत होते. या सिनेप्रवाहात हिमेश रेशमिया नावाचे संगीतवादळही हिरो बनून गेले होते. बॉलीवूड सिनेमांचा सर्वात वाईट काळ हा होता.
टप्पा ४ २००८ ते आज
या काळात अँग्री यंग मॅनचा सिनेमा आला असता, तर लोकांनी त्याची खिल्ली उडविली असती. २००८ पासून सुरू झालेला सिनेबदलाचा नवा टप्पा असा आहे, ज्यातील लोकांनाच काळप्रवाहाला पुरून उरेल असा नायक नकोय. गेल्या तीसेक वर्षांतील नायकवजा अवस्थाच त्यांना आता आवडू लागली आहे. २००८ साली अनुराग कश्यपचा ‘देव डी’ आला. अभय देओल या आधीच्या देओल परंपरेला तिलांजली देणाऱ्या नायकाचे आधीही काही आदळलेले सिनेमे आले होते. पण ‘देव डी’ या एकटय़ा चित्रपटाने अनेक गोष्टी बदलून टाकल्या. बऱ्याच वर्षांनी एक चांगला चित्रपट लोकप्रिय झाला. अनुराग कश्यपचा जॉन अब्राहम अभिनित बॉलीवूड न्वारही कौतुकला गेला. विशाल भारद्वाजच्या शिव्यारडय़ा सिनेमांतूनही सैफ अली खान, अजय देवगण यांचा जीर्णोद्धार झाला. २००८ नंतर नवसमांतर चित्रपटांचा तांडाच मोठय़ा पडद्यावर दाखल झाला. ‘लव्ह, सेक्स अॅण्ड धोखा’, ‘ओय लक्की, लक्की ओय’, ‘शांघाय’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘इश्किया’, ‘रिव्हॉल्व्हर रानी’सारखे आडशहरांमधले सिनेमे आले. ‘तनू वेड्स मनू’सारखे मनोरंजनाची हद्दपारी करून दाखविणारे विनोदप्रकार आले. ‘मसान’सारखे गंभीर सिनेमे आले.
नायकांमध्ये नव्या चेहऱ्यांना नाकारण्याचे २० वर्षांपूर्वीचे प्रेक्षकांचे सूत्र बदलले. नवाजुद्दीन सिद्दिकी, रणबीर कपूर, राजकुमार राव, कात टाकलेला इम्रान हाश्मी, वीर दास, वरुण धवन, आयुषमान खुराणा यांचे सिनेमे पाहिले जातात. त्यांच्या चेहऱ्यांवरून त्यांना नाकारले जात नाही. नायिकांमध्ये प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कंगना राणावत ते श्रद्धा कपूर यांनी दोन दशकांपूर्वी असलेल्या नायकांच्या पुढे नाचायचे, त्यांच्यासोबत पळायचे आणि चित्रपटाच्या शेवटी खलनायकाकडून बंधक झाल्यावर घाबरून दाखवायचे, या शिरस्त्याला बदलून दाखविले. कंगना राणावत बॉलीवूडची अँग्री यंग वुमन बनली. प्रियांका चोप्रा तर हॉलीवूडमध्ये रांगू लागली.
आज कोणता चित्रपट चालू शकेल आणि कोणता डब्यात जाईल याचे भाकीत करणे अवघड बनले आहे. दीपिका पदुकोणचा ‘पिकू’ लोकांना आवडू शकतो तसाच नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘मांझी’ही.
प्रेक्षकांचा सिनेमा आणि मनोरंजनाकडे पाहण्याचा दोन दशकांपूर्वीचा कल आज पूर्णपणे बदलून गेला आहे. मनोरंजन कधी नव्हे इतके सहजसोपे झाल्यामुळे उच्च-मध्यम-निम्न वर्गस्तर कोसळून गेले आहेत. एकाच वेळी झोपडवस्ती आणि टोलेजंग टॉवरमध्ये इंटरनेटमुळे एकच एक मनोरंजन पाहता येणे शक्य झाले आहे. हा बदल लोकांची सिनेचव बदलणारा किंवा त्यांच्या डोक्यात या माध्यमाविषयी घुसळण करणारा आहे. टोरण्ट्स, वायटीएस, एफ मूव्हीज यांद्वारे मनोरंजनाची भूक भागवणारा, आयएमडीबी आणि मेटाक्रिटिकवर चित्रपटांना मिळणारे स्टार्स आणि रँकिंग पाहूनच चित्रपटाच्या वाटेला जाणारा तरुणवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने पडद्यावर हाणामारीच्या खोटय़ा करामती करणारा, केसांचा कोंबडा ठेवणारा, फॅशनची दिखाऊगिरी करणारा बॉलीवूडी नायक हद्दपार झाला आहे. अभिनयाची खरी करामत दाखवून प्रेक्षकांना जिंकणारा कलाकार आवडण्याचा काळ आलेला आहे. समाजाचा आरसा चित्रपट अधिक दाखवतोय, म्हणावे तर तसे आजच्या चित्रपटांच्या विषयावरून दिसून येते.
१९८७ च्या टप्प्यात साऱ्याच दृष्टीने निष्क्रिय राजपटल होते. तेव्हाच्या सिनेमामध्ये नायक एकुणातच समाजभानापासून वजा असण्याचे ते इतर कारणांतील एक कारण होते. आज मात्र सर्वार्थाने सक्रिय राजपटलाचा निव्वळ आभास निर्माण केला जात आहे. तर सिनेमामध्ये नायकवजा काळ तीव्रतेने आला तर त्यात नवल ते काय?
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com