सोळाव्या शतकात स्पेनहून अमेरिकेच्या शोधात निघालेला कोलंबस समुद्री वादळामुळे अचानक एका हिरव्यागार बेटावर पोहोचला. उतरून किनाऱ्यावर गेल्यावर त्याला तेथील स्थानिक लोक अंगावर सोने लेवून समारंभ साजरा करताना दिसले. त्या ठिकाणी काही काळ केलेल्या वास्तव्यात त्याला बेटाचा अंतर्गत भागही नैसर्गिक संपत्तीने नटलेला दिसला. ते पाहून स्पॅनिश भाषेत तो म्हणाला, कोस्टारिका.. म्हणजेच रिच कोस्ट. तेव्हापासून हा देश कोस्टारिका म्हणूनच ओळखला जाऊ लागला.
मध्य अमेरिकेतील पनामा, निकुरागवा, होडुरास, बेलीज्, एल् साल्वाडोर या देशांच्या बरोबरीने असलेला हा एक देश. त्याच्या उत्तरेला आणि पश्चिमेला अनुक्रमे कॅरेबियन समुद्र तसंच पॅसिफिक महासागर आहे. या दोन्ही समुद्रांमुळे त्याला एक हजार २९० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. तालामांका व कॉडेलेरा या डोंगररांगांमुळे तसंच या दोन्ही समुद्रांवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे इथे भरपूर पाऊस पडतो. इथे नोव्हेंबर ते मार्च एप्रिल ते डिसेंबर या काळात हिवाळा असतो. मध्य भागात काही ठिकाणी वर्षभर पाऊस असतो. त्याचे प्रमाण वर्षांला ५०० मिमी. आहे.
मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश सत्तेअगोदर संका जमातीचे राज्य होते. कोलंबसनंतर गोन्सालेज् या अधिकाऱ्याने इथे पहिली स्पॅनिश वसाहत केली. हळूहळू आपला जम बसवीत या वसाहतीने इथे १५० वर्षे राज्य केले. पुढे मेक्सिकन राजवट आली. पण कोस्टारिकन जनता त्यांना दाद देत नव्हती. १९व्या शतकाच्या मध्यावर मेक्सिकन हुकूमशाहीविरुद्धच्या लढय़ात जनतेने सैन्याचा पराभव करून स्वातंत्र्य मिळवले. त्या वेळी जीवितहानीसह इतरही बरेच नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात राष्ट्रपती सुसिमोया यांनी लष्करावर खर्च करण्यापेक्षा जनतेच्या शिक्षणावर व आरोग्य सेवांवर भर दिला. त्यामुळे कोस्टारिका येथे साक्षरतेचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त असून बालमृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. स्पॅनिश राजवटीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली राजधानी नंतर सॅनहोजे येथे आली, ती अजूनही तिथेच आहे.
आमची सफर सुरू झाली, ती ब्रॉलिओ कोरिलो नॅशनल पार्कपासून. ते रेन फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे परिसमीना व कॅलिफोर्निआ या नद्यांच्या प्रवाहातून प्रवास होता. अगदी थोडक्या सामानासहित एक स्पीडबोट २०-२५ प्रवाशांना घेऊन लिमोन गावातून निघते. कॅलिफोर्निआ नदी पुढे कॅरेबियन समुद्राला मिळत असल्याने भरती- ओहोटीनुसार नदीचे पात्र लहान-मोठे असते. कधी कधी उथळ पाण्यात उतरून कॅप्टनला बोट ढकलण्यासाठी मदत करावी लागते. डिस्कव्हरी, नॅटजिओ चॅनेलवर पाहून थोडेफार माहिती असलेल्या या रेन फॉरेस्टची सफर एरियल ट्राममध्ये बसून करण्याची गंमत काही औरच. अगदी खालूनच सुरू होणाऱ्या ट्राममध्ये बसून आपण झाडांच्या शेंडय़ांपर्यंत म्हणजे रेन फॉरेस्टच्या कॅनोपीपर्यंत पोहोचतो. इथे असलेल्या उंच फायकसची खोडे खडबडीत, पर्णरहित असतात, पण शेंडे मात्र हिरवेगार असतात. त्यांना ब्रोकोली ऑफ द रेनफॉरेस्ट म्हणतात. ट्राम संथपणे जात असली तरीही गाईड देत असलेल्या झाडे, फुले, पक्षी, प्राणी यांच्या माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी नजर आणि मानेला भरपूर कसरत करावी लागते. पण एवढय़ा गडबडीतसुद्धा लिपस्टिक प्लान्ट अगदी डोक्यात घर करून राहतो. नावाप्रमाणेच त्याची पाने म्हणजे अगदी लालचुटुक रेखीव ओठच. शिवाय इथे भरपूर ऑर्किडस्, ब्रोमेलिया,-होडेडेंड्रॉन, आणि अगदी आपला तेरडाही आहे. अगणित झाडे असल्याने, फुटभर लांब चोचीचे रंगीत मकाव, टय़ुकानस्, रॉबिन्स् यांचा सदैव कलकलाट असतो. जोडीला काळी मान, विटकरी अंग, पिवळी चोच असलेला कर्कश ओरडणारा माँझुमा ऑरपेंडुला आपलं लक्ष वेधून घेतो. या सगळ्यात हाऊलिंग मंकींचा धुमाकूळ तर विचारूच नका. बोटीतून फिरताना वेगवेगळे पाम्स दिसतात. त्यात राफिया आपल्या कल्पवृक्ष माडाप्रमाणे बहु उपयोगी. इथल्या इको फ्रेण्डली लॉजमध्ये वीज फक्त संध्याकाळी थोडा वेळ असते. पण लाऊंजमध्ये अद्ययावत बार, लायब्ररी, उत्तम रेस्टॉरंट सज्ज असते.
या देशाच्या दोन्ही बाजूंनी पाणी असल्याने इथे दाट जंगल आहे. नदीच्या बाजूच्या किनाऱ्यावरील झाडांवर भारद्वाज, ग्रेटर पुट्टू, टायगर हेरॉन, नॉर्दर्न जकारना, बोट बेलीड हेरॉन दिसतात. नॅटजिओवर आपण कधी तरी पाण्यावर धावणारा सरडा पाहतो. रंगीत शरीर आणि डोक्यावर मुकुट असलेला डबल क्रेस्टेड बासलिसिक लिझर्ड नर व डोक्यावर मुकुट नसलेली, आकाराने लहान असलेली मादी पाहायला मिळाली. कापुचीन माकडांची टोळी धपाधप करीत आल्यावर पाण्यात लटकणाऱ्या फांदीवर बसलेला नर बासलिसिक लिझर्ड जीव मुठीत घेऊन नदीत पाण्यावर उडय़ा मारत पळत सुटला.
शिवाय पाण्यात झाडांच्या फांद्यांवरचे कारमोरांट्स, अनाहिंगा, लहानशा फांदीवर सनबाथ घेणारी कासवं, तोंडाचा आ वासलेल्या मगरी, सुसरी, झाडांच्या बुंध्यांवर चिकटलेली हाताच्या तळव्याएवढी वटवाघळं.. सांगावं तेवढं कमीच.
समुद्राच्या दिशेला भरपूर जंगली बदामांची, तसंच इतरही बऱ्याच प्रकारची लहानमोठी खुरटी झाडं होती. अशा झाडांनी सगळा किनारा हिरवागार झाला होता. त्यावर चिवचिवणारे पॅराकीट्स होते. हा भाग रिडली, लॉगर हेड, ग्रीन टर्टल्सच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. ही कासवं किनाऱ्यावर पाण्यापासून थोडं लांब वाळूत अंडी घालण्यासाठी येतात. फार पूर्वी इथले स्थानिक लोक तसंच दक्षिण अमेरिकेतून येणारे पर्यटक व्यापारासाठी, पाठीवरील कवचासाठी कासवांची शिकार करीत. तर स्थानिक लोक कासवांची अंडी खात. कासवांची संख्या झपाटय़ाने कमी झाल्यानंतर १९६०च्या दशकात जागरुकता करण्यात आली तेव्हा हे प्रकार बंद होऊन या कासवांना अभय मिळाले. तरीही कधीकधी हे प्रकार घडतातच. माणसांना बंदी केली तरी किनाऱ्यावर वावरणारे प्राणी आणि पक्षी असतातच. आम्ही किनाऱ्यावर फिरताना कुठेकुठे कासवांच्या अंडय़ांची टरफलं मिळाली. अंडी पुरण्याच्या जागा दिसल्या.
ही कासवं रात्रीच्या वेळी पाण्यातून बाहेर येऊन वाळूत मोठा खड्डा करून एकावेळी १०० पर्यंत अंडी घालतात. त्यांच्यावर वाळू पेरून ती जागा पूर्ववत करतात. ठरावीक काळानंतर अंडय़ातून बाहेर पडून पाण्याच्या दिशेने कूच करणारी पिल्ले खाण्यासाठी माणसांबरोबर पक्षी तसंच कुत्रे टपलेले असतात. त्यामुळे या कासवांचे जगण्याचे प्रमाण जेमतेम एक टक्का आहे. ही कासवं ३० वर्षांतून एकदा अंडी घालण्यासाठी पूर्वस्थानी येतात. मध्यंतरी त्यांची संख्या वाढण्यासाठी पिलांना हाताने उचलून समुद्रात सोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यावेळी मानवी हाताळणीमुळे पिले दगावली. तेव्हापासून त्यावरही बंदी आली. उत्तरेला वानाकास्ते या ठिकाणी कासवे हजारोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात, तेव्हा तर किनाऱ्यावर पाऊल ठेवणे मुश्कील असते. पण तेव्हा शिकारीसाठी परवानगी दिली जाते.
इथे असलेल्या केळ्यांच्या बनात फेरी मारलीच पाहिजे. पद्धतशीर लागवड असलेल्या बनात झाडांचे बुंधे केळ्यांच्या भाराने एकीकडे कलू नयेत म्हणून एकमेकांना दोरीने बांधलेले असते. तयार घडांना पक्षी, किडे, बुरशी यापासून दूर ठेवण्यासाठी कव्हर घातलेले असते. तिथले कामगार कॅरेबिअन बेटांवरचे असतात, तर बनातील केळ्यांची ने-आण करण्यासाठी चिनी मजूर असतात. कोस्टारिकातील रेल्वे १९४४ पासून बंद असली तरी केळीच्या बनात ती आहे. आम्ही तेथे फिरत असताना एकदम धडधडाट ऐकू आला. पाहतो तर काय दोन-तीन वाघिणी भरून केळी आली होती. स्टोअर रूममध्ये आल्यावर त्यांची प्रतवारी केली जाते. उत्तम प्रतीची केळी १६ अंश सेंटिग्रेडच्या शीतगृहात ठेवली जातात व त्यांची निर्यात होते. दुय्यम दर्जाची देशांतर्गत विक्रीसाठी वापरली जातात.
कोस्टारिका येथे तुरिआल्बो, सोआस असे काही जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी सान्होझे येथून ९० कि. मी. अंतरावर असलेला, शंकूसारखा देखणा आरेनाल आहे. तो समुद्रसपाटीपासून एक हजार ६३५ मीटर उंचीवर आहे. आपल्याला इथेही वेगवेगळ्या वनस्पती, झाडं, पक्षी, कापूचीन मंकी, स्लॉथ, पॅटर स्नेक असे प्राणी पाहायला मिळतात. अधूनमधून होणाऱ्या लहानमोठय़ा भूकंपांमुळे त्यावर काही विवरे आहेत. माथ्यावरचे विवर १४० मी. व्यासाचे आहे. १९६८मधे अचानक झालेल्या भूकंपात जवळची काही गावे नष्ट झाली, तेव्हापासून या परिसरात मानवी वस्ती नाही. २००८ मधे आम्ही येथे आलो होतो. तेव्हा वरच्या विवरातून तडतडी फुलबाजीप्रमाणे उडणारे लाव्हाचे गोळे चार-पाच किमी. अंतरावरून टोमॅटोसारखे दिसत होते. २०१२ नंतर त्यातून उडणारा लाव्हा बंद झाला. आता त्यातून फक्त धूर येताना दिसतो. आरेनालच्या डोंगरावरून आरेनाल लेकमधे येणारे पाणी पिण्याऐवजी कारखान्यांमधे वापरले जाते. लेकमधे तिलापिआ, गोल्डन कार्पसारखे मासे आहेत. शिवाय जेट स्की, कायाकसारखे वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग, कॅनोपी राईडसारखे साहसी खेळही आहेत. हा भाग ज्वालामुखी झोनमधे आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांतील पाणी नेहमी उबदार असून येथे बरेच हॉट वॉटर स्पा आहेत.
मॉँटेवेर्दे म्हणजे सदैव हिरवाईने नटलेला डोंगर. तो समुद्रसपाटीपासून दीड हजार मीटर उंचीवर असल्याने तिथले तापमान सदैव १८ अंश सेल्सिअल्स असते. हवेत आद्र्रता असल्याने तिथे नेहमी धुके असते. १९५० साली झालेल्या कोरिअन लढाईच्या वेळेस अमेरिकेच्या अलाबामा, फेअरहोप अशा भागांतून शांतताप्रिय व सर्वसमभाव विचारसरणीचे लोक येथे आले. इथले वातावरण आवडल्यामुळे ते येथे स्थायिक झाले. तिथल्या सुपीक जमिनीवर त्यांनी शेती तर केलीच शिवाय डोंगरावर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली. तोच भाग आता रेन व क्लाऊड फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या झाडांमुळे जमिनीची धूप कमी झालेली आहे. शिवाय उंचउंच झाडांमुळे डोंगरावरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांपासून शेतीचे, घरादारांचे रक्षण होते. कॅरेबिअन समुद्रातील चक्रीवादळाचा आम्हालाही चांगलाच अनुभव आला.
हा भाग इतका नयनरम्य आहे की, नॅशनल जिओग्राफी संस्थेने जगातील रम्य स्थळांपैकी एक म्हणून त्याला नावाजले आहे. माँटेवेर्दे येथील इको टुरिझम पार्कमधली सुरुवात होते ती हमिंग बर्ड पार्कमधून. विविध रंगांचे, लांब, टोकदार चोच असलेले आणि आकाराने दहा-बारा सेंमी असलेले हे पक्षी एकाच ठिकाणी पंख फडफडवत किती तरी वेळ फुलातील मध चोचीने शोषून घेत असतात ते पाहून आश्चर्य वाटते. पार्कमधे काही ठिकाणी खोटय़ा फुलांमधे नळीत साखरेचं पाणी ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी आपण उभे राहिलो तर हे पक्षी आरामात आपल्या डोक्यावर, खांद्यावर, हाताच्या पंजावर बसतात.
इथल्या जंगलात असलेल्या अति दुर्मीळ अशा गोल्डन फ्रॉगचे शिकारीपासून रक्षण केले जाते. पार्कमधे फिरण्यासाठी आपण बरेच हँगिंग ब्रीज पार करतो. पण नेपाळमधे ईबीसी येथे जाताना जे हँगिंग ब्रीज आहेत त्यापुढे इथले हँगिंग ब्रीज काहीच नाहीत. त्यापेक्षा कॅनोपी राइड हे झकास अॅडव्हेंचर. राइडला जाण्यापूर्वी आपल्याला हार्नेस, हेल्मेट वगैरेंनी सजायला लागते. सुरुवातीला प्रात्यक्षिक दाखवले जाते. पहिली राइड लहानच असते. पहिल्यांदाच करत असल्याने आपल्याला जमेल की नाही, मधेच हात सुटले तर काय, हार्नेस व्यवस्थित राहील की नाही अशा शंका मनात डोकावत होत्या. पण पहिल्या राइडनंतर त्यातली गंमत कळली आणि पुढचा सगळा प्रवास मस्त झाला. एका कॅनोपी प्लटफॉर्मवरून खाली येऊन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ३०-५० पायऱ्या चढायच्या अशा १५ राइड्स होत्या. आणि सर्वात शेवटची राइड ४०० फूट उंच आणि एक किमी लांब होती. या ठिकाणी एकतर नेहमीप्रमाणे बसून यायचे किंवा लहानशी बंजी जंप करून सुपरमॅनसारखे यायचे. हे सर्व राइडला बसते वेळी घातलेल्या सामग्रीसकट करायचे. अंगावर एवढा भार घेऊन चढउतार केल्यामुळे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर पुढे पाऊल टाकवत नव्हतं.
इथली कॉफी जगप्रसिद्ध आहे. इथे एकाच ठिकाणी कॉफी, कोको व ऊस यांची लागवड होत असल्यामुळे इथल्या कॉफी प्लान्टेशनमध्ये थ्री इन वन टूर असते. इंग्लिश, स्पॅनिश अशा दोन्ही भाषा बोलणाऱ्या गाईडबरोबर फिरताना बरीच माहिती मिळाली. कॉफीच्या उत्पादनासाठी समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली जागा उपयुक्त असल्याने माँटे वेर्दे येथे मोठय़ा प्रमाणावर कॉफीची लागवड होते. प्लान्टेशनमध्ये कॉफीच्या रोपापासून बिया वेगळ्या करून, सुकवून, भट्टीत भाजून कॉफीची पावडर कशी केली जाते हे दाखवले जाते. तिथे सजवलेल्या बैलगाडीतून फेरीदेखील मारता येते.
कॉफीबरोबरच इथे कोकोची लागवड केली जाते, त्याबद्दलही माहिती मिळाली. व्हिजिटर्स सेंटरमध्ये कोकोपासून वेगवेगळी चॉकलेट्स बनवण्याची कृती दाखवली गेली. त्यांनी आम्हाला स्पाइसी चॉकलेट्सही बनवून दाखवली आणि नंतर ती चाखायलाही दिली. असो. इथे कॉफीबरोबरच उसाची लागवड अशासाठी की, हवेतून एखादा रोग आला तर उसाची पिकं त्याला थोपवून धरतात व कॉफीचे संरक्षण होते. प्लान्टेशनमध्ये फिरताना सर्वाना आले घालून केलेला उसाचा रस काढून दिला गेला. गोऱ्यांना त्याचं नावीन्य, पण मी मनात म्हटलं, मंडळी, आमच्याकडे या, तुम्हाला भरपूर रसवंतीगृहे दाखवू. त्यांच्या सेंटरमध्ये रोबस्टा व अरेबिका या कॉफी बिया, त्यांची पावडर व पिण्यासाठी लाइट, मीडियम, डार्क रोस्ट असे कॉफीचे प्रकार होते. शिवाय त्यापासून बनवलेले क्रीम, लिक्युअर इसेन्स, साबण, स्थानिक कलाकृती विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या.
माँटेर्वेदे येथील उंचीवरील, त्यानंतर आरेनाल येथील साधारण उंचीवरील व समुद्रसपाटीवरील म्यॅनुअल अँतोनिओ नॅशनल पार्कमधील रेन फॉरेस्ट हे पर्यटक, स्थानिक लोक व शालेय विद्यार्थ्यांचे हमखास भेट देण्याचे ठिकाण. भरती असेल तेव्हाच तेथे समुद्रातून लहान बोटीने जाता येते. पार्कमधल्या पिकनिक स्पॉटमध्ये पोहोचल्यावर तिथूनच वर उंचसखल भागातून, लाकडी पुलांवरून एक कि.मी.पेक्षा जास्त अंतर चालून डोंगरावरील व्ह्य़ू पॉइंटला जायचं. मोटारीने गेलो तर आपण मुख्य प्रवेशद्वारावरच पोहोचतो.
येथून पिकनिक स्पॉट दोन कि.मी. अंतरावर आहे; पण चालताना आपण सिडर्स, फायकस वगैरे मोठमोठय़ा वृक्षराजीतून जातो. या ठिकाणी प्राणी पाहायचे तर नजर चाणाक्ष असावी लागते, कारण जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात पिटुकले रंगीत बेडूक, वेटोळे करून बसलेले साप, दहा रुपयांच्या नाण्याप्रमाणे असलेली, झाडाच्या बुंध्यांना चिकटून बसलेली वटवाघळं, उंच झाडांवर असणारे अति मंद हालचालींचे टु किंवा थ्री टोड स्लॉथ.. काय आणि किती याला सीमाच नाही.
सर्वात मजा वाटली ती आपल्या वाकडय़ा चालीने तुरुतुरु चालणाऱ्या कुल्यार्ंची. यांचा रंग लाल, निळा होता. ब्रिजवर हालचाल झाली की ते पटकन लहानशा बिळात घुसणार आणि सर्व सुनसान झाल्याची खात्री झाल्यावर पुन्हा बाहेर येऊन तुरुतुरु धावणार. त्यातच त्यांना पकडण्यासाठी टपलेल्या पक्ष्यांची धावपळ. झाडांवर हाऊलिंग, व्हाइट फेस कापूचीन मंकीज्ची झाडांवर उडय़ा मारायची गडबड चालली होती. पांढरे निमुळते तोंड, शेपटीवर काळे पट्टे असलेले काओटीज् अगदी साळसुदपणे येऊन हातातली खाऊची पिशवी खसकन् ओढण्यात तरबेज होते. समुद्रकिनारी त्याने आमच्यापैकी एका सहपर्यटकाच्या हाताला ओरबाडले. त्याला डॉक्टरकडे न्यावे लागले; पण थोडक्यावर भागले. पिकनिक स्पॉटला पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे ठेवलेली असतात. तिथेही प्राण्यांना ‘खाऊ देऊ नका’चे फलक होते. आपल्याला माहीत असते की, आपली मंडळी बऱ्याच वेळा असे नियम झुगारण्यात तरबेज असतात; पण गोरी मंडळीदेखील तशीच. त्यामुळे माकडं, काओटीज् बिनधास्त येऊन धीटपणे बाकडय़ावरचा किंवा आपल्या हातातला खाऊ खेचण्यात अगदी तरबेज होती.
सर्वच बाजूंनी समुद्राने वेढले असल्याने इथे विविध प्रकारच्या मासळीचे प्रकार पाहायला, चाखायला मिळतात. इथे आपल्या कोकणाप्रमाणे नारळाची भरपूर झाडे आहेत. त्यामुळे इथले सुमधुर शहाळ्याचे पाणी, कोकोनट आइस्क्रीम प्रसिद्ध आहे. नारळाप्रमाणे इथे पाम झाडांची भरपूर लागवड होते. त्यामुळे इथे नारिंगी रंगाचे पाम ऑइलचे भरपूर उत्पादन होते. याशिवाय फणसासारखा पण उग्र वासाचा, कापसासारखा दुरियान असतो; पण कोणत्याही हॉटेलमध्ये तो नेण्यास मनाई आहे.
इथे कुणालाही विचारले, हाऊ आर यू, तर तुम्हाला उत्तर मिळणार पुरा विदा. पुरा विदा म्हणजे शांती, समाधान, आरामदायी. या देशाचे कुणाशी वैर नसल्याने त्याच्या वाटय़ाला युद्धे नाहीत. त्यामुळे पुरा विदा जीवन पाहायचे असेल तर इथे नक्कीच भेट द्या. डोंगर, नद्या, समुद्र, लगून्स् यामुळे रेन फॉरेस्ट, ज्वालामुखी, खारफुटीची जंगलं, दलदल असं सगळं असल्याने निसर्गाचे इथे विविध प्रकार आहेत. बरोबर प्रेमळ माणसं आहेत, स्वादिष्ट पदार्थ आहेत. या सगळ्याबरोबर असलेली गर्द हिरवाई तुम्हाला नक्कीच मोहवील.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com