कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तान सरकारचा हेरगिरीचा आरोप आहे. तो आरोप खरा की खोटा ही गोष्ट वेगळी, पण वेगवेगळ्या देशांची हेरगिरी ही एक वेगळीच दुनिया आहे. भारतीय गुप्तहेरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नाझींना मूर्ख बनवण्यापर्यंत कशी मजल मारली होती, ते समजून घेणं औत्सुक्याचं आहे.

दिवस १९ जानेवारी १९४१. दिल्ली रेल्वे स्थानक. फलाटावर फ्रंटियर मेल उभी होती. नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी-गोंधळ सुरू होता. मियाँ अकबर शाह एका बाजूला शांतपणे उभे होते. त्यांची नजर मात्र सर्वत्र भिरभिरत होती. अचानक त्यांना ती मुस्लीम व्यक्ती दिसली. पोशाखावरून सुशिक्षित, मध्यमवर्गातील वाटत होती. ती डब्यात शिरली, तसे अकबर शाह जागचे हलले. क्ष-किरण यंत्रासारखे त्यांचे डोळे गर्दीवरून फिरले. त्या व्यक्तीच्या पाळतीवर आणखी कोणी नाही ना, याची खात्री त्यांनी करून घेतली आणि मग गुपचूप त्याच डब्यात मागच्या बाजूला जाऊन ते बसले. त्यांचे लक्ष मात्र त्या व्यक्तीच्या हालचालींकडेच होते.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

पेशावर कॅन्टोन्मेंट स्थानकावर मेल थांबताच ती व्यक्ती उठली. दारातूनच तिने एका हमालाला साद दिली. त्याच्या मागोमाग ते बाहेर आले. त्या व्यक्तीने भाडय़ाने एक टांगा ठरविला. त्याला पत्ता दिला – ताजमहल हॉटेल. तो टांगा हलताच अकबर शाह यांनी दुसरा टांगा घेतला. आणि त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला.

या घटनेनंतर दोनच दिवसांनी, २१ जानेवारी रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास पेशावरमधील एका घरातून दोघे जण बाहेर पडले. त्यातील एकाने मलेशिया क्लॉथचे सलवार, कमीझ घातलेले होते. त्यावर पठाणी चामडी जॅकेट होते. डोईवर पठाणी पद्धतीचा फेटा. पायात पेशावरी चप्पल. इंचभर वाढलेली दाढी. भक्कम अंगकाठी. गोरा रंग. पेशावरचा पठाणच जणू. कोणाला जराही संशय आला नसता, पण ती तीच फ्रंटियर मेलने आलेली व्यक्ती होती. आता तिच्यासोबत एक तरुण होता. मध्यम उंचीचा. अंगानेही तसा किरकोळच. त्याच्याबरोबरच्या पिशवीत काही पराठे होते. उकडलेली अंडी होती. आणि बरोबर ब्लँकेट होते.

पहाटेच्या त्या अंधारात ते घरापासून थोडय़ा अंतरावर आले. तेथे एक कार उभी होती. चालक होता अबाद खान हा वाहतूक व्यावसायिक. त्याच्या समवेत एक वाटाडय़ाही होता. काहीही न बोलता ते कारमध्ये बसले. आणि कार निघाली हिंदुस्थानच्या सीमेच्या दिशेने..

त्या ‘पठाणा’ला कोणी नाव विचारले असते, तर त्याला ते सांगता आले नसते. कारण तो ‘मुका आणि बहिरा’ होता. पण त्याचे नाव होते झियाउद्दीन.

खरे नाव – नेताजी सुभाषचंद्र बोस!

आणि त्यांना घेऊन निघालेल्या तरुणाचे नाव होते – रहमत खान.

खरे नाव – भगतराम तलवार. वय – ३३.

कोड नेम – सिल्व्हर.

दिल्लीपासून नेताजींच्या पाळतीवर असलेला मियाँ अकबर शाह हा भगतरामचाच सहकारी. नेताजींच्या पाळतीवर सीआयडीची माणसे नाहीत ना याची खात्री करून घेण्यासाठीच त्याने अकबर शाहला पाठविले होते. ते आवश्यकच होते. दग्याफटक्यापासून सावध राहणे गरजेचे होते. अखेर, नेताजींना काबूलपर्यंत सुखरूप नेण्याची जबाबदारी भगतरामने उचलली होती.

०००

भगतराम. पित्याचे नाव लाला गुरुदासमल. राहणार घल्ला ढेर, वायव्य सरहद्द प्रांत.

त्यांच्याबद्दल फारसे कुणाला माहीत नाही. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले अत्यंत चलाख असे गुप्तचर होते ते. इतके चलाख, की इटली आणि नाझी जर्मनांमध्ये वावरून, त्यांनाच शेंडय़ा लावून आले होते ते. मोठी रंगतदार कहाणी आहे त्याची. तिची सुरुवात होते ती नेताजींच्या यशस्वी पलायनकथेपासून.

त्या काळातल्या अनेक तरुणांप्रमाणेच भगतरामही देशभक्तीने भारलेले होते. काँग्रेसचे काम करायचे ते. असहकार आंदोलनात तुरुंगातही जाऊन आले होते. पण काँग्रेसमधील सोशालिस्ट गटाशी त्यांची अधिक जवळीक होती. मनावर भगतसिंग यांच्या क्रांतिकार्याचा प्रभाव होता. त्यामुळे आपसूकच ते नेताजींकडे ओढले गेले. नेताजींच्या फॉरवर्ड ब्लॉकचे वायव्य सरहद्द प्रांत प्रपोगंडा सचिव होते ते. पुढे ते कम्युनिस्ट विचारांकडे ओढले गेले. पण म्हणून नेताजींवरील निष्ठा कमी झाली नव्हती. नेताजींच्या पलायनात त्यांच्या कम्युनिस्ट सहकाऱ्यांनी, गदर पार्टीच्या नेत्यांनी मोठी मदत केली. किंबहुना भगतरामकडे नेताजींना काबूलपर्यंत नेण्याची जबाबदारी सोपविली होती ती गदर पार्टीचे एक नेते अछारसिंग छिना यांनीच.

पेशावर – जामरोद – खजुरी मैदान – आफ्रिदी आणि शिनवारी आदिवासी भाग, मग तेथून अफगाणिस्तानात काबूल-पेशावर  मार्गावरील गऱ्हादी, भाटी कोट – जलालाबाद – अड्डा शरीफ, तेथून परत जलालाबाद आणि मग काबूल हा त्यांनीच आखलेला मार्ग. याच प्रवासात त्यांनी रहमत खान हे नाव धारण केले होते. याच नावाने त्यांनी हेरगिरीच्या विश्वात प्रवेश केला होता. तोही नेताजींमुळेच.

नेताजींचा प्रवास काबूलपर्यंत तर सुखरूप झाला. पण त्यांच्याकडे ना पारपत्र होते ना कोणते ओळखपत्र. अशा प्रकारे कोणत्याही कागदपत्रांशिवाय अफगाणिस्तानात राहणे धोक्याचे होते. अफगाण पोलिसांनी पकडले तर सगळाच डाव फसणार होता. शिवाय काबूल हा काही त्यांचा अखेरचा मुक्काम नव्हता. त्यांना सोव्हिएत रशियात जायचे होते. भारतीय स्वातंत्र्ययुद्धासाठी त्यांची मदत घ्यायची होती. पण त्यासाठी पारपत्र तर आवश्यकच होते. भगतराम यांनी काबूलमधील सोव्हिएत दूतावासाशी संपर्क साधण्याचे खूप प्रयत्न केले. ते जमेना. तेथील अधिकारी मदत करीनात, तेव्हा मग त्यांनी ठरविले की जर्मनांचे साह्य़ घ्यायचे. पण जर्मन अधिकारीही वेळकाढूपणा करू लागले. तेव्हा मग भगतराम यांनी एक धाडसी निर्णय घेतला.

काबूलमध्ये फिरत असताना त्यांना एका रस्त्यावर इटलीच्या दूतावासाची पाटी दिसली होती. एके दिवशी ते त्या दूतावासाच्या मागच्या दरवाजाने सरळ आता घुसले. तिथे काही अफगाणी सेवक काम करीत होते. त्यांनी यांना विचारले, कोण तू? काय काम आहे? प्रसंगावधान राखून ते उत्तरले, मी स्वयंपाकी आहे. जर्मन दूतावासातील थॉमस नामक अधिकाऱ्याने मंत्रीजींना भेटण्यासाठी मला पाठवलेय. एका सेवकाने त्यांना इटलीच्या राजदूतांकडे नेले. त्यांनी त्याची विचारपूस केली. त्या थॉमस नामक अधिकाऱ्याला फोन लावला. त्या अधिकाऱ्याशी भगतराम यांची ओळख होतीच. त्यानंतर इटलीच्या राजदूताने बाकीच्या सेवकांना बाहेर जाण्यास सांगतिले. भगतराम यांनी त्यांना नेताजींबद्दल माहिती दिली. त्या राजदूताने मग लवकरच नेताजींचे पारपत्र व अन्य कागदपत्रे बनवून दिली. त्या राजदूताचे नाव होते पिएत्रो क्वारोनी.

याच क्वारोनी यांच्यामुळे भगतराम हेरगिरीच्या दुनियेत दाखल झाले. नेताजींनी भगतराम यांना आपले इटलीचे एजंट म्हणून नेमले, त्यानंतर काही दिवसांतच क्वारोनी यांनी त्यांना इटलीसाठी ब्रिटिशांची हेरगिरी करण्याच्या कामाचा प्रस्ताव ठेवला. क्वारोनी यांना हे ठाऊ क होते, की ब्रिटिश साम्राज्याची आता सर्वात कमजोर कडी कोणती असेल तर ती भारतच. ती अधिक खिळखिळी करण्यासाठी तेथे आपले एजंट असणे आवश्यक होते. त्यांचा आजवरचा भारतातील माहितीचा स्रोत होता तो तेथून येणारी इंग्रजी वृत्तपत्रे. भगतराम यांच्याद्वारे त्यांना तेथील गोपनीय माहिती मिळू शकणार होती. भगतराम यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. ते त्यांच्यासाठी काम करू लागले. पण अखेपर्यंत त्यांनी त्यांना आपले खरे नाव कळू दिले नाही. त्यांच्यासाठी ते रहमत खानच होते.

वायव्य सरहद्द प्रांत ही भगतराम आणि त्यांच्या कम्युनिस्ट सहकाऱ्यांची कर्मभूमी. तेथील, अफगाणिस्तानातील आदिवासी भागातील टोळ्यांमध्ये ब्रिटिश साम्राज्याविरोधात असंतोष निर्माण करणे, त्यांना ब्रिटिशांविरोधात लढण्यास तयार करणे, ब्रिटिश मुलखात, खास करून अफगाणिस्तानात घातपाती कारवाया करणे, ब्रिटिश फौजेच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळविणे हे त्यांचे प्रमुख काम होते. त्यासाठी लागणारी आर्थिक तसंच शस्त्रास्त्रांची मदत ते इटलीकडून घेत असत. बदल्यात त्यांना भारतातील ब्रिटिशांची गोपनीय माहिती देत असत. पण भगतराम यांना हवी तेवढी आर्थिक मदत करणे पुढे इटलीच्या दूतावासाला कठीण जाऊ  लागले. तेव्हा त्यांनी जर्मनांची मदत घेण्याचे ठरविले. लवकरच क्वारोनी यांनी रहमत खान यांची ओळख रूसमस नामक एका जर्मन अधिकाऱ्याशी करून दिली. आता भगतराम नाझी जर्मनीसाठीही हेरगिरी करू लागले. काबूलमध्ये तेव्हा डिट्रिच विट्झेल हा जर्मन गुप्तचर प्रमुख होता. त्याने तेथे भगतराम यांच्या निवासाचीही व्यवस्था केली होती. जर्मन आणि रशिया यांचे तेव्हा सख्य होते. त्यामुळे कम्युनिस्ट भगतराम यांना जर्मनांना मदत करणे कठीण गेले नाही. पण भगतराम यांच्या मनातील हे मैत्र लवकरच संपले.

२२ जून १९४१ रोजी हिटलरने ‘ऑपरेशन बार्बरोसा’ सुरू केले. रशियावर आक्रमण केले. हा भगतराम यांच्यासाठी धक्काच होता. त्यांनी आता जर्मनीला धडा शिकवण्याचे ठरविले. त्यांच्या पेशावर ते काबूल अशा फेऱ्या सुरूच होत्या. १५ सप्टेंबर १९४१ रोजी ते असेच काबूलला गेले असताना त्यांनी तेथील रशियन दूतावासाशी गुपचूप संपर्क साधला. त्या रात्री दूतावासात त्यांची बैठक झाली. मद्यपान आणि भरपूर प्रश्नोत्तरे झाल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांना त्यांचा खरेपणा पटला. या भेटीत भगतराम यांनी रशियाला जर्मनीच्या अनेक कारवायांविषयी माहिती दिली. ते जर्मनीप्रमाणेच इटली आणि जपानसाठीही आतापर्यंत हेरगिरी करीत होते. आता ते रशियासाठी डबल एजंट म्हणून काम करू लागले. पण तेही रहमत खान म्हणूनच. आपली खरी ओळख त्यांनी रशियन गुप्तचरांनाही दिली नव्हती. रशिया आणि ब्रिटन ही तेव्हा दोस्त राष्ट्रे. त्यामुळे रशियाने आपल्या या हेराची सेवा ब्रिटिश गुप्तचरांना दिली आणि रहमत खान आता रशिया आणि ब्रिटिश यांच्यासाठी संयुक्तरीत्या काम करू लागले.

एक साधा, कमी शिकलेला तिशी-पस्तिशीतला तरुण. व्यक्तिमत्त्वही फारसे प्रभावी नाही. इंग्रजी यायची त्यांना. पण तीही मोडकीतोडकी आणि तरीही ते जगातील पाच देशांसाठी हेरगिरी करीत होते. महायुद्धातील हेरगिरीचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार मायकल हॉवर्ड यांच्या शब्दांत सांगायचे, तर गाबरेशी तुलना होऊ  शकेल असा हा हेर होता. गाबरे हे ह्य़ान पुजोल गार्सिया या स्पॅनिश गुप्तचराच्या २९ नावांमधले एक नाव. तोही डबल एजंट होता. डी-डे लॅण्डिंग ही दुसऱ्या महायुद्धातील महत्त्वाची घटना. त्याबद्दल जर्मनांना चुकीची माहिती देऊन त्याने फसविले होते. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व आणि आपल्या अधिकारातील व्यक्तींवरील प्रभाव याबाबत नक्कीच भगतराम हे गाबरेसारखे होते, हे हॉवर्ड यांचे मत. ‘वेशांतरातला उस्ताद’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबियासारखे’ अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

एप्रिल १९४३ पासून भगतराम नवी दिल्लीतील ब्रिटिश लष्करी गुप्तचर सेवेच्या ‘डी डिव्हिजन’साठी काम करू लागले. यातील ‘डी’ म्हणजे डिसेप्शन. छलकपट. फसवाफसवी. या विभागाचे तेव्हाचे प्रमुख होते कॅप्टन पीटर फ्लेमिंग. ‘जेम्स बॉण्ड’चे जनक इयान फ्लेमिंग यांचे हे बंधू. त्यांनीच भगतराम यांना ‘सिल्व्हर’ हे सांकेतिक नाव दिले. या दोघांनी मिळून दुसऱ्या महायुद्धातील हेरगिरीतील एक महत्त्वाचे प्रकरण रचले. छलकपट हाच त्याचा पाया होता. डिट्रिच विट्झेल हा तेव्हा काबूलमधील जर्मन गुप्तचरांचा प्रमुख होता. त्यांनी भगतराम यांना एक ट्रान्समीटर दिला होता. दिल्लीतून ब्रिटिशांची गोपनीय माहिती पाठविण्यासाठी. त्यावरून भगतराम आणि फ्लेमिंग दिवसातून तीन वेळा बर्लिनमधील जर्मन गुप्तचर मुख्यालयाला माहिती पाठवीत असत. पण ती अर्थातच चुकीची तरी असे किंवा अर्धसत्य. यातील मौजेची बाब अशी, की हा ट्रान्समीटर चक्क व्हाईसरॉयच्या बंगल्यातील बागेत बसविला होता.

जर्मनीला फसविण्यासाठी त्यांनी आणखी एक अफलातून योजना आखली होती. सर्वात प्रथम भगतराम यांनी त्यांच्या एका कम्युनिस्ट लेखकमित्राच्या साह्य़ाने एक बनावट संघटना तयार केली. अखिल भारतीय राष्ट्रीय क्रांतिकारी समिती नावाची. त्या संघटनेच्या घातपाती कारवायांच्या बनावट बातम्या ते तयार करीत आणि जर्मनीला पाठवून देत. या बातम्या अशा काही कौशल्याने लिहिलेल्या असत की जर्मन अधिकाऱ्यांना वाटावे, ब्रिटिश सत्तेला मोठेच दणके दिले जात आहेत. या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापलीकडे त्यांना अन्य पर्यायही नव्हता. या बातम्यांची सत्यता पडताळून पाहण्याची अन्य कोणतीही यंत्रणाच नव्हती त्यांच्याकडे.

१९४१ ते ४५ या काळात भगतराम किमान बारा वेळा काबूलला गेले होते. खैबर खिंडीच्या मार्गाने लपतछपत पायी जात असत ते. तो प्रवास सोपा नव्हता. अनेक धोके असत त्यात. ही ऑगस्ट १९४३ मधील गोष्ट आहे. त्या महिन्यात ते काबूलला जाण्याची तयारी करीत असताना अचानक दिल्लीत त्यांना काबूलमधील एक अफगाण व्यक्ती भेटली. नेमके त्यावेळी भगतराम आणि फ्लेमिंग हे एकत्र होते. ते पाहिल्यावर फ्लेमिंग यांनी त्यांना काबूल दौरा रद्द करण्याची सूचना दिली. ते काबूलला गेले, तेथे ती व्यक्ती भेटली आणि तिने भगतराम यांचे खरे रूप उघड केले तर मरणाशीच गाठ. पण फ्लेमिंग यांची सूचना डावलून भगतराम गेले. एक हेर म्हणून आपण आपली काळजी कशी घ्यावी हे त्यांना चांगलेच माहीत होते.

एकदा ते दोन कम्युनिस्ट क्रांतिकारकांसमवेत प्रवास करीत होते. सुल्तानपूरहून फतेहाबादला पायी निघाले होते ते. वाटेत एक चहाची टपरी दिसली. तेथे थांबले ते. अफगाणिस्तानात ग्रीन टी पिण्याची एक पद्धत आहे. तो दुधाशिवाय घेतला जातो. एका कपाने भागत नसे त्यांचे. पहिला कप घेताना त्यात तळाशी साखर टाकलेली असते थोडीशी. नंतर मात्र तीही घालत नाहीत. तर चहा पिताना भगतराम यांचा सहकारी सोधी मोहिंदर सिंग याने पुन्हा साखर मागितली. ते शाह झमान या नावाने प्रवास करीत होते. अफगाणी मुस्लीम व्यक्तीसारखा वेश परिधान केला होता. अशा अफगाणी व्यक्तीने साखर मागणे हे बिंग फोडणारे ठरले असते. भगतराम यांनी तत्क्षणी दाबले त्यांना. अशीच एक घटना त्यांच्या बंगाली सहकाऱ्याबाबत घडली होती. तो जेवताना बंगाली पद्धतीने भाताचे मुटके करून तोंडात टाकत होता. तेव्हा भगतराम यांनी त्याला रोखले. अफगाणी आहात, तर त्याच पद्धतीने वागा असे सांगितले. किरकोळ गोष्टी आहेत या. पण अशा बारीकसारीक बाबींतूनही पितळ उघडे पडू शकते. भगतराम यांना याची चांगलीच जाणीव होती. त्यांना ‘वेशांतरातील उस्ताद’ म्हणत ते उगाच नाही.

त्या काबूल दौऱ्यावर आपल्याला धोका आहे ही जाणीव असूनही ते गेले. अनेक आठवडे झाले तरी ते परतले नाहीत. इकडे फ्लेमिंग अस्वस्थ. एके दिवशी अचानक ते त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले. फ्लेमिंग यांनी त्यांना, काय झाले म्हणून विचारले. त्यावर भगतराम यांनी जे सांगितले ते कल्पनातीत होते. ते त्या अफगाण व्यक्तीला जाऊन भेटले. तिला आपल्या फ्लॅटवर जेवायला बोलावले. तिच्यासाठी खास जेवण बनविले होते त्यांनी. ते खाल्ले आणि नंतर ती व्यक्ती मेली. भगतराम यांच्या म्हणण्यानुसार, जेवणातल्या भाजीत त्यांनी वाघाच्या मिशा टाकल्या होत्या. त्या पोटात गेल्या की आतडय़ात घुसून रक्तस्त्राव होतो. माणूस मरतो. ही अर्थातच बनावट कहाणी आहे. कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्या माणसाला मारले असेल. पण यावर फ्लेमिंग यांचा विश्वास बसला होता. याच भेटीत भगतराम यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. काबूलमधील जपानी राजनैतिक अधिकारी ईन्योये यांची भेट घालून द्या अशी गळ त्यांनी जर्मनांना घातली. त्यांना ते भेटले. आणि मग जर्मनी आणि इटलीप्रमाणे ते जपानसाठीही ‘हेरगिरी’ करू लागले. जपानला चुकीची माहिती पुरवताना जपानच्या भारतातील हेरांची माहितीही काढून घेऊ  लागले. हे जपानी हेर मग फ्लेमिंग यांच्या जाळ्यात सापडत आणि डबल एजंट बनत.

हे सारे पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो, की आधी काँग्रेसमध्ये असणारा, भगतसिंग, सुभाषबाबूंना मानणारा आणि नंतर कम्युनिस्ट झालेला हा गुप्तचर आता मनापासून ब्रिटिशांचा एजंट झाला होता का? त्याच्या लाडक्या भावाला ब्रिटिशांनी मृत्युदंड दिला होता. ब्रिटिश सत्तेचा द्वेष करीत होता तो. ते सारे तो विसरला होता काय?

जर्मनी आणि इटलीकडून भगतराम यांनी हेरगिरीसाठी आजच्या भावाने किमान १६ कोटी रुपये मिळविले होते. त्यातील बराचसा पैसा त्यांनी कम्युनिस्ट चळवळीला दिला होता. वायव्य सरहद्द प्रांतातील टोळीवाल्यांना त्यांनी पैसे वाटले होते. हे सारे ब्रिटिशांविरोधात त्यांनी सशस्त्र संघर्ष उभारावा, देश स्वतंत्र व्हावा यासाठीच. जागतिक राजकारणात मात्र ते रशियाच्या बाजूने होते आणि म्हणून नाझी जर्मनीविरोधात, इटली आणि जपानविरोधात काम करीत होते. त्यावेळी ते ब्रिटिशांना मदत करीत होते. परंतु हे करताना ते जर्मनी व जपानच्या साह्य़ाने लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविरोधातही काम करीत होते. मग त्यांच्या निष्ठेचे काय? या प्रश्नाचे उत्तर काळ्या आणि पांढऱ्या रंगात देणे कठीण आहे. ते स्वत: मात्र आपण शेवटपर्यंत सुभाषबाबूंशी एकनिष्ठ होतो हेच सांगतात. विश्वास तरी कसा ठेवायचा? अखेर भगतराम तलवार हे सिल्व्हर होते. छलकपटातील उस्ताद होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अचानक गायबच झाले. फाळणीनंतरच्या पाकिस्तानात त्यांचे घर होते. अनेकांना वाटले, फाळणीच्या त्या खूनपर्वात ते मारले गेले असतील. पत्ताच लागला नाही त्यांचा.

आणि अचानक १९६०च्या दशकात ते समोर आले. कोलकात्यात सुभाषबाबूंवर एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात ते दिसले. त्याच काळातले एक छायाचित्र आहे त्यांचे. त्यात ते चक्क डिट्रिच विट्झेल यांच्यासमवेत दिसतात. विट्झेल हे तेच नाझी गुप्तचर, ज्यांना भगतरामनी मूर्ख बनवले होते..  आजही त्यांची ओळख नाझींना मूर्ख बनविणारा हेर हीच आहे.

संदर्भस्रोत –

  1. Silver: The Spy Who Fooled the Nazis – Mihir Bose, Fonthill, 20161. Silver: The Spy Who Fooled the Nazis – Mihir Bose, Fonthill, 2016
  2. Uncovering the Remarkable Life of A.C.N. Nambiar – The Wire (https://thewire.in/119015/nambiar-secret-life/)
  3. Netaji deputy and Nehru’s old friend was a Soviet spy, British documents reveal – PTT, 25 Oct. 2014
  4. When The Former Indian Ambassador ACN Nambiar Met Nehru In Paris – Vappala Balchandran (http://www.caravanmagazine.in/vantage/acn-nambiar-nehru-indira-bose-ambassador)

नानू – एक राष्ट्रवादी हेर

सन १९५१. पंतप्रधानांचे कार्यालय.

इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) प्रमुख बी. एन. मलिक यांनी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या समोर एक गोपनीय फाइल ठेवली. मॉस्कोहून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आलेले काही सांकेतिक संदेश आयबीने पकडले होते. यापूर्वी मॉस्कोतील नेते भारतीय कम्युनिस्टांच्या सतत मागे लागलेले असायचे, की नेहरू हे क्रांतीविरोधी आहेत. त्यांचे सरकार उलथवून टाका. या वेळी मात्र त्या संदेशाची भाषा जरा बदललेली होती. त्यात कम्युनिस्टांना इशारा दिला होता, की नेहरूंच्या जाळ्यात अडकू नका. हाच संदेश त्या फाइलमध्ये होता.

नेहरूंनी ते वाचले आणि हसायलाच लागले ते. म्हणाले, ‘‘आमचे गुप्तचर किती चतुर आहेत हे बहुधा मॉस्कोला अजून समजलेलेच नाही.’’

व्हॅसिली मित्रोखिन या केजीबी अधिकाऱ्याने रशियातून केजीबीच्या अनेक फायली पळवून आणल्या. त्याआधारे मित्रोखिन आणि ख्रिस्तोफर अँडर्य़ू यांनी लिहिलेल्या ‘द वर्ल्ड वॉज गोइंग अवर वे – द केजीबी अँड द बॅटल फॉर द थर्ड वर्ल्ड’ या पुस्तकात हा किस्सा दिलेला आहे. तो सांगून लेखकद्वय पुढे म्हणतात, पण मॉस्कोतील भारतीय दूतावासात केजीबी किती घुसलेली होती, हे ना नेहरूंना माहीत होते, ना आयबीला.

मित्रोखिन यांचे म्हणणे योग्यच होते. स्वातंत्र्यानंतरच नव्हे, तर स्वातंत्र्याच्या आधीही भारतात रशियाने आपले असंख्य हेर पेरलेले होते. यात अमेरिकाही मागे नव्हती. मित्रोखिन यांच्या त्या पुस्तकात हा उल्लेख नाही, पण नेहरूंचे एक अगदी जवळचे सहकारी रशियाचे हेर होते. ते केवळ नेहरूंचेच सहकारी नव्हते, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही निकटवर्ती होते. त्यांचे नाव होते अराथील कांदेथ नारायण – एसीएन – नंबियार.

भारतात नुकताच गांधी युगाचा प्रारंभ होत होता. देशातील वसाहतवादविरोधी चळवळीला नवी दिशा मिळत होती. याच काळात रशियातील साम्यवादी क्रांतीने भारावलेले काही युवक भारतात ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात उभे राहिले होते. समतेवर आधारलेला शोषणविरहित समाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत होते. एसीएन नंबियार हे त्यांतीलच एक. नानू नावाने ओळखले जायचे ते. १९२४ मध्ये ते जर्मनीला गेले ते ‘हिंदू’चे पत्रकार म्हणून. बर्लिनमध्ये तेव्हा भारतीय साम्यवाद्यांचा एक गट काम करीत होता. त्यांच्याबरोबर ते काम करू लागले. तेथूनच ते १९२९ साली मॉस्कोला सोव्हिएत ‘पाहुणे’ म्हणून गेले. याच काळात ‘एम आय फाइव्ह’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेने त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

नानू नंबियार जर्मनीत होते तो हिटलरच्या उदयाचा काळ. फॅसिस्ट शक्तींना स्वातंत्र्य आणि समता या दोन तत्त्वांचे फार वावडे. त्यामुळेच त्यांचा कम्युनिस्टांवर राग. हिटलरच्या नाझी पक्षाने तर ज्यूंनंतर कम्युनिस्टांनाच आपले शत्रू म्हणून घोषित केले होते. अशा काळात बर्लिनमध्ये काम करणे कठीण होते. नानू नंबियार हे तर कट्टर साम्राज्यशाहीविरोधी, स्वातंत्र्यवादी, साम्यवादी. नाझी विचारधारेचे कडवे विरोधक होते ते. त्यामुळे एकीकडे त्यांच्यामागे नाझींचा ससेमिरा होता, दुसरीकडे ब्रिटिश गुप्तचरही त्यांच्या पाठीमागे लागलेले होते.

१९३३ मध्ये नाझी गेस्टापोंनी त्यांना पकडलेच. आरोप होता जर्मन पार्लमेन्टच्या – राईशस्टाग – इमारतीला आग लावल्याच्या कटातील सहभागाचा. नाझींच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना. ही आग कोणी लावली हे अद्याप अज्ञातच आहे. पण या घटनेचा वापर करून नाझींनी राष्ट्रवादी भावनेला उधाण आणले आणि नागरिकांचे सर्व घटनात्मक अधिकार संपुष्टात आणले. या प्रकरणात नंबियार दीड महिना तुरुंगात होते. तेथून सुटका झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की जर्मनीतील वास्तव्य हे काही आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. कधीही प्राणाशी गाठ पडण्याची शक्यता. तेव्हा सुटकेनंतर ते झेकोस्लोव्हाकियामार्गे फ्रान्सला गेले. तेथे त्यांच्या आयुष्याला आणखी एक वेगळे वळण लागणार होते..

फ्रान्समध्येही नाझी समर्थकांची कमतरता नव्हती. जिवाला धोका तेथेही होता. नंबियार सावधगिरी बाळगूनच तेथे वावरत होते. पण एके दिवशी अचानक त्यांच्यासमोर एक उंच धिप्पाड जर्मन येऊन उभा ठाकला. नंबियार यांना वाटले, आता संपलेच सारे. परंतु ती जर्मन व्यक्ती नाझी नव्हती. ती सुभाषचंद्र बोस यांचा खास निरोप घेऊन आली होती. १९३४ साली प्रागमध्ये त्यांची आणि सुभाषबाबूंची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांचीही नाझींबद्दलची मते भिन्न होती. पण तरीही त्यांची चांगलीच मैत्री जुळली होती. १९४१ साली कोलकात्यात ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन नेताजी पळाले. भगतराम तलवार यांच्या मदतीने ते जर्मनीला पोचले. भारताचे स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी परदेशातील भारतीयांची मदत त्यांना हवी होती. त्यांना त्याकरिता नंबियार यांची साथ हवी होती. बर्लिनमध्ये राष्ट्रवादी भारतीयांचा गट कार्यरत होताच. नंबियार यांनी बर्लिनला परतावे असे नेताजींचे म्हणणे होते. हे म्हणजे स्वत:हून मृत्यूच्या दाढेत मान देण्यासारखेच होते. परंतु अखेर नंबियार यांनी ते आव्हानही स्वीकारले.

ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढणाऱ्या कोणालाही मदत करण्यास तेव्हा नाझी जर्मनी तयारच होती. त्यांच्या मदतीने १ नोव्हेंबर १९४१ रोजी बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटरचे कार्यालय उघडण्यात आले. आठ शयनगृहे असलेल्या एका भल्यामोठय़ा बंगल्यात हे कार्यालय होते. नाझींकडून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत होती. त्यासाठी जर्मन परराष्ट्र खात्याने ३०-३५ राजनैतिक अधिकाऱ्यांचा एक खास भारत विभाग तयार केला होता. या काळात नेताजींना राहण्यासाठी एक मोठा बंगला देण्यात आला होता. जर्मनीतून ते जपानला गेल्यानंतर फ्री इंडिया सेंटरची जबाबदारी नंबियार यांच्याकडे सोपविण्यात आली. या सेंटरची एक शाखा त्यांनी पॅरिसमध्येही उभारली होती. मार्च १९४४ मध्ये नेताजींनी त्यांच्या आझाद हिंद सरकारचे परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली.

नाझींनी दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करल्यानंतर नंबियार ब्रिटिश फौजांच्या हाती लागले. जर्मनीतील सॅलिसबरी गावातून त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता, तो नाझींचे समर्थक असल्याचा. हे विचित्रच. सोव्हिएत रशियाचे हेर म्हणून ब्रिटिश गुप्तचर ज्यांच्यावर पाळत ठेवून होते त्या नंबियार यांना आता नाझी समर्थक म्हटले जात होते.

पण नानू नंबियार हे फार काळ कैदेत राहणारे नव्हते. ते ब्रिटिशांच्या तावडीतून पळाले ते थेट स्वित्र्झलडला. तेथून नेहरूंच्या आग्रहाखातर ते १९४८ साली भारतात परतले. स्वतंत्र भारतात त्यांनी स्कँडिनेव्हियातील, पश्चिम जर्मनीतील राजदूत अशी महत्त्वाची पदे सांभाळली. परंतु बहुधा त्यांच्यातील साहसी वृत्तीला ते मानवणारे नव्हते. अखेर त्यांनी राजनैतिक अधिकारपदाची वस्त्रे उतरवली आणि ‘हिंदुस्थान टाइम्स’चे वार्ताहर म्हणून युरोपात गेले. परंतु ही बातमीदारी हा एक दिखावाच होता. ते खरे काम करीत होते ते औद्योगिक गुप्तहेरगिरीचे.

इंदिरा गांधी यांनाही त्यांच्याबद्दल फार आदर होता. ‘रॉ’चे माजी वरिष्ठ अधिकारी व्ही. बालचंद्रन यांच्यानुसार, ‘रॉ’चे पहिले प्रमुख आणि भारतीय गुप्तचरांचे ‘कुलगुरू’ आर. एन. काव यांना १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांनी सल्लागार म्हणून नेमले ते नानू नंबियार यांच्या सूचनेवरून.

१९८६ मध्ये त्यांचे निधन झाले. पण तोवर केरळच्या या सुपुत्राला, युरोपच्या भूमीवरून भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या या स्वातंत्र्ययोद्धय़ाला, राजनैतिक अधिकाऱ्याला आणि गुप्तचराला भारत विसरला होता…
रवि आमले – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader