अमित सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुस्वा माऊंटन हे काही रूढार्थाने पर्यटनस्थळ नाही. ज्वालामुखीने तयार झालेली एकात एक अशी दोन विवरं, लाव्हारसामुळे तयार झालेल्या गुहा, स्थानिक वन्यजीवांचे एकमेकांवर अवलंबून असलेले जीवनचक्र आणि मसाई लोकांचे गाव असणारं हे ठिकाण केनिया सफारीत एक दिवस थोडी वाट वाकडी करून आवर्जून पाहावे असे मात्र नक्कीच आहे.

केनियात मसाई मारा अभयारण्यात जायचे ठरल्यावर आजूबाजूला अजून काही बघण्यासारखी आगळीवेगळी ठिकाणे आहेत का याचा शोध घेत होतो. गुगल मॅप बघताना सुस्वा माऊंटन हे ठिकाण सापडले. रूढार्थाने हे पर्यटनस्थळ नाही. मुळात इथे जायला रस्ताच नाही. रस्ता म्हणून जे काही आहे त्याचे पावसाळ्यात अस्तित्वदेखील नसते. पण या सुस्वा माऊंटनच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. त्यामुळे सुस्वा माऊंटनला जायचे नक्की केले.

नरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर नऊ हजार सहाशे किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेट्सच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे. रिफ्ट व्हॅलीतून जाताना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. ‘जमीन दुभंगली आणि आभाळ फाटलं तर दाद मागायची कोणाकडे’ या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहणाऱ्या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमीन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्याबरोबर वाहून जाते आणि अचानक जमीन खचते. चीनने बांधलेल्या नैराबीला जोडणाऱ्या नवीन महामार्गावर अशीच जमीन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. याच रिफ्ट व्हॅलीत सुस्वा माऊंटन हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर आहे. या ठिकाणी ज्वालामुखीमुळे एकात एक अशी दोन विवरे तयार झालेली आहेत. अशा प्रकारे एकाच ठिकाणी एकात एक अशी दोन विवरे असणारे हे पृथ्वीवर एकमेव दुर्मीळ ठिकाण म्हणता येईल.

मसाई माराहून नरोबीला जाणाऱ्या महामार्गावर नारोख शहर आहे. या शहराच्या पुढे महामार्गाच्या उजव्या बाजूला सुस्वा माऊंटन दिसतो. पण या डोंगरावर जाण्यासाठी वाटाडय़ाची आवश्यकता आहे. आमचा मसाई वाटाडय़ा महामार्गावर आमची वाट पाहात उभा होता. मसाई पारंपरिक पेहराव केलेला रॉजर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्याच्या कमरेला मसाई सुरा लावलेला होता. तरस, बिबटय़ा यांच्याशी सुस्वातील मसाईंची अधूनमधून गाठ पडते. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ते हा मसाई सुरा कायम बाळगतात.

महामार्ग सोडल्यावर एक कच्चा रस्ता सुस्वा माऊंटनकडे जातो. या रस्त्यावर रिफ्ट व्हॅलीचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या लांबच्या लांब पसरलेल्या जमिनीतील भेगा दिसत होत्या. या खडबडीत रस्त्यावरून तासाभराचा प्रवास केल्यावर आम्ही ज्वालामुखीच्या विवराच्या पायथ्याशी पोहोचलो. आता रस्ता असा नव्हताच, रॉजर दाखवीत होता, त्या मार्गाने आमचा चालक गाडी डोंगरावर चढवत होता. केवळ अशा प्रदेशात चालवण्यासाठी तयार केलेली फोर व्हील ड्राइव्ह गाडी आणि गेली पंधरा वर्षे या भागात फिरणारा कसबी चालक असल्यामुळे आम्ही तासाभरात विनासायास विवरात प्रवेश केला. हे ज्वालामुखीचे आतले विवर होते. दुरवर पसरलेला गवताळ माळ, त्यावर चरणारी मसाईंची गुरे आणि हरणे दिसत होती. हे कुरण चारी बाजूंनी विवराच्या कडेला तयार झालेल्या डोंगररांगेने वेढलेले होते. हे ज्वालामुखीचे आतील विवर होते. या आतल्या विवरात ऐंबेटिरा (Embetira) नावाचा दोन हजार एकतीस फूट उंचीचा एक डोंगर आहे. त्यावरून आतले आणि बाहेरचे अशी दोन्ही विवरे दिसतात. गाडी पुढे गेल्यावर चक्क एक शाळा दिसली. शाळेची पक्की बठी इमारत होती. पण शाळा बाहेरच्या झाडाखाली भरली होती. आता मध्ये मध्ये शेते आणि गाई-गुरे चराईला आलेले मसाई गुराखी दिसायला लागले होते.

आतल्या विवरात मसाईंची तुरळक वस्ती आहे. आमची राहायची सोय ज्या मसाईच्या घरात केली होती तेथे आम्ही पोहोचलो. दोन कुडाची खोपटं बाजूबाजूला होती. दोन्ही खोपटं पत्र्याने आच्छादित केलेली होती. घरासमोर छोटेसे अंगण होते. त्याच्यापुढे थेट गवताचे कुरण सुरू होते. घराला कम्पाऊंड नव्हते. एका खोपटात त्या कुटुंबाचे स्वयंपाकघर होते. स्वयंपाकघरात जाण्याचा दरवाजा आपल्या िदडी दरवाजासारखा अरुंद आणि तीन फूट उंचीचा होता. त्यांच्या रोजच्या जेवणात मांसाचा वापर असल्याने त्याच्या वासाने जंगली जनावराने पटकन आत शिरू नयेत यासाठी अशा प्रकारे हा दरवाजा तयार केला जातो. सुस्वा माऊंटनला अजून वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे खोपटात सौर ऊर्जेवर चालणारे दिवे होते.

आम्हाला दिलेले खोपटे शेणाने सारवलेले होते. आठ बाय सहा फुटांच्या खोपटात दोन बेड कसेबसे बसवलेले होते. या दोन बेडवर आम्ही तीन जण कसे झोपणार हा प्रश्न होता. पण आमच्याकडे स्लीिपग बॅग असल्याने एक जण जमिनीवर आरामात झोपू शकत होता. तेथे स्वच्छतागृह नाही. आमच्या यजमानांनी चहा आणून दिला. आपल्यासारखाच दुधाचा चहा त्या अपरिचित ठिकाणी मिळाल्याने प्रवासाने आलेला शीण निघून गेला. खोपटात सामान टाकून आम्ही ऐंबेटिरा या आतल्या विवरात असणाऱ्या डोंगराकडे निघालो. या शिखरावर जाऊन येण्यासाठी चार तासांचा ट्रेक करावा लागतो. तर आतील पूर्ण विवर डोंगरावरून फिरण्यासाठी आठ तासांचा ट्रेक करावा लागतो.

ऐंबेटिरा शिखराकडे निघाल्यावर वाटेत एका ठिकाणी लाकडी कुंपण घातलेली एक जागा दिसली. त्या कुंपणाच्या आत एका कोपऱ्यात जमिनीतून काही पाइप्स वर आलेले होते. त्या पाइप्समधून वाफ येत होती. जमिनीवर एक दहा हजार लिटरची सिंटेक्ससारखी टाकी ठेवली होती. त्या टाकीत पाइप्समधून येणारे पाणी ठिपकत होते. हा सुस्वा माऊंटनवरचा पाणवठा होता. सुस्वा माऊंटन येथे पावसाव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचे दुíभक्ष्य आहे. त्यावर उपाय म्हणून जमिनीतून निघणाऱ्या वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना मसाईंनी लढवली आहे. सुस्वा माऊंटन हा सुप्त ज्वालामुखी असल्यामुळे या भागात काही ठिकाणी जमीन खोदल्यावर जमिनीतून वाफ बाहेर येते. अशा जागंचे पारंपरिक ज्ञान या भागात राहाणाऱ्या मसाई लोकांना आहे. या ठिकाणी जमीन खोदून त्यात पाच ते १० पाइप इंग्रजी एल आकारात बसवले जातात. जमिनीतील वाफ या पाइप्समधून वर येते. रात्रीच्या वेळी वातावरण थंड असते. त्यामुळे या वाफेचे पाणी होते आणि ते पाणी टाकीत साठवले जाते. हल्ली जमिनीतून पाच ते १० पाइप्स आणण्यापेक्षा जमिनीवर आयताकृती सिमेंटचे चेंबर बांधून त्यावर एकच पाइप एल आकारात बसवला जातो. अर्थात हे सिमेंटचे चेंबर बांधण्यासाठी शहरातून गवंडी बोलवावा लागतो. आम्ही ज्या पाणवठय़ाला भेट दिली तेथे दोन्ही प्रकारे जमिनीतील वाफ काढली जाते. या पाणवठय़ावर सर्व मसाई पाडय़ाचा हक्क असतो. पण पाणी वापरण्याचे नियम सर्व जण पाळतात. कपडे, भांडी कुंपणाबाहेरच धुतली जातात. आम्ही तेथे गेलो तेंव्हा दोन मसाई बायका कुंपणाबाहेर कपडे धूत होत्या. गाई-गुरांना हे पाणी देत नाहीत. तसेच जनावर धुण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जात नाही.

सुस्वा माऊंटनवरचा हा पाणवठा पाहून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. खुरटय़ा झुडपातून, दाट झाडीतून जाणाऱ्या मळलेल्या पायवाटेने दोन तासांत डोंगरमाथ्यावर पोहोचलो. येथून ज्वालामुखीचे बाहेरील विवर आणि दोन विवरांतील जंगलाचे दृश्य दिसते ते नजर खिळवून ठेवणारे आहे. इथे थोडा वेळ थांबून आम्ही आल्या मार्गाने दीड तासांत खाली उतरलो.

सुस्वा माऊंटनवरील दुसरी महत्त्वाची जागा (पाणवठा धरल्यास तिसरी महत्त्वाची जागा) म्हणजे ‘बबून्स पार्लमेंट’. लाव्हा रसाच्या प्रवाहामुळे सुस्वा माऊंटनवर काही गुहा तयार झालेल्या आहेत. त्यांना लाव्हा टय़ूब्स म्हणतात. बबून्स पार्लमेन्ट ही सहा मल लांबीची लाइम स्टोन गुहा आहे. गुहेच्या वरच्या बाजूला जंगल आहे. वीस पायऱ्या उतरून आपण गुहेच्या तोंडाशी पोहोचतो. उजव्या बाजूला एका गुहेचे तोंड आहे, तर डाव्या बाजूला दुसऱ्या गुहेचे तोंड आहे. आम्ही वाटाडय़ामागोमाग प्रथम उजव्या बाजूच्या गुहेत शिरलो. साधारणपणे वीस फूट उंच आणि वीस फूट रुंद गुहेचे तोंड होते. गुहा शंभर फूट लांब होती. आत गेल्यावर काळोख वाढल्याने जवळच्या विजेऱ्यांचा वापर करावा लागला. गुहेच्या शेवटी जमिनीत एक खड्डा होता. त्यावर झाडाची मजबूत फांदी आडवी टाकलेली. त्या फांदीला एक जाड दोरखंड बांधलेला होता. या दोरखंडाच्या साहाय्याने आत उतरता येते. या ठिकाणी वटवाघळांचे वास्तव्य आहे. त्याचा अतिशय घाणेरडा आणि उग्र वास येत होता. त्यामुळे आम्ही गुहेत न उतरण्याचा निर्णय घेतला आणि परत फिरलो. गुहेच्या तोंडाशी पायऱ्यांवर दोन हेरेक्स (आफ्रिकन मोठे उंदीर) आमच्याकडे पाहात बसलेले होते.

आता आम्ही दुसऱ्या बाजूच्या गुहेत शिरलो. इथे जमीन ओबडधोबड होती. मोठमोठे खडक छतापासून सुटून खाली पडल्यामुळे चालताना कधी या खडकांच्या बाजूने चिंचोळ्या जागेतून तर कधी खडक पार करून पुढे जावे लागत होते. पायाखालून पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्यामुळे त्या मिट्ट काळोखातही वाटाडय़ाच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे जात होतो. एके ठिकाणी थांबून वाटाडय़ाने आम्हाला गुहेच्या कोपऱ्यात पडलेला विष्ठेचा ढीग दाखवला. ती बिबटय़ाची विष्ठा होती. बिबटय़ांना एकाच जागी विष्ठा विसर्जित करायची सवय असते. गुहेत जमा होणाऱ्या बबून माकडांना खाण्यासाठी बिबटय़ांचा या गुहेत वावर असतो. पुढे गुहा काटकोनात वळली आणि काळोख अजूनच दाट झाला. उजव्या-डाव्या बाजूला गुहेला फाटे फुटलेले होते. दहा मिनिटे चालल्यावर दूरवर प्रकाश दिसायला लागला. या ठिकाणी गुहेचे छत कोसळून झाडाची मुळं आत आली होती. छतापासून दहा फुटांचा ओबडधोबड खडक छत कोसळल्यामुळे उघडा पडलेला आहे. या खडकात अनेक नसíगक खाचा आहेत. दररोज संध्याकाळी सुस्वा माऊंटनमधली सर्व बबून माकडे या गुहेच्या वरच्या बाजूला जमा होतात. जसजशी रात्र होत जाते तसतशी ही माकडे जंगलातून या गुहेतल्या कपारीत उतरायला सुरुवात करतात आणि आपल्या भक्षक बिबटय़ापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त अवघड जागी जाऊन बसतात आणि तिथेच संपूर्ण रात्र काढतात. शेकडो वष्रे या ठिकाणी माकडे येत आहेत. त्यामुळे या भागाला ‘बबून्स पार्लमेंट’ असे नाव पडले आहे.

बबून माकडांच्या वावरण्याने आणि मलमूत्रामुळे इथले दगड गुळगुळीत झालेले आहेत. त्या गुळगुळीत झालेल्या दगडावर हाताची पकड बसणे मुश्किल आहे. तरीही बिबटय़ापासून वाचण्यासाठी जीव धोक्यात घालून माकडे या कपारीत उतरतात आणि अवघड जागी जाऊन बसून, झोपून रात्र काढतात. सगळ्यात अवघड जागा पकडण्याचा सर्वाचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात एखादे माकड खाली पडले तर जगण्याची शक्यता फारच कमी असते अशी माकडे बिबटय़ाची शिकार होतात. बिबटय़ा चोरपावलाने गुहेत येऊन डरकाळी देतो. त्यामुळे एखादे बेसावध माकड घाबरून खाली पडते आणि बिबटय़ा त्याची शिकार करतो. बबून्स माकडांच्या काही कवटय़ा आणि हाडं तिथे विखुरलेली पाहायला मिळाली.

गुहेत पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला बिबटय़ाची विष्ठा एकेजागी साठलेली दिसत होती. गुहेतला अंधार आणि त्याबरोबर वटवाघळांचा येणारा घाणेरडा उग्र वास आता वाढत चालला होता. नाकावर रुमाल बांधून आम्ही पुढे निघालो. इथे छताला अक्षरश: हजारो वटवाघूळ (Giant Mastiffs bats) लटकत होती. मोठे कान आणि सुटी शेपूट असलेल्या या वटवाघळांची ही जगातली सगळ्यात मोठी वसाहत आहे. या वटवाघळांच्या वास्तव्यामुळे या गुहेच्या जमिनीवर वटवाघळांच्या विष्ठेचा पांढऱ्या रंगाचा थर जमलेला आहे. या थरातही अनेक कीटक आहेत. आजारी आणि लहान वटवाघळं ज्यावेळी छतावरून खाली पडतात तेव्हा हे कीटक त्यांचा फन्ना उडवतात. संध्याकाळच्या वेळी ही हजारो वटवाघळे ‘बबून्स पार्लमेंट’ पार करून गुहेच्या छताला पडलेल्या भोकातून बाहेर पडतात त्यावेळी आकाश काही काळासाठी झोकाळून जाते. वटवाघळे बाहेर पडल्यावर बबून्स, बिबटे आणि किटकांचा गुहेत वावर सुरू होतो. सकाळी बबून्स माकडे गुहेच्या बाहेर पडली की, वटवाघळांची परतायची वेळ होते. शेकडो वष्रे हे चक्र अव्याहतपणे चालू आहे.

वटवाघळांच्या घाणेरडय़ा वासामुळे त्या ठिकाणी जास्त वेळ उभे राहाणे शक्य नव्हते. आम्ही मागे फिरून आल्या मार्गाने गुहेच्या बाहेर आलो. आता सूर्य अस्ताकडे चालला होता आणि बबून माकडांची एक टोळी ‘बबून्स पार्लमेंट्स’च्या दिशेने चालली होती आणि आम्हीदेखील विवर उतरून परतीच्या मार्गाला लागलो.

कसे जाल? केव्हा जाल?

केनियाची राजधानी नरोबी गाठावी लागते. नरोबी ते सुस्वा माऊंटन हे अंतर १२५ किलोमीटर आहे. साधारणपणे चार तासात हे अंतर कापता येते. सुस्वा माऊंटनवर तंबू लावून किंवा स्थानिक मसाई लोकांच्या घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय होते. नरोबीहून पहाटे निघून एका दिवसात सुस्वा माऊंटन पाहून परत नरोबीला पोहोचता येते. दुसरा पर्याय म्हणजे मसाई मारा पाहून नरोबीला परतताना सुस्वा माऊंटनला जाता येते. सुस्वा माऊंटनचे हे ऑफबीट ठिकाण असल्याने केनिया सफारीचे बुकिंग करतानाच टूर ऑपरेटशी बोलून नियोजन करावे.

योग्य कालावधी : मे ते ऑगस्ट