वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
बाल विशेष
‘‘मिकू.. मिकू बेटा.. मिकू राणी.. ऊठ बरं आता..’’
आईची मिकूला ही चौथी हाक होती. त्याआधी बाबा, आजी-आजोबा सगळ्यांच्या मिकूला हाका मारून झाल्या होत्या; पण टॉम अॅण्ड जेरीच्या पांघरुणात मिकूने स्वत:ला गुरफटून घेतलं होतं आणि डोक्याखाली होती डोनाल्ड डकची उशी. तिच्या गादीवर आई रोज छोटा भीमचं बेडशीट घालायची. हे सगळं जमलं, परी आणि योयोला जवळ घेतलं, की मिकूला झक्कास झोप लागायची. परी म्हणजे मिकूची डॉली आणि योयो म्हणजे तिचा नॉडी. आईचा नाही तर आजीचा हात तिच्या केसातून फिरत असायचा. त्यांची गोष्ट सुरू असायची. परी आणि योयोचा हात धरून मिकू केव्हा झोपेच्या खेळात पळायची ते तिला कळायचंही नाही.
परी आणि योयोला घेऊन झोपेच्या खेळात गेलं की मज्जा असते. कुण्णी कुण्णी खेळ थांबवायला सांगत नाही. हाक मारायला येत नाही हे तिला तिच्या बाबानेच सांगितलं होतं. आत्ताही मिकू झोपेच्या खेळातच होती. ती, परी आणि नॉडी वाघ-सिंहांच्या बागेत गेले होते. तिथे धम्माल सुरू होती. वाघाच्या तोंडात शिरायचं आणि सिंहाच्या तोंडातून बाहेर पडायचं.. उंटाच्या मानेवर चढायचं आणि घसरगुंडीतून हत्तीच्या पोटात शिरायचं.. आईच्या ऑफिसजवळची ही बाग तिच्या स्वप्नात आली होती.
तेवढय़ात पुन्हा आईची हाक ऐकू आली. आई तिला हलवत होती. डोक्यावरून आईचा मऊ मऊ हात फिरत होता.
‘‘मिकू, आता उठली नाहीस तर गंमत मिळणार नाही हं..’’
‘‘ऊं ऊं ऊं..’’
‘‘बघ, सगळी गंमत मी प्रिया छोटुलीला देऊन टाकणार.’’
‘‘अंअंअं.. नाय.. नको..’’
प्रिया छोटुली म्हणजे मिकूची अगदी फास्ट फ्रेण्ड; पण सोसायटीत आणखी एक प्रिया असल्यामुळे मिकूची फास्ट फ्रेण्ड झाली प्रिया छोटुली.
‘मग चल बरं, लवकर उठ आता.. गंमत घेऊन कोण येणारे माहीत आहे का..’’
मिकूने एकदम डोळे उघडले. तिच्या डोक्यावरून फिरणारा आईचा हात पकडला आणि ओरडली,
‘‘दिनामामा.. दिनामामा.. ए आई, तो काय गंमत आणणार आहे?’’
मिकूला उचलून घेऊन वरच्या वर हवेत फेकून झेलणारा दिनामामा मिकूला फार म्हणजे फार आवडायचा. तो त्याच्या मोबाइलमध्ये तिला टॉम अॅण्ड जेरीचे सगळे व्हिडीओ बघू द्यायचा. त्याच्या बाइकवर बसवून आइस्क्रीम खायला घेऊन जायचा. तो घरातल्या इतर कुण्णाला नाही, पण फक्त मिकूला भेटायला यायचा आणि त्याच्याबरोबर कितीही वेळ दंगामस्ती केली तरी आई मिकूला अजिबात ओरडायची नाही.
दिनामामा कुठे येणारे? तो नाही का विमानात बसून भुर्र गेला. त्याने आपल्याला दिसायचा फोनपण केला नव्हता का?
विमानात बसून दिनामामाने केलेला व्हिडीओ कॉल मिकूला आठवला.
मग आत्तू येणारे?
दिनामामासारखीच आत्तूपण मिकूला जामच आवडायची. आत्तू आली की तिची पर्स उघडून मिकू त्यातलं सगळं बाहेर काढायची. लिपस्टिक, बिंदी, काजल, आय लायनर आणि त्याहीपेक्षा सगळ्यात भारी तिचा तो कोम्ब.. तो घेऊन मिकू तिचे छोटुसे केस विंचरायची, पण तिच्या डोळ्यासमोर यायचे तिचे लांबसडक केस. ती मोठ्ठी झाली की आत्तूसारखेच केस वाढवणार, तिच्यासारखाच मेकअप करणार आणि तेव्हा आईने अज्जिबात नाही म्हणायचं नाही, असं तिने आईला किती तरी वेळा बजावून सांगितलं होतं. आत्तूचा कोम्ब या शब्दावरून तर तिच्यासमोरच आईची आणि आत्तूची कित्ती भांडणं व्हायची.
कोम्ब नाही ग, कंगवा.. तू मिकाला हे असलं शिकवू नकोस.
मी नाही शिकवलं तरी तिची ती शिकणारच आहे.. आत्तू म्हणायची.
या दोघी अशा का भांडतात ते मिकूला काही केल्या कळायचं नाही. पण कितीही भांडल्या तरी आत्तू यायचीच परत. आत्तासारखीच.
आत्तूचा फोटो बघितलास ना परवा? ताप आला म्हणून झोपली होती की नाही?
मग कोण येणारे? मिकूने आईला विचारलं.
नुसतं येणार नाही, गंमत आणणार आहे.. आई म्हणाली.
कोण येणार.. काय आणणार.. सांग ना.. सांग ना.. मिकूने गादीवरच हातपाय आपटत रडायला सुरुवात केली.
बघ हं, असं केलंस तर कुणीच येणार नाही आणि काहीच आणणार नाही.
प्रिया छोटुली येणारे का?
नाही.. आता जो लवकर उठेल, पटापट दात घासेल, तोंड धुवेल, दूध पिईल त्यालाच गंमत मिळणार.
ऊं ऊं ऊं.. मी नाही जा.. दूध नक्को. मी बाबाच्या कपात चहा पिणार
मग तुला गंमत मिळणारच नाही.. ए गंमत जा तिकडे. नकोच येऊ मिकूकडे..
मिका अंथरुणातून उठत नाही हे बघून आईच उठली आणि बाहेर निघाली.
आता आपलं कुणी ऐकणार नाही हे मिकाला समजून चुकलं.
मग तीही उठली. तिने जाऊन पेपर वाचत बसलेल्या आजोबांच्या केसांशी खेळ केला. भाजी निवडत बसलेल्या आजीला मिठी मारून तिचा पापा घेतला. आता चहा पीत बसलेल्या बाबांकडे ती वळणार तितक्यात तिकडून आईचा पुन्हा आवाज आला.
मिकू तुला खरंच गंमत नकोय ना..
आता मात्र नाईलाजाने मिकू बेसिनपाशी गेली. आई तिथे मिकूच्या ब्रशवर पेस्ट लावून उभीच होती. तिने उभं राहून मिकूला नीट दात घासायला लावले. लाल लाल रंगाची ती गोड पेस्ट खरं म्हणजे मिकूला थोडी खाऊन टाकायची होती. पण आईचं लक्ष आहे बघून तिने गुपचूप दात घासले.
तोंड पुसून ती उडय़ा मारतच बाबांकडे निघाली तेवढय़ात आईने बाबांच्या हातात मिकूचा दुधाचा ग्लास नेऊन दिला. तो बघूनच मिकूने भोकाड पसरलं.
मी नाहीच दूध पिणार..
तुम्ही सगळे चहा पिता तर मग मी दूध का पिऊ
मी पण मोठी झाले आता.
मी प्ले ग्रुपला आहे..
मी नाही दूध पिणार
हात पाय आपटून, रडून, डोळ्यांतून पाणी काढून मिकूने घर डोक्यावर घेतलं, एवढय़ात बेल वाजली.
आईने जाऊन दार उघडलं तर समोर टक्कर आजोबा उभे. मामा, आत्तू, प्रिया छोटुली यांची नावं घेताना मिकू टक्कर आजोबांना विसरूनच गेली होती. टक्कर आजोबा तिच्या आजोबांचे मित्र. ते घरी आले की मिकूचा त्यांच्याबरोबर ठो द्यायचा खेळ सुरू व्हायचा. म्हणून ते टक्कर आजोबा.
पिल्लू का रडतंय बरं.. आत येत टक्कर आजोबांनी विचारलं. आणि हातातली बास्केट बाजूला ठेवत ते खुर्चीत बसले.
तुम्ही आणलेली गंमत वेडय़ा मुलांना द्यायची नाहीये.. बरोबर ना..
आईने टक्कर आजोबांना विचारलं तसं मिकूचे कान एकदम टवकारले गेले. टक्कर आजोबांच्या या बास्केटमध्ये गंमत आहे तर.. खाली बसलेली ती पटकन उठली आणि पळत पळत टक्कर आजोबांकडे गेली.
आजुबा काय आणली गंमत?
आधी मला एक पापी दे, मग सांगतो.. असं आजोबांनी म्हटल्यावर मिकूने लगेच त्यांना गोड पापी देऊन टाकली.
आजोबांनी खुशीत येऊन तिलाही एक पापी दिली आणि बाजूला ठेवलेली बास्केट मांडीवर घेतली. तिच्यावरचं जाळीचं झाकण बाजूला केलं तर काय..
आतमध्ये एक पांढऱ्या काळ्या रंगाचं, गोलमटोल भूभूचं पिल्लू बसलं होतं. आपल्या भोकरासारख्या डोळ्यांनी त्याने टक्कर आजोबांकडे आणि मिकूकडे बघितलं आणि कुं कुं असं काहीतरी ओरडलं.
ही गंमत.. माझ्यासाठी
मिकूने सगळ्यांना डोळे मोठ्ठे करत विचारलं.
हो तुझ्यासाठीच. आजपासून हा तुझा मित्र. आजोबा म्हणाले.
आई-बाबा मिकूजवळ आले. मिकूचा गालगुच्चा घेत बाबांनी विचारलं.
मग काय मज्जा आहे बुवा. काय नाव काय तुझ्या या नवीन मित्राचं.
त्याला बास्केटमधून उचलून घेत म्हणाली,
हा माझा मित्र.. याचं नाव गुब्बु..