राम, सीता, लक्ष्मण, रावण यांच्याइतकीच रामायणातली महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे हनुमानाची. तिची तुलना महाभारतातल्या कृष्णाशीच होऊ शकते..

आपल्याला माहीत असलेलं रामायण अपूर्ण आहे असं मानलं जातं. त्यातले एक लाख श्लोक भगवान शंकरांनी सांगितले आहेत, ६० हजार श्लोक हनुमानाने सांगितले आहेत तर वाल्मिकींनी  आणि २४ हजार श्लोक सांगितले आहेत अशी श्रद्धा आहे. म्हणजेच एक रामायण असंही आहे, जे हनुमानाने लिहिलं आहे. ते हनुमानाच्या नजरेतून बघितलं गेलेलं रामायण आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

रामाचा परमभक्त अशी पुराणांनी हनुमानाची प्रतिमा रंगवलेली असली तरी प्रत्यक्षात महाभारतात जे स्थान श्रीकृष्णाला आहे, तेच स्थान रामायणात हनुमानाला आहे. सीतेच्या अपहरणानंतरच्या रामायणामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. पण तरीही तो सगळ्यापासून अलिप्त आहे. छाती फाडून हृदयात विराजमान झालेले रामसीता दाखवणारा हनुमान हे हनुमानाचं रुप आपल्याकडे लोकप्रिय असलं तरी रामायणाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या वेगवेगळ्या रचनांमधून दिसणारं हनुमानाचं रुपडं वेगवेगळं आहे. त्याशिवाय ठिकठिकाणच्या लोकसाहित्यातून आपल्यापुढे येणारा हनुमान एकदम वेगळा आहे. भारताबाहेर ज्या देशांमध्ये रामायण लोकप्रिय आहे, तिथल्या जनमानसाचा भाग आहे, अशा मलेशियासारख्या देशात तर हनुमान हा भरपूर स्रियांमध्ये रमणारा रामाचा सरदार आहे. तो शूर असल्यामुळे अर्थातच तो रामाला सीतेच्या शोधात मदत करतो. त्याला मुलंबिलं आहेत असंही हे बाहेरच्या देशांमधलं रामायण सांगतं. एकीकडे ब्रह्मचर्याचं प्रतीक ते दुसरीकडे हे रुप असा एखाद्या व्यक्तिरेखेचा इतक्या टोकाचा प्रवास खरोखरच विस्मकारक आहे.                                                                                                                                                                                                                                           आपल्याला माहीत असलेल्या रामकथेनुसार लवकुशांना भेटल्यानंतर सीतेचा स्वीकार करायचा मुद्दा पुन्हा पुढे येतो तेव्हा राम तिने सगळ्या प्रजाजनांसमोर दिव्य करून पावित्र्य सिद्ध करायचं आवाहन करतो. ते ऐकून सीता धरतीला आपल्याला पोटात घेण्याचं आवाहन करते. धरणीकंप होतो आणि भूमी सीतेला पोटात घेते.

राम लवाकुशांना घेऊन अयोध्येला परत येतो. काही दिवसांनी वनात गेलेला लक्ष्मण परत येतच नाही. सीता गेली, लक्ष्मण गेला, आता राम..? हनुमानाला ते सहनच होत नाही. तो रामाला क्षणभरही नजरेआड होऊ देईनासा होतो. एक दिवस रामाची अंगठी बोटातून घरंगळते. एका बिळातून पाताळात जाते. ती परत आण असं राम हनुमानाला सांगतो. त्यासाठी हनुमान पाताळात जातो. तिथे नाग त्याला पकडून वासुकीकडे, त्यांच्या राजाकडे नेतात. वासुकी हनुमानाला विचारतो, तुला हवी असलेली अंगठी कुठे आहे ते मी तुला सांगतो, पण तू मला हे सांग जमिनीत शिरणारं प्रत्येक मूळ सीता हे नाव घेत असतं. कोण आहे ही सीता. तेव्हा हनुमान सांगतो की मी ज्या रामाची अंगठी शोधतो आहे, त्याचीच आहे सीता. मग नाग त्याला रामसीतेची गोष्ट सांगायची विनंती करतात. हनुमान अगदी आनंदाने रामकथा सांगायला तयार होतो. रामकथेची सुरुवात ही अशीसुद्धा आहे.

रामायणात हनुमानाचा प्रवेश बराच उशिरा म्हणजे सीतेचं अपहरण झाल्यानंतर राम सीतेचा शोध सुरू करतो तेव्हा होतो. पण त्या शोधाबद्दल आपल्याला तपशील समजतात ते लंकेत सीतेची भेट घेऊन हनुमान तिच्याशी बोलतो आणि तिला ती गेल्यानंतर रामलक्ष्मणाच्या बाबतीत काय काय झालं ते सांगतो तेव्हा. सीतेचं आपहरण ते तिची हनुमानाशी भेट यात एका पावसाळ्याचं अंतर आहे. उन्हाळ्यात तिचं अपहरण होतं आणि पावसाळ्यानंतर दसऱ्याच्या आसपास राम रावण युद्ध होतं.

हनुमान आणि सीता भेटीची वेगवेगळी वर्णनं आहेत. वाल्मिकी रामायणात रावण अशोकवनात सीतेकडे येऊन शरण ये नाहीतर ठार मारतो अशी धमकी देऊन जातो आणि त्यानंतर लगेचच हनुमान सीतेला भेटतो. तेलुगु रामायणात असा उल्लेख आहे की ती जीव द्यायचा प्रयत्न करत असताना हनुमानाला सापडते. उडिया रामायणात तो दिवसभर तिला घाबरवतो आणि मग रामाची मुद्रिका खाली टाकतो. वाल्मिकी रामायणात हनुमानाला प्रश्न पडतो की सीतेशी कोणत्या भाषेत बोलायचं. संस्कृत की प्राकृत. कोणत्याही भाषेत बोलला तरी वानर बोलतो याचं तिला आश्चर्य वाटतं.

आपल्याबद्दल हनुमान सीतेला सांगतो, की जगात शिकण्यासारखं म्हणून जे जे काही होते, ते त्याला शिकायचं होतं. त्यासाठी तो सूर्याकडे गेला कारण पृथ्वीवर जे जे काही आहे, ते सगळं सूर्य बघू शकत होता. पण मी दिवसभर फिरत असतो, त्यामुळे मी दमतो असं म्हणून सूर्याने त्याला शिकवायला नकार दिला. मग हनुमान निश्चयीपणे सूर्याबरोबर उडत राहतो. त्याचा निश्चय बघून शेवटी सूर्य त्याला शिकवायला तयार झाला आणि त्याने त्याला वेद, उपनिषदं, शास्र, तंत्र शिकवलं. त्याशिवाय सूर्य हनुमानाला आकार लहान-मोठा  करणे, रुप बदलणे, जड किंवा हलके होणे, खूप ताकद वापरू शकणे, कुठेही भ्रमण करू शकणे, उडणे, कुठलीही इच्छापूर्ती करणे, अशा सिद्धी देतो. (याचा उल्लेख सोळाव्या शतकात अवधी भाषेत लिहिल्या गेलेल्या तुलसीदासाच्या चाळीस श्लोकी हलुमानचालिसेमध्ये येतो.) सूर्य त्याला सांगतो की मी तुला  हे सगळं शिकवलं त्याबदल्यात तू एकच कर ते म्हणजे माझा मुलगा सुग्रीवाची काळजी घे. कायम त्याच्या बरोबर त्याचा सखा म्हणून रहा.

52-lp-hanuman

हे असतं हनुमानाचं आपण सुग्रीवाच्या बरोबर का होतो याचं सीतेला दिलेलं स्पष्टीकरण. सीताही त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत जाते आणि हनुमान तिला अतिशय बुद्धिमान उत्तरं देत जातो. पावसाळा संपल्यावर वानरांचे वेगवेगळे गट करून सीतेच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशांना पाठवले जातात. हनुमान सुग्रीव पुत्र अंगदाच्या गटात असतो. इतक्या सगळ्या वानरांमध्ये तोच एकटा रामाकडे जातो आणि त्याच्याकडे सीता भेटलीच तर ओळख पटवण्यासाठी एखादी खूण मागतो. राम त्याला आपल्या बोटांमधली अंगठी काढून देतो. पुढे काय घडू शकतं आणि त्यासाठी आपण कसं तयार असलं पाहिजे यासाठीची ही हनुमानाची मुत्सद्देगिरीच आहे. रामायणात हनुमानाच्या मुत्सद्देगिरीचे असे अनेक दाखले अनुभवायला मिळतात.

खरं म्हणजे हनुमान म्हणजे वानर. शुद्ध मराठीत माकड. माकडांची सेना घेऊन रामाने लंका जिंकली आणि सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणलं असा सरसकट समज आहे. पण हनुमानाची बुद्धिमत्ता बघितली तर हे कसं शक्य आहे, मुळात माकड आणि मानव यांचा भाषिक संवाद कसा शक्य आहे, असा प्रश्न कुणालाही पडणं साहजिक आहे.

त्याची वेगवेगळी स्पष्टीकरणं रामायणाच्या वेगवेगळ्या आवृत्यांमध्ये मिळतात. वा नर म्हणजे मानवांपेक्षा थोडे कमी. किंवा वन नर म्हणजे वनातील मानव. वाल्मिकींनी त्याचे वर्णन कपि, मर्कट (माकड) असेही केले आहे. त्या वनातील टोळ्या असाव्यात आणि माकड हे त्यांचे चिन्ह असावे असा एक अंदाज बांधला जातो. पण त्यांच्या शेपटीचा उलगडा होत नाही. जैन रामायणाने बोलणाऱ्या माकडांची कल्पना नाकारली. विमलसुरी यांनी हनुमानाचे वर्णन विद्याधर असे केले आहे. हे विशेष जीव होते आणि त्यांच्या टोळ्यांच्या ध्वजावर वानरांचे चिन्ह असावे.

मानव राहतात ते आर्यावर्त आणि राक्षस राहतात ती लंका. त्यांच्या मध्ये किष्किंधा नगरी (सध्याचा कर्नाटक आणि आंध्र यांच्या मधला भाग) दाखवली आहे. हे स्थान जितके भौगोलिक तितकेच मानसिकही असावे.

हनुमानाचा उल्लेख सतत वानर असा आला आहे. त्याचं संस्कृतवर प्रभुत्व होतं असं मानलं जातं. संस्कृत देव भाषा तर प्राकृत मनुष्य भाषा मानली गेली. राजे पुरोहित संस्कृत बोलत तर सामान्य माणसं आणि स्रिया प्राकृत बोलत. मग वानर असूनही हनुमानाला संस्कृत कशी येत होती, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे माकडाचं चिन्ह बाळगणाऱ्या या वन्य जमाती असाव्यात या तर्काला जागा आहे.

53-lp-hanuman

माकडांच्या जगात कळपाचा मुख्य नायक सगळ्या माद्यांवर हक्क प्रस्थापित करतो. प्रतिस्पर्धी नराला टोळीपासून दूर ठेवतो. सुग्रीव आणि वाली  यांनीही अशाच वानरांच्या चालीरीती पाळल्यामुळेही वाल्मिकी त्यांना वानर म्हणत असावेत, असं एक स्पष्टीकरण पुराणकथांसंदर्भातील प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक देतात. हनुमानाकडे इतकी शक्ती असतानाही त्याला वाल्मिकी रामायणात वानरांचा नेता का केले गेले नसावे, याचं स्पष्टीकरणही तो  बलवान आहे, बुद्धिमान आहे आणि मागे राहून इतरांना प्रसिद्धीचा आनंद मिळू देण्याचं शहाणपण त्याच्याकडे आहे, असं त्यांनी दिलं आहे.

वाल्मिकी रामायण आणि सुरुवातीच्या पुनर्कथनांमध्ये हनुमान हा केवळ बलदंड माकड आणि वायुदेवाचा पुत्र होता. मध्यकालापासून त्याला शिवाचा पुत्र, शिवाचा अवतार मानलं जाऊ लागलं. बलराम दासच्या ओडिया दंडी रामायणात त्याचा शिवाचा अवतार असाच उल्लेख आहे.

मलेशियामधल्या रामायणात राम आणि सीता मर्कटरुप घेऊन एका मुलाला जन्म देतात. तो मुलगा म्हणजेच हनुमान. तो पुढे सीतेच्या सुटकेसाठी रामाला मदत करतो असं मानलं जातं. इतर भारतीय पुनर्कथनांमध्ये शिव आणि पार्वती मर्कटरुप घेऊन हनुमानाला जन्म देतात आणि त्याला अंजना आणि केसरी या अपत्यहीन मर्कटदाम्पत्याकडे देतात असा उल्लेख आहे.

रामाशी नातं..

  • रामाला विष्णूशी जोडले जाऊ लागले तसे हनुमानाला शिवाशी जोडले जाऊ लागले.
  • राजस्थानातील मेवाती जोगी हे मुस्लीम असून शिवभक्त असलेले जाट आहेत. ते लंकाचढाई नावाचे एक गीत गातात. या गीतात असे उल्लेख आहेत की, रामासाठी फळे आणायला गेलेल्या लक्ष्मणावर चोरीचा आरोप करून हनुमान त्याला गिळून टाकतो. राम रावणाशी युद्ध करतो. तेव्हा शिव हनुमानाच्या सुटकेसाठी येतो. तो रामाला दोन वर देतो तेव्हा राम त्याच्याकडे लक्ष्मण आणि हनुमानाचा पाठिंबा मागतो. त्यामुळे हनुमान रामाचा अनुयायी होतो असे उल्लेख या गीतामध्ये आहेत.
  • इंद्र आणि सूर्य या वेदांच्या ऋचांमधल्या प्रमुख देवता आहेत. विष्णूने रामावतार घेतला असे मानले जाते तेव्हा या देवतांनी वाली आणि सुग्रीव रूपात ते आले. त्यामुळे उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्यांना सूर्याकडून ज्ञानप्राप्ती होते, तर पुराणांनुसार हनुमानाला सूर्याकडून ज्ञानप्राप्ती होते.
  • रामावर विश्वास ठेवण्यासाठी सुग्रीवाला पुरावा हवा असतो. हनुमानावर विश्वास ठेवण्यासाठी लक्ष्मणाला पुरावा हवा असतो. राम आणि हनुमानाला एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी कसल्याच पुराव्यांची गरज लागत नाही.

हनुमानाच्या वानर असण्याबद्दल असे वेगवेगळे तपशील वेगवेगळ्या ठिकाणी येतात. दरम्यान हनुमान सीतेला आपण लंकेपर्यंत कसे पोहोचलो, वाटेत आपल्याला कुणीकुणी मदत केली, या सगळ्याबद्दल सांगतो. तो लंकेत उडत आला याचं सीतेला फार आश्चर्य वाटतं. ‘मलाही जांबुवंताने सांगेपर्यंत माहीत नव्हतं.’ तो सीतेला सांगतो. जांबुवंत त्याला सांगतो की विष्णूने मोहिनीचं रुप घेऊन शिवाला मोहवलं तेव्हा शिवाने आपलं बीज शरीराबाहेर टाकलं. ते वायूने अंजनाच्या कानात टाकलं. त्यापासून हनुमानाचा जन्म झाला. वायुदेवाला मरुत म्हणतात म्हणून तोही मारुती झाला. त्यामुळे त्याचं पितृत्त्व शिव, वायू आणि केसरी या तिघांकडे दिलं जातं.

हनुमान सीतेला सांगतो की तो लहानपणी अतिशय बलिष्ठ आणि उपद्व्यापी असतो. त्याच्या उच्छादांमुळे वैतागलेले ऋषी त्याला शाप देतात की तुझ्या शक्तीची तुला कुणीतरी आठवण करून देईपर्यंत विसर पडेल. आणि मग सीतेच्या शोधाच्या प्रक्रियेत जांबुवंत त्याला त्याच्या ताकदीची, उड्डाण करण्याच्या शक्तीची आठवण करून देतो. तार्किक विचारवंतांच्या मते हनुमान उडत नाही तर पोहून लंकेला गेला. वाल्मिकी रामायणात पोहणे आणि उडणे यासाठी सारखेच शब्द आहेत.

हनुमान सीतेला सांगतो की उड्डाण करून लंकेला येतानाही वाटेत त्याला एक पर्वत, सुसर, सिंहिका नावाची राक्षसीण यांचा सामना करावा लागतो. लंकेच्या दारात लंकिनी ही लंकेची रक्षक देवता त्याला अडवते. तो तिचाही समाचार घेतो.

पण तू नेमकं मलाच कसं शोधलंस या सीतेच्या प्रश्नालाही तो अतिशय बुद्धिमान उत्तर देतो. तो सांगतो की लंकेभर फिरलो. रावणाच्या शयनगृहातही गेलो. अनेक ठिकाणी सुंदर स्रिया होत्या. त्या अतिशय तृप्त दिसत होत्या. रामाने वर्णन केलेली सीता तृप्त दिसणं शक्यच नव्हतं. त्याला अशोकवनात एक स्री दिसते, केसांमधल्या चापाशिवाय दुसरा कोणताही अलंकार तिच्या अंगावर नसतो. त्याला रामाबरोबर झालेलं संभाषण आठवतं. त्याला रामाने सांगितलेलं असतं की सीतेचे वनात ठिकठिकाणी जे दागिने सापडले, त्यात तिचा केसांचा चाप नव्हता. इथे लंकेत बाकी सगळ्या स्रिया इतक्या दागिन्यांनी वेढलेल्या असताना एकच स्री फक्त केसांचा चाप लावून बसली आहे, तेव्हा ती सीताच असणार असा अर्थ तो लावतो.

54-lp-hanumanसीतेचा निरोप घेऊन जाताना तो सीतेकडेही रामाला देण्यासाठी खूण म्हणून काहीतरी मागतो तेव्हा सीता त्याला केसांमधला चाप देते. हनुमान तिला म्हणतो, पण हा चाप तुम्हीच दिला, मला वनात कुठेतरी सापडला नाही कशावरून असा प्रश्न रामाने विचारला तर? तेव्हा मग सीता त्याच्या हुशारीचं कौतुक करून तिच्या आणि रामाच्या खासगी जीवनातला इतर कुणालाही माहीत नसलेला एक प्रसंग सांगते.

सीतेचा निरोप घेऊन हनुमान अशोकवनातून तसाच रामाकडे परत येत नाही, तर तो त्याला रावणाकडे नेलं जाईल असा उच्छाद मांडतो. रावणाच्या दरबारात गेल्यावर आपण रामाकडून आल्याचं त्याला सांगतो आणि आपली चूक कबूल करून सीतेला परत पाठवून दे असंही सुचवतो.  हनुमानाने जाऊन अशा पद्धतीने रावणाला भेटणे हे थेट कृष्णशिष्टाईशी साधम्र्य दाखवणारे आहे.

रावणाला भेटणे, त्याला रामाच्या मोहिमेची माहिती देणे, त्याच्या लोकांना घाबरवून सोडणे हा हनुमानाचा तिथल्या तिथे घेतलेला निर्णय होता. त्याला कितीही मोठा रामभक्त मानलं जात असलं तरी हे सगळे उपदव्याप काही तो रामाने सांगितलं म्हणून करत नाही. यातून असं दिसतं की तो रामाचा भक्त असला तरी स्वतंत्र वृत्तीचा आहे. मात्र लंकेत जाऊन हनुमानाने घातलेला गोंधळ रामाला आवडत नाही, असा लोककथांमध्ये उल्लेख येतो.

लंका जाळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रामाने हनुमानाला खडसावले होते. तेव्हा मग हनुमानाने ठरवले की आपण होऊन काहीही करायचे नाही. राम आज्ञा देईल तेव्हाच जे काही करायचे ते करायचे. त्याने पुन्हा सक्रीय व्हावे यासाठी पातालसाहसाचा बनाव देवांनी रचला. तिथे हनुमानाला स्वत: होऊन निर्णय घ्यावेच लागले.

रामाने सीतेच्या सुटकेसाठी वानरसेनेसह लंकेला जायचं ठरवल्यावर तर हनुमानाची भूमिका आणखीनच महत्त्वाची ठरली, कारण त्या सगळ्यांपैकी तिथे तो एकटाच जाऊन आलेला होता.

पाच दिवसात सेतू बांधला जाऊन सगळी वानरसेना त्यावरून पलीकडे गेली. पण ती लंकेला पोचणार इतक्यात रावण त्या सेतूची दोन्ही टोकं मोडून टाकतो. अशा वेळी हनुमान आपला आकार वाढवतो, लंकेच्या किनाऱ्यावर उडी मारतो, आपली शेपटी लांबवून पुलाच्या तुटलेल्या भागापर्यंत पोहोचवतो आणि किनाऱ्यापर्यंत जायचा रस्ता तयार करतो. या शेपटीवरूनच सगळी वानरसेना आणि राम लक्ष्मण लंकेत पोहोचतात. रावणाने पूल तोडणे आणि रामाच्या सैन्याने हनुमानाच्या शेपटीवरून लंकेला जाणे हे कथानक फक्त आग्नेय आशियातल्या रामायणात आहे.

युद्धाला तोंड फुटल्यानंतर रावणाचा मुलगा इंद्रजीत याच्या एका बाणाने लक्ष्मणाचा अचूक वेध घेतला. विंध्य पर्वताच्या उत्तरेला हिमालयाच्या उतारावर गंधमादन पर्वतावर मिळणारी संजीवनी वनस्पतीच लक्ष्मणाला वाचवू शकते. ती सूर्योदयापूर्वीच मिळायला हवी आणि हनुमानच ती आणू शकतो. ती आणायला निघालेल्या हनुमानासमोर अनेक आव्हानं आली. कालनेमी नावाचा रावणाने पाठवलेला राक्षस, गंधमादन पर्वतावरची एक शापित मगर हे सगळे अडथळे पार केले, पण नेमकी कोणती वनस्पती हे समजेना म्हणून तो आपला आकार वाढवून सगळा पर्वतच उचलून घेऊन निघाला. अयोध्येवरून उडत येताना त्याची भेट भरताशी होते. भरताने त्याला बाण मारलेला असतो. रामनाम घेऊन हनुमान त्याला बाणानेच उत्तर देतो. तो रामाचं नाव का घेतो आहे, हे कळल्यावर तो लवकर पोहोचावा म्हणून भरत त्याला आपल्या मंतरलेल्या बाणावर आरुढ करुन वेगाने लंकेला पोहोचवतो.

भरताची ही कथा दहाव्या शतकानंतरच्या प्रदेशिक रामायणामध्ये येते. त्याआधी तिचा उल्लेख सापडत नाही. हनुमानाने उचलून आणलेला पर्वत म्हणजे हिमालयाच्या उतारावरचा, उत्तरखंडातला बद्री इथली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, असे मानले जाते. त्याला द्रोणागिरी किंवा गंधमादन पर्वत म्हणूनही ओळखतात. हनुमानाने दक्षिणेला आणलेल्या पर्वताचा अवशेष म्हणून रामेश्वर टेकडी ओळखली जाते.  तर  वाल्मिकी रामायणानुसार हनुमान औषधी वनस्पतींचा पर्वत दोन वेळा लंकेला आणतो.

युद्धादरम्यान आलेलं महिरावणाचं कथानक हनुमानाच्या व्यक्तिरेखेचं कुतुहल वाढवणारं आहे. होतं असं की इंद्रजीत आणि कुंभकर्ण या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर रावण त्याच्या मित्राकडे, पाताळलोकाचा राजा असलेल्या महिरावणाकडे जातो. त्याला राम-लक्ष्मणांना मारायला मदत करायची विनंती करतो. महिरावणापासून राम-लक्ष्मणांचं संरक्षण फक्त हनुमानच करू शकत असतो. तो आपली शेपूट वाढवून एक संरक्षण व्यवस्था तयार करतो आणि राम-लक्ष्मणांनी युद्ध नसेल तेव्हा त्या तटबंदीत विश्रांती घ्यायची असं ठरतं. तिथे हनुमानाच्या परवानगीशिवाय दुसरं कुणीच जाऊ शकणार नसतं. तेव्हा महिरावण बिभिषणाचं रुप घेऊन त्या तटबंदीत शिरतो आणि रामरावणांना मोहिनी घालून जमिनीतल्या भुयारी मार्गाने पाताळलोकात घेऊन जातो.

ही गोष्ट लक्षात आल्यावर हनुमानही भुयारात उडी घेतो आणि महिरावणाचा पाठलाग करतो. पाताळलोकाच्या तोंडाशी त्याची गाठ एका योद्धय़ाशी पडते.  कडवी झुंज चालते. त्याचा पराक्रम बघून हनुमान त्याला म्हणतो की तू कोण आहेस, तेव्हा तो सांगतो की मी हनुमानाचा पुत्र मकरध्वज आहे.

आणखी काही तपशील

  • मंदिरांमधली हनुमानाची लोकप्रिय प्रतिमा एका हातात पर्वत आणि कालनेमी या राक्षसाला पायाखाली चिरडलेला अशी आहे.
  • उत्तर भारतात हनुमानाला रानटी आणि विषारी अशी रुईची पानं वाहतात. त्यातून त्याचे संन्यस्त शिवाशी असलेले नाते अधोरेखित होते. दक्षिण भारतात अंजनेय म्हणजे अंजनीचा मुलगा म्हणून लोकप्रिय असलेल्या हनुमानाला विडय़ाची पानं आणि लोणी अर्पण करतात.
  • हनुमानाला संकटांचे निवारण करणारा मानले जाते. सूर्य, तारे अशा आकाशस्थ गोष्टींवर त्याचे नियंत्रण असते. त्याला मंगळवारी आणि शनिवारी नैवेद्य दाखवला जातो, कारण हे दोन दिवस संघर्षकार मंगळ आणि विलंबकारक शनी या दोन दुष्ट ग्रहांचे मानले जातात.
  • मंदिरांमधील चित्रांमध्ये दक्षिण भारतात, जेव्हा हनुमानाचे शेपूट खाली दाखवलेले असते तेव्हा तो शांत आणि मृदू असतो. त्याला आक्रमक योद्धय़ाच्या, रक्षकाच्या पावित्र्यात दाखवायचे असते तेव्हा त्याचे शेपूट डोक्यावर मुरडलेले असते.
  • काही मूर्तींमध्ये त्याचा हात वर उंचावलेला दाखवतात. काहींच्या मते तो वरदहस्त आहे, तर काहींच्या मते थप्पड मारल्याचा आविर्भाव आहे. लोककथांमध्ये असा उल्लेख आढळतो की, लंकेला आग लावण्याआधी हनुमान रावणाच्या सिंहासनाला आग लावतो आणि रावणाला थप्पड मारून त्याचा मुकुट खाली पाडतो.
  • लंकेत रावणाच्या दरबारात हनुमानाच्या शेपटीला आग लावली जाते. आग विझवण्यासाठी हनुमान आपली शेपटी तोंडात घालतो आणि त्या राखेमुळे त्याचे तोंड काळे होते. त्यामुळे एके काळी लालतोंडी असणारी माकडे काळतोंडी झाली असं मानलं जातं.
  • अनेक पुनर्कथनांमध्ये हनुमान हा रामायणाचा स्रोत मानला गेला आहे. त्याला जे रामायण सांगायचे होते त्याचाच एक भाग वाल्मीकींनी लिहिला असे मानले जाते.
  • सेतू बांधताना हनुमान दगडावर रामनाम लिहितो असा उल्लेख आहे. त्या काळात अजून लिपीचा शोध लागला होता का याबद्दल साशंकता आहे, कारण तो काळ मौखिक परंपरेचा होता.
  • हनुमान योद्धा असला तरी वाल्मीकी रामायणात त्याला देवत्व दिलेले नाही. ती प्रक्रिया आठव्या शतकापासून सुरू झाली. त्याला नागा-बाबांनी शिवाचा अवतार मानायला सुरुवात केली. त्यानंतर बाराव्या शतकात तामिळनाडूमधील रामानुज, कर्नाटकातील मध्व (तेरावे शतक), उत्तर भारतातील रामानंद (चौदावे शतक) आणि महाराष्ट्रातील रामदास (सतरावे शतक) त्याच्याकडे आदर्श रामभक्त म्हणून बघायला सुरुवात केली.
  • भारतात सगळीकडे पाताळ हनुमान, दक्षिणमुखी मारुती, पंचमुखी, दशमुखी हनुमानाची मंदिरे आहेत. या मुद्रेत तो रामभक्त नसतो तर महाबली असतो.

हनुमान म्हणतो की मीच हनुमान, आणि मला कुणी पत्नी नाही. मी ब्रह्मचारी आहे. मकरध्वज त्याला त्याच्या हनुमान असण्याचे पुरावे मागतो. म्हणतो की पाताळलोकात पाच दिशांना पाच दिवे आहेत. ते तू एकाच फुंकरीत विझवून दाखव. तेव्हा मग हनुमानाला पाच शिरे निर्माण होतात आणि तो ते पाचही दिवे विझवतो. कर्नाटकातल्या मध्व संप्रदायात हनुमानाला सिंह, रानडुक्कर, घोजा, गरुड अशी पाच शिरे असण्याची प्रतिमा लोकप्रिय आहे. तो खरंच हनुमान आहे, याची खात्री झाल्यावर मकरध्वज त्याला सांगतो की हनुमान जेव्हा लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून उडत होता, तेव्हा त्याच्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला. तो मकरध्वजाच्या मस्यरुपी आईने गिळला. त्यातून मकरध्वजाचा जन्म झाला. त्याला त्याच्या वडिलांना भेटायचं असतं. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलेलं असतं की तू पाताळलोकाचा द्वारपाल हो. तिथेच तुला तुझे वडील भेटतील.

मकरध्वज मग हनुमानाला पाताळलोकात जाऊ देतो. तिथे रामलक्ष्मणाला बळी द्यायची तयारी चाललेली असते. हनुमान मग मधमाशीचं रुप घेऊन रामाजवळ जातो आणि त्याला या गोंधळातून कसं बाहेर पडायचं ते सांगतो. महिरावणाचाच बळी देऊन दोघं तिथून बाहेर पडतात. 55-lp-hanumanरामाचे अपहरण आणि हनुमानाचे पाताळगमन ही कथा अदभूत रामायणामध्ये येते. त्या गूढरम्यतेपक्षा मनोरंजन अधिक आहे.

हनुमानाला एका समुद्री प्राण्यापासून झालेल्या मुलाची कथा ही अद्भूत रामायणात आहे.

भारतात लोकप्रिय असलेल्या रामायणात हनुमानाचे ब्रह्मचर्य आणि त्याची शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. पण आग्नेय आशियात प्रसिद्ध असलेल्या रामायणात तो अनेक प्रेमप्रकरणे असलेला सरदार आहे. इथल्या रामायणांमध्ये राक्षस स्रिया हनुमानाच्या प्रेमात पडतात असे उल्लेख आहेत. ही प्रतिमा भारतीय जनमानसाला रुचत नाही. इथला हनुमान हा एखाद्या संरक्षक सरदारासारखा आहे. तो रामाला सीतेच्या शोधात मदत करतो. पण त्याचे आणि रामाचे नाते देव आणि त्याचा भक्त असे अजिबात नाही.

जैन पुनर्कथनांमध्ये तर हनुमान रंगेल आहे, कारण तो कामदेवाचा अवतार मानला आहे. आग्नेय आशियात जे रामायण प्रसिद्ध आहेत, त्यानुसार हनुमानाकडे अनेक स्त्रिया आकृष्ट झाल्या होत्या.  त्यापैकी स्वयंप्रभा ही एक. तर वाल्मिकी रामायणानुसार गुहेत प्रवेश केलेल्या कुणालाही बाहेर पडता येत नाही. वानर आत पकडले जातात पण हनुमान स्वयंप्रभेचे मन वळवून तिची शक्ती वापरून त्यांची सुटका करायला लावतो. तमीळनाडूमध्ये तिरुनवेली जिल्ह्य़ात कृष्णपुरम इथं असलेलं हनुमानाचं मंदिर म्हणजे स्वयंप्रभेच्या गुहेचे स्थान मानले जाते.

तुलसीदासाच्या सोळाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या अवधी रामायणात हनुमानाचे वर्णन मन्मथ – मंथन (मनातील इच्छा आकांक्षांना घुसळून काढणारा) उध्र्व रेतस (तपसामथ्याने आपले वीर्य गर्भाशयाऐवजी मनाकडे वळवणारा) असे आहे. म्हणजे तो एकाचवेळी कामुक आणि ब्रह्मचारी आहे. कामप्रेरणा त्याच्या ठायी सूज्ञतेत परिवर्तित होतात. यामुळे तांत्रिक साधू, योगी, संन्यासी, बैरागी यांना हनुमानाचा अतिशय आदर वाटतो.

रामाचा राज्याभिषेक होतो तेव्हा हनुमान त्याच्या पायाशी बसतो. हनुमानाची आई अंजना त्याला विचारते की तू एवढा पराक्रमी आहेस, तू स्वत:च रावणाचा पराभव करून सीतेला आणू शकला असतास. तू तसं का केलं नाहीस, तेव्हा हनुमान सांगतो की कारण मला रामाने तसं करायला सांगितलं नव्हतं. ते ऐकल्यावर सीतेला हसू फुटतं कारण आपल्याला यातून काहीही लाभ मिळावा म्हणून हनुमानाने यातलं काहीही केलेलं नसतं. त्याच्याकडे सगळी क्षमता असूनही युद्धात जिंकण्याचं श्रेय त्याने रामाला घेऊ दिलं. रामही त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि आपल्या सगळ्यात जवळचा मानतो. सीतेला शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हनुमानाला राम अलिंगन देतो असा उल्लेख येतो. उतरंड असलेल्या नियमांनी बद्ध समाजात ही गोष्ट महत्त्वाची मानली गेली.

हनुमान रामाची निरपेक्ष सेवा करतो. त्याला कुठलीच भौतिक गोष्ट नको आहे. तो भावनिकदृष्टय़ा खूप काही मिळवतो. तो रामाचा भक्त होतो आणि त्याच्या तेजातच तळपण्यात धन्यता मानतो. रामाचा सेवक होण्याआधी तो सुग्रीवाचा सेवक दाखवला आहे. तो कशाचच श्रेय घेत नाही, कशातच पुढेपुढे  करत नाही. पण महाभारतात जे कृष्णाचं स्थान आहे, तेच रामायणात हनुमानाचं आहे.

सीतेसाठी रामाने केलेलं युद्ध या सगळ्यात हनुमानाचा कोणताही वैयक्तिक लाभ नाही. तो आधी सुग्रीवाच्या आज्ञा पाळत असतो. रामासाठी तो जे काही करतो ते निरपेक्ष प्रेमाने आहे. त्यामुळे लोकांच्या नजरेत तो उंच ठरला आहे. विष्णूचं मंदिर हनुमानाच्या घुमटाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे उत्तरेत तर म्हणच आहे की पहले हनुमान फिर भगवान.

अयोध्येत राज्याभिषेकासाठी आलेल्या सगळ्या पाहुण्यांची काळजी घेण्याची जबाबदारी हनुमानावर असते. तो ती उत्तम पार पाडतो. तिथे आलेले नारदमुनी त्याला विचारतात की रामावरच्या निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक म्हणून सीता कपाळावर कुंकुमतिलक लावते. तू तुझं रामावरचं प्रेम कसं व्यक्त करशील. या प्रश्नाला उत्तर म्हणून हनुमान आपल्या सर्वागाला शेंदूर फासतो. त्याच्या मते एखाद्या ठिपक्यातून त्याचे प्रेम व्यक्त होत नाही.

शेंदूर फासलेला हनुमान अशी जी प्रतिमा नेहमी दिसते, तिचं एक स्पष्टीकरण असं मिळतं. हनुमानाच्या रामभक्तीचं प्रतीक म्हणून कन्नड रामायणात हनुमान त्याच्या हाडांवर रामनाम लिहिलेले दाखवतो. पण त्यापेक्षा हृदयात राम आणि सीता कोरलेला हनुमान भक्तांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

त्यानंतर हनुमानाचा उल्लेख येतो तो थेट लवकुश मोठे म्हणजे साधारण तेरा-चौदा वर्षांचे झाल्यावर. वाल्मिकी आपलं रामायण पूर्ण करतात आणि सीतेला दाखवतात. ते सीतेला आवडतं. वाल्मिकींच्या पत्नीलाही ते आवडतं. वाल्मिकी मग ते नारद मुनींना दाखवतात. नारद म्हणतात, चांगलं आहे, पण हनुमानाचं रामायण जास्त चांगलं आहे. ते ऐकून वाल्मिकी हनुमानाचा शोध घ्यायला बाहेर पडतात. अयोध्येजवळ असलेल्या कदलीवनाच्या घळीत केळीच्या सात पानांवर हनुमानाने ते कोरलेलं असतं. ती परिपूर्ण रचना वाचून वाल्मिकींना रडू कोसळतं.

ते हनुमानाला म्हणतात की हे इतकं सुंदर आहे की तुझं रामायण वाचल्यानंतर वाल्मीकीचं रामायण कुणीच वाचणार नाही. ते ऐकल्यावर हनुमान ती सात पानं फाडून टाकतो. आणि म्हणतो की आता कुणीच हनुमानाचं रामायण वाचणार नाही. तुम्ही रामायण लिहिलंत ते जगाला वाल्मिकींची आठवण रहावी म्हणून. मी रामायण लिहिलं ते मला रामाची आठवण रहावी म्हणून!

ही हनुमानाची रामकथा. ती वासुकीला आणि इतर नागांना सांगून तो परत वर येतो तेव्हा सगळी अयोध्या शरयूच्या दिशेने लोटलेली असते. सीतेच्या नावाचा जप करत राम नदीमध्ये शिरलेला असतो..

हनुमानाच्या वाटय़ाला मात्र चिरंजीवित्व आहे..

(आधार- सीता रामायणाचे चित्रमय पुनर्कथन- देवदत्त पट्टनायक, अनुवाद- विदुला टोकेकर, मंजुल पब्लिशिंग हाऊस)
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader