ठिकठिकाणी असणारी हनुमान मंदिरं आणि केली जाणारी त्याची आराधना पाहिली की या देवतेच्या लोकप्रियतेची कल्पना येते. रामायणासारख्या महाकाव्यातील व्यक्तिरेखा ते लोकप्रिय दैवत असा हनुमानाचा प्रवास नेमका कसा झाला असेल, याची चर्चा-

हनुमान या रामायणातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखेला सर्वसामान्य हिंदू लोक देवता मानतात. महाकाव्यातल्या एखाद्या पात्राचं, एखाद्या व्यक्तिरेखेचं कालांतराने देवतेत रूपांतर होणं साहजिक आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे असं महाकाव्यांमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल होत नाही. उदाहरणच द्यायचं तर महाभारतात द्रौपदी ही महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, पण तिला देवी मानलं जात नाही, की तिची मूर्तिपूजा होत नाही. याचं कारण म्हणजे धार्मिक संकल्पनांची एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्यानुसार हे व्यक्तिरेखांचं हे दैवतीकरण होत असतं किंवा असंही होतं की एखादी संकल्पना, व्यक्तिरेखा महाकाव्याचा भाग नसते, पण तरीही तिचं दैवतीकरण होतं. उदाहरण द्यायचं तर काही वर्षांपूर्वी संतोषी माता या देवीचं प्रस्थ तयार झालं होतं. जुन्या धर्मग्रंथांमध्ये या देवीचा उल्लेख नाही, तरीही तिचं देवीत रूपांतर झालं. म्हणजे देवतेत रूपांतर हा धार्मिक प्रक्रियेचा भाग आहे, या अंगाने हनुमानाकडेही पाहायला हवं. या संदर्भात दुसरंही एक उदाहरण घेता येईल, ते म्हणजे लोक ज्यांना मोठे मानव, संत मानतात, त्यांचंही कधी कधी देवतेत रूपांतर होऊन पूजाअर्चा सुरू होते. याचं मोठं उदाहरण म्हणजे साईबाबा. एका शंकराचार्याचं असं मत आहे की साईबाबा देव नाहीत, त्यामुळे त्यांची अशी पूजा करणं योग्य नाही, पण तसं झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशाच दैवतीकरणाचं महाभारतातलं उदाहरण म्हणजे हनुमान ही व्यक्तिरेखा.

हनुमानाचं दैवतीकरण नेमकं केव्हा झालं हे पाहताना आणखीही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुळात हनुमान ही व्यक्तिरेखा रामाशी संबंधित आहे. राम हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक असं भक्त गण मानतात. (वास्तविक विष्णूचे २५ किंवा ५० असेही अवतार मानले जातात.) संपूर्ण रामायण हे महाकाव्य रामाच्या कथेवर आधारित आहे. ही कथा प्राचीन धारणेनुसार महाभारतापूर्वी घडली. कारण महाभारतात असं एक कथानक आहे की महाभारत युद्ध घडल्यानंतर युधिष्ठिर शोकमग्न झाला आहे, पश्चात्तापदग्ध झाला आहे. तेव्हा त्याला व्यास असं सांगतात की तू दु:ख करू नकोस, कारण अनेक मोठमोठय़ा राजांना दु:खाला सामोरं जावं लागलं आहे. राम हा महत्त्वाचा राजा होता. त्यालाही दु:खाला तोंड द्यावं लागलं होतं. महाभारतात अशा रीतीने रामाचा उल्लेख आलेला असल्याने रामायण हे महाभारतापूर्वी घडलं होतं असं म्हणता येतं.

23-lp-hanuman

‘लोकप्रभा’च्याच मागच्या अंकात डॉ. मधुकर ढवळीकर यांनी महाभारतात काळ इ.स. पूर्व ९९ वर्षे असा निश्चित केला आहे. म्हणजे रामायण त्याहीपूर्वी घडले असावे, असा कयास बांधता येतो. हिंदूू धर्मश्रद्धा असं मानते की विष्णू या देवतेचे दहा वेगवेगळे अवतार जन्माला आले. महाभारतातला कृष्ण विष्णूचा पूर्णावतार मानला जातो. कृष्णभक्ती, त्याचे पंथ-उपपंथ, त्यांचे प्रकार प्रसिद्ध आहेत. कृष्ण हा देव परदेशातही पोहोचला आहे. त्या दहा अवतारांमधला राम हासुद्धा विष्णूचाच एक अवतार आणि आदर्श राजा मानला जातो. पृथ्वीवरचा दैत्यांचा भार कमी करण्यासाठी तो जन्मला असं मानलं जातं. त्याचाच भाग म्हणून त्याने रावणाचा वध केला, असं मानतात. त्यानुसार रामाचा वनवासही त्याच्या या कामाचा पूर्वभाग म्हणूनच घडला असंही मानतात.

रामाचं देवता म्हणून पूजन कधीपासून सुरू झालं याबाबत विद्वानांमध्ये जी चर्चा झाली, त्यात त्यांना असं आढळलं की दहाव्या शतकापर्यंत रामाची देवता म्हणून पूजा होत नव्हती. दक्षिणेमध्ये अळवार म्हणजे विष्णुभक्त आणि नायनार म्हणजे शिवभक्त असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडे संतांनी जशा अभंगरचना केल्या आहेत, तशाच या अळवार-नायनारांनी पाचव्या-सहाव्या शतकापासून शिव तसंच विष्णुभक्तिपर रचना केल्या आहेत. त्यांची कवनं तिथे आजही गायली जातात. तर कुळशेखर या केरळमधल्या अळवार राजाने अकराव्या शतकात रामाचं दैवतीकरण केलं, त्याची पूजाअर्चा सुरू केली असं विद्वानांचं मत आहे. असं म्हणत या मताला अर्थात अनेकांनी छेदही दिला आहे. त्यांच्या मते रामाचं दैवतीकरण पाचव्या-सहाव्या शतकातच सुरू झालं.

माझे मित्र अजय शास्त्री यांच्या मते चौथ्या-पाचव्या शतकातच रामाचं दैवतीकरण सुरू झालं तर व्ही. व्ही. मिराशींच्या मते पाचव्या शतकात रामाच्या पादुकांचं पूजन केलं जायचं. राम रामटेकजवळ रामगिरी इथं काही काळ राहिला होता, अशी धारणा आहे. समकालीन शीलालेखात ‘रामगिरी स्वामींच्या पावलांना साक्षी ठेवून दान देतो आहे,’ असा उल्लेख आहे. यातली पावलं रामाची असावीत असं एक मत आहे. 24-lp-hanumanकालिदासाने राम त्या परिसरात फिरला अशी वर्णनं केली आहेत. त्याच्या थोडं आधीच्या काळातली रामायणातले प्रसंग कोरलेली मृद्शिल्प, शीलाशिल्पं सापडतात. या सगळ्यावरून काही विद्वानांच्या मते इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात रामायण घडलं असावं.

हंडा नावाच्या नाणकशास्त्रज्ञांनी त्यांना सापडलेल्या शिक्क्याचं वाचन केलं, त्यात त्यांना कपि असा उल्लेख आणि हनुमानाची प्रतिमा सापडली आहे. हा संदर्भ रामायणाचा काळ इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत नेऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. हा सातवाहनांचा काळ आहे. याचा अर्थ हनुमानाचं तेव्हापासून देवतास्वरूप पूजन होत असावं. अर्थात हंडांच्या या तर्काबाबत मी साशंक आहे, कारण एखाद्या शिक्कयावर उल्लेख, शीलालेख सापडला एवढय़ाच आधारावर देवता ठरवणं पुरेसं नाही, त्यासाठी जास्त पुरावे हवेत असं मला वाटतं. अकराव्या शतकात मात्र हनुमानाचं पूजन होत होतं असं आपण खात्रीने म्हणू शकतो, कारण तशा मूर्ती सापडल्या आहेत.

समर्थ रामदासांनीही रामाबरोबरच हनुमंताच्या मूर्तीची स्थापना आणि पूजन करायला सुरुवात केली. पण चाफळला ते रामाची म्हणून ज्या मूर्तीची उपासना करीत होते, ती प्रत्यक्षात सूर्याची मूर्ती आहे. पण रामदास ती रामाची म्हणून उपासना करू शकले. कारण त्यांची तशी श्रद्धा होती. अशी श्रद्धा ही भक्ताचा आणि भक्तीचा विशेष म्हणता येईल. इथे संदर्भ देता येतो तुलसीदासाचा. त्याच्या काळात रामाची देव म्हणून पूजा व्हायला सुरुवात झाली होती. पण त्याच्या दृष्टीतून हा देव कसा होता तर त्याच्या ‘हनुमान चालिसा’मध्ये जसं वर्णन आहे तसा. तुमचं भूतप्रेताचं भय नष्ट करणारा, ‘हनुमान चालिसा’ म्हणाल तर तुमची कोणतीही कामं चुटकीसरशी करणारा. ही भक्ताची श्रद्धा तेव्हाच निर्माण होते, जेव्हा त्याला ती व्यक्तिरेखा देवता म्हणून मान्य होते. दुसरीकडे १९ व्या शतकातल्या संस्थानांची नाणी रामसीता यांच्या प्रतिमा असलेली आहेत. याच शतकात चंद्रपूरचा बीरशा नावाचा गोंड राजा होता. त्याच्या वीराई नावाच्या राणीने रामपंचायतन मांडल्याचा उल्लेख सापडतो. ते रामपंचायतन आजही उपलब्ध आहे. त्यात राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान आहेत. याचा अर्थ असा की १९ व्या शतकात निश्चितच रामपंचायतन पुजलं जात होतं.

अकराव्या शतकातल्या खजुराहोच्या मूतींमधली एक मूर्ती चपेट हनुमानाची आहे. एका हातात द्रोणागिरी उचललेला, शेपटी उभारलेली (वानर चिडतं तेव्हा त्याची शेपटी वर उचलली जाते) दुसरा हात चापट देण्यासाठी उगारलेला अशी ती मूर्ती आहे. त्यातला आवेश वीरपुरुषाचा आहे. चापट देण्यासाठी हात उगारलेला म्हणून तो चपेट हनुमान. तर याचा अर्थ असं हनुमानाचं पूजन अकराव्या शतकात नक्कीच केलं जात होतं. यावरून चौथ्या-पाचव्या शतकात रामपूजन सुरू झालं तसंच हनुमानपूजन सुरू झालं असा तर्क करता येतो.

रामायण इसवीसन पूर्व सातव्या- आठव्या शतकात लिहिलं गेलं असावं असं निश्चितपणे म्हणता येतं, याचं कारण म्हणजे महाभारत इसवीसन पूर्व सहाव्या शतकात लिहायला सुरुवात झाली आणि तेव्हा राम हा प्राचीन राजा म्हणून मान्य होता, माहीत होता. त्यामुळे अर्थातच हनुमानाचं प्राचीनत्वही तेवढंच मागे जातं.

एखाद्या व्यक्तिरेखेचं जेव्हा असं दैवतीकरण होतं तेव्हा त्याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना, कर्मकांडं (रिच्युअल्स) लोकांच्या मनात रुजतात. वाढतात. उदाहरणच द्यायचं तर हनुमंताच्या मूर्तीला शेंदूर असतो. त्याच्या मूर्तीला शेंदूर लावावा हे कुठून आलं? याचा शोध घेतला तर लक्षात येतं की ही शेंदूर लावण्याची पद्धत काही विशिष्ट दैवतांबाबतीतच आहे. शेंदूर लावण्याआधी ती साधी अनघड शीळा किंवा तांदळा असते. आणि नंतर तिला देवतास्वरूप प्राप्त होतं. उदा. माहूरची रेणुकादेवी. ती अमूर्त स्वरूपात पुजली जाते. तिची मानवी मूर्ती स्वरूपात पूजा होत नाही. गणपतीलाही शेंदूर लावण्याची प्रथा आहे. अशा रीताने ज्या काही विशिष्ट देवतांना शेंदूर लावण्याची प्रथा आहे, ती सगळी दैवतं लोकदैवतं आहेत. त्यांची प्रवृत्ती द्वंद्वस्वरूप आहे. त्याला इंग्रजीत अ‍ॅम्बिव्हॅलंट असं म्हणतात. म्हणजे गणपती विघ्नकर्ता आहे, तसाच तो विघ्नहर्तासुद्धा आहे. कुठले देव असे द्वंद्व स्वरूप नाहीत, याचं उदाहरण द्यायचं तर विष्णूचं देता येईल. त्याउलट शिव हे दैवत द्वंद्वस्वरूप आहे. तो रौद्र आहे आणि सौम्यही आहे. या परस्परविरोधी देवता यक्षस्वरूप देवता आहेत. यक्ष खूश झाला तर तो वाटेल ते, मागाल ते देतो, चिडला तर तुमचं काही खरं नसतं, असं यक्षस्वरूप देवतांचं स्वरूप असतं. आपल्याला सगळ्यांना महाभारतातली पांडवांची यक्षप्रश्न ही गोष्ट माहीत असते. तळ्याकाठी पाणी पिण्यासाठी आलेल्या, आपल्या प्रश्नांची उत्तरं न देणाऱ्या चारही पांडवांना त्या यक्षाने मारून टाकलं आणि युधिष्ठिराने बरोबर उत्तरं दिली, तर त्याचं बक्षीस म्हणून युधिष्ठिराच्या मागणीप्रमाणे त्याच्या चारही भावांना जिवंत केलं. म्हणजे यक्षस्वरूप देवता आपल्या मर्जीप्रमाणे वागतात, वागवतात.

हनुमानाचं सुरुवातीचं स्वरूपही असं यक्षस्वरूपच असावं. भयंकर चिडला तर काहीही करेल, खूश झाला तर काहीही देईल, अशी असावी. त्यामुळे त्याचं पूजनही यक्षाप्रमाणेच केले जात असावे असं मानायला वाव आहे. ‘हनुमान चालिसा’ वाचल्यावर आपल्या हे लक्षात येतं. तुम्ही त्याचं स्तुती स्तोत्र गायलात तर तो तुमचं भुताखेतांपासून संरक्षण करील असं त्यात म्हटलं आहे. ही भोळ्या भक्तांना भावणारी देवतेची प्रतिमा आहे. महामारी, सीतला, सटवाई या देवताही अशाच स्वरूपाच्या आहेत. तुम्ही त्यांचं पूजन केलं नाहीत तर त्या क्रुद्ध होऊन तुमचं ललाट बदलतील. त्या रौद्रही आहेत आणि सौम्यही आहेत. तशी हनुमानाची सुरुवात झाली असावी. देगलुरकरांनी अलीकडे केलेल्या एका भाषणात हनुमानाचं पूजन शनिवारीच करायला का प्राधान्य दिलं गेलं आहे, याचं विवेचन केलं आहे. त्यांच्या मते खूप ठिकाणी हनुमानाच्या पायाखाली एक स्त्रीप्रतिमा दाखवलेली असते आणि तिला तो तुडवत असतो. ही स्त्रीप्रतिमा साडेसाती किंवा पनौतीची असते. हनुमान प्रसन्न झाला तर शनीची साडेसाती तुमच्यामागे लागणार नाही, असं त्यातून सुचवायचं असतं. त्या साडेसातीवर प्रभाव गाजवणारा देव म्हणून  शनिवारी हनुमानाचं पूजन केलं जात असावं.

आणखी एक वेगळेपण म्हणजे अर्कपत्रे म्हणजेच रुईची पानंही हनुमान आणि गणपती या दोन देवांनाच वाहिली जातात. म्हणजे शेंदूर आणि अर्कपत्रे या दोन गोष्टी या दोन्ही देवांमधला समान दुवा आहेत. एका लोककथेत रुद्र नरसिंह या देवतेची प्रतिमा अक्राळविक्राळ दाखवली आहे. स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की या रुद्र नरसिंहाला नवस केला तर पुत्रप्राप्ती होते. मग ते नवस फेडण्यासाठी त्याला शेंदूर लावतात. आर्किऑलॉजी विभागाचा संचालक या नात्याने मी ती प्रथा बंद करायला लावली. ती पाचव्या शतकातली मूर्ती आहे, म्हणून तिला शेंदूर फासायला कायद्याने प्रतिबंध केला. तिच्या शेजारी एक मार्बलची मूर्ती ठेवून तिला शेंदूर लावायला सांगितलं. तर सांगायचा मुद्दा असा की द्वंद्वस्वरूप देवतांना शेंदूर लावला जातो.

काही ठिकाणी पंचमुखी हनुमान असतो. त्याला सिंह, घोडा अशा प्राण्यांचं तोंड असतं. म्हणजे त्याला अशाच प्रकारच्या देवता येऊन मिळतात. त्यातून त्याचं सात्मीकरण होतं. हनुमंताचं दक्षिणमुखी हे रूपही लोकप्रिय आहे. दक्षिणमुखीच का तर त्याचा खरा पराक्रम दक्षिणेकडे सीतेला शोधायला गेल्यावरच, त्यातही समुद्र उल्लंघून लंकेला गेल्यावरच समजला. सीतेला रावणाने लंकेत पळवून नेलंय हे हनुमान ज्या तुकडीत होता, त्या तुकडीतल्या वानरांना समजल्यावर लंकेला जायचं कसं, हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जांबुवंताने हनुमानाला त्याच्या क्षमतेचं स्मरण करून दिलं आणि तो उड्डाण करून लंकेला गेला असं मानतात. म्हणजे माणसाचा सुप्त पराक्रम जागृत करायला हनुमान हे स्फूर्तिस्थान आहे. तो तंत्रविद्येतही आहे. त्याची तंत्रातली सुरुवात हनुमान चालिसापासून झाली, कारण जारणमारण, उच्चरण या अघोरी विद्यांपलीकडे गेलेला म्हणून त्याच्या नावाने तावीज वगैरे बांधले जातात.

रामायण हे महाकाव्य खरंच घडलं का, याची तज्ज्ञ लोक चर्चा करतात. त्यांच्या चर्चाची, त्यांच्या निष्कर्षांची सामान्य माणसाला काहीच गरज नसते. पण ते घडलंच ही हिंदूंची श्रद्धा असतो. त्या श्रद्धेतून ते या महाकाव्यांकडे बघत असतात. त्यामुळेच आपल्याला अगदी रामायण महाभारताच्याही वेगवेगळ्या आवृत्त्या दिसतात. आता उदाहरणच द्यायचं तर जैन रामायण आहे. या जैन रामायणामधला हनुमान आपल्याला माहीत असलेल्या हनुमानापेक्षा वेगळा आहे. त्यांना वानर वगैरे कल्पना मान्य नाहीत. त्यांच्या रामायणाप्रमाणे हनुमान हा मदनाच्या पुतळ्याप्रमाणे देखणा होता. त्याला शेकडो स्त्रिया होत्या. त्याने सीतेच्या सुटकेसाठी रामाला मदत केली. राम-रावण युद्धानंतर तो जैन मुनी झाला आणि त्याने संलेखना (प्रायोपवेशन) करून देहत्याग केला. त्याच्याबरोबरच त्याच्या अनुयायांनीही देहत्याग केला आणि त्या सगळ्यांना निर्वाणप्राप्ती झाली. एकाच परिसरात राहणाऱ्या दोन भिन्न समाजांमध्ये पुढे जाऊन देवतास्वरूप धारण करणाऱ्या व्यक्तिरेखांचा प्रवास किती वेगवेगळा होऊ शकतो, हे यावरून दिसतं.

या सगळ्यावरून एवढंच दिसतं की एखादी धार्मिक दंतकथा केव्हाही मूर्त स्वरूपात येऊ शकते. त्यासाठी शास्त्राची गरज असतेच असं नाही. भक्ताची श्रद्धा असते, त्याला फलस्वरूपाची खात्री असते तेव्हा देवता निर्माण होतात आणि देवता भक्ताला हवं असतं तसंच रूप घेतात.
(शब्दांकन- वैशाली चिटणीस)
डॉ. अरविंद जामखेडकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader