गणेश विशेष
शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com / @shamikavrushali
मानव हा मुळातच पापभीरू आहे. मनाच्या व बुद्धीच्या पटलावर अनुभवाअंती उमटणाऱ्या असंख्य लहरींना तो प्रतिसाद देत, आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. ‘देव’ ही संकल्पना माणसाच्या याच लहरींचा परिपाक आहे. देव म्हणजे नक्की काय? अशा प्रकारची कोणती शक्ती अस्तित्वात आहे का? हे समजून घेणे सामान्य माणसासाठी थोडे कठीणच असते. देव हे केवळ माणसाच्या भीतीतून व गरजेतून उत्पन्न झालेले तत्त्व आहे, असे विज्ञान सांगते. मानववंशशास्त्राच्या आधारे देव हे तत्त्व बौद्धिक पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास माणसाच्या प्राथमिक उत्क्रांतीच्या टप्प्यात, ज्या गोष्टी उपयुक्त ठरल्या त्यांना माणसाने आपल्या बुद्धीनुसार कृतज्ञतेच्या भावनेतून देव म्हणून पूजले. भय, उपयुक्तता व आश्चर्य या भावनेतून मानवाने अनेक देव आकारास आणले. मानवाने आकारात आणलेल्या या देव संकल्पनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रकर्षांने जाणविणारी गोष्ट म्हणजे मानवाला पंचमहाभुतांचे वाटलेले भय. सभोवतालचा नसíगक उत्पात पाहत व अनुभवत असताना, या प्रचंड शक्तीसमोर आपला निभाव कसा लागणार या भीतीतून माणसाने देव आकारास आणले व त्यांच्या समोर तो नतमस्तक झाला. या जन्माला घातलेल्या देवांना माणसानेच आकारउकार बहाल केले. म्हणूनच कालपरत्वे ‘देव’ ही संकल्पना बदलत गेली. वेद काळातच देवांचे मानवीकरण सुरू झाले आणि मानवाच्या गुणधर्मानुसार देव वागू लागले, तर ब्राह्मणकाळात मानवी नातीगोती देवांना लावून देवतांचे परिवार निर्माण केले गेले. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने आदिमानवापासून मानव जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतसा देवही मानवासोबत निसर्गातून मनुष्यरूपात विकसित होत गेला.

भयातून निर्माण झालेल्या दैवी तत्त्वाचे एक सुरेख स्वरूप आज आपल्या रोजच्याच जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. हे स्वरूप म्हणजे श्री गणेशाचे! श्री गणेश हा प्रारंभी विघ्नकर्ता म्हणून जाणला जात असे, परंतु कालांतराने या विघ्नकर्त्यांचे स्वरूप विघ्नहर्त्यांत रूपांतरित झाले. श्री गणेशाचे विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हे उन्नयन मानवी उत्पाताच्या प्रवासातील दैवी संकल्पनेच्या विकासाची साक्षच देणारे आहे. भारतीय संस्कृतीत गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विनायक, गणपती, गजमुख, भालचंद्र अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला हा देव आपल्याला पौराणिक वाङ्मयात अनेक स्वरूपात आढळतो. या भारतभूमीने आपल्या कुशीत अनेक संस्कृतींना जन्म दिला, काहींना आपल्या अंगणात आश्रय दिला. या संस्कृती आपल्या अंगणात नांदल्या, बहरल्या व काळाच्या ओघात नष्टही झाल्या. परंतु, आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या संस्कृतींनी वेगवेगळ्या मार्गानी मागे ठेवल्या, कधी इतिहासाच्या रूपाने, तर कधी संस्कारांच्या रूपाने. या पाऊलखुणा आपले प्राचीनत्व वेळोवेळी सिद्ध करतात. असेच काहीसे गणपतीच्या बाबतीतही लक्षात येते. आजच्या अस्तित्वात असलेल्या गणेशाच्या रूपावर याच अनेकविध संस्कृतींचा संस्कार झालेला आहे. म्हणूनच गणेशाची उत्पत्ती हा संशोधनाचा विषय ठरला आहे. अनेक अभ्यासकांनी गणेशाच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा शोध प्रामुख्याने पुरातत्त्वीय व वाङ्मयीन साधनांवर आधारित आहे. वाङ्मयीन संदर्भानुसार गणेशाचे अस्तित्व हे वेदकालीन आहे तर पुरातत्त्वीय पुरावे गणेशाचे प्राचीनत्व हे केवळ इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत मागे घेऊन जातात. असे असले तरी, गणेशाच्या उत्पत्ती विषयी अनेक सिद्धांत उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी गणेशाच्या अस्तित्वाचा शोध आपापल्यापरीने घेण्याचा प्रयत्न केला व त्या पद्धतीने गृहीतके ही मांडण्यात आली. आजपर्यंत झालेल्या संशोधनावरून लक्षात येणारी बाब म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयात गणपतीचे प्राचीनत्व हे त्याच्या प्रतिमेपेक्षा जुने आहे, असे अभ्यासक मानतात.

म्हणूनच गणेशाचा प्राथमिक संबंध हा ऋग्वेदात येणाऱ्या बृहस्पतीशी जोडला जातो. तर दुसरा संबंध हा विघ्नकारक विनायकांशी जोडला जातो. असे असले तरी आजच्या गणेशाचा संबंध हा शिव परिवाराशी अधिक जवळचा आहे. गणेशाचे शिवाशी असलेले नाते हे महत्त्वाचे ठरते, वास्तविक पहाता या दोघांचे पिता- पुत्राचे नाते. पौराणिक कथांमध्येही गणेशाचे वर्णन शिवसुत असेच येते. परंतु प्रारंभी शिव व गणपती या देवता एकच होत्या असे मानले जात होते. म्हणजे शिव तोच विनायक किंवा गणपती होता. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषण ही तीन शिवाची वैशिष्टय़े गणेश मूर्तीत तेवढय़ाच प्रमाणात दिसतात. त्यामुळेच पौराणिक कथांमध्ये व वाङ्मयात येणारे गणेशाचे शिवाशी असणारे साधम्र्य हा संशोधनाचा विषय आहे. म्हणूनच श्री गणेश हाच ब्रह्मणस्पती की विनायक, की गणपती हाच शिव हा संबंध समजून घेणे रोचक ठरते.

ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती

ब्रह्मणस्पती हा ऋग्वेदात येणारा उल्लेख आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. गणेशाच्या अस्तित्वाची पाळेमुळे याच वेदात सापडतात असे काही अभ्यासक मांडतात. त्याला कारणही तसेच आहे. ‘गणपती’ या नामाभिधानाचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती सूक्तात आढळतो. गृत्समदशौनक ऋषींकडे या सूक्ताचे कत्रेपण जाते.

गणानां त्वा गणपित हवामाहे।
किव कविनामुपमश्रवस्तमम्।
जेष्ठराजं ब्रह्मणांब्रह्मणस्पत: आन:।
शृण्वभूतिभी: सिद सादानम्?

या ब्रह्मणस्पती सूक्तातील मंत्रात बृहस्पती हाच गणांचा स्वामी म्हणून गणपती असा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणूनच हा सर्वात जुना गणपतीचा उल्लेख मानला जातो. पर्यायाने बृहस्पती हाच गणेश असे मानले जाते. परंतु ऋग्वेदातील हा गणपती किंवा बृहस्पती आपला आजचा गजमुख गणेश नाही असा एक दुसरा मतप्रवाहही प्रचलित आहे. म्हणूनच या मतप्रवाहाची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते.

मध्ययुगीन संस्कृत विद्वान सायणाचार्य यांच्या मतानुसार ऋग्वेदात नमूद केलेला हा मंत्र ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पतीची स्तुती, वर्णन करणारा आहे. याचा आजच्या गणेशाशी संबंध नाही. मग साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ऋग्वेदात उल्लेखलेला ब्रह्मणस्पती कोण आहे?

वैदिक वाङ्मयानुसार प्रमुख वैदिक देव मानल्या जाणाऱ्या प्रजापतीपासून बृहस्पतीची उत्पत्ती झालेली आहे. प्रजापतीपूर्वी काहीही अस्तित्वात नव्हते व प्रजापती हाच प्रथम व परब्रह्म आहे. प्रजापती हाच पहिला देव असा उल्लेख वाजसनेयी माध्यंदिन संहितेच्या बत्तिसाव्या अध्यायात करण्यात आला आहे. प्रजापती हा शब्द प्रजा व पती या दोन शब्दांच्या युतीतून तयार झाला आहे. प्रजापती म्हणजे प्रजेला उत्पन्न करणारा व तिचे पालन करणारा देव. वृद्धेव, कामेष्टी देव, दयानिधी अशी वेगवेगळी नावे वैदिक वाङ्मयात प्रजापतीसाठी वापरलेली आहेत. यजुर्वेदात प्रजापती व ब्रह्मा एकच आहेत, अशा नोंदी दोन ठिकाणी आहेत; तर पुढे प्रजापती व ब्रह्म निरनिराळे आहेत अशाही नोंदी आहेत. ऐतरेय उपनिषदात इंद्राला प्रजापती मानले गेलेले आहे. यजुर्वेदात कुबेर व यक्ष यांना प्रजापतीचे एक रूप मानलेले आहे. इथे विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे गणेशाच्या रूपाचा व उपासनेचा उगम यक्ष प्रतिमांमधून झाला असे अभ्यासक मानतात.

पूर्ण सक्षम प्रजापतीच्या अनुभूतीजन्य तथा संतानयुक्त स्थितीस, म्हणजेच ब्रह्मा तथा प्रजापती यांच्या संयुक्तस्थितीस बृहस्पती असे म्हणतात. बृहस्पतीचा जन्म प्रजापती व २७ कन्या यांच्या शरीरसंबंधातून म्हणजे योनीज व त्या वेळच्या अनुभूतीतून म्हणजे अयोनिज अशा दोन्ही तऱ्हेने झालेला आहे; म्हणूनच बृहस्पती हा पुढे येणाऱ्या योनीज व अयोनिज या दोन्ही जन्मप्रणालींचा अधिपती झाला, असे मानले जाते. सृष्टी निर्मितीच्या आरंभी प्रजापतीने एक स्त्री निर्माण केली ती म्हणजे अदिती. तिच्यापासून २६ कन्यांची निर्मिती केली. अदिती व या २६ कन्या अशा २७ कन्यांपासून बृहस्पतीचा जन्म झाला.

अ + दिती= अदिती ही प्रजापतीने निर्माण केलेली (आदी) पहिली व (इति) म्हणजे शेवटची स्त्री म्हणून तिला अदिती म्हणतात. ब्रह्माकुमारी, योषिती, वादिनी अशा नावांनीदेखील ती ओळखली जाते. अदितीला आदिशक्ती मानले आहे. म्हणूनच बृहस्पतीला मूळ आदिशक्तीचा पहिला मुलगा म्हणजे प्रथम संस्कारित संतान मानले गेलेले आहे.

बृहस्पती हा शब्द बृहत व पती या दोन शब्दांनी तयार झालेला आहे. बृहत म्हणजे मोठे, विस्तारित व पती म्हणजे पालन करणारा. बृहस्पती म्हणजे संपुष्टी विस्ताराचा म्हणजे बुद्धी, ज्ञान व विकास यांचे पालन करणारा, ज्ञान व कर्म यांचे नियम व संहिता निश्चित करणारा व देवता मंडलाचा प्रमुख सल्लागार आचार्य होय. ब्रह्म म्हणजे प्रार्थना किंवा मंत्र होय, ब्रह्मणस्पती म्हणजे मंत्र किंवा प्रार्थना यांचा अधिपती होय. अशा स्वरूपाचे बृहस्पतीचे वर्णन वैदिक वाङ्मयात सापडत असले तरी त्याच्या रूपाचे वर्णन सापडत नाही, त्याचे स्वरूप गजमुख युक्त आहे का, याचा संदर्भही सापडत नाही. पर्यायाने मूर्ती विज्ञानात त्याची मूर्ती नाही. म्हणूनच ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती हाच आजचा गणपती मानावा का? या संदर्भात शंका घेण्यास वाव आहे.

विनायक

ब्रह्मणस्पतीनंतर गणेशाचा महत्त्वपूर्ण उल्लेख सापडतो तो विनायक म्हणूनच! गणपतींच्या अनेक नावांपकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे विनायक, नायकांचा अधिपती म्हणून गणेशाचा विनायक म्हणून उल्लेख केला जातो. मानव गृसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये विनायकांचा संदर्भ येतो. परंतु हे विनायक गजमुख आहेत याला ठोस पुरावा नाही. लोकांत विघ्ने निर्माण करण्यासाठी विधात्याने हा विनायक निर्माण केला असे मानले जाते. विनायक हा मूळचा विघ्नकर्ता होय. पुराणकारांनी त्याला विघ्नहर्ता बनविले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील बौधायन गृह्य़ परिशेष कल्पात चार विनायकांच्या एकत्रीकरणातून एक विनायक तयार झाला असा संदर्भ सापडतो हा विनायक हस्तिमुख आहे, असेही संदर्भ आहेत; परंतु हाच विनायक आजचा गणपती आहे का? यावर मतैक्य नाही. परंतु या विनायकांचा संबंध यक्षांशी जोडण्यात येतो. हे विनायक यक्षांप्रमाणे लोकांच्या कामात विघ्न आणतात. यक्षांची मंदिरे गावाच्या वेशीवर किंवा गावाबाहेर असतात. असेच काहीसे या विनायकांच्या संदर्भातही आढळते. पुराणांमध्ये हत्तीमुखधारी व लंबोदर यक्षांचे उल्लेख आहेत. शुंग व कुशाणकालीन मथुरेला सापडलेल्या हत्तीचे तोंड असलेल्या मानवाकृती प्रतिमा या गजमुख यक्षांच्या आहेत असे अभ्यासक मानतात.

शिव संस्कारित गणपती

ब्रह्मणस्पती व विनायक यांच्यानंतर आजचा गणेश सापडतो तो शिव परिवारात. शिवाचा व गणेशाचा खूप जवळचा संबंध आहे. गणपती हा जरी शिवाचा पुत्र असला तरी, गणेशाचे मूर्तीविज्ञान, गणेशाची उत्पत्ती व त्याच्याशी निगडित अन्य पुरावे हे शिवाशीच थेट साधम्र्य दर्शवितात. शिवाचे व गणेशाचे साम्य, शिव हाच गणपती या नावाने नवीन देवतेच्या स्वरूपात आला असावा असे दर्शविते.

शिव हा ऋग्वेदात रुद्र या स्वरूपात येतो व पुढे कालांतराने त्याचे शिव या स्वरूपात रूपांतर झालेले दिसते. रुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाचे वर्णन गणेशाप्रमाणेच आहे. ऋगवेदात रुद्र हा महाभयंकर रूपात समोर येतो. रुद्र या नावाच्या मुळाशी गेल्यास ‘रोदयति इति रुद्र:’ म्हणजेच जो रडवणारा किंवा रडणारा आहे तो रुद्र असा प्राथमिक अर्थ मिळतो तर ‘रुतं राति इति रुद्र:’ म्हणजेच दुखांचा नाश करणारा असा दुसरा अर्थ मिळतो. ज्या प्रमाणे गणेश विघ्नकर्ता होता तो विघ्नहर्ता झाला त्याप्रमाणे रडवणारा रुद्र नंतर दुखांचा नाश करणारा ठरला.

शिव (आदिनाथ) व पार्वती (आदिशक्ती) यांचा पुत्र म्हणजेच गणपती. आजच्या गणेशाशी साधम्र्य असणारे गणेशाचे मूíतमंत रूप इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून सापडण्यास सुरुवात होते. तर शिव व शक्ती यांची उपासना तत्पूर्वी अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतींच्या अनेक स्थळांवर मातीचे िलग मोठय़ा प्रमाणात सापडले आहे. तत्कालीन समाजात िलगपूजेला महत्त्व होते हे यावरून लक्षात येते. याशिवाय पशुपतीची मुद्रा याच संस्कृतीशी निगडित आहे. आता ही मुद्रा शिवाचीच आहे का, यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे असली तरी शिव उपासनेचे धागेदोरे सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जातात हे मात्र नक्की. शिवाप्रमाणे सगुण रूपात मातृपूजेचेही अनेक पुरावे आपल्याला आदिम काळापासून सापडतात. असे असताना या दोन्ही देवतांशी संलग्न असणाऱ्या गणेशाच्या मूíतमंत अस्तित्वाचे पुरावे इतक्या उशिरा का सापडतात हा मात्र प्रश्न पडतो.

शिव व शक्ती यांची उपासना फार पूर्वीपासून केली जात असली तरी त्यांचे एकत्रित पूजन हे मात्र नंतरच्या काळात सुरू झाले. साधारण इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापर्यंत शिव व शक्ती यांची स्वतंत्ररीत्या पूजा होत असे. म्हणूनच सुरुवातीच्या कालखंडामध्ये योनीपीठविरहित शिविलग सापडत होते. िलग हे शिवाचे प्रतीक आहे तर योनीपीठ म्हणजेच शाळुंखा ते शक्तीचे प्रतीक आहे. याचाच अर्थ शैव व शाक्त तत्त्वज्ञान एकत्र येणे शिल्लक होते. शैव व शाक्त तत्त्वज्ञान इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० या काळात विकसित होण्यास सुरुवात झाली आणि इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकानंतर या दोन्ही       तत्त्वज्ञानाचा मिलाफ झाल्याचे आढळते. यातूनच पुढे तंत्र विद्य्ोसारखी शाखा भारतीय तत्त्वज्ञानात विकसित होत गेली. शैव व शाक्त तत्त्वज्ञान एकत्र आल्यानंतर त्याचा प्रभाव मूर्ती शास्त्रात तसेच शिल्पांवरदेखील झालेला दिसतो. म्हणूनच यानंतरच्या मूर्ती व शिल्पांमध्ये शक्तीसह शिव या प्रतिमांचा प्रवाह प्रचलित झालेला दिसतो. याच काळात विनायकांचा संबंध हा शिव परिवाराशी आलेला दिसतो. पूर्वी यक्ष रूपाने किंवा स्वतंत्र म्हणून आढळणाऱ्या गजमुखी मूर्तीचा संदर्भ शिवपरिवारातील गणेश म्हणून याच काळात होऊ लागला हे लक्षात येते.

कल्याणसुंदरं हे शिव-पार्वतीच्या विवाहाचे शिल्प आहे. पाशुपत संप्रदायाच्या लेणींमध्ये हे शिल्प नेहमीच पाहायला मिळते. या शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्यात गणेशाचे शिल्प हे विशेष लक्षवेधक आहे. गणपती हा जर शिव-पार्वतीचा पुत्र आहे, तर मग त्यांच्या विवाह सोहळ्यात त्याचे शिल्प कोरण्यामागची भूमिका काय असावी, हा प्रश्न पडतो. शिव व गणेश या दोघांमध्येही भरपूर साम्य असले तरी शिवगणांचे वर्णन गणपती मूर्तीच्या जवळ जाणारे आहे. रुद्रगण किंवा शिवगण रुद्राचा वेश धारण करतात असा पौराणिक साहित्यात संदर्भ येतो. तर शिव गण हे बुटके, स्थूल, तांबडय़ा वर्णाचे असतात. त्यांच्या मुखातून सुळे बाहेर आलेले असतात. व त्यांना चार हात असून त्यात पाश, सर्प, त्रिशूळ आणि महापात्र या वस्तू असतात. याच प्रकारची लांच्छने आपल्याला गणेशमूर्तीतही पाहावयास मिळतात, मग कल्याणसुंदर या शिल्पात येणारी गणेशाची मूर्ती ही शिवगणाची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

भालचंद्र, त्रिलोचन, परश्वायुध इत्यादी नावे शिव व गणेश यांच्यात समान आहेत. याशिवाय शिवाचे एक नाव गणपतीही आहे. शिवालाही गणांचा स्वामी मानले जाते. गणपती नावाच्या साधम्र्यामुळे ज्याप्रमाणे बृहस्पती गणेश ठरतो, त्याचप्रमाणे शिव हाच गणेश या संकल्पनेशी आपला संबंध दर्शवितो असे म्हणावे लागेल.

शिवाप्रमाणेच गणपतीलाही ऊध्र्विलग मानले जाते. काबूल, उदयगिरी येथे मिळालेल्या मूर्ती या ऊध्र्विलगी आहेत. गणेशाच्या मूर्तीमध्ये असलेले ऊध्र्विलग, व्याघ्रांबर, सापाचे जानवे हेदेखील शिवाशीच साम्य दर्शविणारे आहे. विष्णूधर्मोत्तर पुराणात गणपतीचे वर्णन सापाचे जानवे घातलेला असे केलेले आहे. गणेशांनी धारण केलेली ही लांच्छने शिवाप्रमाणे आहेत. त्यामुळे शिव हाच गणेश असावा असे अभ्यासक मानतात.

विनायकांच्या उत्पत्तीसंदर्भात एक पौराणिक कथादेखील प्रसिद्ध आहे; या कथेनुसार पृथ्वीवर लोकांमध्ये पापकाय्रे निर्वघ्नि होऊ लागल्याने सर्व देव चिंतीत झाले व त्यांनी रुद्राकडे धाव घेतली. देवांची व्यथा ऐकून रुद्र पार्वतीकडे पाहून हसला व तेथे रुद्रातून आकाशतत्त्वाचा प्रतिनिधी म्हणून एक सुंदर पुरुष निर्माण झाला. पार्वती त्याचे सौंदर्य न्याहाळू लागली, ते पाहून रुद्र चिडला व त्याने त्या सुंदर पुरुषाला शाप दिला. तुला हत्तीचे तोंड असेल, तू सापाचे जानवे घालशील व तुझे पोट सुटलेले असेल. हे ऐकून तो पुरुष क्रोधायमान झाला त्याच वेळी त्याच्या शरीरातून अनेक विनायकांची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाने हस्तक्षेप केल्याने हा गजमुख शिवाच्या कृपेने त्या सर्व विनायकांचा अधिपती झाला. या कथेवरून विनायक हा शिवापासूनच निर्माण झाला असे लक्षात येते. पार्वतीने त्याचे सौंदर्य न्याहाळणे हे तिचे व त्याचे माता व पुत्राचे नाते नक्कीच दर्शवत नाही.

नृत्य गणेश व मातृका, शैषवाहन नृत्य गणेश, शक्ती गणेश, उच्छिष्ठ गणपती या गणेशाच्या मूर्ती शिवमूर्तीशी साम्य दर्शवितात. शिवाप्रमाणे गणेशही नृत्यपटू आहे. मध्ययुगीन काळात नृत्यगणेशाच्या अनेक प्रतिमा सापडतात. बऱ्याच शिल्पात व मूर्तीमध्ये गणपतीने आपले दोन हात डोक्यावर नेऊन एका मोठय़ा सापाला आडवे धरलेले आहे. या रूपाचा उल्लेख नृत्य गणेश म्हणून करण्यात येतो. शिव हा नटराज आहे, नृत्य गणेश हे रूप शिवाच्या नटराज रूपाशी साम्य दर्शविणारे आहे. किरात हे शिवाचे कापालिक रूप आहे, या रूपात शिव गजचर्म पांघरतो. त्याला मद्य प्रिय आहे. तो विविध क्रीडाविलासात मग्न असतो. त्याच्या भोवती हजारो स्त्रियांचा गराडा असतो. आजूबाजूला भूतगण नाचत असतात. उमाही त्याच्या सोबत असते. शैव उपासनेच्या प्रगतीच्या काळात हे रूप नष्ट झाले. केवळ शिवाचा नृत्याशी संबंध राहिला. शिवाच्या त्या नर्तक रूपाचा विकास नंतर नटराजमूर्तीत झाला. उच्छिष्ठ गणपतीची मूर्तीही उमा महेश्वराप्रमाणे दाखविली जाते. या मूर्तीत गणेशाच्या डाव्या मांडीवर शक्ती दाखविली जाते. पौराणिक संदर्भानुसार शिवाप्रमाणे गणेशालाही केवडय़ाचा गंध आवडतो. या साधम्यार्ंवरून लक्षात येते की, शिव व गणपती यांच्यात बरेच साम्य आहे. त्यामुळेच शिव हा गणपती आहे का, शिवाचेच गणपतीत उन्नयन झाले आहे का, अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. म्हणूनच कालांतराने शिवाला गणेशाचा पिता बनविण्यात आले असावे.

गणेशाचा प्रवास हा बृहस्पतीपासून सुरू होतो. बृहस्पती हा मंत्रांचा देव, बुद्धी, ज्ञान व कर्म यांचे पालन करणारा देव आहे, परंतु तो आकारहीन आहे. त्याची मूर्ती सापडत नाही. आपल्या आजच्या गणेशाचे रूप हे बृहस्पतीसारखे नाही. तो आकारहीन नाही. परंतु गुणांच्या बाबतीत आजचा गणपती हा ऋग्वेदी बृहस्पतीशी साम्य साधतो. लक्षवेधी बाब म्हणजे बृहस्पती हा आदिशक्ती अदितीचा पुत्र आहे तर गणेश हा पार्वतीस्वरूप आदिशक्तीचा पुत्र आहे. गणेशाच्या प्रवासात पुढील टप्पा हा विनायकाचा आहे, विनायक हा यक्ष समान आहे त्याचे रूप यक्षाप्रमाणे बुटके व स्थूल आहे, हेच रूप गणांचेदेखील आहे. दुसऱ्या शतकातील साहित्यात विनायक हा गजमुख असल्याचे पुरावे सापडतात. आजच्या गणपतीचे विनायकाच्या गुणांपेक्षा बारूपाशी अधिक साम्य आढळून येते. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकानंतर गणेशाचा संबंध शिव परिवाराशी आलेला दिसतो. गणेश हा शिवाप्रमाणे लांच्छन धारण करतो. गणेशाच्या विविध मूर्ती शिवमूर्तीशी साम्य प्रस्थापित करतात. शिव गणांशी तर कधी शिवाशी साम्य दर्शवणारा गणेश नंतर शिवपुत्र म्हणून प्रसिद्ध होतो. म्हणूनच बृहस्पतीचे गुण, विनायकाचे रूप व शिवाचे संस्कार यांच्या समीकरणातून आजच्या गणेशाची उत्पत्ती झाली असावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.