-जय पाटील
एखाद्या चित्रपटाला प्रसिद्धी द्यायची असो वा राजकारणाच्या रणांगणात प्रतिपक्षाला चितपट करायचं असो, मिम्सचं अस्त्र सध्या अतिशय प्रभावी मानलं जातं. हसत-खेळत, चिमटे काढत वर्मावर बोट ठेवणाऱ्या या अस्त्राचा वापर आता एम इंडिकेटरही करणार आहे. अनेकांचा प्रवास सुकर करणाऱ्या एम इंडिकेटरने या टाळेबंदीच्या दिवसांत काहीशा दुरावलेल्या आपल्या युझर्सची कल्पकता आजमावण्यासाठी मिम्स कॉम्पिटिशन आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतल्या विजेत्यांना ३००० रुपयांचं पारितोषिकही देण्यात येणार आहे.
एम इंडिकेटरशी संबंधित मिम्स चित्र किंवा व्हिडिओ रूपात पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी ९ मे रोजी दुपारी १२ ते रात्री ११.५९ दरम्यान आपापल्या फेसबुक पेजवर मिम्स पोस्ट करायची आहेत. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक मिम्ससुद्धा पोस्ट करू शकतो. मिम्स तयार करून, त्यावर आपल्या नावाचा वॉटरमार्क आणि #mindicator_meme2020 हा हॅशटॅग टाकून ९ मे रोजी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करायची आहेत. प्रत्येक एन्ट्रीसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागणार आहे. त्यासाठीची लिंक एम-इंडिकेटरच्या फेसबुक वॉलवर देण्यात आली आहे.
सर्वाधिक लाइक्स आणि कमेंट्स मिळालेली पहिली पाच मिम्स विजेती ठरतील. त्यांना तीन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणि पहिल्या १०० मिम्सना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील. विजेत्यांची नावं एम-इंडिकेटरच्या फेसबुक वॉलवर १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. चला तर मग, लागा कामाला…