चारोळ्यांपासून सुरुवात करून कविता आणि नंतर गीतलेखनाकडे वळणारा मंदार चोळकर सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. प्रेम, विरह, मैत्री, गंभीर, साहित्यिक अशा सगळ्या बाजांची गाणी लिहून त्याने त्याचं कसब दाखवलं आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेल्या मंदारच्या प्रवासाने वेग धरला आहे.
कवी ते गीतकार या तुझ्या प्रवासाबद्दल सांग.
– खरं तर कविता करण्यालाही माझ्या आयुष्यात उशिरा सुरुवात झाली असं म्हणू या. मुळातच माझ्यात लेखनाची आवड निर्माण झाली ती चारोळ्यांपासून. साधारण २००७-२००८ मध्ये फक्त चारोळ्या लिहायचो. या दरम्यान कधीही कविता वगैरे लिहिलेल्या नव्हत्या. २००९ च्या आसपास चारोळ्या सुचेनाशा झाल्या. कारण मी लिहीत असलेल्या चारोळ्या विशिष्ट पठडीतल्या होत्या. तोच बाज, दर्जा तसाच जमून येईना. मग विचार आला की, या चारोळ्या पुढे वाढवून बघू या. त्याची कविता होऊ शकते का असा विचार आला. तसा प्रयत्न केला आणि जमतंय असं वाटलं. मग माझ्यातल्या कवीने हळूहळू वेग घेतला. २००८ मध्ये ‘शब्दात माझ्या’ हे माझ्या चारोळ्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. चारोळ्या-कवितामय आयुष्य सुरू होतं माझं. नंतर २००९ मध्ये योगिता चितळे या गायिकेच्या ‘लाइफ इज ब्युटिफुल’ या अल्बमसाठी एक गाणं लिहिलं. या गाण्यासाठी निलेश मोहरीरने संगीत दिलं होतं. २०११ साली मालिकांची शीर्षक गीते लिहायला सुरुवात झाली. आजवर अनेक मालिकांची शीर्षकगीते लिहीली. ही सगळी शीर्षकगीते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली. त्या वर्षी ‘दुर्गा म्हणतात मला’ या चित्रपटामुळे चित्रपटातील गीतकार म्हणून श्रीगणेशा झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘इचार ठरला पक्का’, ‘सतरंगी रे’ या सिनेमांसाठी लिहिलं. ‘दुनियादारी’ या सिनेमातलं ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं टर्निग पॉइंट ठरलं, असं म्हणायला हरकत नाही. २०१३ हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. इथपासून गीतकार म्हणून प्रवासाला प्रचंड वेग आला. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी माझ्या अॅड एजन्सीतल्या नोकरीचा राजीनामा दिला. काम वाढल्यामुळे नोकरी आणि गीतलेखन दोन्हीचं वेळापत्रक जुळून येत नव्हतं. पण, कवी ते गीतकार या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट लक्षात आली, गाणं आणि कविता लिहिणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. प्रत्येक कवितेचं गीत होतंच असं नाही. पण, प्रत्येक गीत ही एक कविता असावी लागते, असं मला वाटतं.
गीतलेखन करायचं असं ठरवलं होतंस का?
– अल्फा मराठी म्हणजे आताच्या झी मराठी वाहिनीवर ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम लागायचा. साहित्य, संगीत, लेखन, कला अशा विविध विषयांतील जाणकार, दिग्गज लोकांवर हा कार्यक्रम असायचा. या कार्यक्रमात गाणी सादर होताना गीतकार, संगीतकार अशी नावं यायची. मला त्यातल्या गीतलेखनाविषयी नेहमी कुतूहल वाटायचं. ज्या व्यक्तींवर कार्यक्रम सादर झाला होता असे गदिमा, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे असे अनेकजण प्रतिभावंत होते. मग वाटायचं कविता करणं, सुचणं हे तंत्र नाही. मित्रमंडळींमध्ये गप्पा मारत, इतरांच्या कविता ऐकून, वाचून कविता करण्याच्या संदर्भात ज्ञान मिळू शकतं. कविता करण्यासाठी विचार करणं आणि तो मांडणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी पुस्तकी अभ्यास करावा लागत नाही. ती देणगी असावी लागते. तशी सवय असावी लागते. म्हणूनच कदाचित मी याकडे वळलो असेन. कारण माझी अभ्यासू वृत्ती अजिबात नाही. मी प्रवाहाप्रमाणे लिहीत गेलो. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमामुळे मी प्रेरित झालो. नाटय़संगीत ऐकू लागलो. दुसरीकडे कवितालेखन सुरू होतं. एका क्षणी वाटलं आपणही लिहू शकतो. आत्मविश्वास मिळाला. चंद्रशेखर गोखले, संदीप खरे यांची चारोळ्यांची, कवितांची पुस्तकं वाचायचो. असं सभोवतालच्या व्यक्ती आणि कार्यक्रमांमुळे मी गीतलेखनाकडे वळलो.
‘वी-चार’ या तुझ्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे?
– चार वर्षांपूर्वी ‘वी-चार’ या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. वी-चारमध्ये ‘विचार’ आणि ‘आम्ही चार’ असे दोन अर्थ आहेत. त्याचा लोगोही ‘ही-चार’ असा आहे. मनात येणारे विचार अनेकजण सोशल साइट्सवर पोस्ट करतात. त्यावर चर्चा, मतभेद, वादविवाद होतात. मनात येणारे विचार सोशल साइट्सच्या माध्यमातून आपण इतरांपर्यंत पोहोचवतो. हाच वी-चारचा उद्देश आहे. आपल्या मनातले विचार आपल्याला हवे तसे मांडता आले पाहिजेत. वी-चारमध्ये प्रेम, पाऊस, दुष्काळ, सामाजिक, राजकीय अशा सगळ्या कविता असतात. माझ्यासोबत समीर सामंत, प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, तेजस रानडे असे सगळे आहेत. चार वर्षांत आम्ही वी-चारचे ५४ प्रयोग केले. समीरने या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे. ही संहिता कवितांवर बांधलेली नाही. कवितांचे विशिष्ट बाज यात आहेत. त्यानुसार संहिता लिहिली आहे. आम्ही सगळेजण आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून प्रयोग करतो. पण, आमच्यापैकी काहीजण सिनेक्षेत्रात प्रस्थापित झाले आहेत तरी त्याचा वापर आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी करत नाही. कार्यक्रमाच्या कोणत्याही जाहिरातीत ‘कटय़ार फेम मंदार’ किंवा ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला फेम मंदार’ असं कुणाहीबाबतीत लिहीत नाही. वी-चार हा कार्यक्रम फक्त त्यातल्या आशयावर चालतो. त्याला कोणत्याही प्रकारचं वलय नाही.
चित्रपटाच्या पोस्टरवर श्रेयनामावलीमध्ये गीतकाराचं नाव नसल्याची खंत तू स्पष्ट व्यक्त केली होतीस. नेमका तुझा मुद्दा काय होता?
– खरंय हे. या मुद्दय़ावर मी स्पष्टपणे व्यक्त झालो होतो. मी लिहिलेलं गाणं कोणा एका प्रस्थापित गीतकाराने लिहिलंय असं प्रेक्षकांना वाटलं तर खरं तर ती माझ्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखंच आहे. एकाअर्थी तो माझा सन्मानच आहे. पण, मी जर इंडस्ट्रीत येत असेन तर माझं गाणं हे ‘माझं’ म्हणून लोकांनी ओळखायला हवं, अशी माझी इच्छा असेल तर त्यात गैर काय? हिंदीमध्ये याबाबतची पद्धत मला आवडते. तिथे बारीक अक्षरात का होईना, सगळ्या गीतकारांची नावं देतात. मग त्यासाठी त्या सिनेमाचे गीतकार जावेद अख्तर किंवा गुलजार असे दिग्गजच असायला हवेत असा अट्टहास नसतो. चित्रपटात सहा गीतकार असतील तर सगळ्यांची नावं लिहिली जातात. सोशल साइट्समुळे आता प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचता येतं. मराठीतही चांगले सिनेमे येताहेत. तंत्रज्ञान सुधारतंय. असं सगळं असताना श्रेयनामावलीविषयी जागरूकता का नाही? मला तर वाटतं फक्त गीतकारच नाही तर कोरिओग्राफर, बॅकग्राऊंड स्कोअरर, इतर तांत्रिक मंडळी अशी सगळ्यांचीच नावं हवीत. संपूर्ण सिनेमा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वितरक येतो. पण, त्याचं नाव पोस्टरवर असतं. मग गीतकार तर सिनेमाच्या प्रक्रियेत आधीपासून असतो; मग त्याचं नाव असायलाच हवं. थिएटर्सच्या बाहेर असणाऱ्या पोस्टर किंवा पेपरमध्ये येणाऱ्या श्रेयनामावलीला मान्यता मिळाली आहे. त्यात गीतकाराचाही उल्लेख आहे. मग तुम्ही त्यांना का डावलता? प्रस्थापित गीतकाराचं नाव हमखास असतं. मग नवोदित गीतकारांच्या बाबतीत असं का, हा माझा मुद्दा आहे.
गीतकाराचं मानधन अडकवून ठेवणे, उशिरा देणे, नंतर देतो म्हणून तंगवणे ही बाबही तुला खटकते.
– हो, मला मानधनाविषयीचा हा मुद्दा खूप खटकतो. रेकॉर्डिग स्टुडिओचे पैसे काम झालं की लगेच दिले जातात. गायक-गायिकांनाही त्यांचं मानधन लगेच दिलं जातं; लगेच देता आलं नाही तरी निश्चित झालेल्या दिवशी तर नक्की दिलं जातं. पण, गीतकाराचं तसं होत नाही. ही माझ्या एकटय़ाची खंत नसून इतर अनेक गीतकारांना असं वाटतं. शेवटी पैसे न देणे, उशिरा देणे, तंगवणे असे प्रकार करणाऱ्यांसोबत काम न करणं हा एकमेव मार्ग उरतो. पैसेच नाहीत, पुढच्या सिनेमात बघू या असं सांगणाऱ्यांचाही मला अनुभव आहे. पण, या इंडस्ट्रीत थोडं रुळल्यानंतर कोणासोबत कसं काम करायचं हे समजू लागतं. या मुद्दय़ावर मी स्पष्ट बोलत असल्यामुळे मला आजवरच्या माझ्या ५६ सिनेमांपैकी प्रदर्शित झालेल्या ३५ सिनेमांचं मानधन मला वेळेत मिळालं आहे. या वर्षी १२-१३ सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर त्याचंही मानधन मिळेल. चारेक सिनेमांचं मानधन मिळालंच नाही. तर सहा सिनेमांच्या निर्मात्यांच्या मागे लागून मानधन मिळालंय.
‘एका दिवसात किंवा काही तासांत गाणं लिहून दे’ असं सांगून गीतकाराला गृहीत धरलं जातंय असं वाटतं का?
– कमी वेळात गाणं लिहून देण्याचे किस्से माझ्यासोबत अनेकदा झाले आहेत. पण, मी या गृहीत धरण्याकडे संधी म्हणून बघतो. कारण ‘गृहीत धरलंय’ असा विचार करत राहिलो तर त्याचा त्रास होईल. हेच दु:ख कमी करायचं असेल तर त्याकडे सकारात्मकदृष्टय़ा बघायला हवं. माझ्या बाबतीत तर असंही झालंय की, एखाद्या सिनेमाचं शूटिंग, एडिटिंग पूर्ण झालंय, पहिलं पोस्टर, प्रोमो प्रदर्शित झालाय; अशा सगळ्या गोष्टी निश्चित झालेल्या असतात. पण, त्यातलं एक गाणं एखाद्या ख्यातनाम गीतकाराला दिलेलं असतं. काही कारणास्तव त्यांच्याकडून ते गाणं लिहिलं जात नाही आणि तेच गाणं माझ्याकडे येतं. अशा परिस्थितीकडे मी संधी म्हणून बघतो. त्यावेळी त्या गृहीत धरण्याला मी माझ्यावरचा विश्वास समजतो.
एका सिनेमात एकापेक्षा अधिक गीतकार असण्याचा तोटा होतो का?
– आर्थिकदृष्टय़ा किंवा श्रेय देण्याच्या दृष्टीने यात तोटा वाटू शकतो. एक संपूर्ण सिनेमा एकाच गीतकाराच्या नावावर असणं हा गीतकारासाठी फायदाच असतो. याव्यतिरिक्त बाकी काही तोटा नाही असं मला वाटतं. अनेक गीतकारांनी एकाच सिनेमासाठी लिहायचं हा सध्याचा ट्रेंड आहे. सिनेमा कोणता आहे यावरही अनेक गीतकार हवेत की नको हे अवलंबून आहे. अनेक गीतकारांमध्ये एका गीतकाराचं अस्तित्व कितपत टिकेल हे त्याच्या क्षमता, कौशल्य, हुशारी यावर अवलंबून असतं. गीतकाराने उत्तम गाणं लिहीलं तरी तो इतर चार गीतकारांमध्ये उठून दिसेल. फक्त गीतकारांना लोकांनी टाइपकास्ट करू नये. म्हणजे अमुक एका गीतकाराला विशिष्ट प्रकारचंच गाणं लिहायला सांगणं, असं करायला नको.
तुला कोणत्या प्रकारचं गाणं लिहायला आवडतं?
– ज्या गाण्यात खोलवर विचार मांडला आहे त्या प्रकारचं गाणं मला आवडतं. उदाहरण सांगतो, ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ या गाण्यात ‘उत्तरांना प्रश्न कसे हे पडले’ हा विचार मांडलाय, ‘मितवा’ गाण्यामध्ये ‘वेड पांघरावे न व्हावे शहाणे ठेच लागण्याचे कशाला बहाणे’ असं आहे तर ‘मनमंदिरा’मध्ये ‘स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा’ असं मांडलंय. या सगळ्या गाण्यांचा बाज वेगवेगळा आहे. यातल्या या ओळी विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्यामुळे ज्यात विचार आहे त्या प्रकारचं गाणं मला आवडतं. शिवाय गझल, ठुमरी, मुजरा हे प्रकारही आवडीचे आहेत. सुदैवाने बऱ्यापैकी माझे सगळे प्रकार हाताळून झाले आहेत. त्यामुळे असं एकच आवडीचा प्रकार नेमका सांगता येणार नाही. तसंच आताच्या काळात मला उत्तम शृंगारिक लावणी, द्वयर्थी आयटम साँग लिहायला आवडेल. शेवटी आपल्या लेखनातून आपल्याला आनंद मिळायला हवा हे खूप महत्त्वाचं ठरतं. मला नेहमी वाटतं की, मी ३०-४० वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो आणि बाबूजींच्या काळात या क्षेत्रात काम करत असतो तर मला भावगीतं लिहायला आवडली असती.
गीतलेखनासोबतच सिनेमाची कथा-पटकथा लिहिण्याची इच्छा आहे का?
– मध्यंतरी मालिका-नाटक-चित्रपट संघटना म्हणजे ‘मानाचि’तर्फे आयोजित केलेल्या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखनाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. पटकथा लिहिण्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे अभ्यासू वृत्तीचा मी अजिबातच नाही. त्यामुळे मी पटकथा लिहू शकेन की नाही माहीत नाही; पण मी संवादलेखन करू शकतो, याची मला खात्री आहे.
तुझे आवडते गीतकार कोणते?
-जगदीश खेबूडकर, गदिमा, गुलजार, जावेद अख्तर, शांताबाई शेळके, स्वानंद किरकिरे, गुरू ठाकूर, समीर सामंत, आनंद बक्षी.
या वर्षांतील कोणकोणत्या सिनेमांमध्ये तू गाणी लिहिली आहेस?
– ‘गुरू’, ‘बंध नायलॉनचे’, ‘फुंतरू’, ‘फोटोकॉपी’, ‘तालीम’, ‘पिंडदान’ असे अनेक सिनेमे आहेत. ‘फोटोकॉपी’ या सिनेमाचं एक वैशिष्टय़ सांगतो, या सिनेमाच्या पोस्टरवर माझं गीतकार आणि कवी अशी दोन्ही नावं आहेत याचा मला खूप आनंद झालाय. सिनेमात माझ्या चार कविता वापरल्या आहेत.
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11