एकीकडे वाचनसंस्कृतीला उतरती कळा लागलेली असतानाही लहान मुलांसाठी गेली ३५ वर्षे ‘टॉनिक’ हा वार्षिक अंक काढला जात होता. या अंकाचे संपादक कृ. ल. तथा मानकरकाका यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मानसकन्येने जागवलेल्या त्यांच्या आठवणी.
कुठल्याशा एका कार्यक्रमात मला बोलताना ऐकले आणि मानकर काकांनी माझ्याशी ओळख करून घेतली. १९९० च्या सुमारासची ती आमची पहिली भेट. तेव्हाची मी वीणा माळकर. ‘टॉनिक’च्या त्या वर्षीच्या कार्यक्रमात लोकांनी मला पाहिले आणि आडनावातील साधम्र्यामुळे काकांना विचारणा झाली, ‘‘ही तुमची मुलगी?’’ अशी मी काकांची मानसकन्या झाले.
गेली २५ वर्षे मी काकांना पाहते आहे. या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पैलूवर एकेक पुस्तक होईल. त्यांचं नाव कृष्णा मानकर. हा मुलगा दीड वर्षांचा असताना मातृछत्र हरपलेला. सातरस्त्यावरील कामगार विभागात काकांची जडणघडण झाली. शिरीन टॉकीजमध्ये पेंटर म्हणून काम करणारे दलू पेंटर, चित्रपटाकरता जाहिराती लिहिणारे पेंटर बाबूराव मसुरकर यांचा काकांवर प्रभाव पडला तो शालेय वयातच. ‘मी चित्रकार होणार आहे,’ हा ध्यास शालेय जीवनातच त्यांच्या मनात रुजला. चित्रकलेत आवड होती, पण तासन् तास उभे राहून मातीकाम पाहतानाही त्यांना कंटाळा येत नसे. सातरस्त्याच्या गणेशोत्सवात बऱ्याच मूर्तिकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. पाश्र्वसजावट करण्याच्या निमित्ताने अनेक मूर्तिकारांची काकांशी ओळख झाली.
पुढे दादा गावकरांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाशी त्यांचे नाते जुळले.
चंद्रकांत खोत या अवलिया लेखकाशी त्यांची ओळख झाली. साने गुरुजी कथामाला, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ नि चंद्रकांत खोत यांच्यावरची काकांची निष्ठा कधीही ढळली नाही. मंडळाची ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. ही व्याख्यानमाला त्यांनी कधीही चुकवली नाही. (जगाचा निरोप घेतानाही ती चुकू नये म्हणून त्यांचा अट्टहास!)
मूळचे चित्रकार पण पुढे नाटकात रमलेले रघुनाथ चिपळूणकर हे काकांच्या नाटय़जीवनातले गुरू. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोक नाटय़ाशी जोडले गेलेले एक महत्त्वाचे नाव म्हणजे पांडुरंग मेजारी. त्यांचा सातरस्त्यावरच्या चाळीत एक ग्रुप होता. काका जाहिरातप्रमुख या नात्याने ग्रुपशी जोडले गेले. लेटरिंग, ब्लॉक मेकिंग, मुखपृष्ठे तयार करणे हे सारे स्वत:मध्ये झिरपवत असतानाच ते शाहीर अमरशेखांच्या कलापथकाशी जोडले गेले. यातूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा त्यांनी जवळून अनुभव घेतला.
कलंदर चित्रकार विनायक साठे, शिल्पकार बी. आर. खेडेकर (‘मुघले आझम’चे असिस्टंट आर्ट डायरेक्टर), सुप्रसिद्ध बॅनर आर्टिस्ट कांबळे, खातू पेंटर, मूर्तिकार श्याम सारंग, मूर्तिकार वेलिंग, चंद्रकांत परब अशा कलावंतांशी मानकर काकांचे मैत्र जुळले ते सातरस्त्यावरच्या कामगार वस्तीतच! लालबागचा गणेशोत्सव, तिथले रांगोळी कलाकार, गणेश मूर्तीचे काम काकांनी जवळून पाहिले. चर्मकार समाजाच्या रोहिदास जाती पंचायतीच्या नाटकांकडे काका सहज ओढले गेले. १९६५ च्या सुमारास लग्न झाले आणि काका ‘कथाकृष्ण’ मानकर झाले. कथाकाकीही त्यांच्यासारखीच नाटकवेडी निघाली. दोघांनी मिळून कथाकृष्ण कलाकेंद्राची उभारणी केली. या कलाकेंद्रातून ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘नटसमट’ अशा नाटकांमधून दोघांनी मिळून कामे केली.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून ड्रॉइंग टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले काका, हाडाचे शिक्षक होते. ‘महात्मा फुले शाळा, ताडगावातली ‘सर एली कदूरी’ ही त्यांची कार्यक्षेत्रे. कामात कसूर केलेली त्यांना खपायची नाही. हाती घेतलेले काम पूर्ण केलेच पाहिजे आणि त्याकरता आपल्या सर्व क्षमता पणाला लावल्याच पाहिजेत ही त्यांची शिस्त होती. ही शिस्त ते स्वत: कटाक्षाने पाळतच, पण इतरांनी मोडलेलीही त्यांना मुळीच खपत नसते. आणि ते तसे स्पष्टपणे सांगून टाकत. त्यांच्या या शिस्तीमुळेच गेली ३५ वर्षे ‘टॉनिक’ अव्याहत सुरू राहिले. सोबत कुणी असो- नसो, कथाकाकूंना सोबत घेऊन बैठक मारायची आणि तासन् तास काम करत राहायचे हा त्यांचा खाक्या. ते कशासाठीच अडून राहिले नाहीत. ना पैशासाठी, ना मनुष्यबळासाठी! न डगमगता, डळमळता ते काम करत राहिले अगदी कालपरवापर्यंत! ‘जपान’ हा विषय असलेला ‘टॉनिक’चा अंक नुकताच त्यांनी हातावेगळा केला. गेल्या वर्षीचा ‘टॉनिक’चा विषय होता ‘नागरिकशास्त्र’. हा खरं तर शाळेतला अनेकांना कंटाळवाणा वाटणारा विषय, पण सांदीकोपऱ्यातले अनेक विषय काका शोधून काढायचे. मुलांकरता दिवाळी अंक घेण्यात पालकांना आज रस नाही. मुलांनाही मराठी वाचनाचे विशेष वाटत नाही याचे काकांना वाईट वाटायचे. अंकांचे गठ्ठे घेऊन काका वेगवेगळ्या शाळेत शिक्षकांना मुख्याध्यापकांना भेटायचे. सवलतीत अंक द्यावा तरी प्रतिसाद नाही याचे त्यांना वाईट वाटायचे. ‘‘गेल्या वर्षीच्या ‘टॉनिक’चे खूप अंक पडून आहेत गं. वीस वीस रुपयांना देऊन टाकतोय.’’ काका काही दिवसांपूर्वीच म्हणत होते. समाजाच्या उदासीनतेमुळे काकांच्या उत्साहावर मात्र कधी सावट पडले नाही. ते नव्या नव्या युक्त्या शोधून काढत राहिले. त्यांनी बालनुक्कड स्पर्धेची गाठ ‘टॉनिक’शी बांधून टाकली. बालनुक्कड स्पर्धेची फी पन्नास रुपये आणि तिच्यातच ‘टॉनिक’चा दसरा- दिवाळी अंक मुलांना द्यायचा अशी भन्नाट कल्पना गेली काही वर्षे ते राबवतायत. ही कल्पना सांगायचे नि काका म्हणायचे, ‘‘म्हणजे स्पर्धा फुकटच ना! कारण प्रवेश फीपेक्षा जास्त निर्मितीमूल्य असलेला ‘टॉनिक’ मुलांना मिळतोय.’’ स्पर्धेत मराठी- अमराठी अशी वेगवेगळी मुले असतात आणि मायबोली मराठीतला ‘टॉनिक’ अनेकांच्या घराघरात जातो हेही काकांच्या या कल्पनेमुळे साध्य झाले. विजेत्यांची पुस्तके काका ‘टॉनिक’मध्ये छापायचे. ‘टॉनिक’ संग्रा व्हावा, लोकांनी जपून ठेवावा याकरता त्यांनी शोधलेली ही आणखी एक युक्ती!
काकांचे ‘टॉनिक’ अंकाचे नियोजन हाही विषय सविस्तर समजून घेण्याचा आहे. काका आदल्या वर्षीच्या ‘टॉनिक’च्या अंकात पुढल्या वर्षीचा विषय जाहीर करून टाकायचे आणि ‘टॉनिक’ परिवारातले लेखक त्यावरचे साहित्य पाठवायला लागायचे. (अर्थात ‘टॉनिक लेखक परिवार’ वर्षांगणिक विस्तारत गेला आहे.) गणित विशेषांक, धांगडधिंगा विशेषांक, नातेसंबंध, पशुपक्षी आणि त्यांच्यावरील जातककथा, जल व जलचर, हास्यकट्टा अशा विविध विषयांवर ‘टॉनिक’चे अंक प्रकाशित झाले. वेगवेगळ्या चित्रकारांनी ‘टॉनिक’ अंकाचे मुखपृष्ठ सजवले. त्याचबरोबर अंतर्गत सजावटीसाठीची चित्रे त्यांनी मुलांकडून काढून घेतली. चार रंगांतला टॉनिक मुलांकरता ते मनापासून सजवायचे. दीर्घकाळ टिकावा म्हणून ‘हार्डबाइंड’ टॉनिकचाही प्रयोग त्यांनी करून पाहिला. ‘‘मला खर्च पडला तरी चालेल पण मुलांना मात्र ‘टॉनिक’ महाग वाटायला नको’’ ही काळजी त्यांनी नेहमीच घेतली. मध्यंतरी त्यांच्याकडच्या पुस्तकसंग्रहाला वाळवी लागली तेव्हा रंगीत अंक, पुस्तकांची रंगीत पाने यांच्या पट्टय़ा कापून अंक सजावटीसाठी त्याचा उपयोग करून घेतला. ही विलक्षण किमया त्यांच्यापाशी होती. नातेवाईक, सुहृदांपैकी कुणाच्या घरी काही समारंभ असला (लग्न-बारसे वगैरे) की काका वेळेच्या आत पोहोचून तिथे सजावटीसाठी स्वत: आणलेले साहित्य घेऊन सज्ज व्हायचे. त्यांच्या झोळीत म्हणूनच कागदांचे तुकडे, रंग, जुन्या कॅलेंडर्समधली चित्रे, असे काय काय असायचे! बालवाचकांच्या पत्रांची दखल ते आवर्जून घ्यायचे. दूर दूर असलेल्या बालवाचकांकडे जाऊन, प्रत्यक्ष भेटून मुलांचे कौतुक करणे हा त्यांचा स्वभाव होता. मोबाइल- ई मेलच्या या काळात माणसं बसल्या जागी सारे करू पाहतात म्हणजे आनंद असो वा दु:ख ते ते टाईप करून पाठवले की आपण मोकळे असा आजचा काळ! काका मात्र प्रत्यक्ष भेटींवर विश्वास ठेवायचे. माणसं जोडायची कला त्यांना छानच साधली होती. जयंत नारळीकर, डॉ. विजया वाड, वि. आ. बुवा, सुनीता नागपूरकर, रमण माळवदे, शि. द. फडणीस अशी अनेक नावे ‘टॉनिक’ परिवाराशी यातूनच जोडली गेली. ‘माझं एवढं ऐकाच’ असं मनोगत ‘टॉनिक’च्या प्रत्येक अंकाकरता काका लिहायचे. ते मुळातून वाचायलाच हवे.
डॉ. वीणा सानेकर – response.lokprabha@expressindia.com