दक्षिण भारत म्हटलं की अतिशय सुंदर तसंच भव्य मंदिरं, त्यावरची देखणी कलाकुसर हेच डोळ्यासमोर येतं. तमिळनाडूमधल्या मदुराई इथलं मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरदेखील त्याला अपवाद नाही.

आपला देश विविधतेने संपन्न आहे. उत्तरेकडे हिमालय, बरोबरीने तेथील वेगवेगळ्या भागांत पाईन, फर अशी कोनीफरस जंगले, तर खाली साधारणपणे ईशान्येकडे बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि साल वृक्षांची रेन फॉरेस्ट्स, तर पश्चिमेला अरबी समुद्र. दक्षिणेला ‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखले जाणारे केरळ, तमिळनाडूमधले मदुराई, खालोखाल रामेश्वर हे ‘सिटी ऑफ टेम्पल’ म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिणेला सर्वच देवळांवर उंचउंच गोपुरे आणि त्यावर  द्रविड संस्कृतीनुसार कोरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. त्यापैकी मीनाक्षी सुंदरेश्वर हे मंदिर  कलाकृती व आर्किटेक्चरचा अत्युत्कृष्ट नमुना म्हणून जगभर वाखाणले गेले आहे.

Fire decoration material godown, decoration material godown Sinhagad road area,
सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
rishabh shetty in jai hanuman movie
कलियुगी अवतरणार हनुमान, ‘जय हनुमान’चं पोस्टर आणि शीर्षकगीत प्रदर्शित; राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता मुख्य भूमिकेत
Lakshmi Aarti Songs
Lakshmi Aarti : “जय जय लक्ष्मी माता” लक्ष्मीच्या निवडक आरत्या; जाणून घ्या एका क्लिकवर
gold price rise
सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांचा आखडता हात, धनत्रयोदशीला गेल्या वर्षाइतकीच २० टनांपर्यंत विक्री अपेक्षित

हजारो वर्षांपूर्वी मदुराई शहराचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर कोणी व केव्हा  बांधले याची नोंद नाही असे तिथे वावरणाऱ्या गाइड्सकडून समजले. हे हिंदूंचे तमिळनाडूमधील महत्त्वाचे, पवित्र स्थळ आहे. पूर्वी मदुराई हे शहरच अस्तित्वात नव्हते. तिथे सर्व जंगलच होते. पौराणिक आख्यायिकेप्रमाणे इंद्र आपल्या पापाचे प्रायश्चित्त  घेण्यासाठी पृथ्वितलावर प्रदक्षिणा करत स्वयंभू शिवलिंगाजवळ आला. त्या वेळी त्याला आपले ओझे हलके झाल्याचा भास झाला व त्याने या देवळाची स्थापना केली. पुढे मंदिरापासूनच सर्व रस्त्यांची आखणी अशा कल्पक रीतीने करण्यात आली की जणू  काही कमलपुष्पामधे मंदिर आहे, असे वाटावे. येथील रस्त्यांना वेगवेगळ्या  ऋ तूंची नावे  देण्यात आली आहेत.

हजारो वर्षांपूर्वी पंडय़ा राजवटीत राजा मलयद्वज व राणी कांचनमल यांनी अपत्यप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पण त्यांना पुत्राऐवजी विक्षिप्त कन्यारत्न प्राप्त झाले. त्या मुलीला निसर्गनियमानुसार दोन स्तनांऐवजी तीन स्तन होते. पण आकाशवाणी झाली की, ही कन्या उपवर होईल तेव्हा विवाहावेळी तिचा तिसरा स्तन नाहीसा होईल. कन्येचे डोळे माशाप्रमाणे असल्यामुळे तिचे नाव ‘मीन-अक्षी’ मीनाक्षी असे ठेवण्यात आले. राजघराण्यातील  रिवाजानुसार  तिला सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात आले. तामीळ पुराणानुसार राज्याभिषेक होण्यापूर्वी राजाला अष्टदिशा पादाक्रांत करूनच सिंहासनावर बसता यायचे. तसे मीनाक्षीने विष्णुलोक, ब्रह्मलोक, व इंद्रलोकावरून नंदी व शिवगण यांना चीत करून कैलासाकडे शिवकलेसाठी कूच केले, पण कैलासाधितपीच्या दर्शनाने लज्जित होऊन ती नतमस्तक झाली. त्याक्षणी तिचे तिसरे स्तन नाहीसे झाले. मीनाक्षीचा शंक राबरोबर विवाह झाला. पृथ्वितलावरील या भव्य सोहळ्यासाठी श्री विष्णूही वैकुंठातून अवतरले होते. आजही चैत्र महिन्यात हा सोहळा मीनाक्षी मंदिरात मोठय़ा थाटात केला जातो.

या देवळाला चारही दिशांना प्रवेशद्वारें आहेत, फक्त दक्षिणेला दोन द्वारे आहेत. प्रत्येक द्वारावर भव्य गोपुरे आहेत. प्रत्येक गोपुर हे खालपासून वपर्यंत निमुळते होत गेले आहे. त्यावर  देव, दानव, प्राणी, पक्षी वगैरेंच्या आकर्षक  रंगसंगतीत अतिशय सुबक व मूर्ती आहेत. त्यांची संख्या ४० ते ५० हजारांच्या आसपास आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वार  हे पंडय़ा कालावधीत बांधले आहे असे सांगितले जाते. पुढे १४ व्या शतकात मोगल काळात मलिक कफूर याने देवळाची बरीच तोडफोड, लूट केली. त्यानंतर  नायक कारकीर्दीत  जीर्णोद्धार करून विस्तारात  गेले. दक्षिणेकडील  एका गोपुराची उंची १७० फूट आहे. पूर्वाभिमुख प्रवेशातून आपण मीनाक्षी मंदिरातील कुंडाकडे येतो. हे कुंड १६६ बाय १२० फूट क्षेत्रफळाचे असून मध्यभागी सुवर्णकमळ आहे. मोगलकाळात झालेल्या आक्रमणात कुंडासभोवतीच्या व्हरांडय़ातील एका भिंतीवरच त्या वेळची चित्रकला राहिली होती. बाकी सर्वच उद्ध्वस्त झाले होते. ती चित्रे तशीच आहेत.

मीनाक्षी व सुंदरेश्वर ही दोन्ही मंदिरे व्हरांडय़ाद्वारे एकमेकांना जोडलेली आहेत. पण मीनाक्षीला मदुराईमध्ये अग्रक्रम दिला जातो व शंकराला नंतर. मीनाक्षी मंदिरावर सोन्याचा कळस आहे. गणेश मंडप, नंदी मंडप येथे अनुक्रमे गणपती व नंदीचे दर्शन घेऊनच पुढे जावे लागते. गणेश मंडप येथील गणपतीची मूर्ती अवाढव्य आहे. वाटेत जाताना लागणऱ्या खांबांवर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. तेथील सहस्र खांब असलेल्या भागात मदनदेवाची  सहचारिणी रती, कार्तिकेय, गणेश या मूर्ती अतिशय सुंदर आहेत. छतावर थ्री डायमेन्शनमध्ये असलेली कमळं उठावदार आहेत. तसेच दोन्ही  देवळांत शिवलिंगाचे चित्र कोणत्याही कोनातून वा दिशेने पाहिल्यास एकसारखेच दिसते. गाभाऱ्यात प्रवेशद्वारावर  सोन्याचा मुलामा  दिलेले द्वारपाल असून आतील मीनाक्षी देवीची मूर्ती पाचूची आहे. जवळच एक सोन्याचा स्तंभ आहे. बाहेर एका भिंतीवर श्रीविष्णू मीनाक्षी व सुंदरेश्वर विवाह सोहळ्याचे शिल्प आहे. तेथे असलेल्या झोपाळ्यावर हा विवाह सोहळा साजरा केला जातो.

मदुराई येथे कोणत्याही ठिकाणाचे अंतर हे मीनाक्षी मंदिरापासून मोजलं जातं. मंदिरापासून २५ कि. मी. अंतरावर अलगर हिल्स म्हणून ग्रॅनाइटच्या टेकडीवर थीरुपुरम् कुंदरम् म्हणजे मुरुगनचे मंदिर आहे. या मंदिराविषयी पुराणात अशी आख्यायिका आहे की सुरपऊ राक्षसाने शंकराची एवढी उपासना केली की त्यामुळे त्याला त्रलोक्यात राज्य करता येईल असा वर दिला गेला. पण या वरामुळे तो देवांना त्रास देऊ लागला. इंद्राला कैद करून तो त्याच्या पत्नीची इंद्राणीची मागणी करू लागला. इंद्राने मुरुगनकडे धाव घेतली. तो त्याच्याकडे देवांना वाचवण्यासाठी विनवणी करू लागला.  मुरुगनने युद्धात सुरपऊचा वध केला. इंद्राने प्रसन्न होऊन आपल्या मुलीबरोबर त्याचा विवाह करून दिला. मुरुगनच्या सहा विश्रामस्थानांपैकी हे पहिले. पुढे हे जैन साधूंचे विश्रांतिस्थान बनले. तेराव्या शतकात पांडियन राजाने हे सुवर्ण कळसाचे मंदिर बांधले. पुढे नायक कारकीर्दीत त्याचे सौंदर्य आणखीनच वाढवले गेले. प्रवेशावर मुखमंडप असून तेथे कोरीवकाम असलेले ऑर्नेटच खांब आहेत. स्कंद पुराणात २३ स्तुतिसुमनांनी या मंदिराचे वैशिष्टय़ सांगितले आहे. गाइडने आम्हाला ते तामीळ भाषेत गाऊन दाखवले, पण आम्हाला त्यातले काहीच कळले नाही. टेकडीवरून आसपासचा देखावा मात्र छान दिसतो. तिथे असलेल्या गुहांमधे जैन साधूंना आसरा मिळतो. गांधी संग्रहालयामधे गांधीजींच्या बालपणापासून ते अंत्ययात्रेपर्यंतच्या पुष्कळशा गोष्टींचे जतन करून ठेवले आहे. स्वातंत्र्य लढय़ातील पुढाऱ्यांची छायाचित्रे, गांधीजींची पत्रे, त्यांच्यावर गोळ्या झाडल्यावर रक्ताळलेले त्यांचे कपडे हे सगळे काचेच्या हवाबंद पेटीत ठेवले आहे.

वैगेई नदी किनारी मरिअम्मन् या पर्जन्य देवतेचे देऊळ आहे. असे म्हणतात की नायक राजवटीत राजाने आपला महाल बांधण्यासाठी येथे उकरलेल्या मातीने विटा तयार केल्या. अर्थात राजाचा महालच तो, किती माती लागली असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.  तेव्हापासून हा खणलेला भाग तसाच आहे. याचा विस्तारच ३०० मीटर बाय ३०० मीटर आहे. चारही बाजूंनी आत उतरायला पायऱ्या आहेत. मध्यभागी मैया मंडपम् असून तेथे गणपतीचे मंदिर आहे. या तलावाला नैसर्गिकरीत्याच वैगेई नदीपासून पाणीपुरवठा होतो. पूर्वी फेब्रुवारी महिन्यात उत्सवावेळी या तलावात संध्याकाळी मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्ती आणून सोहळा होत असे. दिव्यांच्या रोषणाईने तलावाचे सौंदर्य आगळेच भासत असे. पण गेल्या दोन-चार वर्षांत या इलाख्यात पावसाने पाठ फिरवल्याने नदी व त्यामुळे मरिअम्मन् टँक अगदी कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तिथे क्रिकेट, सभा, समारंभ असे कार्यक्रम होतात.

आम्हाला मीनाक्षी मंदिरात कॅमेरा नेऊ दिला नाही, त्यामुळे तेथील दुर्मीळ कलेचे फोटो घेता आले नाहीत. तिथे सर्वच मंदिरांत इतकी गर्दी होती की प्रवेशासाठीच तास-दीड तास ताटकळत उभे राहावे लागत होते. म्हणून मीनाक्षी मंदिराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवळात गेलो नाही.

मदुराईच्या दक्षिणेला रामनाम नावाचा जिल्हा आहे. त्यालाच रामेश्वर म्हणतात. ते बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांच्या संगमावर पेम्बाम् बेटावर आहे. त्याला दक्षिणेतील काशी मानले जाते. इथे शैव व वैष्णव या दोन्ही पंथांतील लोक रामेश्वर यात्रेसाठी येतात. मदुराई सोडल्यावर थोडय़ा वेळाने सरळसोट व दोन्ही समुद्राला समांतर रस्त्याने आपण थेट पेम्बाम आयलंडवर रामेश्वला पोहोचतो. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समुद्र व पाण्यातच समांतर लोहमार्ग आहे. हे ठिकाण हिंदू धर्मातील चारधामांपैकी तसेच बारा ज्योतिर्लिगांपैकी एक म्हणून त्याला स्थानमाहात्म्य आहे. या बेटाच्या पूर्वेला ३० मैलांवर श्रीलंकेतील तैलमर या ठिकाणी जाता येते. पण मध्यंतरी तामीळ वाघांबरोबर असलेल्या संघर्षांमुळे तेथे कडक देखरेख आहे. दंडकारण्यातून सीतेचे हरण करून रावणाने तिला लंकेला नेले. तिच्या सुटकेसाठी समुद्रात दगड टाकून श्रीलंकेपर्यंत जाण्यास बांधलेल्या रामसेतूवरूनच मारुतीची वानरसेना लंकेला पोहोचली होती. तिथे जवळच लहानशा हौदात एक तरंगता दगड ठेवलेला आहे. तो रामसेतूपैकीच आहे असे म्हटले जाते. आजसुद्धा श्रीलंकेला जाताना विमानातून आपल्याला पाल्क सामुद्रधुनीत एक अस्पष्ट अशी रेषा दिसते. रावणाबरोबरच्या युद्धात विजय मिळवून रामाने  सीतेला परत आणले. त्यानंतर तो सेतू तोडून टाकला गेला असे मानले जाते.

मदुराईपासून पेम्बाममार्गे धनुषकोडी व पुढे लंकेपर्यंत रेल्वेची सोय होती. तिथे कोयंदमार या लहानशा गावात रेल्वे स्टेशन, शाळा, लहानसा दवाखाना अशा सोयी होत्या. पण १९६४ साली आलेल्या चक्रीवादळात रेल्वे गाडीच वाहून गेली होती. या वादळाने धनुषकोडी भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. आता त्या गावात फक्त या वास्तूंचे सांगाडेच उरले आहेत. त्यामुळे हे गाव आता ‘घोस्ट सिटी’ म्हणून ओळखले जाते. रामेश्वर ते तामिळनाडूचे टोक हे पेम्बाम पुलाने जोडलेले आहे. हा पूल फेब्रुवारी २०१३ मधे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा एक दुवाच मानला जातो. हा मुंबईच्या वरळी समुद्रसेतूच्या आधीचा भारतातला पहिला समुद्रसेतू होय. आताच्या पुलाची लांबी दोन हजार ६५ मी. आहे. वाहनांच्या रहदारीचा रस्ता रेल्वे पुलापेक्षा उंच आहे. समुद्राला ओहोटी असताना जीप किंवा मिनी बसने धनुषकोडी किनारी जाता येते. ओल्या वाळूतला हा प्रवास गमतीचा असतो. वाटेवर वाळूतील किंवा लहानशा डबक्यातील किडे, लहान मासे पकडण्यासाठी सॅण्ड पायपर्स, व्ॉगटेल यांची गडबड चाललेली दिसते. मधे एखादा ध्यानस्थ बगळा भक्ष्याच्या प्रतीक्षेत असतो. हिवाळ्यात बरेचसे स्थलांतरित पक्षी येथे दिसतात. कधी वाळूत रुतून बसलेली गाडी प्रवाशांना ‘है जोश’ म्हणत ढकलावी लागते.

इथे अशी आख्यायिका सांगितली जाते की रावणाबरोबरच्या युद्धात विजयी होऊन राम सीतेसह परत आले, तेव्हा अगस्ती मुनींनी सांगितले की रावणाच्या वधामुळे आलेला ब्रह्महत्येचा कलंक धुवून काढण्यासाठी शंकराची उपासना करावी लागेल. तेव्हा रामाच्या आज्ञेवरून मारुती शिवलिंग आणण्यासाठी कैलासाकडे निघतो. सहज म्हणून किनाऱ्यावर सीता वाळूत शिवलिंग करते. मारुतीला परत यायला वेळ लागत असल्याने पूजेचा मुहूर्त टळू नये म्हणून सीतेने केलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. पण तेवढय़ात मारुतीही पोहोचतो. आपण आणलेल्या शिवलिंगाची पूजा न झाल्यामुळे नाराज होतो. पण राम त्याचे सांत्वन करतात आणि सांगतात की येथे येणारे भाविक प्रथम तू आणलेल्या शिवलिंगाची पूजा करूनच पुढे मंदिरात येतील. हेच ते रामनाथ स्वामी मंदिर किंवा रामेश्वर मंदिर आहे. यावरूनच त्या भागाला रामेश्वर असे संबोधले गेले.

रामेश्वर हे मदुराई, कोइंबतूर, चेन्नई अशा ठिकांशी जोडलेले आहे. इथे देवळांची कमी नसल्याने हे शहरही ‘टेम्पल सिटी’तच गणले जाते. रामेश्वर मंदिर हे १५ एकर जागेत पसरलेले आहे. या परिसरात रामाने वाळूत बाण मारून कुंडे, २२ अग्नितीर्थे निर्माण केली. या प्रत्येक कुंडातील पाण्याची चव वेगळी आहे असे म्हणतात. लक्ष्मणतीर्थ, जटायुतीर्थ, हनुमानतीर्थ अशी त्यांची नावे आहेत. रामतीर्थापासून तीन कि. मी. गंधमादन पर्वतम् किंवा रामपरम् हे ठिकाण आहे. या ठिकाणी एका लहानशा टेकडीवजा उंचवटय़ावर देऊळ आहे. अशी आख्यायिका आहे की राम या उंचवटय़ावरूनच सर्वासोबत श्रीलंका कोठे आहे हे अवलोकन करीत असत. तेथूनच हनुमानाने लंकेला जाण्यासाठी उड्डाण केले होते. एका खडकावर रामाची पावले आहेत असे म्हणतात. हे रामेश्वर येथील उंच ठिकाण म्हटले जाते. तिथे गेल्यावर आपल्याला एका बाजुला समुद्र, दुसरीकडे गाव व तेथील देवळांचे कळस, टीव्ही टॉवर दिसतो. समुद्रात काहीजण ओल्या वाळूत शिवलिंग करताना दिसतात.

रामेश्वर म्हणजेच रामस्वामी टेम्पल हेदेखील मीनाक्षी मंदिराप्रमाणेच भव्य आहे. सातव्या शतकात बांधलेले, हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिगांपैकी एक. मोगल काळातील पडझडीनंतरचे सध्याचे मंदिर हे पंडियन राजवटीतले आहे. या देवळाला पूर्व व पश्चिम अशी दोनच प्रवेशद्वारे आहेत. त्यावरील गोपुरे वेगवेगळ्या उंचीची आहेत व त्यावरही कोरीव मूर्ती आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वार समुद्रावरच आहे. या ठिकाणाला अग्नितीर्थ असे संबोधले जाते. शिवाय उथळ समुद्रामुळे तेथे लाटांचा त्रास होत नसल्याने भाविकांची मंदिरप्रवेशापूर्वी समुद्रस्नान करण्यासाठी गर्दी असते. आपण पश्चिमेकडील गोपुरांतून मंदिराच्या परिसरात येऊ शकतो. हे मंदिर १५ एकर जागेवर पसरलेले आहे. आतला व्हरांडा चार हजार फूट लांबीचा तसंच हजार खांबांचा आहे. आतले सर्व खांब ग्रॅनाइटचे असून प्रत्येकावर मीनाक्षी मंदिराप्रमाणे मूर्ती कोरलेल्या आहेत. १२ फूट लांब, नऊ फूट उंच नंदीला नमस्कार करूनच गाभाऱ्यात जावे लागते. रामेश्वर येथे रामायणातील महत्त्वाच्या खाणाखुणा आहेत. असं म्हटलं जातं की  चारधाम यात्रेची सांगता रामेश्वर येथे आल्याशिवाय होत नाही. मीनाक्षी मंदिरात आम्ही संध्याकाळी गेल्यामुळे आम्हाला गर्दीचा त्रास झाला नव्हता. पण रामनाथ स्वामी मंदिरात भर दुपारी पोहोचलो. तिथेही प्रचंड गर्दी होती. स्पेशल दर्शनासाठीही तीच गत होती. बाहेरूनच नमस्कार करून माघारी आलो.

या दोन्ही ठिकाणी तीर्थाव्यतिरिक्त बरेच काही पाहण्यासारखे व करण्यासारखे आहे. मदुराई येथून कोडाईकनाल, उटी येथेही जाता येते. अनेकांना दक्षिण भारतीय पदार्थ खायला, साडय़ांची खरेदी करायला आवडतेच. त्यामुळे इथे ट्रिप करायला हरकत नाही.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com