मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणे, ही इतकी साधी व्याख्या असली तरी ते तेवढंच नाहीय. त्यामध्ये असलेलं हार्मोन्सचं चक्र, मानसिक स्थिती, गर्भाशयाचे आजार असं सगळं समजून घेणं गरजेचं आहे.
मासिक पाळी येण्याचं वय, लक्षणं, कारणं, परिणाम असं सगळं जितक्या प्रमाणात अभ्यासलं जातं तितकंच मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीबद्दल अभ्यासणं आता गरजेचं झालं आहे. मासिक पाळी थांबणं म्हणजे मेनोपॉज असा याचा साधा अर्थ असला तरी त्याबद्दलची अपुरी माहिती अनेक स्त्रियांना असते. काही वेळा त्यात गैरसमज असतात तर काही वेळा चुकीची माहिती. यामुळे मेनोपॉज म्हणजे नेमकं काय, ते साधारण कोणत्या वयात होतं, कोणत्या वयातलं धोकादायक आहे, त्याचे परिणाम, कारणं असं सगळं अभ्यासणं जरुरीचं आहे. मेनोपॉजचा संबंध मासिक पाळीशी आहेच, पण त्याशिवाय त्यासंबंधी घटकांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
मेनोपॉज हा कोणताही आजार नाही, तो निसर्गाचाच एक भाग आहे हे सर्वात आधी लक्षात घ्यायला हवे. एखादी स्त्री मेनोपॉजमधून जात असेल तर तिला गंभीर आजार झालाय, असं नाही. त्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सर्वसामान्यांच्या दृष्टीने मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणं. पाळी बंद होणं म्हणजे शरीरातल्या हार्मोन्सचं (संप्रेरके) प्रमाण हळूहळू कमी होणं; ही महत्त्वाची बाब दुर्लक्षित केली जाते. हार्मोन्सचं प्रमाण कमी होत असल्यामुळे मासिक पाळी थांबते. मेनॉपॉज हा गर्भाशयाचा आजार आहे हा चुकीचा समज आहे. मेनोपॉज गर्भाशयाच्या आजारामुळे होत नसून हार्मोन्सच्या कमी झालेल्या प्रमाणामुळे होतो, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हार्मोन्स नसल्यामुळे त्यांची गर्भाशयावर काहीच प्रक्रिया होणार नाही आणि ही प्रक्रिया झाली नाही तर गर्भाशय कामच करू शकत नाही. या हार्मोन्सचा संबंध फक्त पाळी येणं आणि न येणं याच्याशी नसून संपूर्ण शरीराशी आहे. लैंगिक इच्छा, त्वचेचा पोत, केस, हृदय, स्नायू या सगळ्यात हार्मोन्सचा परिणाम आणि फायदा दिसून येतो.
मासिक पाळीप्रमाणेच मेनोपॉजसंदर्भातही अनेक समजुती आहेत. मेनोपॉजच्या वयाबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. पण मेनोपॉजचं (रजोनिवृत्ती) विशिष्ट असं वय नाही. पण पूर्वीपेक्षा मेनोपॉजचं वय लांबताना दिसतंय. भारतात आता मेनोपॉजचं साधारण वय ५१-५३ र्वष इतकं आहे. मेनोपॉजच्या या लांबलेल्या वयाचं विशेष असं कारण नाही. काहींच्या बाबतीत उलटं घडताना दिसतं. एखाद्या स्त्रीचा पस्तिशीच्या आधीच मेनोपॉज आला तर त्याला अकाली (अर्ली) मेनोपॉज म्हणतात. याचं प्रमाण फार कमी आहे. इथे आनुवंशिकतेचा मुद्दा ठळक करता येईल. एखाद्या स्त्रीचा पन्नाशीत मेनोपॉज सुरू झाला तर तिच्या मुलीचाही त्याच वयात येऊ शकतो. किंवा आईचा लवकर आला तर तिच्या मुलीचा लवकर येऊ शकतो. मेनोपॉज येण्याचा काळ काही अंशी आनुवंशिक असतो. पण सरसकट सगळ्यांमध्येच असं दिसून येतं असंही नाही. पण मेनोपॉज खूपच लवकर आला तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.
डॉ. निखिल दातार मेनोपॉजची व्याख्या आणखी विस्तृत करून सांगतात, ‘साधारण सलग सहा महिने पाळी न येणे म्हणजे मेनोपॉज, अशी त्याची शास्त्रीय व्याख्या आहे. दोन महिने पाळी आली नाही म्हणजे मेनोपॉज आहे असं म्हणता येणार नाही. कदाचित तुम्ही त्याच्या जवळ आला असाल, पण व्याख्येनुसार तो मेनोपॉज होत नाही. मेनोपॉज सुरू झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला तर मात्र ते अतिशय गंभीरपणे घेतलं पाहिजे. ते अंगावर काढता कामा नये. कारण त्यामध्ये गर्भाशयाचा कर्करोग किंवा कर्करोगाच्या अलीकडची स्टेज असं मोठय़ा प्रमाणावर आढळून येतं.’ सलग सहा महिने पाळी आली नाही म्हणजे एखाद्या स्त्रीचा मेनोपॉज सुरू झाला असं आपण म्हणतो. पण त्यानंतर तिला कधीही रक्तस्राव सुरू झाला तर ते अतिशय गंभीर आहे, अशी महत्त्वाची माहिती डॉ. दातार देतात. कंबर दुखणे, हार्मोन्स कमी झाल्यामुळे शरीराचा एखादा भाग खूप गरम वाटतो (हॉट फ्लशेस), रात्री झोपल्यावर खूप घाम येणे, लघवीला जळजळ होणे, लैंगिक संबंध ठेवताना योनीमार्गात कोरडेपणा जाणवणे हे मेनोपॉजच्या वेळी होणारे त्रास आहेत. असे त्रास सरसकट सगळ्यांनाच होतात असं नाही. पण ज्यांना जसा त्रास होतो त्यानुसार त्याच्यावर उपचार केले जातात. पण कधी कधी या त्रासाकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. मेनोपॉजमध्ये हा त्रास होतोच, असं गृहीत धरून त्या तो सहन करत असतात. पण त्यांच्या या दुखण्यामागे एखादा गंभीर आजार असू शकतो. त्याबद्दल खातरजमा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असं न केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. ‘फायब्रॉइड, कर्करोगाची सुरुवातीची परिस्थिती असं काही त्या वयाच्या दरम्यान असू शकतात. पाळी जायला आली म्हणून विशिष्ट त्रास होत असतात, बाकीच्या स्त्रियाही त्यासाठी काहीच करत नाहीत, ही अनेकींची समजूत चुकीची आहे. या अशा विचारांमुळे त्यांना होत असलेला त्रास त्या बरीच र्वष अंगावर काढतात. त्याची तीव्रता वाढल्यावर डॉक्टरांकडे त्यासंबंधी उपचार करायला गेल्यानंतर त्यातली गंभीर समस्या कळते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे केलेलं दुर्लक्ष हेच त्यामागचं कारण असतं’, डॉ. दातार सांगतात.
विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. विविध संशोधनांमुळे गंभीर आजारांवरही आता उपचार, औषधं उपलब्ध आहेत. आता उपचार म्हणून वेगवेगळ्या थेरपी केल्या जातात. या थेरपींचे प्रकार रुग्ण आणि त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार बदलत जातात. हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी ही त्यातलीच एक महत्त्वाची थेरपी आहे. या थेरपीविषयी डॉ. दातार सांगतात, ‘नैसर्गिकरीत्या शरीरात असलेले हार्मोन्स कमी होतात तेव्हा ते औषधांद्वारे त्या त्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण करणे म्हणजे हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी. एखाद्या स्त्रीला होणारा त्रास लक्षात घेऊनच त्यानुसार थेरपी बदलत जाते. साधारण वीसेक वर्षांपूर्वी मेनोपॉजच्या सगळ्या रुग्णांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यावी, असा प्रवाद होता. त्यानुसार ती दिलीही गेली. मात्र त्यानंतर रुग्णांमध्ये विविध प्रकारचे आजार दिसू लागले. हे प्रमाण वाढतच गेलं. स्तनाचा कर्करोग, हृदयविकार असलेल्या रुग्णांचं प्रमाण वाढत गेलं. त्यानंतर सरसकट सगळ्यांना हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी देण्यात तथ्य नाही, असं निश्चित झालं. असं असलं तरी ती थेरपी वाईट असं नाही. या त्याचे काही फायदे आहेत आणि त्याचा काहींना नक्कीच उपयोग होऊ शकतो, हेदेखील मान्य करावं लागेल. त्यामुळे आता रुग्णाच्या गरजेनुसार ती थेरपी दिली जाऊ लागली. आताची हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आणि वयोगट लक्षात घेऊन केली जाते.’
मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणं असं असलं तरी मेनोपॉजचा संबंध फक्त पाळीशी नक्कीच नाही. मासिक पाळी, हार्मोन्स, मेनोपॉज अशी ही साखळी आहे. ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. मेनोपॉज विशिष्ट वयातच का येतो, कारणं, त्याचे इतर गोष्टींशी संबंध याची महिती असायला हवी. डॉ. निखिल दातार त्याविषयी सांगतात, ‘पन्नाशीच्या अलीकडच्या पुरुषांमध्ये रक्तदाबाचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. पण साधारण वीस वर्षांपूर्वी रक्तदाब असणाऱ्या पन्नाशीच्या अलीकडच्या स्त्रियांचं प्रमाण जितकं होतं ते आता वाढलंय हेही खरंय. मात्र पन्नाशीच्या अलीकडचे पुरुष आणि स्त्री अशी तुलना केली तर रक्तदाब असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी आढळून येईल. स्त्रियांचं प्रमाण कमी असण्याचं कारण म्हणजे इस्ट्रोजन हे त्यांच्यात असलेलं संप्रेरक. या संप्रेरकामुळे स्त्रियांमध्ये रक्तदाब आणि हृदयांचे विकार कमी आढळून येतात. पण पन्नाशीनंतर रक्तदाब असणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण साधारण सारखंच होतं. कारण इस्ट्रोजन या संप्रेरकाच्या अभावामुळे हृदय आणि त्यासंबंधीच्या यंत्रणेवरील संरक्षणाचा प्रभाव कमी होतो. इस्ट्रोजन या संप्रेरकाच्या अभावामुळे त्याचा स्नायू आणि हृदयावर परिणाम होतो, हे सहसा ध्यानात नसते. या सगळ्याचा संबंध फक्त पाळीशी आहे, असा सर्वसाधारण गैरसमज आहे. हाच संबंध आणखी एका गोष्टीत लक्षात येईल. एखाद्या स्त्रीला मेनोपॉज लवकर सुरू झाला तर त्यातलं गांभीर्य लक्षात घ्यावं. मेनोपॉज मुख्यत्वे हार्मोन्सशी संबंधित आहे. एखादी स्त्री जितक्या लवकर मेनोपॉजच्या स्थितीत पोहोचते तितक्या लवकर तिच्यातले हार्मोन्स कमी झालेले असतात. तिच्यातले हार्मोन्स कमी वयातच कमी झाले तर तिच्या उर्वरित आयुष्यात तिला स्नायू, हृदयाचे आजार उद्भवू शकतात. पाळी बंद होणे हा हार्मोन्स कमी होण्याच्या परिणामांपैकी एक परिणाम आहे. त्याचे इतर शारीरिक, मानसिक परिणामही असतात. चाळिशीनंतर हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी साधारणपणे केली जाते.’
मेनोपॉजमध्ये स्त्रीमध्ये शारीरिक बदलांप्रमाणेच मानसिक बदलही होत असतात. तिची मानसिक स्थिती बदलत असते. पन्नाशीला आलेल्या स्त्रीचं बऱ्यापैकी सगळं झालेलं असतं. मुलांचं शिक्षण, त्याचं लग्न, झालंच तर नातवंडं अशा सगळ्या टप्प्यातून ती गेलेली असते. त्यामुळे तिच्यापुढे तेव्हा तसं विशेष काही ध्येय नसतं. एक प्रकारचं स्थैर्य आलेलं असतं. मुलं संसारात रमलेली असतात. या सगळ्यात तिची कोणाला फारशी गरज नाही किंवा तिच्यावाचून कोणाचं अडत नाही या भावना तिच्या मनात पक्क्या होतात. अशाने तिची मानसिक स्थिती बदलते. हा बदल तिच्या वागणुकीतून दिसून येतो. या काळात चिडचिडेपणा वाढू शकतो. काही वेळा नैराश्य येणं, पटकन एखाद्या गोष्टीसाठी रडू येणं, मनातच कुढत राहणं अशा गोष्टी घडू लागतात. पण या सगळ्यात तिला सगळ्यात जास्त गरज असते ती तिच्या कुटुंबाची. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला साथ देणं खूप महत्त्वाचं ठरतं. ‘मेनोपॉजमध्ये हे सगळं होतंच असतं’, ‘त्यात काय एवढं. हे सगळ्यांनाच होतं’ अशा दृष्टिकोनातून विचार न करता कुटुंबीयांनी तिच्या बाजूने विचार करायला हवा. मेनोपॉजमधून जाणाऱ्या स्त्रीनेसुद्धा ‘हे फक्त मलाच झालंय, याचा त्रास फक्त मलाच होतोय’ असं समजू नये. अशा मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने उत्तम आहार, वैद्यकीय उपचार, कौन्सिलिंग अशा उपचारांची मदत घ्यायला हवी.
काही स्त्रिया सभोवताली बघून स्वत:पुरतं काही गोष्टी ठरवून घेतात. तसंच त्या त्या वेळी त्यांच्या डॉक्टरांशी बोलून त्यांनी विशिष्ट मतं तयार केलेली असतात. पण आता त्याच डॉक्टरांचं मत बदलेलं असतं आणि विज्ञानही पुढे गेलेलं आहे. तरी त्या मात्र तेच मत घेऊन ठाम असतात. या वृत्तीमुळेही स्त्रियांच्या मनात मेनोपॉजविषयी संभ्रम निर्माण होतो. हे असं का होतं, त्यासाठी काय करायचं, करायचं की करायचं नाही, करायचं तर कधी करायचं असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. कधी कधी हा गोंधळ औषधांपर्यंत येऊन पोहोचतो. कोणतं औषध घ्यायला हवं, हा प्रश्न डोक्यात आला की साधारणपणे काहीच न करण्याच्या निर्णयापर्यंत स्त्रिया पोहोचतात. मनात निर्माण झालेल्या या संपूर्ण गोंधळामुळे उपचारांची अत्यंत आवश्यकता असलेल्या स्त्रिया उपचारांपासून वंचित राहतात. कारण त्यांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ त्यांना पुढेच येऊ देत नाही. ‘वैद्यकीय सल्ला घ्या’ असं एखाद्या डॉक्टरांनीच सांगितलं तर त्याचा अर्थ ते नेहमी औषधंच देतील असा होत नाही. तर ते त्यासाठी साधे उपचारही करू शकतात, हे समजून घ्यायला हवं.
मेनोपॉजबद्दलचे गैरसमज पिढय़ान्पिढय़ा तसेच आहेत. मेनोपॉज म्हणजे फक्त मासिक पाळी बंद होणं हे नसून त्याचा संबंध स्त्रियांमध्ये असलेल्या हार्मोन्स (संप्रेरके) यांच्याशी आहे. हार्मोन्सचा संबंध स्त्रीच्या शरीरातील इतर घटक आणि काही आजारांशीसुद्धा आहे. पण मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद या व्याख्येपलीकडे जाऊन त्याबद्दलची माहिती समजून घेतली तर मेनोपॉज आणि त्याआधीच्या काळात काय करता येईल हे स्पष्ट होईल. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11