आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
अत्याधुनिक कॅमेरा, वापरायला सोपे तंत्रज्ञान, उत्तम दर्जाची छायाचित्रे, एडिट करण्यासाठी सोपी पद्धत आणि वजनाला तुलनेने अतिशय हलका यामुळे अनेक जण आता कॅमेराबरोबरच मोबाइल फोनच्या साहाय्याने छायाचित्रण करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. केवळ सामान्यांनाच नाही तर व्यावसायिक छायाचित्रकारांनाही मोबाइलच्या कॅमेराने भुरळ घातली आहे. एवढेच नव्हे तर वेबसीरिजसाठीसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मोबाइल फोटोग्राफी अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी काही उत्तम टूल्स उपलब्ध आहेत. या टूल्सचा उपयोग करून सुंदर छायाचित्र टिपतानाच छायाचित्रणाचा आनंदही घेता येईल. जाणून घेऊ या, अशाच काही टूल्सबद्दल..
छायाचित्रकाराचा ते दृश्य टिपतानाचा विचार आणि त्याचा दृष्टिकोन यावरच त्या छायाचित्राचे यश अवलंबून असते. महागडा कॅमेरा असला तरच चांगले छायाचित्र टिपता येते हा गैरसमज आहे. तुमच्याकडे ५डी सारखा लाखो रुपयांचा कॅमेरा असो वा एखादा साधा मोबाइल कॅमेरा, तुमच्या डोक्यातील कल्पना कल्पकतेने तुम्ही कॅमेऱ्यात कशी टिपताय यावरच त्या छायाचित्राची परिणामकारकता अवलंबून असते. आपल्यासमोरचे क्षण पटकन टिपण्यासाठी मोबाइल फायदेशीर ठरतो. सध्याच्या मिड रेंज फोनमध्येसुद्धा सर्वच कंपन्यांकडून चांगले कॅमेरे देण्यात येत आहेत. आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्याचे सर्व फीचर्स व्यवस्थित समजून घेतल्यास त्याच्या साहाय्याने एखादा लघुपटसुद्धा तयार करणे शक्य आहे. मोबाइलद्वारे छायाचित्रण करणे सोपे आणि अधिक परिणामकारक व्हावे यासाठी बाजारात अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करणे सोयीचे ठरते.
ऑटोमेटेड सेल्फी स्टिक
सध्या बाजारात विविध प्रकारच्या सेल्फी स्टिक्स उपलब्ध आहेत. सेल्फीप्रेमींकडे सेल्फी स्टिक असायलाच हवी. अलीकडे तर ब्लूटूथवर चालणाऱ्या सेल्फी स्टिक्सही उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने २५-३० मीटर अंतरावरूनसुद्धा छायाचित्र टिपणे शक्य होते. तुमच्या गरजेप्रमाणे अगदी १०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत कोणतीही सेल्फी स्टिक खरेदी करू शकता.
एक्सटर्नल फ्लॅश
मंद प्रकाश असणाऱ्या ठिकाणी किंवा रात्री छायाचित्रण करताना अनेकदा छायाचित्रे चांगली येत नाहीत. मोबाइलचा फ्लॅशही निष्प्रभ ठरतो. ही समस्या सोडवण्यासाठी मोबाइलच्या फ्लॅशसारखाच पण अधिक परिणामकारक एक्सटर्नल फ्लॅश वापरू शकता. त्यामुळे छायाचित्रांची स्पष्टता वाढते, दर्जा सुधारतोच शिवाय एलईडी फ्लॅश असल्याने डोळय़ांना त्राससुद्धा होत नाही. तसेच यामध्ये रेड आय फोटोजसुद्धा येत नाहीत. हे फ्लॅश सेलवर किंवा मोबाइल फोनच्या बॅटरीवरही काम करतात. एक्स्टर्नल फ्लॅशचा आकार इनबिल्ट फ्लॅशपेक्षा खूप मोठा असतो आणि त्याची क्षमताही जास्त असते. त्यामुळे कमी प्रकाशातसुद्धा चांगले सेल्फी किंवा साधे फोटो चांगल्या पद्धतीने टिपता येतात.
मोबाइल ट्रायपॉड
कंपनीने मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये बऱ्याच सोयी दिलेल्या असतात. पण त्यातले काही पर्याय वापरताना मोबाइल स्थिर ठेवला, तर त्याचा परिणाम अधिक चांगला येतो. नाईट फोटो मोड, लाँग एक्सपोजर मोड, टाइम लॅप्स व्हिडीओ यासाठी मोबाइल फोन स्थिर असावा लागतो. यासाठी ट्रायपॉडचाही वापर करता येऊ शकतो.
प्रकाश कमी असेल आणि कॅमेऱ्याचं शटर जास्त वेळ उघडं राहणार असेल, तेव्हा मोबाइल स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉड वापरावा. त्यामुळे स्पष्ट छायाचित्रे मिळतात. तसेच धावत्या ढगांचे किंवा एखाद्या ठिकाणी माणसांच्या हालचालींचे टाइम लॅप्स व्हिडीओ चित्रित करायचे असतील, तर त्या वेळीही ट्रायपॉडचा खूप उपयोग होतो.
शिवाय आपण एकटे असताना आपल्याला स्वत:चा व्हिडीओ चित्रित करायचा असेल किंवा टायमर लावून स्वत:ची छायाचित्रे टिपायची असतील, तर त्यासाठी ट्रायपॉड असणं गरजेचं आहे. अगदी १०० रुपयांपासून मोबाइल ट्रायपॉड उपलब्ध आहेत.
मोबाइलद्वारे छायाचित्रणासाठी गोरिला ट्रायपॉडचासुद्धा वापर केला जातो. या ट्रायपॉडचे तिन्ही पाय वाकवता येतात, हवे तसे गुंडाळतासुद्धा येतात. त्यामुळे सपाट जागा नसल्यास याचा वापर करणे फायदेशीर ठरते.
मोबाइल लेन्सेस
मोबाइलच्या कॅमेऱ्याच्या सेटिंग्ज, त्याच्या लेन्सची फीचर्स आपल्याला बदलता येत नाहीत. कॅमेऱ्याप्रमाणे मोबाइलची लेन्स बदलता येत नाही. मोबाइल कॅमेऱ्याचा शटर स्पीड, फोकस सेटिंग्ज हे ठरलेलेच असते. त्यामध्ये हवा तसा बदल करून घेता येत नाही. यावर पर्याय म्हणून एक्स्टर्नल लेन्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर आपण कॅमेऱ्यावर लावून करू शकतो. त्यामुळे मोबाइलद्वारे अधिक चांगल्या दर्जाची छायाचित्रे टिपता येतात. वाइड अँगल लेन्स, फिश आय लेन्स, मॅक्रो लेन्स, झूम लेन्स अशा विविध प्रकारच्या लेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत. कॅमेऱ्याच्या फीचर्सचा पूर्ण वापर या लेन्सच्या मदतीने करता येऊ शकतो.
गिम्बल
एखाद्या व्हिडीओमध्ये माहिती चांगली असेल, पण व्हिडीओ भरपूर हललेला असेल, तर तो पाहणे कोणालाही आवडणार नाही. म्हणूनच मोठय़ा प्रमाणत व्हिडीओ चित्रित करणाऱ्यांसाठी गिम्बल हे एक उत्तम यंत्र आहे. गिम्बलच्या मदतीने स्थिर व्हिडीओ कॅप्चर करता येतो. मोटर्स आणि सेन्सरच्या मदतीने हे उपकरण काम करते. मोबाइल एखाद्या गिम्बलला लावून चित्रण केले तर चांगला स्थिर व्हिडीओ मिळू शकतो. हल्ली प्री-वेिडग फिल्म्स, माहितीपट चित्रीकरण, म्युझिक व्हिडीओचे चित्रीकरण यासाठी गिम्बलचा वापर मोठय़ा प्रमाणावर करतात.
महत्त्वाच्या सूचना
मोबाइलद्वारे छायाचित्रण करण्याआधी कॅमेरा एखाद्या रुमालाने किंवा मऊ कापडाने अलगद पुसून घ्या. यामुळे कॅमेऱ्यावरील बोटांचे ठसे, धूळ पुसली जाऊन छायाचित्र अधिक सुस्पष्ट येते. यासाठी कोणत्याही लेन्स क्लिनरचा किंवा तत्सम रसायनांचा वापर करू नये. त्याने कॅमेराची हानी होऊ शकते.
मोबाइल फोटोग्राफी करताना शक्यतो फ्लॅशचा उपयोग टाळावा. त्यामुळे काही वेळा ज्या व्यक्ती अथवा वस्तूचे छायाचित्रण करायचे आहे, त्यावर अधिक प्रकाश पडून छायाचित्र बिघडण्याची भीती असते. शक्यतो गरज असेल तरच फ्लॅशचा वापर करावा. मोबाइलमधील सेटिंग्जनुसार आपल्याला छायाचित्रातील प्रकाशयोजना बदलता येते. डय़ुअल एलईडी फ्लॅश असेल तर त्याने छायाचित्र चांगले येते, मात्र सिंगल फ्लॅश छायाचित्रणासाठी अपुरा असतो.
मोबाइलद्वारे छायाचित्रण करताना फिल्टरचा उपयोग शक्यतो टाळावा. फिल्टर्स वापरून वेगळाच परिणाम साधता येत असला, तरीही त्यामुळे दृश्य आभासी वाटते.
झूमचा वापर गरजेपुरताच करावा, झूम न करता छायाचित्रे टिपल्यास अधिक चांगला फोटो येऊ शकतो.
उपलब्ध प्रकाश, फोकस याकडेसुद्धा लक्ष द्या. मोबाइलमधील छायाचित्रांची तुलना डीएसएलआरशी करू नका. फीचर्स, फोटो काढण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने त्यामध्ये तफावत आढळणारच.