टीकायन
पंकज भोसले –  response.lokprabha@expressindia.com

संख्येने सदैव मूठभर असलेले पट्टीचे वाचक त्यांच्या अविश्रांत वाचनासाठी सध्याच्या काळात अधिक ठळक होणे स्वाभाविक आहे. जग ना-पुस्तकी होऊ पाहत असताना तीन विलक्षण आशावादी पुस्तकवेडे आपल्या वाचनवेडाच्या, ग्रंथप्रेमाच्या, वाचलेल्या विलक्षण ग्रंथांच्या आनंदयात्रेत वाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठीत अलीकडच्या काळात प्रकाशित झालेल्या तीन ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातल्या ग्रंथांच्या निमित्ताने इथल्या सद्यवाचनस्थितीचा विस्तृत आढावा..

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati temple
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?

मराठी वाचनसंस्कृती वगैरे…

स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यांवर भारताच्या इतर राज्यांसह महाराष्ट्रातही गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील तफावत वाढत चालली असल्याचा सिद्धांत दर दशकांत उच्चरवात मांडला जातो. तसाच एक सिद्धांत मराठी वाचन व्यवहाराविषयी काढता येऊ शकेल. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील वाचणारे आणि न वाचणारे यांच्यातील तफावत वाढतीच राहिली असून वाचणाऱ्यांच्या अधिकाधिक वाचनामुळे ते अधिकाधिक न वाचणाऱ्यांपेक्षा वेगळे ठरत गेले. या वाचनवेडय़ांच्या पुस्तकनादाची पहिली पायरी दुर्मीळ पुस्तकांचा शोध आणि जतन करण्याची खुमखुमी कायम राखण्याची होती आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे आपल्या वाचनावर लिखाण करण्याची.

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आणि भाषेत वाचणारा हा आपल्याकडची वाचनसंस्कृती वगैरे फुलविण्याच्या हेतूने वाचक बनत नाही. (ती एकाच प्रकारच्या वाचकसमूहातून घडून येणारी गोष्ट असते.) वेळ घालविण्याच्या इतर कोणत्याही साधनाहून पुस्तक वाचनाचा पर्याय त्याला श्रेष्ठ असल्याचा आत्मिक साक्षात्कार विशिष्ट वयात झालेला असतो. परिणामी त्याची आपल्याला आवडीच्या विषयावरची वाचनभूक किंवा ग्रंथलालसा एखाद्या व्यसनामध्ये परावर्तित झालेली असते. आयुष्यातला प्रचंड वेळ, अमाप पैसा खर्च करून ग्रंथ हस्तगत करण्याची असोशी त्याच्या अंगी अंमळ अधिक प्रमाणात असते.

विलक्षण समाज-संस्कृतीदर्शक आणि साहित्याचे भाष्यकार अशोक शहाणे यांनी द्रुतगती हल्ल्याद्वारे ‘आजकालच्या वाङ्मयावर ‘क्ष’ किरण’ या निबंधातून १९६३ साली महाराष्ट्राला थोर लेखकांची परंपरा असल्याचा भ्रमाचा भोपळा टाकून फोडला होता. (शहाण्यांच्या नियमाप्रमाणे ३० वर्षांची ‘एक्स्पायरी डेट’ उलटूनही) त्यांचा निबंध आजही ‘कोसला’ कादंबरीइतकाच टवटवीत आणि रसरशीत आहे. कारण मराठी साहित्याने आपल्या भोवती परीघ निर्माण केल्याबद्दल जी खंत त्यांनी व्यक्त केली होती, त्या परिस्थितीत इतक्या वर्षांनंतरही ठोस म्हणावा असा बदल झालेला दिसत नाही. हा निबंध आज वाचायला मिळतो त्या ‘नपेक्षा’ लेखसंग्रहामध्ये शहाण्यांनी ‘वाचकाची कैफियत’ नावाचा आणखी एक तिरकस निबंध लिहिला आहे. त्यात एका निष्कर्षांप्रत येऊन ते म्हणतात, ‘‘वाचणाऱ्यापेक्षा लिहिणाऱ्याला मोकळीक फार आहे. एक मोठी मोकळीक म्हंजे लिहिणारा मरून गेला तरी त्यानं लिहिलेलं तसंच राहतं. ते काही लेखकाबरोबर मरून जात नाही. वाचणाऱ्याचं सगळंच हवेतलं, काल्पनिक, त्याच्यापुरतं. तेव्हा तो मेला की मागं काहीच उरत नाही. लेखक मरून गेला तरी वाचक त्याचं लिखाण वाचू शकतो. स्वत:चा जीव ओतून तो ते जिवंत करू शकतो.’’ (नपेक्षा, २००५ लोकवाङ्मयगृह)

शहाण्यांच्या या नियमानुसार गेल्या शतकभरामध्ये मराठीतील ग्रंथवेडय़ांची किंवा वाचणाऱ्यांची थोर परंपरा बऱ्यापैकी अज्ञात राहिली. अन् जी समोर आली ती पट्टीचे वाचून त्यावर हिरिरीने लिहिते होणाऱ्या लेखकांमुळे. अन् त्यांच्या नोंदींतून आपल्याला त्रोटक प्रमाणात का होईना, मराठीतील ग्रंथजोपासनेची आणि पुस्तकप्रेमाची जातकुळी उमजू शकली.

सन १९३५ साली मुंबई विद्यापीठाने मॅट्रिक्युलेशनच्या मराठीकरिता विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील ‘वाचन’ या निबंधाला अवलोकनार्थ लावले होते. वाचनाचे ज्ञान व मनोरंजन हे लाभ, मनोरंजनाच्या इतर पर्यायांशी त्याची तुलना आणि मराठीतील ग्रंथसंग्रहाची १०० वर्षांपूर्वीची स्थिती यावर विवेचन केले आहे. त्यात त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘आजर्प्यत जे मोठमोठे ग्रंथकार होऊन गेले, ते बहुतकरून सर्व जब्बर वाचणारे होते असे आढळेल. यांत वस्तुत: पाहता काही आश्चर्य नाही. कारण कोणाची बुद्धी केवढीही उज्ज्वल असली, तरी खाणींतील हिऱ्याप्रमाणे तीवर काहीच संस्कार घडला नाही, तर तिचे तेज कधीही प्रगट होणार नाही.’’

चिपळूणकरांनी आपल्या काळाचे वर्णन करताना नंतरच्या पिढीतील शहाण्यांच्या शैलीतच न वाचणाऱ्यांवर या निबंधात आसूड ओढले आहेत. ते म्हणतात, की, ‘‘आमच्या देशात जुन्या पद्धतीचे जे लोक आहेत, त्यांचा एकंदरीत पाहता वाईट काळ जातो असे म्हणता येणार नाही; तरी त्यांचा विद्याभ्यास फारच तोकडा असल्यामुळे ज्ञानापासून होणारा जो परमानंद, त्याचा अनुभव त्यांस कधीही घडत नाही. श्रीमंतांची व विशेषत:  संस्थानिकांची जर आमच्या देशांतील स्थिती पाहिली, तर ती फारच शोकास्पद वाटेल.’’

निबंधमालेच्या काळात मराठी आमदनीतील वाचनाची दुस्तर स्थिती आणि तिच्यात बदल व्हावा या सद्हेतूने उपदेशामृतयुक्त वाचन महत्त्व सांगणारे लेखन नियतकालिकांमधून मोठय़ा प्रमाणावर झाले. मुळात आरंभीच्या काळात लोकसंख्येच्या मानाने ग्रंथसंपदा- नियतकालिके आणि ती विकत घेऊन वाचणारा वर्ग यांची टक्केतुलना पाहिली तर पुढल्या काळात एकूण ग्रंथवाचनाची पातळी अधिक वाढायला हवी होती. मात्र तसे  काही झाले नाही. पन्नासच्या दशकांत रेडिओ-नाटक-सिनेमादी मनोरंजन घटक पुस्तकांच्या वाचनाला आणि भाषेला मारत असल्याची चिंता व्यक्त झाली. सत्तर-ऐंशीच्या दशकांत होमव्हिडीओ, नव्वदीच्या दशकात केबल आणि दोन हजारोत्तर दशकांत सध्या एकाग्रता गॅझेट्सने गिळंकृत केल्यामुळे ग्रंथवाचन संपत चालले असल्याचा ओरडा होत आहे.

आपल्याकडल्या पुस्तकांवरील पुस्तक किंवा वाचनावरील पहिल्या पुस्तकाची अचूक नोंद सापडत नसली, तरी यादव शंकर वावीकर यांची कोल्हापूरमधून निघालेली ‘वाचन’ नावाची पुस्तिका अशा प्रकारचे पहिले पुस्तक असल्याचे मानले जाते. निबंधमालेतील चिपळूणकरांच्या ‘वाचन’ या निबंधाचे निर्मितीसाल उलगडत नसल्यामुळे वावीकर यांना वाचनावरच्या पुस्तकाचे पहिले श्रेय देता येईल, असे मराठीतील निष्ठावंत वाचक आणि ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हा पुस्तकवेडाचा अनोखा ग्रंथ लिहिणारे सतीश काळसेकर यांनी सांगितले. यादव शंकर वावीकर यांच्या या पुस्तिकेवर ‘ग्रंथमाला मासिक पुस्तकात आलेले प्रकरण’ असा उल्लेख असून प्रकाशन साल ५ नोव्हेंबर १९०० आहे. या ८० पानांच्या पुस्तिकेचे संपादन विष्णू गोविंद विजापूरकर यांनी केले असून त्यात केशव हरी पौडवाल यांचा ‘ज्ञानार्जन’ आणि गो.स. सरदेसाई यांचा ‘शिक्षण प्रसाराची एक योजना’ हा निबंधही आहे. स्वत:च्या पदराला खार लावून केलेला हा प्रकाशनाचा खटाटोप वाचन इतिहासाबाबतच्या आपल्या अनास्थेमुळे विस्मृतीत गेला असला, तरी त्या काळच्या ग्रंथ उत्साहाचे मासले दाखविणारा आहे.

‘लीळा पुस्तकांच्या’ या नितीन रिंढे यांच्या अलीकडच्या  ग्रंथात (त्यावर तपशिलात लेखात पुढे येईलच) त्यांनी ‘महाराष्ट्रीयांच्या पुस्तकसंस्कृतीवर दृष्टिक्षेप’ टाकून गेल्या १०० वर्षांतील या विषयातील ग्रंथांचा सूक्ष्मलक्षी आढावा घेतला आहे. तसेच महाराष्ट्रातील छापील प्रकाशनाला २०० वर्षे उलटल्यानंतरही इथली पुस्तकसंस्कृती प्राथमिक अवस्थेत कशी आहे, हे दाखवून दिले आहे.

रिंढेंनी घेतलेल्या इथल्या पुस्तकांवरील पुस्तकांच्या सर्वसमावेशक निरीक्षणापलीकडे काही नव्या नोंदी काढायच्या झाल्या तर त्या या पुस्तकांतील तपशिलाबाबत बोलावे लागेल. उदाहरणार्थ चिपळूणकरांच्या ‘वाचन’ या निबंधामध्ये वाचनाचे महत्त्व विद्वत्ताप्रचुर भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या पुढल्या सर्वच वाचनविषयक आणि ग्रंथविषयक लेख-पुस्तिकांचे स्वरूप हे बरेचसे आजच्या ‘सकारात्मक विचारांच्या’ पुस्तकांसारखे आहे. वाचकांमध्ये आणखी ग्रंथलालसा निर्माण व्हावी अशा प्रकारचे रंजक किस्से पेरणारे काही तपशील भानू शिरधनकर यांच्या ‘पुस्तकांची दुनिया’ या पुस्तकात आढळतात. ‘लोकहितवादी गोपाळराव देशमुख हे त्या काळात पुण्यात पुस्तकांची दुकाने नसल्याने युरोपीयनांच्या ओळखीने त्यांच्याकडून पुस्तके आणत. त्यासाठी नदीच्या काठाने चालत खडकीपर्यंत चालत इंग्रज विद्वानांकडे कसे पोहोचत.’ ‘अब्राहम लिंकन तर एकदा हवे असलेले पुस्तक विकत घेता येईना व जवळपास कुणीही मिळेना, म्हणून ते उसने मिळविण्यासाठी चाळीस मैल चालत कसा गेला होता.’ बेंजामिन फ्रँकलिन, न्यायमूर्ती तेलंग, बाबासाहेब आंबेडकर, वि.द. घाटे, वि.भि. कोलते, श्री.म. माटे, धर्मानंद कोसंबी, वि.स. खांडेकर, गोळवलकर गुरुजी, विन्स्टन चर्चिल, दत्तो वामन पोतदार अशा देशी-विदेशी ग्रंथप्रेमींच्या वाचनकलेबद्दल शिरधनकर यांची सुश्राव्य समालोचनसदृश माहिती मिळत राहते. १९६७ सालचे हे पुस्तक आज मिळवायचे असल्यास इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे.

या पुस्तकाच्या आधी १९६४ साली मुंबईतील ग्रंथप्रेमी मंडळाच्या बैठकींमधून तयार झालेल्या ‘ललित’ मासिकाने ग्रंथप्रसार आणि ग्रंथप्रचाराचे कार्य जोमाने राबविले होते. त्यात येणाऱ्या ठणठणपाळसारख्या लोकप्रिय सदराइतकेच भल्याभल्यांची आपल्या देशी-विदेशी ग्रंथ वाचनसंदर्भानी टोपी उडविणारे नाटय़समीक्षक माधव मनोहर यांचे पुस्तकांवरचे लेखही महत्त्वाचे होते. त्यांनी ललितमधून आपल्या वाचनाविषयी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखांचे पुस्तक बनू शकले नाही. ते झाले असते, तर मराठीमधल्या एका अफाट वाचन कालखंडाचे दस्तावेजीकरण पुढच्या पिढय़ांना अनुभवायला मिळाले असते.

पुढल्या काळात वृत्तपत्रीय संपादकांनी केलेल्या वाचननोंदींच्या ग्रंथांना आपसूक महत्त्व आले. गोविंद तळवलकरांच्या ‘वाचता वाचता’ या पुस्तकात ‘एटीफोर, चारिंग क्रॉस रोड’ या हेलेन हान्फच्या ग्रंथांची ओळख आहे. ‘बुक्स ऑन बुक्स’ गटातील पुस्तकांपैकी असलेले हे पुस्तक. त्यात ही अमेरिकी लेखिका आणि लंडनमधील ‘एटीफोर, चारिंग क्रॉस रोड’ पत्त्यावर असलेल्या मार्क्‍स अ‍ॅण्ड कंपनी या जुन्या-दुर्मीळ पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानातील मालक-कर्मचाऱ्यांशी झालेला पत्रसंवाद वाचायला मिळतो. तळवलकरांचे ग्रंथप्रेम विविधांगी असल्याने त्यांची ग्रंथ आस्वादकी पुस्तके मराठीतील ‘बुक्स ऑन बुक्स’ बनली नाहीत. व्यक्तिचित्र, राजकीय विश्लेषण, इतिहास, समाजशास्त्र, अभिजात ब्रिटिश साहित्य यांच्यावरच्या ताज्या पुस्तकांची मराठी वाचकांना वृत्तपत्रीय जागेच्या मर्यादेत ओळख करून देत त्यांना सजग बनविण्याचा विचार त्यातून कायम डोकावला. अरुण टिकेकर यांनी मात्र ‘अक्षरनिष्ठांच्या मांदियाळी’ या छोटेखानी पुस्तकातून पाच दशकाच्या आपल्या पुस्तकवेडासह देशी-विदेशी ग्रंथजोपासनेचा इतिहास  मांडला. ‘एटीफोर, चारिंग क्रॉस रोड’ या पुस्तकाचे टिकेकरांनी केलेले विश्लेषण त्या अनुषंगानेच येथे वाचायला मिळते. ग्रंथ-शोध आणि वाचनबोधाचा हा नमुना कुठल्याही प्रकारच्या वाचकाला दिशादर्शनास मदत करणारा ठरू शकतो.

पण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे वाचणारे आणि न वाचणारे यांच्यातील वाढत्या तफावतीचा आलेख गेल्या काही वर्षांमध्ये वर गेला असल्यामुळे समाजात अफाट वाचकांमुळे आणि अजिबात न वाचणाऱ्यांमुळे विचित्र असे ग्रंथव्यवहाराचे चित्र निर्माण झाले आहे. आज अ‍ॅमेझॉनवरल्या ऑनलाइन पुस्तक खरेदीमुळे जगातल्या कानाकोपऱ्यातून ग्रंथ उपलब्धी होऊ शकते. त्यामुळे जागतिक पातळीवर दुर्मीळ ग्रंथ ही संकल्पना हद्दपार होत चालली आहे. एका छोटय़ाशा किंडल नामक ई-बुक गॅझेटमध्ये चार मजली वाचनालयातील ग्रंथालयात भरतील इतकी पुस्तके मावत असल्याने ग्रंथालय खिशात असलेल्या व्यक्ती आहेत. तर मराठीतील पारंपरिक पुस्तकांना वाचक नसल्याने आर्थिक तोटय़ातून तगून जाण्यासाठी राज्यांतील बहुतांश खासगी मराठी वाचनालयांनी आपला कारभार आटोपता घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मराठी ग्रंथांना रद्दी किंवा खासगी संग्राहकांच्या आर्थिक वकुबानुसार आसरा मिळत आहे. मराठीत गाजलेल्या पुस्तकांच्याही पुन्हा आवृत्त्या न काढण्याच्या प्रकाशकांच्या अनास्थेमुळे दोन-तीन दशकांपूर्वी गाजलेले कित्येक लेखक साहित्यपटलावरून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. ऐंशी-नव्वदीत हौसेने मराठीऐवजी इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना टाकणाऱ्या सुसंस्कृत आई-बापांना आपली मुले त्यांच्याप्रमाणे तारुण्यात मराठीतील वाचक होऊ शकतील की नाही, याचा अंदाजच आला नाही. मुंबई-पुण्यातील खासगी वाचनालयांनी २००५ नंतर नव्या पिढीचा वाचकच मराठीला लाभला नसल्याचे कारण आपले ग्रंथालय बंद करण्यामागे असल्याचे सांगितले.

सदैव मूठभर संख्येने असलेले पट्टीचे वाचक त्यांच्या अविश्रांत वाचनासाठी याच काळात अधिक ठळक होणे स्वाभाविक होते. जग ना-पुस्तकी होऊ पाहत असताना हे विलक्षण आशावादी पुस्तकपाळ आपल्या वाचनवेडाच्या, ग्रंथप्रेमाच्या, वाचलेल्या विलक्षण ग्रंथांच्या आनंदयात्रेत वाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून नवे वाचनबीज समाजात पेरले गेले, तर वाचनाचेच भले होऊ शकेल.

तीन ग्रंथस्नेह्य़ांचे वाचनवेड…

निष्णात वाचक असलेल्या मराठी लेखकांनी आपल्या वाचनावर शिस्तीत लेखन न केल्याने शंभर वर्षांतील प्रत्येक दशकात वाचन या विषयावर तुरळक ग्रंथसंपदा निर्माण झाली. मासिकांतून आपली वाचनप्रौढी कित्येक लेखकांनी व्यक्त केली. दिवाळी अंकांमधून फडके-खांडेकरांपासून ते व्यंकटेश माडगूळकरांपर्यंतच्या मराठी साहित्यिकांचा वाचनपैस पाहायला मिळतो. अरविंद गोखले, दि. बा. मोकाशी लेखनाइतकेच वाचनकलेत निष्णात असल्याचे तपशील मिळतात. पुढे ‘लिटिल मॅगझिन’ची चळवळ पुढे नेणाऱ्या प्रस्थापितविरोधी लेखकांच्या जथ्यांमध्ये हाडाचे वाचकच खूप होते. त्यातील सतीश काळसेकरांची वाचनतपस्या अद्याप सुरूच आहे. ‘अबकडई’च्या चंद्रकांत खोतांचेही वाचन अफाट असल्याचे संदर्भ त्यांच्या काही लेखांतून सापडतात.

किलरेस्कर, मनोहर आणि स्त्री मासिकाचे सहसंपादक ल. न. गोखले यांच्या धोशातून १९६५ सालापासून मनोहर मासिकाच्या अंकात इंग्रजी पुस्तकांचा फार वेगळा परिचय प्रसिद्ध व्हायला लागला होता. त्या काळात परदेशी सिनेमांच्या चित्रकथा जशा लोकप्रिय होत्या, त्याच धर्तीवर परदेशी इंग्रजी पुस्तकाचा रंजक असा गोषवारा लेखांच्या स्वरूपात सुधाकर राजे मांडत असत. त्याकाळी मराठीतील सर्वात महाग पुस्तक दोन किंवा तीन रुपये इतक्या किमतीचे असे. राजे आपल्या सदरात लिहीत ती इंग्लंड-अमेरिकेतील पुस्तके तेव्हा १६ रुपये ८० पैसे, १४ रुपये या तात्कालिन मराठी वाचकांच्या आर्थिक आवाक्यापलीकडची होती. या सर्व लेखनाचे पुस्तक ‘वेगळे जग’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. तळवलकरांच्या आरंभीच्या लेखनाच्या समकालीन म्हणून आता त्याचे महत्त्व. ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी नव्वदच्या दशकात एका वृत्तापत्राच्या पुरवणीतून केलेले लेखनही उपयुक्त म्हणावे लागेल. देशी लेखकांसोबत एरिक फॉर्म, जाँ जेने, इतालो काल्व्हिनो या विदेशी लेखकांचे अचाटपण पहिल्यांदा मराठी वाचकांना त्यांनी उलगडून दाखविले. लॅटिन कादंबरीजगताची ओळख करून देत मारिओ वार्हास योसाच्या ‘आँट हुलिया अँड द स्क्रिप्टरायटर’ या अजब कादंबरीचा ‘विषयांतर’ या त्यांच्या ग्रंथात उत्तम परिचय आहे. ही पुस्तके मिळवणे अवघड असणाऱ्या काळात त्यांनी नव्या पिढीला या लेखकांकडे जाण्यास उद्युक्त केले. प्रदीप कर्णिक यांच्या ‘जावे ग्रंथांच्या गावा’ आणि  ‘ग्रंथ, ग्रंथालये आणि ग्रंथसंस्कृती’ या दोन पुस्तकांचेही मोल खूप आहे. पण वाचनवेडाच्या पातळ्या स्पष्ट करणारी आणि ‘बुक्स ऑन बुक्स’ या गटात मोडणारी मराठीतील महत्त्वाची पुस्तके याच दशकात प्रसिद्ध झाली आहेत. त्यातल्या सतीश काळसेकरांनी आपल्या जगण्याला वाचननोंदींच्या स्वरूपात मांडून लिहिलेल्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या देखण्या ग्रंथांत पुस्तकासोबत सिनेमा, व्यक्ती आणि समाजसंस्कृतीचा इतिहास पाहायला मिळतो. तर एकामागोमाग आलेल्या निरंजन घाटे, नितीन रिंढे आणि निखिलेश चित्रे या तीन ग्रंथस्नेह्य़ांच्या पुस्तकांमध्ये वाचनवेडाचे अनंत नमुने अनुभवायला मिळतात.

निरंजन घाटे यांचे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, नितीन रिंढे यांचे ‘लीळा पुस्तकांच्या’ आणि निखिलेश चित्रे यांच्या ‘आडवाटेची पुस्तकं’ ही गेल्या दोन वर्षांत दाखल झालेली पुस्तकांवरची पुस्तकं म्हणजे समकालातील वाचणाऱ्या आणि अजिबात न वाचणाऱ्यांना आपल्या पायरीवर जाऊन वाचन करण्यासाठी काय करायला हवे, याची दीक्षा देऊ शकतात. तिन्ही पुस्तकांची जातकुळी एकच असली, तरी प्रकृती पूर्णपणे भिन्न आहे. पाश्चात्त्य समाजातील पुस्तक संस्कृती आणि वाचन संस्कृती यांची तोंडओळख मराठी वाचकांना व्हावी या उद्देशाने रिंढे यांनी आपल्या लेखनाचा घाट घातला आहे. निरंजन घाटे यांनी आपल्या हयातभरातील ग्रंथ जमविण्याचे दाखले देत आपल्या वाचनाचे आत्मचरित्रच मांडले आहे. तर निखिलेश चित्रे यांनी जगभरातील लोकविलक्षण पुस्तकांचे गुरुत्वाकर्षण आणि त्यातला आनंद वाचकांसोबत वाटण्याचा विडा उचलला आहे. वाचनाबाबतची अनास्था-बेफिकिरी बोकाळलेल्या अवस्थेत अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज असताना एकामागोमाग ती आलीत, हीच मोठी मौज आहे.

या तिघांमध्ये वयाने, अनुभवाने, लेखन आणि वाचनाच्या दृष्टीनेही ‘दादा’ असलेल्या  निरंजन घाटे यांच्या नावावर १८०हून अधिक पुस्तके आहेत. साठोत्तरी साहित्यातील सर्व प्रवाहांची दखल घेणारे, मराठीतील रहस्यकथांचा सुवर्णकाळ जवळून अनुभवलेले आणि त्याचा अस्त कसा झाला, याची तपशीलवार नोंद असलेले ते एकमेव शिलेदार आहेत. विज्ञान लेखन ही त्यांची अधिक ओळख असली, तरी त्यांच्या परिचितांना सर्वच विषयांवर कुतुहलाने वाचत राहण्याचे त्यांचे अंग आणि ग्रंथ जमविण्याचा त्यांचा कित्येक वर्षांचा खटाटोपच जास्त ज्ञात आहे.

समकालीन प्रकाशनाच्या ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’मधील मनोगतातच त्यांनी वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणे असे म्हटले आहे. वाचनातून आपल्याला जग कळते. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. जग आपल्यापरीने घडविणारी माणसे कळतात. त्यातले वाद-प्रतिवाद कळतात. जग नावाच्या गोष्टीचा वेगळा आवाका येतो.

घाटेंचा ‘घरबसल्या जगप्रवासा’चा शिरस्ता गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. त्यांच्या सुस्पष्ट आणि पकडून ठेवणाऱ्या लेखनाची ताकद ही त्यांच्या वाचनसाधनेतून मिळालेली देणगी असून ब्रिटिश लायब्ररीतील पुस्तकांनी त्यांच्यात वाचनशिस्तीचा पाया रोवला आहे. इयत्ता तिसरी-चौथी काळात ‘गोटय़ा-चिंगी’, ‘कॅप्टन प्रताप’, ‘चंदू’ या पुस्तकांपासून वि. वा. हडप, नाथमाधव, ह. ना. आपटे आणि भा. रा. भागवत यांचे वाचन स्मरण करीत बाबुराव अर्नाळकर, मधुकर अर्नाळकर, व. ग. देवकुळे, रामराव भालेराव यांच्या वाचनाच्या आठवणी पहिल्याच लेखात त्यांनी जागविल्या आहेत. पण नुसते स्मरणरंजन असे याचे स्वरूप नाही, तर त्यासोबत आज पूर्णपणे विसरली गेलेल्या लेखकांची माहितीही ते रंजक शैलीत पुरवितात. उदा. सदानंद भिडे हे रम्यकथा प्रकाशनाचे लेखक होते. ते ‘शृंगारकथा’ नावाची माला लिहित. त्यात त्या काळच्या मानाने ते जरा जास्तच शृंगार असे. बंद खोलीत नायक नायिकेचे कपडे उतरवायचा किंवा ती त्याचे कपडे उतरवायची. नंतर त्यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फसवायची नि पैसे-दागिने घेऊन पसार व्हायची, या साच्यातल्या त्या कथा गोष्टी असत. गोष्टींसोबत पुस्तकात अर्धनग्न स्त्री-पुरुषांची चित्रंही असत, हे सांगताना ते कंसात आजकालच्या जाहिरातींमधील स्त्री-पुरुष त्यापेक्षा नग्न असतात, हा जोड पुरवितात. भिडे यांची बहुतांश पुस्तके आज लगद्यात गेली आहेत. पण त्यांचे संदर्भ केवळ घाटे यांच्याद्वारेच समजू शकतात.

पुढे पुस्तकांचा नाद विस्तारण्यास मदत करणारी मित्रमंडळी, वाचनालये आणि रद्दीची दुकाने यांतून सुरू होणारे ग्रंथपर्यटन पानोपानी भेटण्यास सुरुवात होते आणि त्यांच्या पुस्तक वाचनाचा आवाका समजायला लागतो. रहस्यकथांची ओढ कायम टिकवून ठेवत त्यांनी मराठीतील रहस्यकथांसोबत इंग्रजी रहस्यकथांकडे मार्ग वळविला. ब्रिटिश लायब्ररीत शेरलॉक होम्सपासून ते लेस्ली शार्तरीजच्या सेंट नायकाशी परिचय झाल्यानंतर त्यांनी अनेक रहस्य लेखकांच्या पुस्तकांचा फडशा पाडला. ही सारी पुस्तके वाचताना बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकातलं रहस्य उलगडत गेलं. पण बाबुराव अर्नाळकर प्रांजळपणे या कथांच्या मुळांची कबुली देत, या आठवणीही त्यांनी नोंदविल्या आहेत. गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे, नारायण धारप यांच्या वाचनाच्या मोहिनीसोबत मराठीतील कित्येक वाचक ही रहस्यकथांची पुस्तके लपून-छपून वाचत असल्याची कबुली कसे देत, याचीही इथे माहिती मिळते. मराठी रहस्यकथा प्रकाशनाच्या अद्भुत सत्यकथा त्यांनी पाहिल्या असल्याने या जगाच्या तपशिलाची इथे रेलचेल दिसते.

ज्ञात असलेल्या पुस्तकांपेक्षा अज्ञात पुस्तकांचे अवाढव्य जग घाटेंच्या या पुस्तकामुळे समोर येते. टॅबू विषयावरच्या, अश्लील ठरविल्या गेलेल्या अशा कोणत्याही पुस्तकाचे वाचन वज्र्य न करता घाटेंच्या वाचनाचा वयाच्या प्रत्येक टप्प्यातला पसारा इथे पाहायला मिळतो. विज्ञान लेखन, साहसकथा, पारमानसशास्त्राची फसवी गुहा, शब्दकोश, विज्ञान साहित्य, विनोदी आणि आचरट लेखनाचेही वाचनसंदर्भ मिळतात. उदाहरणार्थ रेल्वे फलाटांवर ए. डब्ल्यू. व्हीलर कंपनीच्या पुस्तकांच्या दुकानातून वाचलेली ‘कन्फेशन्स.’ या मालिकेतील टिमथी लिआ या लेखकाच्या पुस्तकांचे मासले घाटे यांनी दिले आहेत. चौकटीत असणाऱ्या कथानकांच्या या कादंबऱ्यांतील विनोदाचे वेगळेपण बिंबविल्याने ती पुस्तके वाचण्याची इच्छा तीव्र व्हायला लागते. शिवाय दरएक पानांवर पुस्तक, लेखकांच्या नावांच्या संदर्भानी हे पुस्तक वाचणारा संपृक्त व्हायला लागतो. जगभरच्या अभिजात पुस्तकांपासून ते झंगड म्हणून ठरविलेल्या ग्रंथांच्या वाचनाचा हा सोस आत्मसात करण्यास प्रवृत्त करणारा आहे.

प्राध्यापक आणि कवी म्हणून दोन दशकांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या नितीन रिंढे यांचा अगदी अलीकडेपर्यंत जगासाठी अज्ञात असलेला भाग म्हणजे ग्रंथ गोळा करण्याचे वेड. २०-२५ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळापासून रद्दी किंवा जुन्या ग्रंथदालनातून अद्भुत पुस्तके सापडण्याच्या त्यांच्या नशिबाच्या दंतकथा त्यांच्या परिचित वर्तुळात लोकप्रिय आहेत. आपल्या वाचनाच्या कक्षा रुंदावत प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्यासोबत परदेशी वाचनसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास सुरू होता. त्याच वेळी एका वृत्तपत्राच्या दर सोमवारी येणाऱ्या पुस्तकविषयक पानात िरढे यांच्या अभ्यासाचे दाखले उमटायला लागले होते. आठवडी सदराची वाट पाहणे दुर्लभ झालेल्या आजच्या काळात रिंढे यांच्या पुस्तकांवरील पुस्तकांची ओळख करून देणाऱ्या सदराचा वाचक वर्तुळात बोलबाला सुरू झाला होता. या सदराचे विस्तारित रूप म्हणजे दोन वर्षांपूर्वी पुस्तक दिनाच्या जवळपास प्रसिद्ध झालेले लोकवाङ्मय गृहाचे ‘लीळा पुस्तकांच्या’ हे देखणे पुस्तक.

जगभरातील पुस्तक गोळा करणाऱ्या तऱ्हेवाईक ग्रंथ जाणकारांची या पुस्तकामुळे नुसती ओळखच होत नाही, तर त्यांच्या वृत्ती प्रवृत्तींशी आपल्या ग्रंथप्रेमाची लिटमस चाचणी व्हायला सुरुवात होते. एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे की, उदारीकरणानंतरच्या नव्वदीच्या दशकात जगातील सर्वच गोष्टींचा साठा आपल्या देशात जसा खुला झाला, तसा पुस्तकांचाही मुबलक प्रवाह पाहायला मिळू लागला. त्या ज्ञानझऱ्याचा पहिला आनंद घेणाऱ्यांमधले रिंढे हे एक आहेत.

वॉल्टर बेंजामिन या एकोणिसाव्या शतकातील वस्तू आणि ग्रंथ जमविण्याच्या वेडाने झपाटलेल्या अवलियाच्या ‘अर्काइव्हज’ या बृहद््ग्रंथाच्या परिचयापासून पुस्तकातील वाचनप्रवासाला सुरुवात होते; पण लेखाचा आरंभ जॉर्ज पेरेकच्या ‘ब्रीफ नोट्स ऑन द आर्ट अ‍ॅण्ड मॅनर ऑफ अ‍ॅरेंजिग वन्स’ या लेखाने होतो. आपली पुस्तक खरेदी ३६१ पुस्तकसंख्या बंद झाल्यानंतर थांबविण्याचा निश्चय करणारा पेरेकचा मित्र ३६२ वं पुस्तक दाखल होऊ नये म्हणून शोधणारी अफलातून पळवाट खिळवून ठेवणारी आहे. पुस्तक जमविणाऱ्यांचा एखादवेळी न खरेदी करण्याचा निग्रह समोर दिसणाऱ्या खजिन्याने गळून पडण्याची सार्वकालिक आणि सार्वत्रिक घडणारी बाब इथे रंगविली आहे. िरढेंची शैली आणि लेखाच्या विषयात शिरण्यापूर्वी वाचकांचा केला जाणारा वॉर्मअप पुस्तकातील सगळ्याच लेखनाला अविस्मरणीय बनवतो.

नाहीशा होणाऱ्या पुस्तकांच्या इतिहासावर लिहिणाऱ्या स्टुअर्ट केली याच्या पुस्तकावर लिहिताना ते आपल्या ज्ञात संदर्भाचे दाखले जोडून लेखाला आणखी माहितीपूर्ण करतात. कवी कालिदास याच्या उपलब्ध नसलेल्या नाटकावर केली यांनी लिहिले आहे; पण कालिदासाइतकाच थोर नाटककार अश्वघोष यांचं एकही संपूर्ण नाटक सापडत नाही, याविषयीची माहिती स्टुअर्ट केलीपर्यंत पोहोचली नाही याचा तपशील रिंढे पुरवितात. एखाद्या वैचारिक प्रवाहात ४००-५०० वर्षे निर्माण होत राहिलेली सर्व पुस्तकं समूळ नाहीशी करणं ही अशक्य वाटणारी गोष्ट भारतीयांनी करून दाखविली, याविषयीची माहिती रिंढे यांनी दिली आहे. वेद पाठांतराद्वारे हजारो वर्षे जपून ठेवण्याचा चमत्कार भारतीयांच्या नावावर असला, तरी त्याच भारतीयांनी बौद्ध वाङ्मय इतकं समूळ नाश केले, की हजार वर्षांनी आधुनिक काळात राहुल सांकृत्यायन, धर्मानंद कोसंबी यांनी पाली किंवा संस्कृत भाषेचा आधार घेऊनही ते विलुप्त ग्रंथ उपलब्ध झाले नाहीत, याविषयी आणि केलीपर्यंत पोहोचू न शकलेल्या गोष्टींचे लेखात मुक्तहस्ते उल्लेख करतात.

लेखाच्या शेवटचा केलीचा दाखला इथे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘‘सीडी-डीव्हीडीच्या रूपाने विसाव्या शतकातील मानवाने कागदावर छापलेल्या पुस्तकाच्या नश्वरतेवर विजय मिळविला आहे, असं वाटत असतानाच सीडी या कागदाइतक्याही टिकत नाहीत असं आढळून आलं आहे आणि म्हणूनच पुस्तकाच्या शाश्वत रूपाचा मानवाने चालविलेला शोध भविष्यात सुरूच राहणार आहे.’’

मराठीत अस्तंगत होत चाललेल्या पुस्तकांच्या वैविध्यपूर्ण ग्रंथांच्या शोधाची गरज केलीच्या दाखल्यातून आणखीच महत्त्वाची वाटत आहे. कॅसानोव्हा, अल्बेर्तो मँग्वेल, रिक गेकोस्की, झ्ॉक ग्युरीन, हिटलर, मार्सेल प्रूस्तच्या पुस्तक व खासगी वस्तूंचा हयातभर संग्रह करणारा अत्तर विक्रेता यांची व्यक्तिचित्रे त्यांच्या अचाट ग्रंथवेडाला अधोरेखित करीत रंगविण्यात आली आहेत. आपल्या देशातील प्रदीप सेबॅस्टियन या ग्रंथलोलुप संग्राहकाच्या ग्रोनिंग शेल्फ या पुस्तकाचेही सुंदर विवेचन पुस्तकात आहे. अख्ख्या ग्रंथामध्ये पुस्तकांवरील पुस्तकांचे विविध प्रकार हाताळले आहेत. चरित्र, आत्मचरित्र, बुक्स ऑन बुक्समधील कथात्मक साहित्य या सर्वाची आयती नामावली वाचण्याची खुमखुमी असणाऱ्यांसमोर उपलब्ध होऊ शकते. या पुस्तकाचे आणखी एक भाषिक वैशिष्टय़ म्हणजे धोपट आणि हरखून जाऊन उपमांच्या रांगोळीयुक्त भाषेपासून वाचवून लिहिलेले लेख. ७० ते ९० च्या काळात परदेशी लेखकांचा, पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या मोजक्या मराठी लेखकांमध्ये याचा अभावच होता. त्यामुळे काळाच्या पातळीवर रिंढेंचे लेखन ग्रंथ परिचयापलीकडे वाचकाला या विषयाबाबत साक्षर करण्यास हातभार लावते.

निखिलेश चित्रे या तरुण अवलियाची ओळख दहा-पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत डीव्हीडी बुम आले तेव्हा जगभरातील आडवाटेचे सिनेमे तो गोळा करीत असल्यापासूनची आहे. सिनेसंग्राहकांच्या वर्तुळात त्याची अफाट डीव्हीडी खरेदी, त्या सिनेमांचा आस्वाद आणि त्यावर बोलण्याची, लिहिण्याची हुकमत यांचा दबदबा तेव्हा प्रचंड होता. लॅटिन अमेरिकेतील उच्चार करण्यास अवघड असलेल्या दिग्दर्शकांचे त्याहून अवघड नावांचे सिनेमे आपल्या आधी पाहून, रिचवला असल्याचा न्यूनगंड तो कुण्याही बडय़ा सिनेवेडय़ाला आजही देऊ शकतो. पण या सगळ्या स्वअर्जित छंदाचे मूळ त्याच्या अखंड वाचनात आहे, याची फार थोडय़ांना कल्पना आहे.

निखिलेशच्या वाचनाचा पसारा हा मराठीतील बालसाहित्यापासून ते ऐंशीतल्या मनोरंजक रहस्यकथांपर्यंत आहे. उर्दू कथनसाहित्यापासून ते दक्षिण अमेरिकेतील जाडजूड कादंबऱ्यांपर्यंत तो लीलया वावर करतो. (या भाषांतून पुस्तकांचा आनंद घेता यावा म्हणून उर्दूसह लॅटिन अमेरिकी भाषाही तो शिकला आहे.) हिंदूीतील श्रेष्ठ लेखकांपासून ते काफ्का आणि जपानच्या मुराकामीपर्यंत कुणाचेही त्याला वावडे नाही. बरे हे सारे करताना साठोत्तरीच्या मुख्य धारेतील साहित्य त्याने कोळून प्यायले आहे. ‘आडवाटेची पुस्तके’ या त्याच्या पहिल्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो की, ‘ही समीक्षा नाही, तर आवडलेल्या पुस्तकांविषयी इतर वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. या पुस्तकात ज्यांच्याविषयी लिहिलं आहे, त्या सगळ्या पुस्तकांनी मला वेळोवेळी श्रेष्ठ दर्जाचा वाचनानंद दिलाच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कल्पित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू व्यापक बनविली, तिला स्वच्छपणा दिला. वाचणं ही जगणं समजून घेण्याच्या प्रक्रियेला चालना देणारी क्रिया आहे. वाचनानं मला जगण्याच्या प्रक्रियेत अधिक डोळसपणे सहभागी होण्याची आस्था दिली.’’

आजोबांच्या कपाटात सापडलेल्या संस्कृत आणि प्राकृत पुस्तकांनी त्याच्या वाचनाची बैठक घडविली आहे. कथासरित्सागर, बृहत्कथामंजिरी, मिल्टनचं पॅरेडाईज लॉस्ट, दॉन किहोतेची १९०४ सालची आवृत्ती, तुकाराम गाथा, चिपळूणकरांच्या निबंधमालेची पहिली आवृत्ती या त्या कपाटातील पुस्तकांच्या वाचनाने पाया घडविलेल्या निखिलेशला जगभरातील कथात्म साहित्यामध्ये रस आहे. तो आडवाटेची पुस्तक धुंडाळण्यात आणि त्यावर सदराच्या निमित्ताने व्यक्त होण्यासाठी त्याने वापरला.

जपानी लेखक हारुकी मुराकामी याच्या ‘वाईल्ड शीप चेझ’ या कादंबरीवर लिहिताना त्याच्यातील रहस्यकथाप्रेमी जागृत असतोच, वर तो मराठी वाचकांच्या दृष्टीने तो तिचे सुंदर विश्लेषण करतो.

‘हारुकी मुराकामी आणि जगण्याची रहस्यकथा’ या शीर्षकाच्या लेखात तो म्हणतो की, ‘अज्ञात, रहस्यमय गोष्टींच्या पाठलागाचं अनादीकाळापासून चालत असलेले सूत्र मुराकामी इथे खास त्याच्या शैलीत एका आधिभौतिक पातळीवर नेऊन ठेवतो.’’ रेमण्ड काव्‍‌र्हर, रेमण्ड चॅण्डलर या अमेरिकी रहस्य कथाकारांचा मुराकामीच्या लेखनशैलीवरचा प्रभाव मांडताना निखिलेश शेवटी म्हणतो की गंभीर साहित्य आणि लगदा साहित्य यांच्या कुंपणांची मोडतोड करून त्यांना एकरूप करणारं हे पुस्तक आहे.’’ मुराकामीच्या इतर साहित्यासोबत या पुस्तकाचा अद्भुत प्रवास केलेल्यांना निखिलेश काय म्हणतोय ते चटकन कळणारे आहे. अन्तोनिओ ताबुकी या काफ्का-काल्व्हिनो-कोर्ताझार-बोर्खेस यांच्या परंपरेतील महत्त्वाच्या लेखकाच्या रेक्वियम या आणखी एका पुस्तकाचा अविस्मरणीय परिचय त्याने करून दिला आहेच. वर त्या पुस्तकावर तयार झालेला सिनेमा पाहण्याचेही लेखात सुचविले आहे.

रशियन लेखक आन्द्रे कुर्कव्ह याच्या ‘डेथ अ‍ॅण्ड द पेंग्विन’वरचा, हिंदी लेखक मनोहर श्याम जोशी यांच्या कुरु कुरु स्वाहावरचा, चिलीमधील लेखक रोबर्तो बोलानो याच्या ‘टूसिक्ससिक्ससिक्स’ या आवाढव्य कादंबरीवरचा, मिलोराद पाविचच्या ‘डिक्शनरी ऑफ खजार्स’वरचा लेख अनेकांच्या आवडीच्या लेखांमध्ये समाविष्ट आहेत. मराठी लोकांत देशोदेशीचे ग्रंथ वाचण्यात अनास्था असल्याच्या शतकभरापूर्वीच्या तक्रारी निखिलेश चित्रेने वाचलेली आडवाटेची पुस्तके पाहून फोल वाटायला लागतात. आपल्या  संग्रहातील पुस्तकांमध्ये या पुस्तकांशी आवश्यकता, हे पुस्तक वाचल्यापासून वाढायला लागते, हे खरे.

शिक्का पुसण्यासाठी…

निखिलेश चित्रे, नितिन रिंढे आणि निरंजन घाटे या तिघांच्या पुस्तकांवरच्या पुस्तकांचे आजच्या गुणात्मक वाचनाकडे घटत असलेल्या काळात प्रकाशित होणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. मनोरंजनाच्या साधनांसोबत पुस्तकांची उपलब्धताही मुबलक होते, तेव्हा नक्की काय आणि कसे वाचायचे याबाबत सर्वसामान्य वाचक गोंधळलेला राहतो. तेव्हा त्या गोंधळातून वाचनदिशा मिळाली तर चाचपडत शोधण्याचा वाचकाचा वेळ कमी होऊ शकतो. त्या अर्थाने या तिन्ही पुस्तकांमध्ये शेकडो, हजारो पुस्तकांचे संदर्भ आहेत आणि कुणी शिस्तीत त्यांचा वापर केला तर एक आयुष्य कमी पडेल इतक्या पुस्तकांची यादी तयार होऊ शकेल.

खूप वाचणाऱ्या किंवा पुस्तकप्रेमी व्यक्तींनाही आजच्या गॅझेट्सयुक्त जगात एकाग्रता आणि वाचनासाठी निवांत वेळ मिळविताना स्वत:शी झगडून वेळ खर्च करावा लागत आहे. त्यात किंडल आणि अमेझॉनच्या ऑनलाइन खरेदीने इंग्रजी पुस्तकांची गंगा सहज उपलब्ध आहे. किलोवर मिळणाऱ्या इंग्रजी पुस्तकांनाही खळ नाही.

आज जगभरातील भाषिक समुदायाकडेच फक्त दुर्मीळ, अप्राप्य पुस्तके ही संकल्पना अस्तित्वात आहे. आपणही आपल्या भाषिक पुस्तकांना हळूहळू हरवत चाललो आहोत. नेहमीच थोडय़ा संख्येने असलेला वाचकगट सध्या ज्या वेगाने न-वाचकगटामध्ये परावर्तित होत आहे, त्याचा परिणाम येत्या पाचेक वर्षांत व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत जाणवायला लागणार आहे. समाजमाध्यमावर अभिमानाने स्वभाषिक माध्यमातून व्यक्त होताना दार्शनिक चुका समाजमान्य होऊन नवीच धेडगुजरी भाषा जन्माला येण्याची भीती आहे, त्याचबरोबर येथली पुढची सारीच पिढी न-वाचक गटात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या धर्तीवर निद्रिस्त अवस्थेतून ग्रंथवाचनाकडे घेऊन जाणाऱ्या आणखी ‘बुक्स ऑन बुक्स’ची मराठीला गरज आहे. ना-पुस्तकी काळाचा शिक्का पुसण्याचा आशावाद बाळगण्यापलीकडे आपण सध्या तरी दुसरे काहीएक करू शकत नाही.